कानाला सोहमचा स्वर ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. हा स्वर श्वासातून उमटतो. तो श्वास आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. श्वास घेताना जो सोहम स्वर उमटतो तो आपल्या कानांनी ऐकायला हवा. ते स्वर आपण मनाने ऐकायला हवेत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
नाइकणें ते कानचि वाळी । न पहाणें ते दिठीचि गाळी ।
आवाच्च ते टाळी । जीभचि गा ।। 209 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – जें ऐकू नये, ते कानच वर्ज्य करतात, जें पाहू नयें, तें दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करूं नये ते जीभच टाळते.
साधना करताना आवाजाचा व्यत्यय नेहमीच होतो. नको ते आवाज सहज कानावर पडतात अन् साधनेतील मन विचलित होते. डोळे मिटलेले असले तरी मनाच्या दृष्टीस मात्र दिसत असते. त्यामुळे साधनेत मन मात्र भरकटत राहाते. साधनेत मंत्राचा उच्चार करायचा असतो. मनाने ते उच्चार आत्मसात करायचे असतात, पण मनात वेगळेच उच्चार उमटत असतील तर साधना कशी होणार ? यासाठी जीभेनेच नको असलेले उच्चार टाळायला हवेत. हे सर्व आपणास साधना करता लक्षात घ्यायला हवे.
कानाला सोहमचा स्वर ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. हा स्वर श्वासातून उमटतो. तो श्वास आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. श्वास घेताना जो सोहम स्वर उमटतो तो आपल्या कानांनी ऐकायला हवा. ते स्वर आपण मनाने ऐकायला हवेत. मनामध्ये तो स्वर उमटायला हवा. मन त्यावर केंद्रीय व्हायला हवे. मनाची ही अवस्था येण्यासाठी अवधान हे खूप महत्त्वाचे आहे. अवधान असेल तर स्वरामध्ये आपण गुंतुन जाऊ शकतो. या स्वरामध्ये आपण डुंबायला शिकले पाहीजे. त्याचा आनंद आपण घ्यायला हवा म्हणजे तो स्वर आपल्या हृदयात उमटू शकतो.
हा स्वर हृदयात उमटला तर तो दृष्टीतही प्रकट होतो. डोळ्यांना बाकीचे काहीही न दिसता केवळ हे स्वरच दृष्टीस पडतात. दृष्टीला अन्य गोष्टींनी होणारा व्यत्यय दूर होऊन दृष्टी यावर केंद्रीय झाल्यास आपोआपच त्याचे उच्चार मनाल्या पटलावर उमटतात. मनाच्या पटलावर हे उच्चार उमटले, तर ते जीभेवरही आपोआपच उमटतात. जीभेवर अन्य शब्द न येता केवळ साधनेने सोहम स्वरच व्यक्त होतो. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, अशी अनुभुती आल्यानंतर ती नित्य ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
या अवस्थेच्या नित्यतेतूनच आत्मज्ञानाची अनुभुती होते. हळुहळु ब्रह्मसंपन्नता येते. स्वतःची ओळख होऊन स्वतःमध्ये ते जागृत होते. या अवस्थेतून मग समाधी अवस्थेसाठी प्रयत्न करायचे असतात. हीच अवस्था आपणास समाधीकडे नेते. यासाठी साधनेतील या पायऱ्या लक्षात घेऊन त्या चढायला हव्यात. हळूहळू त्या चढल्यास दम लागत नाही. अपेक्षीत उद्दिष्ट साध्य होऊ शकते. पटापट चढण्याचा प्रयत्न केल्यास आपण थकून जाऊ हे लक्षात घ्यायला हवे. आपणाला उद्दिष्ट गाठायचे आहे यासाठी कासवगतीने विकास झाला तरी चालेल पण उद्दिष्ट आपणच साधायचे आहे. यासाठी नको ते स्वर टाकून देऊन साधनेचा स्वर पकडून आत्मज्ञानी व्हायला हवे.
सोहमचा स्वर आपण ऐकू लागतो तेंव्हा आपोआपच आपले कान अन्य स्वरांना टाळतात. दुष्टीमध्येही नको असलेल्या गोष्टीत रस राहात नाही. जीभेवरही मग नियंत्रणात येते. इतका बदल सोहम साधनेच्या स्वराने होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.