सद्गुरुच्यावर विश्वास ठेऊन कर्म करा म्हणजे सर्व समस्या दूर होतात. सद्गुरु म्हणजे कोण तर ते सुद्धा एक आत्मा आहेत. त्यांच्यात जो आत्मा आहे तो तुमच्या आमच्यातही आहे. म्हणजेच आत्म्यावर विश्वास ठेऊन कर्म करा म्हणजेच कार्यसफलता होते. आत्म्यावर विश्वास म्हणजेच आत्मविश्वास.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
ऐसेनि येणे निवाडें । जयाचां जीवी उजिवडें ।
अकर्तयातें फुडे । देखिलें तेणे ।। 1082 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – अशा या निर्णयानें ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला, त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले.
पावसाचे ढग आकाशात दिसतात. ते पुढे पुढे सरकतात. काही ठिकाणी ते बरसतात. हे सर्व आकाशात घडत असते. पण या सर्व घटनेत आकाश मात्र आहे तिथेच आहे. ढगांची हालचाल आहे. त्यातून पाऊस पडतो. पण आपण म्हणतो आकाशातून पाऊस पडतो. खरेतर ढग आणि आकाश हे वेगवेगळे आहेत. पण आपणाला दोन्ही एकच वाटतात. आकाशात ढग भरलेले आहेत. तसे आत्मा देहाने भरलेला आहे. ढग दुर झाले की मोकळे आकाशच उरते. या मोकळ्या आकाशातून पाऊस पडत नाही. तसे आत्मा आणि देह वेगळा आहे. देह कर्म करतो पण आपणास वाटते आत्म्याकडून कर्म केले जाते. प्रत्यक्षात आत्मा काहीच करत नाही. तो स्थिर आहे. स्थिर आकाशाप्रमाणे त्याचे अस्तित्व देहात आहे.
ढग वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे असतात. काही ढग काळे, काही ढग पांढरे असतात. सूर्याची किरणे पडल्यानतर काही ढग सोनेही दिसतात. प्रकृतीही वेगवेगळ्या प्रकारची असते. काही जाड असतात. काही बारीक असतात. काही काळे असतात काहीजण गोरे असतात. रक्तामुळे गोरी व्यक्ती लालसरही दिसते. प्रत्येक ढगाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. सगळेच ढग पाऊस देतात असे नाही. त्यासाठी विशिष्ट अवस्था असावी लागते. म्हणजेच प्रत्येक ढगाचे कर्म वेगळे. हे सर्व आकाशात घडते. पण आकाश या सर्वापासून अलिप्त असते. तसे वेगवेगळ्या प्रकृतीकडून घडणाऱ्या कर्मापासून आत्मा हा वेगळा असतो.
ढग वेगवेगळे आहेत आकाश मात्र एकच आहे. तसे प्रत्येक प्रकृती वेगवेगळी आहे. चराचरात सामावलेला आत्मा, सर्व प्रकृतीमध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे. आत्म्याचे हे वेगळेपण जाणून घेणे हेच अध्यात्म आहे. आत्म्याचे ज्ञान होणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हा आत्मा जाणे ओळखला तो आत्मज्ञानी, सर्वज्ञानी झाला. यासाठीच साधना आहे. कर्मापासून तो अलिप्त आहे. हा असा आत्मा ओळखणे हे मानवधर्म आहे.
सद्गुरुच्यावर विश्वास ठेऊन कर्म करा म्हणजे सर्व समस्या दूर होतात. सद्गुरु म्हणजे कोण तर ते सुद्धा एक आत्मा आहेत. त्यांच्यात जो आत्मा आहे तो तुमच्या आमच्यातही आहे. म्हणजेच आत्म्यावर विश्वास ठेऊन कर्म करा म्हणजेच कार्यसफलता होते. आत्म्यावर विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. म्हणजे सद्गुरुंच्यावर विश्वास. स्वतःचाच स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास. हा आत्मविश्वास असेल तर निश्चितच कार्यसफलता होते. आत्मविश्वासाच्या बळावर अनेक प्रश्न मार्गी लागतात. यासाठीच आत्म्याला आत्मविश्वासाने जिंका. सर्व कर्मापासून अलिप्त असणारा आत्मा ओळखून आत्मज्ञानी व्हा आणि त्याच विश्वासाने कार्यरत व्हा. म्हणजे सर्व जीवन सुखी होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.