एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात राहणार. सुधारणा कधीच होणार नाही. एकदा सांगितले आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
कां रश्मी हन मृगजळा । पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसे आना । बोधाचेंचि ।।५३०।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – अथवा अर्जुना, सूर्यकिरणे व मृगजळ यांहून सूर्यमंडळ जसें फारच फार वेगळे आहे. त्याप्रमाणे हा उत्तम पुरूष मागील दोन पुरूषाहून फारच फार निराळा आहे.
उन्हाळ्यात वाळलेले गवत दुरून पाहिले असता तेथे पाण्यासारखे दिसते. प्रत्यक्षात हा भास असतो. तेथे पाणी नसते. रस्त्यावरही बऱ्याचदा पाणी पडले आहे असे वाटते पण उन्हाच्या किरणांनी तसा भास आपणास होत असतो. प्रत्यक्षात जे नाही त्याच्या मागे धावणे हा मूर्खपणा आहे. आपल्या नजरेला भास होतो. आपण मात्र या गोष्टी खऱ्या आहेत असेच जाणून चालतो. प्रत्यक्ष जीवनातही आपण अशा गोष्टींना फसतो. आपण समजत एक असतो आणि असते मात्र दुसरेच. असे कित्येकदा घडते.
मृगजळाच्या आशेने आपण त्याच्यामागे धावत राहतो. ते आता सापडेल मग सापडेल पण ते काही हाती येत नाही. धावून धावून आपणाला मात्र थकवा निश्चित येतो. जीवन जगताना अशी अवस्था होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. जागरूक राहायला हवे. जीवनात अशी मृगजळ दाखवणारी माणसे पावलोपावली असतात. येथे पैसा गुंतवा दामदुप्पट करून देऊ. असे सांगून पैसा गोळा करणारी अनेक मंडळी फसवतात. आपण मात्र दुप्पट पैसा देतील या आशेने अशा गोष्टींच्या आहारी जातो. सर्वसामान्यच नव्हे तर गर्भश्रीमंतही यात फसतात.
चार पैसे कमवायला शिका म्हणजे तुम्हाला पैशाचे मोल समजते. असा सल्ला आपणाला आईवडिलांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळतो. पैसा कमवत नाही तोपर्यंत तरी हे बोल ऐकावेच लागतात. पण आईवडील सांगत असलेल्या ह्या गोष्टी किती सत्य आहेत हे आपणास आपण स्वतः पैसे कमवायला लागल्यानंतर लक्षात येतात. हाच संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो. जीवनात अनुभव आल्यानंतरच जागरूकता येते. अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही हे यासाठीच म्हटले जात असावे. ठेच लागल्याशिवाय सुधारणा होत नाही हेही तितकेच खरे आहे.
एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात राहणार. सुधारणा कधीच होणार नाही. एकदा सांगितले आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. शिष्य जागा व्हावा, शहाणा व्हावा. हा त्यामागचा उद्देश आहे. अनुभवातूनच शिकायचे आहे. मृगजळ आहे हे एकदा समजले की पुन्हा डोळ्याला तसा भास होणार नाही. यासाठी जागरूक राहायला हवे. अनुभवातूनच अनुभूती येते. अनुभूतीतुनच आत्मज्ञान प्राप्ती होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.