जाणून घ्या नवनवी अवजारे
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतीच्या अन्य कामांसाठी लागणार छोटी मोठी अवजारे विकसित केली आहेत . या अवजारांची उपयुक्तता शेतकऱ्यांना नेहमीच भासते. कमीत कमी कालावधीत चांगले काम व्हायचे असेल तर अवजारांचा आधार शेतकऱ्यांनी जरूर घ्यायला हवा. शेतमजुरांची भासणारी कमतरता विचारात घेऊन शेतीकामे कमी मनुष्यबळाच्या जोरावर करता यावीत यावर कृषी विद्यापीठात संशोधन चालते. त्यातूनच विकसित करण्यात आलेली ही काही अवजारे….
– प्रा. टी. बी. बास्टेवाड, डॉ. पी. ए. तुरबतमठ, आर. के. राठोड
शेवगा काढणी झेला
अनेक शेतकरी शेवग्याच्या शेतीची लागवड करतात. त्यांना शेंगा काढणे सोपे जावे व मालाची प्रतही राखता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मनुष्यचलित काढणी झेला विकसित केला आहे.
अवजाराची वैशिष्ट्ये :
- एका तासात २५० ते २८० शेंगा काढता येतात.
- शेंगाला इजा होत नसल्याने मालाची प्रत राखली जाते.
पीव्हीसी भात लावणी चौकट
भात पिकाच्या चारसूत्री लागवड तंत्रज्ञानांतर्गत, पुनर्लागवड (१५ सेंमी X २५ सेंमी अंतरावर) व क्रिकेट खते वापरण्याची सुलभता (६५५०० प्रति हेक्टर) आणि अधिक उत्पादनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १.२० मीटर X ०.४० मीटर आकाराच्या फुले पीव्हीसी भात लावणी चौकटीची शिफारस केली आहे.
अवजाराची वैशिष्ट्ये :
- चारसूत्री तंत्रज्ञानातील १५ सेंमी X २५ सेंमी अंतरावर पुन करणे सोईचे होते.
- ब्रिकेट खतांचा वापर सुलभतेने करता येतो..
- नेहमीच्या पद्धतीपेक्षा ५ ते ६ मजूर प्रतिहेक्टरी बचत होते व उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते.
- शेतकऱ्यांना वापरण्यास सोपी, हलकी व कमी खर्चाची आहे.
मानवचलित ज्वारी काढणी यंत्र
मुळासहित ज्वारी काढण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मानवचलित ज्वारी काढणी यंत्र विकसित केले आहे.
अवजाराची वैशिष्ट्ये :
- बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त.
- हाताने ज्वारी मुळासह उपटून काढण्यापेक्षा कमी कष्टात ज्वारी काढता येते.
- वजनाला हलके (२.१ कि.ग्रॅ.) असल्याने उचलून नेण्यास सोपे.
प्रा. टी. बी. बास्टेवाड, डॉ. पी. ए. तुरबतमठ, आर. के. राठोड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.