सीमालढा ज्यांनी जीवंत आणि ज्वलंत ठेवला असे अनेक सत्याग्रही त्याग, समर्पण, निष्ठा यांची प्रतिके. या सर्वांच्या परिश्रमाला त्यागाला, न्याय मिळणार का ? प्रश्न केव्हा सुटणार ? याच प्रतिक्षेत वीस लाख सीमाबांधवांच्या संघर्षाला न्याय देण्याचे काम सुभाष धुमे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
डॉ. अच्युत्त माने, ज्येष्ठ विचारवंत
मराठी भाषिकांचा संघर्ष सहा दशकांहून अधिकाळ सुरू आहे. मराठी अस्मितेचा हा लढा. लोकशाही मानणाऱ्या देशातील ऐतिहासिक लढा म्हणावा लागेल इतका प्रदीर्घ काळ चाललेला हा लढा स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव होत असतानाही थांबलेला नाही. सीमालढ्याचा एक साक्षीदार म्हणून लेखकांने सीमालढ्याची ही भळभळती जखम, लढ्यातील अनेकांच्या सहभागाने, साक्षीने प्रवाहीत केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व मराठी भाषिकांनाही अंतर्मुख बनविणारी, अस्वस्थ करणारी आहे. यात जे नेते, कार्यकर्ते, सत्याग्रही म्हणून उतरले त्यांचे समर्पण, त्याग, मराठी अस्मितेवरील निष्ठा यातून उत्कटतेने जाणवते. सीमाप्रश्नाची झळ सहन करावी लागणारी चौथी पिढी आता मोठ्या निर्धाराने अन्याय, अत्याचार सहन करत आहे. सीमाप्रश्नाच्या निमित्ताने एखाद्या भाषिक प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात मराठी भाषिक आक्रमक होतात. अन्यायाविरूद्ध पेटून उठतात पण प्रश्न जागच्या जागीच आहे. साराबंदी, सत्याग्रह, मोर्चे, मेळावे सर्वकाही झाले. आता सर्व मराठी भाषिकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. पण प्रतिक्षा ती किती काळ ? सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. त्या आता पार झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील दिग्गज नेते या लोकलढ्यात उतरले. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, शरद पवार, एन. डी. पाटील असे सर्व पक्षीय नेते सहभागी झाले पण प्रश्न सुटला सेनापती बापट यांनी याच प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. या प्रश्नांसाठी ६९ शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. अनेकांचे बळी गेले. कित्येक संसार उद्धवस्थ झाले. विना नोकरी अनेक तरूणांचे जीवन वाया गेले. महाराष्ट्र विधानसभेत मराठी भाषिकांना समाधान मिळावे म्हणून अनेकवेळा ठराव मंजूर झाले. कर्नाटकातील नेत्यांनी एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही अशा गर्जना केल्या. पक्षीय अभिनिवेष, सत्ता टिकविणे यापलीकडे या घटनांना काही अर्थ नव्हता. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची ईच्छाशक्ती यात कमी पडली का ? मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे उदाहरण देवून सीमाभागातील नेत्यांनी शरद पवार यांच्यावर बरीच वर्षे निष्ठा दाखविली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण फक्त आश्वासने, कृतीत कमी अशी अवस्था त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावरच हा प्रश्न प्रलंबित आहे.
लढा ज्यांनी जिवंत ठेवला असे अनेक क्रांतीकारी लढवय्ये लोकलढा या ग्रंथातून आपल्याला भेटतात. हुतात्मा चौकातील गोळीबारात मारूती बेन्नाळकरांसह अनेक हुतात्मे झाले. समोर घडलेली ती घटना सांगताना मधु कनबर्गी म्हणतात, दररोज या प्रश्नांची मनाला टोचणी रहावी म्हणून गेल्या २५ वर्षापासून पायात चप्पल वापरणे बंद केले. सर्व गमावले पण सीमालढ्यातील योगदान मला मोठे समाधान देवून गेले. खानापूरच्या धोंडुबाई पाटील शंभरी पार करतानाही प्रश्न सुटण्याची आशा बाळगुन आहेत. ३७ वर्षे बैचेन अवस्थेत आहोत. महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे एवढीच ईच्छा, केवळ आशेवर जगणं. मुंबई, दिल्लीतील सत्याग्रहात भाग घेतलेले सुरेश किल्लेकर या लक्ष्यात आघाडीवर होते. सीमालढ्यातील साराबंदीचा टप्पा महत्वाचा होता. त्यात सहभागी झालेले आणि तुरुंगवास भोगलेले ७१ वर्षीय रामराव पोटे प्रश्न सुटल्याशिवाय स्वास्थ्य नाही म्हणतात. बेदम मारहाण, नंतर उपचारासाठी दवाखाना, न्यायालयीन लढाई आणि जनआंदोलन अशा दोन्ही आघाडीवर लढणाऱ्या कृष्णा मेणसे यांनाही प्रश्न रखडल्याची खंत आहे. चळवळ थंडावल्याची मनाला वेदना असल्याची कबुली खानापूरचे शाबाजी केसरेकर देतात. वयोमानानुसार ज्येष्ठ झालेली मल्लाप्पा कडोलकरसारखी मंडळी प्रश्नांच्या सोडवणुकीच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रश्नांसाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. हे हौतात्म्य वाया जाणार नाही असे रमेश कुडची यांना वाटते.
महाराष्ट्रात जाण्याच्या एकमेव ध्यासाने अनेक महिलांचा या लढ्यातील सहभाग लक्षवेधी होता. ८० वर्षाची वृद्ध आजी सत्याग्रह करून तुरुंगात गेली. माझी पत्नी नवी नवरी सत्याग्रह करून सहा महिने तुरुंगात गेली असे नारायण नेसरीकर म्हणतात. या चळवळीतून प्राणच निघून गेल्याचे त्यांचे मत आणि तेही बरोबरच. कारण कर्नाटक विधानसभेत सहा सहा आमदार भगवा वेश परिधान करून प्रवेश करीत होते. तो आकडा आता शून्यावर आलेला आपण पाहतो. महाराष्ट्रातून म्हणावा तसा उठाव होत नाही, अशी खंतही सुधाकर गुर्जरसारखे सत्याग्रही व्यक्त करतात. चळवळीने खूप अनुभव दिले. पोलिसांच्या मारामुळे शरीर खिळखिळे झाले. तरी मन अजून खंबीर आहे. बेळगांव महाराष्ट्रात हवे अशी जिद्द डॉ. इंदिराबाई खाडे वयाच्या पंचाहत्तरीत बाळगून आहेत. विविध प्रकारचे सव्वीस खटले ज्यांच्यावर होते असे एकमेव मुस्लीम कार्यकर्ते वर्षाची शिक्षा भोगलेले महमद घीवाले केवळ स्वार्थासाठी नेतेमंडळींनी या प्रश्नांचा उपयोग केला अशी खंत व्यक्त करतात. जयललिता यांनी कावेरी प्रश्नी जशी भूमिका घेतली त्याच पद्धतीने शरद पवार यांनी या प्रश्नांसाठी बेमुदत उपोषणाला ठाण मांडावे असे स्पष्ट मत शंकरराव आप्पुगोळ यांचे आहे.
आपले बंधु बळवंतराव सायनाक यांनी लढ्यासाठी सारे जीवन खर्ची घातले. सीमाप्रश्न सुटल्याशिवाय विवाह नाही ही प्रतिज्ञा शेवटपर्यंत पाळल्याचे शांताबाई पाटील सांगतात. एकूणच या चळवळीतील अनेकांचा सहभाग प्रेरणादायी आहे. आमदार विठ्ठलराव चव्हाण यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आत्मदहनाची घोषणा करतात. राजकारण आणि सत्ता यामुळे या प्रश्नांचा गुंता झाल्याचे मत गजानन पाटणेकर यांच्यासारखे ज्येष्ठ व्यक्त करतात.
मारूती बेनाळकर, गोपाळ गावडे, मधु बांदेकर, महादेव बाळगडी हे हुतात्मे, त्यांची एकत्र अंतयात्रा त्यामध्ये सहभागी होऊन त्यांची शपथ घेऊन चळवळीत राहिलेले आणि दारिद्रयात लोटले गेलेले शाहीर संभाजीराव जाधव त्यांचे योगदान महत्वाचे. १९५६ पासून या लढ्यात साऱ्या कुटुंबाचे योगदान कसे होते आणि आजही ती जिद्द कायम असल्याचे लक्ष्मणराव मुतकेकर सांगतात.
कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापौर विजय मोरे यांच्या तोंडाला काळे फासले या घटनेने त्यांच्या नगरसेवक मित्राचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. विजय मोरे हे चळवळीत अग्रेसर होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी चालविलेला शांताई वृद्धाश्रम हे त्याचे उदाहरण. साठ वर्षाच्या चळवळीत महापौरांना झालेली मारहाण हे ठळक वैशिष्ट्य. सीमालढा ज्यांनी जीवंत आणि ज्वलंत ठेवला असे अनेक सत्याग्रही त्याग, समर्पण, निष्ठा यांची प्रतिके. या सर्वांच्या परिश्रमाला त्यागाला, न्याय मिळणार का ? प्रश्न केव्हा सुटणार ? याच प्रतिक्षेत वीस लाख सीमाबांधवांच्या संघर्षाला न्याय देण्याचे काम सुभाष धुमे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
डॉ. अच्युत्त माने, ज्येष्ठ विचारवंत
पुस्तकाचे नाव – लोकलढा
लेखक – सुभाष धुमे
प्रकाशक – व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
किंमत – १०० रुपये, पृष्ठे – १३६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.