September 17, 2024
Know about Rare and HH Blood Group
Home » जाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…
काय चाललयं अवतीभवती

जाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा या रक्तगटाने सधन असल्याचे सिद्ध होत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी नोंदणीकृत संस्था आहे. या प्रतिष्ठानने बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम हाती घेतली आहे. या मोहीमेतून मालवण तालुक्यात अनेकांचा बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळले आहे.

प्रकाश तेंडोलकर

अध्यक्ष
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग

रक्त हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या बहुतांश समस्या रक्ताशी निगडीत आहेत. मनुष्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कोणत्याही कारणाने रक्त संक्रमणाची वेळ आली की रक्ताच्या उपलब्धतेची गरज भासते आणि तेव्हा रक्तदात्यांची आवश्यकता भासते. तेव्हा प्रथम आपला रक्तगट कोणता आहे हे माहीत असणे आवश्यक आहे.

प्रथम रक्तगटांबद्दल जाणून घेऊ. आजवर आपणास सर्व साधारणपणे ए, बी, एबी, ओ हे चार मुख्य गट माहीत आहेत. त्यात आर (RH) म्हणजेच ऱ्हीसस या घटकामुळे निगेटीव्ह पॉझीटीव्ह असे दोन प्रकार पडले. म्हणजे ज्यामधे RH आहे ते सर्व आरएच पॉझीटीव्ह व ज्यात RH नाहीत ते आर एच निगेटीव्ह. त्यामुळे एकूण आठ रक्तगट झाले. काहींचा रक्तगट हा निगेटीव्ह असतो तर काहींचा रक्तगट पॉझीटीव्ह असतो. निगेटीव्ह रक्तगटाचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे निगेटीव्ह रक्तगटांना दुर्मिळ रक्तगट असे म्हणतात.

सन १९०१ मध्ये कार्ल लँडस्टेनर यांना संशोधनादरम्यान रक्तगटांची माहीती झाली. तांबड्या रक्तपेशीवरील ग्लायको प्रथिनांवरुन त्यांनी A, B व AB असे रक्तगट वेगळे मांडले. पुढे १९०७ मध्ये जॉन जॅन्स्की यांनी A, B, AB व O असे चार गट मांडले. पुढे ऱ्हीसस माकडाच्या रक्तामध्ये एक घटक सापडला त्यावरुन मानवी रक्ताचा त्या घटकासाठी अभ्यास केला गेला आणि मानवी रक्तातही हा घटक सापडला त्याला RH नाव देण्यात आले ऱ्हीससचे RH हे संक्षिप्त रुप आहे. सन १९३९ मध्ये अलेक्झांडर विनर यांनी हे संशोधन केले.

बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध

सन १९५२ साली शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमधील डॉ. वाय. एम. भेंडे, सी. के. देशपांडे, एच. एम. भाटीया यांनी मुंबईमध्ये एका नवीन रक्तगटाचा शोध लागला. जो सामान्यपणे ओ गट वाटतो, मात्र ओ रक्तगटात ए व बी एन्टीजन नसतात मात्र त्यात H नावाचं अँटीजन असते, परंतु या संशोधकांना संशोधनादरम्यान असे आढळून आले की H नावाचे अँटीजन या ओ गटात आढळून आले नाही. त्यावर त्यांनी सखोल परीक्षण केले आणि त्यांनी हे संशोधन मांडले व त्याला जागतीक आरोग्य संघटना व शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाली. हा रक्तगट मुंबईमध्ये पहिल्यांदाच सापडून आला म्हणून याला “बॉम्बे ब्लड ग्रुप” असे नाव पडले , यालाच एचएच ग्रुप असेही नाव आहे.

दहा हजारात एक असे प्रमाण

बॉम्बे रक्तगट किंवा एचएच रक्तगट अत्यंत दुर्मिळ असल्याचेही सिद्ध झाले आहे, साधारण दहा लाखात चार असे याचे जागतिक प्रमाण मांडले गेले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ०.०००४ टक्के एवढ्याच लोकांचा हा गट आहे, म्हणजेेच हा अत्यंत दुर्मिळ असा रक्तगट आहे. दक्षिण आशियायी देशात हा रक्तगट जगाच्या तुलनेत सर्वाधिक आढळून येतो. ज्यामध्ये पाकिस्तान, भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश होतो. या भागात हे प्रमाण दहा हजारात एक असे आहे.

डॉ. अरुण थोरात

बॉम्बे आणि ओ रक्तगटामधील अत्यंत महत्त्वाचा फरक –

  • बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये लाल रक्तपेशींवर एच प्रतिपिंडे नसतात. परंतु एच अँटीबॉडी असतात.
    तर ओ रक्तगटामध्ये एच प्रतिजैविक असतात परंतु त्यामध्ये एच अँटीबॉडी नसतात.
  • बॉम्बे रक्त समूह हा जगातील प्रत्येक दशलक्ष लोकांपैकी फक्त चार लोकांमध्ये आढळतो.
  • एच प्रतिजनांच्या अनुपस्थितीमुळे ते वरील चार रक्त गटांपेक्षा भिन्न आहे.
  • जीनोममध्ये एच जनुक नसल्यामुळे हे घडते.
  • बॉम्बे रक्तगट आणि ओ रक्तगटाची तुलना करताना, दोन्ही रक्त गटांमध्ये ए प्रतिजन आणि बी प्रतिजन नसतात. परंतु ओ रक्तगटामध्ये एच जनुक असते; म्हणून, एच प्रतिजन समाविष्टीत आहे.
  • बॉम्बे रक्तगटामध्ये ए आणि बी अँटीजेन्स नसल्यामुळे हे चुकून ओ रक्तगट म्हणून समजले जाऊ शकते. म्हणूनच रक्त घेण्यापूर्वी योग्य रक्तगट तयार करणे आणि चाचण्या पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.
  • विशेषत: एच रक्तगटाचे बाँम्बे रक्तगटापासून वेगळे करण्यासाठी एच अँन्टीजेनची तपासणी केली गेली पाहिजे. तसे न केल्यास रक्तसंक्रमणाच्यावेळी रुग्णामध्ये हेमोलिटिक रक्तसंक्रमण प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते.
  • ज्या लोकांचा बॉम्बे रक्तगट आहे त्यांना फक्त त्याच बॉम्बे फेनोटाइपमधील रक्त द्यावे लागते.
    अन्य कोणत्याही गटाचे रक्त त्यांना चालत नाही.
  • बाँम्बे ब्लड ग्रुप हा A neg/ B neg / AB neg/ O neg या सर्व निगेटिव्ह दुर्मिळ गटांपेक्षाही अत्यंत दुर्मिळ आहे.

भारतात केवळ ३० जणच सक्रिय दाते

थिंक फाऊंडेशनच्या विनय शेट्टी यांच्या माहितीनुसार सर्व भारतभर ३५० लोक या गटाचे आहेत. तथापी यातील ३० जणच सक्रिय दाते आहेत. दुर्मिळतेची शक्यता लक्षात घेता बाँम्बे ब्लड ग्रुपच्या उपलब्धतेच्या अभावाने मृत्यूची शक्यता खूपच जास्त आहे, जर वेळेत रक्तदाता व रक्त उपलब्ध नाही झाले तर मृत्यू जवळजवळ शंभर टक्केच.

सन १९१७ ला श्रीलंकेतील कर्करुग्ण या रक्तगटाच्या अभावाने मृत्यूमुखी पडला. त्याला बॉम्बे ब्लडग्रुप तर हवा होताच शिवाय तो निगेटीव्ह हवा होता. या गटातही पॉझिटिव्ह निगेटीव्ह प्रकार आहे. विक्रम यादव यांनी भारतात एकूण ११ बॉम्बेब्लड ग्रुपच्या व्यक्ती असल्याचे सांगितले आणि पैकी महाराष्ट्रात एकही नाही अशी माहिती सन २०१५ ला दिली होती. ज्यावेळी पहिली निगेटीव्ह व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सापडलेली, तिच्यासाठी विक्रम यादव यांनी कोलकत्ता, कोईमत्तूर, चेन्नई व गुजरात येथील चार दात्यांचे नियोजन केले होते.

भारतात रक्तदान क्षेत्रात काम करणारे व विशेषतः बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी ज्या संस्था व व्यक्ती काम करतात त्यात महत्त्वाचे नाव ‘थिंक फाऊंडेशन’ हे आहे, आतापर्यंत अनेकांना हे रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे. रक्तदाता शोधणे रक्त गोळा करणे व ते योग्यवेळी योग्य प्रकारे लाभार्थीपर्यंत पोहचवायचे काम थिंक फाऊंडेशनने केले आहे.

सांगलीचे विक्रम यादवही सक्रिय रक्तदाते

सांगलीचा बॉम्बे ब्लड ग्रुप संघटनेच्या विक्रम यादव यांनीही रक्तदानाचे काम केले आहे. यादव यांचा स्वतःचा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. त्यांनी देशभरातच नव्हे तर परदेशी जाऊनही अनेकवेळा रक्तदान केले आहे. तेही या रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय आहेत. बॉम्बे ब्लडग्रुपसाठी ते कार्य करतात.

बंगळूरचे संकल्प इंडिया फाऊंडेशनही सक्रिय

बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी काम करणारी तिसरी संस्था बंगळूरची आहे. बंगळूरची ‘संकल्प इंडिया फाऊंडेशन ‘ ही संस्था बॉम्बे ब्लड ग्रुपच्या दात्यांच्या नोंदी ठेवते. या संस्थेच्या माध्यमातून बंगळूरच्या देवनगरे रक्तपेढीने म्यानमारला रक्त पोहचवले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा अन् बॉम्बे ब्लड ग्रुप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा या रक्तगटाने सधन असल्याचे सिद्ध होत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी नोंदणीकृत संस्था आहे. या प्रतिष्ठानने बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम हाती घेतली आहे. या मोहीमेतून मालवण तालुक्यात अनेकांचा बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळले आहे.

एका पाहणीत पंचवीस हजार लोक संख्येत सहा व्यक्ती या गटाच्या सापडल्या तर ४ ते ५ हजार लोकसंख्येत यापैकी ४ जण राहतात त्यातील तीनजण डोनर आहेत. पंकज गावडे, सपना पडवळ, व सुधीर कांबळी अशी या रक्तदात्यांची नावे आहेत.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ बागवान यांच्या सहकार्याने या रक्तगटाची शोध मोहिम सुरु झाली आहे. जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, एसएसपीएम कॉलेज व लाईफ टाईम हॉस्पिटल रक्तपे ढी या तीनही रक्तपेढ्यांच्या माध्यमातून ही शोध मोहिम सुरु केली आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान लवकरच संपूर्ण मालवण तालुक्यात ही मोहीम राबवणार आहे. आतापर्यंत प्रतिष्ठानकडे जिल्ह्यातील एकूण १४ लोकांची नोंद आहे पैकी एक निगेटीव्ह गटाची व्यक्ती आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

संत ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

भिक मागून कोणी राजा होत नाही तर….

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading