निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर खरंच बुद्धी नाठी होऊन बौद्धिक व श्रमिक कामे करण्याची क्षमता संपुष्टात येते का ? उत्तर अगदी थेटपणे नाही असे आहे पण; त्यासाठी मनाचे तारुण्य ओसरणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल. स्वतःला आनंद देईल अशा रचनात्मक कामात गुंतवून ठेवावे लागेल.
गंगाधर मुटे
शरीर वृद्ध होणे आणि मन वृद्ध होणे या दोन परस्परभिन्न कार्य-प्रक्रिया-पद्धती आहेत, इतके एकदाचे लक्षात आले की पुढील रहस्यांचे भेद आपोआप उलगडायला लागतात. शरीर वृद्ध होऊन अगदी जर्जर झाले तरी मन मात्र चिरतरुण ऊर्जास्रोत टिकवून ठेवलेल्या व्यक्ती आपल्याला सभोवताल नेहमीच बघायला मिळतात. देवानंद सारखा व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यँत चित्रपट निर्मितीत गुंतून होता. मनाला नवनिर्मितीत सतत गुंतवून ठेवले आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली मनाला दबू न देता खेळकर व प्रसन्न भावनेने कर्तव्यदक्षता स्वीकारली तर मनाला अकाली वृद्धत्व येण्यापासून परावृत्त करता येते.
खिलाडूवृत्ती, उनाडपणा, खोडकरपणा, विनोदीवृत्ती आणि चंचलता मनाला तारुण्य बहाल करते याउलट धीरगंभीरपणा, अतिसभ्यता, अतिप्रगल्भता, अतिप्रतिष्ठा जोपासणारी जीवनशैली व वेशभूषा मनाला अकाली म्हातारपणाकडे खेचत नेते. नाचत बागडत संचार करणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीला परकरपोलक्याऐवजी साडी नेसवून दिली तर लगेच तिची शरीरभाषा पोक्त आणि वयस्क स्त्री सारखी बदलायला लागते. अर्थात अगदी लहानसहान व किरकोळ बाबीसुद्धा माणसाचे बालपण हिरावून घेत असतात. अगदी लग्न जुळायच्या आधीची मुलगी आणि लग्न जुळल्यानंतरची मुलगी यात काही तासाच्या अंतरातच प्रचंड तफावत जाणवायला लागते. त्यामुलीची जीवनशैली मोठ्याप्रमाणावर बदललेली असते. चार तासापूर्वी मुलीसारखी वागणारी मुलगी चार तासानंतर चक्क वयस्क स्त्री सारखी वागायला लागते. शारीरिक वय न वाढताही मानसिक वय कसे वाढते याचा नमुना म्हणून या उदाहरणाकडे बघता येईल.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या जबाबदारीचे ओझे माणसाच्या शरीराला व मनाला ओझे न ठरता आनंद व समाधान देऊन जाते, अंगात उत्साहाचे वारे संचारते, उत्साहित झालेला मेंदू मरगळलेल्या शरीराला ताजेतवाने करून जातो. याउलट अनिच्छेने स्वीकारलेल्या किंवा नियतीने जबरदस्तीने लादलेल्या जबाबदारीचे ओझे असेल तर उलट परिणाम दिसून येतात. यासंदर्भात दोन घटनांकडे परिणामकारक उदाहरण म्हणून पाहता येईल. माजी पंतप्रधान स्व. इंदिराजींचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर स्व. राजीव गांधी यांना पंतप्रधान व्हावे लागले. अकस्मात ओढवलेल्या इंदिराजींच्या मृत्यूचा आघात आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी यामुळे पुढील सहा महिन्यातच त्यांचा चेहरा-मोहरा बदलून गेला. गुबगुबीत नवजवान दिसणारे राजीवजी प्रगल्भ, मुत्सद्दी आणि प्रौढ दिसायला लागले.
दुसरे उदाहरण असे की, रिटायर झालेल्या मी जेवढ्या व्यक्ती पाहिल्या, त्यांच्यामध्ये एक समान धागा मला आढळला तो म्हणजे मानसिक वृद्धत्व. कर्तव्य पार पाडण्याचे किंवा शारीरिक वा बौद्धिक कार्य करण्याचे वय संपले की शासन त्या व्यक्तींना कार्यापासून मुक्ती देण्यासाठी निवृत्ती देत असते म्हणजे त्या व्यक्तीची कार्यक्षमता संपलेली असते असा एक विचित्र समज इतका जनमानसात रुळला की आपण रिटायर होणार म्हणजे वृद्ध होणार, आता पेंशन घ्यायचे आणि शांतपणे जीवन जगायचे असा त्यांचा भ्रामक समज झालेला असतो. एकदा असे मानसिक वय वाढले की शरीरही त्याला प्रतिसाद देत स्वतःचे वय वाढवून घेते आणि मग शरीरही काम करण्याची शक्ती गमावून बसते. निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर स्वबळावर नव्याने नवे कार्य, उदीम, व्यापार, उद्योग किंवा समाजसेवा सुरु करणाऱ्या किंवा जसे वयाच्या तिशीत मनुष्य नव्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतो तसे वयाच्या साठीत नव्याने नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या व्यक्ती समाजात फारशा आढळत नाहीत, याचे कारण इथेच दडलेले असते.
निवृत्तीनंतर किंवा साठीनंतर खरंच बुद्धी नाठी होऊन बौद्धिक व श्रमिक कामे करण्याची क्षमता संपुष्टात येते का? उत्तर अगदी थेटपणे नाही असे आहे पण; त्यासाठी मनाचे तारुण्य ओसरणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल. स्वतःला आनंद देईल अशा रचनात्मक कामात गुंतवून ठेवावे लागेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.