July 27, 2024
Sant Gadge Maharaj A realistic interpretation of the work of life in Bandopant Bodekar Book
Home » गाडगेबाबांच्या जीवनकार्याचे यथार्थ विवेचन
मुक्त संवाद

गाडगेबाबांच्या जीवनकार्याचे यथार्थ विवेचन

हे ग्रंथवजा पुस्तक वाचनीय आणि दिशादर्शक ठरले आहे. पुस्तकामध्ये घटनेविषयी संदर्भ दिलेले आहेत. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संत गाडगेबाबांचे सुविचार दिलेले आहेत. शिवाय पुस्तकामध्ये संत गाडगेबाबांची थोर महापुरुषांच्या सहवासात आलेली छायाचित्रे आणि बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा यांसंबंधीची निवडक छायाचित्रे पुस्तकात दिल्याने पुस्तकाची उंची वाढलेली आहे.

✍️ राजू गरमडे

उर्जानगर, चंद्रपूर.

आपल्या देशामध्ये अनेक थोरपुरुष, समाजसुधारक, देशभक्त, क्रांतीकारक होऊन गेले. त्यांनी आपलं अवघे आयुष्य समाजासाठी वेचलं. प्रसंगी आपल्याच माणसांशी त्यांनी विरोध पत्करला.
समाजातल्या अनिष्ट प्रथा आणि परंपराना त्यांनी कडाडून विरोध केला. या थोर महापुरुषांच्या मांदीयाळी मधील एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणजे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा.

संत गाडगेबाबा हे कोण आहेत हे सांगायची आज गरज पडणार नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेलं कार्य पाहता असा संत महापुरुष पुन्हा होणार नाही असेच म्हणावे लागेल.
वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्यावर आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
नुकतेच ” संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व ( जीवनकला ) हे प्रा. रघुनाथ कडवे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे.

त्यांच्या लेखनातून संत गाडगेबाबांचे जीवन आणि कार्य अगदी सुंदरतेने मांडलेले आहेत. संत गाडगेबाबांविषयी वाचकांनी अनेक पुस्तके वाचलेली असतील तरी पण हे पुस्तक वाचकांना संत गाडगेबाबा विषयींचा आदरभाव आणि त्यांचे विविधांगी सेवेचे कार्य पाहून वाचक नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी एका गरीब परिटाच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगरुजी आणि आईचे नाव सखुबाई होते.लहानपणीचे वडिल मरण पावल्यानंतर लहानशा डेबूला घेऊन त्यांची आई माहेरी आली. आपल्या मामाच्या घरी डेबूने कष्टाची कामे केली.पुढे डेबूचे लग्न झाले. मामावर सावकाराचे कर्ज होते म्हणून सावकार डेबूच्या मामाचे शेत आपल्या अंमलाखाली आणण्याचा प्रयन्न करु लागला. डेबूजीने त्याला शेताबाहेर काढले.

यानंतर त्याने संसाराचा त्याग केला. समाजसेवेचे व्रत अंगिकारले. समाजामधील दुःखी, कष्टी आणि वंचिताचे दुःख पाहुन ते गहिवरल़े. समाजही अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये वेढल्या गेलेला होता.अशा समाजाला तारण्याचे काम करावे असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणूनच कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे कार्य ते करु लागले.

ह्या पुस्तकांमध्ये एकून ३१ प्रकरणे आहेत. या प्रकरणांमधून दोन्ही लेखकांनी संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर व विस्तृतपणे प्रकाश टाकलेला आहे. वाचकांनाही हे पुस्तक वाचताना लेखकांनी घेतलेल्या कष्टाचे ,बाबांविषयीची माहीती मिळविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे निश्चितच कौतुक वाटते.

संत गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव ‘ डेबूजी ‘होते. त्यांना लहानपणापासूनच भजनाची आवड होती. गावामध्ये कुणी कीर्तनकार आले की, डेबूजी ते ऐकण्यासाठी आवर्जून जात असत. मामाच्या गावी दापुर्‍याला असताना ते नदीच्या काठी मामाची गुरे चारायला नेत.तिथेच आपल्या संवगड्यासोबत भजन करीत असत. त्यांना भजन करण्यासाठी टाळ असलेच पाहीजे असे नाही. टिनपत्र्यांच्या झांजा आणि राॅकेलच्या रिकाम्या डब्याचे ढोल असले की, त्यांचे काम व्हायचे. या मध्ये त्यांचे मित्र त्यांची सोबत करीत असत.

भजन रात्री उशीरापर्यंत चालत असत. त्यामुळे त्यांचे मित्र उशीरापर्यंत उठत असे .गुराढोराची गैरसोय होत असल्यामुळे मुलांचे आई बाप डेबूजीच्या आईकडे तक्रार करीत असे. एवढे सारे होऊनही लहान डेबूजीचे भजनवेड काही कमी होत नसे.

डेबूजीला वाचता येत नव्हते. ते शाळेत कधी गेलेच नाही. त्याकाळी खेड्यापाड्यात शाळाच नव्हत्या.
डेबूजींना वाचता येत नव्हते तरी पण कुणी अभंग म्हटला की, ते मन लावून ऐकत असे. काही वेळातच त्यांना तो अभंग पाठ होऊन जाई. डेबुजींची बुद्धी मेधावी आणि कुशाग्र होती हे या घटनेवरुन लक्षात येते.

डेबूजीचा लहानपणापासूनच आध्यामिक मार्गाकडे ओढा होता. त्यांच मन भजन, कीर्तन याकडेच जास्त लागलेलं असायच. घर संसारामध्ये त्यांच मन कधी रमलं नाही.

डेबूजीनी १ फेब्रुवारी १९०५ रोजी घराचा त्याग केला. आपल्या जीवनात काय करायचे आहे हे त्यांनी ओळखले असावे. संत गाडगेबाबा कुण्या गावी गेले की, त्यांचा मुक्काम हा देवळात किंवा चावडीत असे. तिथे ते भजन म्हणत. सोबत गावकरीही असायचे. सुरुवातीला काही भजने म्हणत. संताचे अभंगही म्हणवून दाखवित. रोजच्या व्यवहारातले ते दाखले देऊन लोकांना समजावून सांगत. त्यामुळे लोकांना हळूहळू त्यांचे बोल आवडायला लागले. रात्री भजन झाले की, पहाटेस ते उठून दुसर्‍या गावी निघून जात. गावामध्येच एक दोन घरची भाकरी मागत.

आपल्या देशामध्ये कीर्तनाची फार मोठी पंरपरा आहे. याच कीर्तनातून संत तुकारामांनी, संत नामदेवांनी, संत कबीरांनी सामाजिक प्रबोधन केले. समाजातील अनिष्ट प्रथा आणि रुढीवर त्यांनी प्रहार केले. आणि हाच मार्ग संत गाडगेबाबांनी अवलंबिला.

एखाद्या गावात गेले ते मंदिरात उतरत आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करीत. गावामध्ये जाऊन भाकर मागत. आणि आज मंदिरात भजन आहे , ऐकायला या असे सांगत. गावकर्‍याना गाडगेबाबांचा चिंध्याचिंध्याचा पोषाख, हातात काठी आणि मडके पाहून हा कुणी भिकारी किंवा वेडा आहे असे वाटत. पण, जेव्हा लोक त्यांचे कीर्तन ऐकत तेव्हा ते त्यांना आवडत असे. सगळीकडे त्यांचे नाव होऊ लागले.

संत गाडगेबाबा मानवी जीवनातील प्रत्येक विषयांवर आणि समाजामधल्या अंधश्रद्धेवर, व्यसनावर, कर्मकांडावर आपले विचार व्यक्त करीत. त्यांचा विचारांचा प्रभाव जनसामान्यावर पडत गेला.
शिवाय अनेक धनिक, जमीनदारही त्यांचे कीर्तन ऐकायला येत. याच श्रीमंताकडून ते विविध समाजापयोगी कामे करून घेत. त्यांच्याकडून देणगी घेऊन त्यांनी अनेक नदीवर घाट बांधले. शाळा, धर्मशाळा, दवाखाने उभे केले.

आपल्या कीर्तनातुन ते लोकांना मार्गदर्शन करीत असत. व्यसनं करु नका, सावकारांकडून कर्ज काढून मुलींची लग्ने करु नका, मरिआईच्या नावाने कोंबडे, बकरे कापू नका, आपली बुद्धी गहाण ठेवू नका, भ्रमात राहू नका आणि नेहमीच सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा असे ते लोकांना आपल्या कीर्तनातून सांगत. शिवाय त्यांनी लोकांना चांगले कर्म करण्याचा सल्ला दिला.

कर्म तसे फळ मिळते, वृद्धांची सेवा करा, बालविवाह करु नका असे ते लोकांना तळमळीने सांगत.
आणि कीर्तनाच्या शेवटी ” गोपाला गोपाला – देवकी नंदन गोपाला ” असा गजर करत आणि उपस्थित प्रेक्षकांना म्हणायला लावत. सर्व माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहोत असे ते लोकांना सांगत. हा उच्च आणि हा नीच असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. जातीभेद कधी त्यांनी मानला नाही. जातीभेदाच्या भिंती त्यांनी आयुष्यभर तोडण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या मनामध्ये नेहमीच दयाभाव असायचा. प्राणीमात्राविषयी, कष्टकर्‍यांविषयी आणि अनाथ बालकांविषयी त्यांच्या मनात दयाभाव होता. अनेक अनाथ वृद्भांना, बालकांना आणि अनाथ स्त्रियांना त्यांनी आधार दिला. असे होते संत गाडगेबाबा. नेहमीच अनाथ, दुर्बल, वंचित यांना आपल्या छत्रछायेखाली घेतले.

संत गाडगेबाबांमध्ये कमालीची सहनशीलता होती. गृहत्याग केल्यानंतर ते इकडे तिकडे फिरत असताना एका गावांमधील मारुतीच्या देवळात गेले. तेथील लोकांनी त्यांची विचारपुस केली.पण बाबांनी त्याना उत्तर दिले नाही. नंतर पाटील आले. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात मडके असा हा विचित्र पोषाख केलेला हा कुणी नक्कीच वेडा असे समजून पाटलाने त्यांना ‘ गावाच्या शिवेच्या बाहेर पोहोचवून द्या ‘ असा हुकूम सोडला.

एकदा तर त्यांना मथुरेला जावेसे वाटले. ते रेल्वे गाडीत बसले आणि भुसावळ आले. नंतर ते एक दोन दिवसात खांडवा जक्शन येथे आले. तिथे त्यांना तिकीट कलेक्टरने तिकीट नाही म्हणून खाली उतरवले तसेच बाबांच्या दोन चार थोबाडीतही दिले. असे अनेक अपमान त्यांच्या वाट्याला आले तरी त्यांनी आपली सहनशीलता सोडली नाही.

संत गाडगेबाबा म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांनी आपलं अवघे आयुष्य समाजासाठी खर्ची घातलं. त्यांचं लग्न झालेल असलं तरी ते संसाराच्या मोहात कधी पडले नाही. गृहत्यागानंतर ते अनेक गावामध्ये जाऊन कीर्तन करीत.

लोकांच्या डोक्यातला कचरा ते आपल्या कीर्तनातून स्वच्छ करीत. स्वतः मंदिरा सभोवतालचा परिसर स्वच्छ करुन लोकांना स्वच्छतेचा मंत्र देत असत. अंधश्रद्धा, कर्मकांड याविषयी लोकांच्या मनातले ग्रह दूर करीत. हे सर्व करीत असताना त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदुर पसरत गेली. त्यामुळे अनेक थोर महापुरुषांशी आणि राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळून संबध आला. शिक्षणमहर्षी भाऊराव पाटील, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आबेडकर, पंडीत मदनमोहन मालवीय, डाॅ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सेनापती बापट, प्र. के. अत्रे यासारख्या अनेक महापुरुषांशी त्यांचा प्रत्यक्ष संबध आला.

संत गाडगेबाबा शाळेत कधी गेले नाहीत .तरीपण त्यांचा जगाचा अभ्यास इतर शिकलेल्यापेक्षा खुप मोठा होता. ते प्रखर बुद्भीवादी व्यक्तीमत्वाचे धनी होते. लोकांना विचार करण्यास ते सांगत असे. सत्य काय आणि असत्य काय यांची शहानिशा आपल्या बुद्धीनुसार करावी असे ते लोकांना सांगत.

समाजामधल्या पोटभरु वृत्तीबद्दल ते नेहमीच कडाडून टिका करीत. लोकांवर त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव पडत असे. कारण त्यांची ओघवती आणि रसाळ भाषा थेट अंतकरणाला भिडायची. त्यामुळे लोकांना ती आवडायची. तशीच कृतीही लोकांकडून घडायची.

हे ग्रंथवजा पुस्तक वाचनीय आणि दिशादर्शक ठरले आहे. पुस्तकामध्ये घटनेविषयी संदर्भ दिलेले आहेत. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संत गाडगेबाबांचे सुविचार दिलेले आहेत. शिवाय पुस्तकामध्ये संत गाडगेबाबांची थोर महापुरुषांच्या सहवासात आलेली छायाचित्रे आणि बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा यांसंबंधीची निवडक छायाचित्रे पुस्तकात दिल्याने पुस्तकाची उंची वाढलेली आहे.

तसेच ह्या पुस्तकाला डेबू सावली वृद्धाश्रमाचे संचालक समाजसेवी सुभाषभाऊ शिंदे यांच्या शुभकामना लाभलेल्या आहेत. सुभाषभाऊंनी गाडगेबाबांच्या नावाने चंद्रपूरात डेबू सावली वृद्धाश्रम सुरु केलेले आहे. आज या वृद्धाश्रमामध्ये ३० वृद्ध वास्तव्याला आहेत. तिथेच ह्या पुस्तकाचे विमोचन गाडगेबाबांचे तत्कालीन वाहनचालक तथा निकटवर्तीय ९३ वर्षीय भाऊरावजी काळे (मुंबई) यांच्या हस्ते झाले. आज समाजाला संत गाडगेबाबांच्या विचारांची खरी गरज आहे. हीच गरज लक्षात घेता झालेली पुस्तक निर्मिती अभिनंदनीय ठरते.
।। गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ।।

पुस्तकाचे नांव : संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व { जीवनकला }
लेखक : प्रा.रघुनाथ कडवे आणि बंडोपंत बोढेकर
प्रकाशक : साईराजे पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ : सुदर्शन बारापात्रे, चंद्रपूर.
पृष्ठे : १२१, मूल्य : ₹ १५०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जयंत नारळीकर यांना ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार

खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…

बिघडलेला बाजार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading