निसर्गाची ताकद कमालीची आहे . तो मानवाला भरभरून देत असतो . चैत्र – वैशाखात वातावरण तप्त झाले तरीही निसर्गाचे देखणे रूप हा सारा उष्मा सुसह्य करते . विविध प्रकारच्या फुलांमुळे मधमाशा त्यातील मध काढून मधुघट भरून ठेवतात . या मधुघटांचा गंध तर पावले जागेवर थबकण्यास भाग पाडतो . निसर्गातील रानमेव्यातही अवीट चवीसह विविध प्रकारचे गंध दडलेले आहेत .
जे . डी . पराडकर
गंध ………! याचे नाव निघताच मन धुंद होऊन जाते. गंधासाठी कोणी आतुर नसतो असे कधी होत नाही. मंद वाऱ्यासोबत आलेला गंध मन प्रफुल्लित करतो. या गंधामुळे मनातील अन्य सारे विचार एका क्षणात दूर होऊन मन या गंधाभोवती फेर धरते. निसर्गाची ताकद केवढी आहे याची अनुभूती गंधातून येत असते. चैत्र आणि वैशाख या दोन महिन्यात तर निसर्गात विविध गंधांची जणू चढाओढ सुरू होते. निसर्गाकडून मिळणारे गंध कधीही अत्तराच्या कुपीत सापडणार नाहीत असे असतात. सृष्टीत तयार होणारे गंध निर्माण करण्याची ताकद केवळ निसर्गदेवतेकडेच आहे . सृष्टीतील गंध मानवाला निर्माण करता येणं अशक्य आहे. हा गंध जरी साठवता आला नाही तरी आठवता मात्र नक्की येतो. गंध हा खरंच वेडा असतो. अस्सल गंधाने नेत्र आपोआप मिटतात. परमेश्वराची आराधना करताना जसे नेत्र बंद होतात तद्वत् गंधाने देखील नेत्र बंद होतात. साक्षात ईश्वरसमीप घेऊन जाण्याची ताकद गंधामध्ये आहे . चैत्र आणि वैशाखात वातावरण कमालीचे तप्त झालेले असते, अशा स्थितीत निसर्ग मानवाला विविध प्रकारचा रानमेवा आणि त्यासोबत असंख्य प्रकारच्या फुलांचा गंध देऊन उपकृत करत असतो . या अस्सल गंधाने वेडं झालेले तन मन वातावरणात वाढलेला उष्मा विसरून जाते . याच कालावधीत पोफळींना लगडणारी केशरी रंगाची शिपटं निसर्गदेवतेने जणू काही अबोलीचे वळेसर माळल्यासारखी भासतात . या केशरी रंगाच्या पोफळांचा गंध म्हणजे परत परत घेत रहावा असाच वेडा गंध ! या दिवसात पोफळीच्या बागेत रमण्याचा आनंद काही औरच असतो . ज्यांनी ज्यांनी या केशरी पोफळांचा गंध घेतला आहे त्यांना आपले गाव आणि बालपण आठवल्याशिवाय रहाणार नाही एवढं मात्र खरं .
आमच्या आंबेडखुर्द या गावी बालपणी आम्ही मोठे मोठे हारे भरून पोफळं काढलेली पाहिली आहेत . आमच्या बागेत सुपारीची असंख्य झाडे होती. आंब्याफणसाच्या अन्य झाडांमुळे आलेल्या सावलीचा परिणाम म्हणून सुपारीची ही झाडे उंच उंच वाढत जणू आकाशाला गवसणी घालत असल्याचा भास व्हायचा . नैसर्गिक झऱ्यांचे पाणी रात्रभर दोन मोठ्या हौदात साठवले जायचे . सकाळ होताच आमचे चुलते ‘आबा ‘ हे हौद फोडून पोफळीच्या बागेला पाणी लावायचे . आईतला ‘ आ ‘ आणि बाबातला ‘ बा ‘ यातून तयार झालेले नाव म्हणजे आमचे ‘ आबा ‘ सर्वांवर अफाट प्रेम करणाऱ्या या माणसाने सुपारीच्या झाडांनाही तेवढीच माया लावली . या सर्वाचा परिणाम म्हणजे प्रत्येक झाड केशरी सुपाऱ्यांनी लगडलेले पहायला मिळे . दररोज सकाळी प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याची काळजी घेणाऱ्या आबांच्या पदरात झाडांनी भरभरून माप टाकलेले पहायला मिळायचे . डोंगर उतारावर असलेल्या आमच्या बागेचे दोन भाग करण्यात आले होते . दोन्ही बागांच्या सुरुवातीलाच उंचावर पाण्याचे हौद असल्याने , हे पाणी नैसर्गिक उताराने संपूर्ण बागेला लावले जायचे . ऐन वैशाखातही आमची बाग थंडगार असायची . आमच्या बालपणी आम्ही मुबलक पाण्याचे जे भरभरून सुख अनुभवले आहे त्याची आठवणही मनाला थंडाव्याचा शिडकावा करून जाते .
सुपारीच्या झाडाला सुरुवातीला येणारा तुरा हा साधारण पिवळसर रंगाचा असतो . त्याचे जेव्हा बारीक फळात रुपांतर होते त्यावेळी या सुपाऱ्या हिरव्या दिसतात . प्रत्यक्षात ज्यावेळी सुपारी तयार होते त्यावेळी त्यांचा रंग केशरी होतो . सुपारीच्या या झाडाने रंगातून किती सांकेतिक अर्थ उलगडून दाखवले आहेत याची प्रचीती येते . ज्यावेळी सुपारीच्या झाडाला तुरा येतो तेव्हा त्याचा रंग पिवळसर म्हणजे अगदी सोनं पिकणार असा असतो . कालांतराने छोट्या फळांचा हिरवा होणारा रंग हे समृध्दीचे प्रतीक समजले जाते . हीच हिरवी समृध्दी ज्यावेळी केशरी रंगात बदलते त्यावेळी या झाडापासून विरक्ती घेण्याची वेळ आली असा संदेश विरक्तीचा केशरी रंग देत असतो . सुपारीचे उंचच उंच झाड आपल्या आशा आकांक्षा नेहमीच उंच असाव्यात असा संदेश देत असते. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो . सुपारीच्या झावळीतून हिर काढून वाढवणी तयार करता येतात . झावळीची जी वीरी असते त्याचा उपयोग ‘ सुपली ‘ सारखा करता येतो . एखादी पोफळ जुनी होऊन मोडली , तर त्याचे दोन भाग करून पन्हळ म्हणून उपयोग केला जातो . सुपारीच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा पुरेपूर उपयोग आमचे अप्पा आणि आबा करत असत .
सुपारीच्या काढणीचा हंगाम म्हणजे आम्हा मुलांचा आनंद गगनात मावत नसे . उंच झाडांमुळे काही झाडांवर चढता येणं अशक्य असे . अशा वेळी एका उंच बांबूला विळा लावून सुपारीची शिपटं पाडावी लागत . पोफळं पाडल्यानंतर ती गोळा करण्यासाठी आम्ही इकडून तिकडे धावत असायचो . मोठ्या हाऱ्यांमध्ये पोफळं एकत्र केल्यानंतर ती तुळशीच्या अंगणात आणि पाणछपरात आणून त्याचे मोठे ढीग करून ठेवले जायचे . केशरी रंगाची ओली पोफळं ढीगाने पाहण्यात खूप मौज यायची . जशी पोफळं काढली जायची तशी दुसऱ्या दिवशी त्याची केशरी साल सोलण्यासाठी घरातील सर्व माणसे विळी , अडकित्ता अशी हत्यारे घेऊन बसायची . केशरी सालांचा वास जरी काहीसा उग्र असला तरी या गंधात आम्हा सर्वांचे भान हरपून जायचे . पोफळांच्या या अविस्मरणीय गंधामुळे साल सोलण्याचे कामही वेगाने होऊन जायचे . साल सोलताना हाताला येणारा गंध अधूनमधून घेतला की हा गंध थेट मस्तकापर्यंत पोहचायचा . साल काढलेली पोफळं दुसऱ्या दिवशी पाणछपराच्या पत्र्यावर , अंगणात जिकडे जागा मिळेल तिकडे वाळत घातली जायची . मुलांच्या हातून जेवढी मदत करता येईल ती करण्यासाठी आम्हा भावंडांची लगबग सुरू असे .
सुपारीच्या हंगामात घरभर सगळीकडे पोफळांच्या सालींचा वेडा गंध पसरलेला असायचा . पोफळांचे ते केशरी रंगाचे ढीग बघून आपले घर समृध्द असल्याची जाणीव व्हायची . या सुपारीने आबांच्या संसाराला चांगलाच हातभार लावला . वाळत घातलेली पोफळं सुकली की ती सोलण्याचे काम सुरू व्हायचे . पोफळं सोलताना आतमधून बाहेर येणारी सुपारी पाहून आम्हा मुलांना मोठे कौतुक वाटायचे . सुकलेल्या सुपारीचा गंधही आम्ही हृदयात साठवून ठेवायचो . सालांचा सर्व ढीग टोपलीत भरून पाणचुलीजवळ ठेवला जायचा . सकाळी हंड्यावर पाणी तापवताना या सालांचा विस्तव करण्यासाठी चांगला उपयोग व्हायचा . सुकलेली सालं भुरभुर जळत जायची हे पाहून मुलांचा सालं जाळण्याचा सपाटाच सुरू व्हायचा . घरातील मोठ्या माणसाने मुलांचे हे उद्योग पाहिल्यानंतर ओरडा मिळायच्या आतच सर्वांची पाणछपरातून पांगापांग व्हायची . त्या काळी आमच्या घरी शेकडो किलो सुपारी व्हायची . ठिकठिकाणाहून विड्याचे पान खाणारी माणसे आमच्या घरी येऊन सुपारी घेऊन जात . घाऊक सुपारी घेणारे व्यापारी घरी येऊन सुपारी घेऊन जात . घराजवळच्या वाड्यांमध्ये लग्नसमारंभ असला की त्यांना लागणारी सुपारी आमच्याकडून नेली जाई .
पोफळ हिरवे असताना काढले तर ही कोवळी ओली सुपारी आमच्या माईआतेला खूप आवडायची . लग्न होऊन आते वरळी मुंबईला गेल्यानंतरही मुंबईत जाणारे कोणी भेटले तर , तिच्यासाठी ओली पोफळं पाठवली जात .या ओल्या सुपारीचा गंध खूप वेगळा . याचा मधला गाभ्याचा भाग खोबऱ्यासारखा लागायचा त्यामुळे आम्ही हा भाग कुरतडून घायचो . मुलांनी सुपारी खाणे हे वडिलांच्या शिस्तीत न बसणारे असल्याने आमचे हे उद्योग लपूनछपून चालायचे . आतेला ओली सुपारी आवडते मग याच्या चवीत एवढे काय वेगळेपण आहे ? म्हणून आम्ही देखील ओल्या सुपारीची चव घ्यायचो . ओली सुपारी खाल्ल्याने कानशीले लाल होतात . काही ओल्या सुपाऱ्या वेगळ्या जातीच्या असल्या की त्याची खांड खाल्ल्याने , ती सुपारी लागून चक्कर येण्यापर्यंत मजल जाते. परिणामी ओली सुपारी खाताना आधी बारीक खांड खाऊन ती माजरी नाही ना ? याची खात्री करावी लागत असे . सुपारीच्या हंगामात पोफळांचा गंध घेताना मन जसं हरपून जायचे , तसे या गंधात आपले वेगळेपण स्पष्टपणे दाखवायचा तो आमच्या तुळशीच्या अंगणात असणारा नागचाफा . निसर्गातून गंध उधळण्याची जणू स्पर्धाच लागायची . प्रत्येक गंध स्वतःच्या स्तरावर श्रेष्ठच असायचा . वेडा गंध घेता घेता आम्हाला गंध वेडं व्हायला होत असे .
निसर्गाची ताकद कमालीची आहे . तो मानवाला भरभरून देत असतो . चैत्र – वैशाखात वातावरण तप्त झाले तरीही निसर्गाचे देखणे रूप हा सारा उष्मा सुसह्य करते . विविध प्रकारच्या फुलांमुळे मधमाशा त्यातील मध काढून मधुघट भरून ठेवतात . या मधुघटांचा गंध तर पावले जागेवर थबकण्यास भाग पाडतो . निसर्गातील रानमेव्यातही अवीट चवीसह विविध प्रकारचे गंध दडलेले आहेत . चैत्रपालवी देखील छोट्या छोट्या अंकुरातून मानवाला एक नवी उर्जा देत असते . निसर्गाची ही शोभा खरंच दृष्ट लागण्याजोगी असल्याने सध्याच्या बदलत्या काळात निसर्गाचा वेगाने होणारा ऱ्हास पाहून निसर्गाला खरोखरच दृष्ट लागल्याची जाणीव होते . निसर्गाचे आनंदी रूप नक्कीच सुखावह आहे . मात्र त्याचे रौद्र रूप कसे असते याची एक साधी चुणूक देखील कल्पनेपलीकडील ठरते . निसर्गाकडून मिळणारी प्रत्येक बाब मानव त्याच्याकडून हिसकावून घेऊ लागलाय . निसर्गाकडून मिळणारे सर्व काही त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून विनम्रपणे घेतले पाहिजे . असे झाले तरच त्याच्याकडून मिळणारा वेडा गंध अविरतपणे मिळवता येईल . निसर्गाकडून मिळणारा गंधच लोप पावला तर मानवी जीवन निरस बनेल .