🌳 कृषिसमर्पण 🌳
🍇 वाढत्या तापमानात द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना 🍇
द्राक्ष बागेमध्ये तापमान वाढत असल्याने जमिनीतून बाष्पीभवनाचा वेगसुद्धा तितकाच वाढेल. तसेच पाण्याची गरजसुद्धा वाढणार आहे. अशावेळी खुंट लागवड, रिकट घेतलेल्या बागा, जुन्या बागा यामध्ये पुढील काळजी घ्यावी.
खुंट लागवड
द्राक्ष लागवडीखाली असलेल्या ज्या भागामध्ये पाण्याची कमी आहे किंवा हलकी जमीन आहे, अशा ठिकाणी रोपांची लागवड यशस्वी होण्यास अडचणी येतात. तेव्हा तापमान जास्त वाढण्यापूर्वीच लागवड करून घेतल्यास त्याचा फायदा होईल. वातावरणातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या पुढे वाढण्यास सुरवात झाल्यानंतर रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते. सध्या हे वातावरण उपलब्ध आहे. पुढे जास्त तापमान वाढून पाण्याची गरजसुद्धा जास्त वाढू शकते. त्यामुळे काही अडचणी उद्भवू शकतात. तेव्हा लवकरात लवकर खुंटाची लागवड करून घ्यावी.
रिकट घेतलेली बाग
सध्या वातावरणामुळे रिकट घेण्यास ही योग्य वेळ आहे. रात्रीचे तापमान वाढायला सुरवात झाली असून दिवसाचे तापमानसुद्धा तेवढ्याच वेगाने वाढत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन बागेत रिकट न घेतलेल्या बागेत रिकट घेण्यापूर्वीची पानगळ करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बागेत जवळपास एक आठवडा पाण्याचा ताण द्यावा. यामुळे काडीमध्ये अन्नद्रव्य एका ठिकाणी गोळा होऊन डोळे चांगले फुगण्यास मदत होईल. डोळे फुगल्यानंतर लगेच रिकट घ्यावा. रिकट घेतेवेळी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये काडीची जाडी पाहूनच रिकट घ्यावा. काडी जितकी जास्त जाड असेल तितके त्यामध्ये अन्नद्रव्य साठविले गेले असेल. म्हणजेच या साठवलेल्या अन्नद्रव्याचा फायदा घेतल्यास, रिकटनंतर ओलांडा व काड्या तयार होण्यास मदत होईल. बागेत ज्या ठिकाणी सर्वांत जास्त जाड काडी असेल, अशा ठिकाणी रिकट घ्यावा. साधारणतः 12 मि. मी. च्या पुढे असलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्याची चांगली साठवण असते. ही काडी आपल्या हाताच्या अंगठ्याच्या सर्वसाधारण जाडीची असते. मागील हंगामात जर चांगले नियोजन झाले असेल तर या वेळी अशा जाडीच्या काड्या नक्कीच मिळतील. अन्यथा, ज्या ठिकाणी काडीची चांगली जाडी मिळते अशा ठिकाणी रिकट घ्यावा.
मागील हंगामात बऱ्यापैकी रोगांचा प्रादुर्भाव झालेला असल्यास, जुन्या पानांवर करपा व भुरीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. काही ठिकाणी काडीवरसुद्धा भुरीचा तीव्र प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे ही काडी कापताना कलम जोडाच्या वर काही डोळे राखूनच कापली जाते. म्हणजेच जितके डोळे उरलेत तितके डोळे रोगग्रस्त आहेत. तेव्हा आपण रिकट घेतेवेळी काडीवरील भुरीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक ते बुरशीनाशक रिकट घेतल्यानंतर पेस्टिंगमध्येच वापरावे. यामुळे काडीवर असलेला भुरीचा प्रादुर्भाव टाळता येईल व पुढे येणारी फूट रोगमुक्त असेल.
तापमानाचा विचार करता बागेत डोळे फुटण्याकरिता रसायनाचा वापर महत्त्वाचा असतो. हायड्रोजन सायनामाईडचा वापर बागेतील सध्याचे तापमान पाहून करावा. रिकट झाल्यानंतर बागेत भरपूर पाणी द्यावे. यामुळे डोळे फुटण्यास आवश्यक असलेले वातावरण निर्माण होईल. एकसारखे व लवकर डोळे फुटतील.
जुनी बाग
लवकर छाटलेल्या बागेमध्ये सध्या फळकाढणीची लगबग सुरू आहे. विशेषतः काळ्या रंगाच्या जातींमध्ये फळकाढणी दिसून येईल. ही द्राक्षजात हिरव्या रंगाच्या जातीपेक्षा लवकर तयार होते. वातावरणातील तापमान वाढत असल्यामुळे मण्यांमध्ये गोडीसुद्धा वाढते. परंतु काही बागांमध्ये जर यापूर्वी संजीवकाचा जास्त वापर झाला असल्यास आता गोडी वाढण्यास अडचणी येऊ शकतात. या वेळी आपण पोटॅशची फवारणी किंवा जमिनीतून उपलब्धता या उपायाद्वारे गोडी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या वेळी याचा फारसा उपयोग होत नाही. संजीवकाचा अतिरेक टाळला तर या वेळी गोडी सहज मिळवून घेता येईल.
दुसऱ्या परिस्थितीमध्ये काही बागेत दाट कॅनॉपीमुळे मण्यांचा हिरवा रंग टिकून असलेला दिसतो. अशा कॅनॉपीमधील मणी हिरवे असतात; परंतु गोडी कमी असते. अशा द्राक्षांना स्थानिक बाजारात कमी मागणी असते. तेव्हा बागेतील घडांच्या अवतीभोवती असलेली कॅनॉपी मोकळी केल्यास त्याचा मण्यांतील गोडी वाढवण्यास फायदा होतो.
|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||
( सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य )