April 16, 2024
need-of-ganga-purification article by Ad Girish Raut
Home » गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे संत गोपालदास आणि संत आत्मबोधानंद यांनी २४ जूनपासुन चालू असलेल्या उपोषणात प्राणपणाला लावले आहेत. संत शिवदास हे त्यानंतर समर्पणासाठी तयार आहेत.

अॅड गिरीश राऊत

निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

गंगा प्रदूषित होणे, तिचा प्रवाह अवरूध्द होणे, यामुळे भारतीय धार्मिक व अध्यात्मिक जनमन अस्वस्थ आहे. गंगा भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे. मग गंगेला वाचवण्यासाठी उपोषण करणाऱ्या संतांना प्राण का गमावावे लागतात ?

थोडे मागे जाऊ. १०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यलढयाला प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ गीतात मातृभूमीचा ‘सुजलाम् सुफलाम्’ असा उल्लेख होता. ही स्थिती स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळापर्यंत म्हणजे साधारण सन १९५५-६० पर्यंत टिकून होती. देश सुमारे दहा हजार वर्षांची कृषिप्रधानता राखून होता. स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेला ‘चरखा’ अडगळीत गेला नव्हता. मातीला, माणसाला व श्रमाला प्रतिष्ठा होती. स्वयंचलित यंत्राला व पैशाला प्रतिष्ठा नव्हती.

साठ वर्षांपूर्वीपर्यंत शुध्द पाण्याच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्या अडवल्या, जोडल्या वा तोडल्या गेल्या नव्हत्या. कोठल्याही विहिर, झरा, ओढा, तलाव, नदीचे पाणी निःशंकपणे पिता येत होते. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. मान्सून हजारो वर्षांच्या वेळापत्रकानुसार पडत होता.
प्रत्येक गावात दोन ते तीन तलाव होते. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांची देशातील संख्या फक्त २५० होती. अगदी जैसलमेर, बिकानेर सारख्या अत्यंत कमी, चार ते आठ इंच पावसाच्या प्रदेशातही पिण्याच्या पाण्याची स्वयंपूर्णता होती. शेतकरी मिश्र व फिरत्या पध्दतीने हजारो वर्षे पर्यावरणाशी जुळवुन घेतलेल्या, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या, स्थानिक बीजांच्या आधाराने, निश्चितपणे काळ्या आईच्या विश्वासावर शेती करत होते. शेतकऱ्यांची आत्महत्या कल्पनेतही शक्य नव्हती. नद्या, सागर व इतर जलस्त्रोत मासळीने समृध्द होते. देशाच्या सुमारे ५० टक्के क्षेत्रावर घनदाट, अस्पर्श जंगल होते. टेकड्या, डोंगर व पर्वत जंगलांनी आच्छादलेले होते. ही स्थिती लक्षावधी, कोट्यावधी वर्षे टिकून होती. पट्टेवाल्या वाघांची, सन १९४७ ला असलेली, ४० ००० ही संख्या प्राणिमात्रांची विपुलता व समृध्द जैविक विविधता दाखवत होती.

तेव्हा धरणे नव्हती. बोअरवेल नव्हत्या. आज चित्र काय आहे ? हजारो धरणे आहेत, कालवे आहेत लाखो बोअरवेल आहेत व त्याचवेळी देशातील २ ७५ ००० पेक्षा जास्त गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. गेल्या ३५ वर्षांत लाखो शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. रोज सुमारे दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत.

आकलन चुकले आहे. नद्या बारमाही होत्या व हव्या, बारमाही सिंचन नव्हे. बारमाही सिंचनाचा हट्ट केला की नद्या बारमाही राहत नाहीत. तसा प्रयत्न करणाऱ्या, शहरीकरण व प्रचंड बांधकामांचा हव्यास बाळगणाऱ्या संस्कृत्या, जसे की रोम, ईजिप्त, माया, इंका इत्यादी काही शतकांत नष्ट झाल्या. धरणे, औद्योगिकरण व शहरीकरणाची पाण्याची प्रचंड राक्षसी गरज भागवण्यासाठी आली. हरित क्रांतीच्या चुकीच्या शेतीपध्दतीत रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशी नाशके, तणनाशके इत्यादी मुळे पाण्याची गरज अनेकपट वाढली. त्यासाठी धरणे आली. ही जीवनाची गरज नव्हती. जीवनशैलीची वखवख व लालसा होती. ती जंगले बुडवून, नद्या अडवून जीवनाला नष्ट करत होती.

आज देशातील ९३ टक्के नद्या पाणी पिण्यालायक नसलेल्या, प्रदूषित आहेत. घनदाट जंगल फक्त सुमारे ४ टक्के उरले आहे. टेकड्या, डोंगर व पर्वत एकामागे एक तोडले जात आहेत. त्यावरील व इतरत्रचे जंगल नष्ट होत आहे. जंगल, डोंगर व मातीच्या थराचा नदीच्या उगमाशी व तिला बारमाही वाहते ठेवण्याशी संबंध असतो. नदी जमिनीवरून तसेच भूपृष्ठाखालून, जमिनीमधुनही वाहते. वाहणे हा नदीचा धर्म आहे. त्यातून ती फक्त माणसाचे नव्हे तर अब्जावधी जीवांचे सृजन, पोषण करते. तिला अडवणारे, वळवणारे, तिचे पाणी काढून घेणारे धरण बांधणे हा अधर्म आहे. धारणा करतो तो धर्म. आज मानवजात व जीवसृष्टीची अनादिकाळापासून धारणा करणाऱ्या नद्या धोक्यात आल्याने, खरे धार्मिक व अध्यात्मिक जीवन जगणारे सानंदांसारखे ऋषि प्राणांची आहुती देत आहेत.

पण गंगा शुध्दिकरणाची योजना म्हणजे घाट बांधणे व सुशोभित करणे, निर्माल्य गोळा करणे, प्रेत टाकले जाऊ नये म्हणून स्मशानभूमी बांधणे अशी मर्यादित आहे. अशाने आतापर्यंत गंगा शुध्द झाली नाही. उलट काँक्रीटीकरण वाढले. आतापर्यंत गंगेच्या वा कोणत्याही नदीच्या उगमापासुन ते सागरात विलीन होण्यापर्यंत पाणलोट क्षेत्रासह विचार केला जात होता. परंतु औद्योगिकरणाच्या व त्यातही जागतिकीकरणाच्या काळात पृथ्वीव्यापी विचार आवश्यक ठरतो. गंगेच्या पाणलोट क्षेत्रातील लाखो कारखाने, उद्योग व शेकडो शहरे गंगेला प्रदूषित करतात. हे जगातील इतर भागांतील अर्थव्यवस्थेशी म्हणजे व्यापार व जीवनशैलीशी जोडलेले आहेत. या प्रदूषणाच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधले जात आहे.

अॅड गिरीष राऊत

गंगा शुध्दीकरणाची अपेक्षा करताना मलप्रवाह, रसायने, घातक विषारी द्रव्यांनी युक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारणे, वाळू उपसा थांबवणे, वीजनिर्मिती केंद्र, धरणे, रस्ते आदींचे प्रकल्प रद्द करणे अशा मागण्या केल्या जातात. पण जर विकसित जीवनाची आधुनिक कल्पना मान्य केली तर सिमेंट, स्टील, वाळू वापरल्याशिवाय बांधकाम होणार नाही. मोटार, विमान, काँम्प्युटर, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, ए सी, वाॅशिंग मशिन, इत्यादी हजारो वस्तुंची निर्मिती करायची तर प्रदूषणकारी कारखाने होणार. त्यातील द्रव प्रदूषण नदीत सोडले जाणार. खनिज इंधने जाळून वा धरणांद्वारे विनाश घडवून वीजनिर्मिती होणार. रासायनिक शेतीमुळे रसायने, कीटकनाशके, ट्रॅक्टर इत्यादी बनणार. याचा तुकड्या तुकड्यांत विचार करता येणार नाही. हे आधुनिक जीवनशैलीचे कृत्रिम जाळे आहे. यातील फक्त द्रव प्रदूषण थांबवा म्हटले तरी त्याच वस्तुनिर्मितीत जेथून नदी उगम पावते व वाहती राहते त्या डोंगर व जंगलांचा नाश होतच राहणार. कुणाही संवेदनशील माणसाप्रमाणे हे संतदेखील मानव व इतर सजीव सृष्टीचा संबंध ( इकाॅलाॅजी ) लक्षात घेऊन शाश्वत विकास करावा असे म्हणतात. परंतु सत्य हे आहे की “भौतिक व आर्थिक विकास हा शाश्वत असू शकत नाही. भौतिक विकास व शाश्वतता या परस्परविरूध्द गोष्टी आहेत.”

पृथ्वीवर फक्त पृथ्वीचीच पध्दत शाश्वत होऊ शकते. ती, मानव जंगलात असताना व बर्याच प्रमाणात कृषियुगात शक्य होती. मात्र स्वयंचलित यंत्र, रसायने व ‘विनिमयाचे साधन’ ही चलनाची मर्यादा ओलांडणारे अर्थशास्त्र आल्यावर पृथ्वीविरोधी पध्दत सुरू झाली. दोन्ही पध्दती एकत्र असू शकत नाहीत.

यंत्र नसतानाही पिरॅमिडसारखी प्रचंड बांधकामे, शहरीकरण, व त्यासाठी बारमाही सिंचनावर आधारित शेती करणार्या संस्कृती काही शतकांत नष्ट झाल्या. सुमारे २५० वर्षांपूर्वी खनिज ऊर्जास्त्रोत जाळून पाण्याची वाफ करून त्याच्या शक्तीवर चालणारे पहिले यंत्र पृथ्वीवर सुरू झाले तेव्हाच मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या सूत्रधारांकडून हे सतत लपवले जात होते. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डिसेंबर २०१५ मधे सर्व राष्ट्रप्रमुखांकडून झालेल्या पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी, पृथ्वीच्या सरासरी तापमानात उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत होणारी २ अंश सेल्सिअसची वाढ रोखणे हे उद्दीष्ट ठेवले गेले, तेव्हा यंत्राने संकट निर्माण केले हे मान्य केले.

आता ही वाढ फक्त पुढील पाच वर्षांत होणार आहे हे लपवण्याचा आटापिटा चालू आहे. मानव नैसर्गिक पध्दतीने जगला असता तर ही वेळ आली नसती. हजारो वर्षांचे भारतीय कृषियुग सर्व गरजा पूर्ण करत शाश्वत होऊ शकत होते. पण काही पाश्चात्यांकडून आलेले व आपण स्वीकारलेले स्वयंचलित यंत्रयुग कधीही शाश्वत होऊ शकत नाही.

खरे तर गंगा यमुना नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश हा जगातील सर्वोत्कृष्ट सुपिक गाळाच्या प्रदेशांपैकी आहे. सुमारे ८ कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका खंडाचा तुकडा आशिया खंडामधे शिरला. त्या प्रक्रियेत हिमालयाच्या पायथ्याशी भारताकडील बाजूस दोन ते तीन हजार फूट खोलीची विशाल घळ निर्माण झाली. ही घळ पुढील लाखो वर्षांत गाळाने भरली. त्यातून, कोठेही उंचसखलपणा नसलेले विस्तीर्ण गाळाचे सुपिक प्रदेश तयार झाले. दुर्दैवाने ही जीवनाची अद्भूत देणगी मिळाली असूनही, ही माणसे निर्जिव औद्योगिकरणातून रोजगार मिळवण्यासाठी मुंबई, दिल्ली, अहमदाबादकडे धाव घेतात. जगण्यासाठी रोजगार हवा असा गैरसमज औद्योगिक व शहरी रचनेमुळे पसरला आहे. जगणे व रोजगार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जगणे पृथ्वीमुळे आहे. औद्योगिक रोजगार मात्र ही जगवण्याची पृथ्वीची क्षमता नष्ट करतो. काही दशकांपुरता आधुनिक मानवकेंद्री विचार चुकीच्या दिशेनेच जाणार. पृथ्वीकेंद्री, जीवनकेंद्री शाश्वत विचार हा खरा विचार. मात्र तंत्रज्ञानातुन मिळालेल्या मोटार, मोबाईल, टीव्ही इ. वस्तुंमुळे एक मायावी जग तयार झाले आहे. या कृत्रिम जगात पैशाशिवाय जगता येत नाही. त्यात माणुस खुळावला आहे. त्याची पृथ्वीवरील वास्तवाशी व निसर्गाशी फारकत झाली आहे.

गंगा, यमुना व उत्तरेतील इतर मोठ्या नद्यांचा उगम हिमालयात होतो. हिमालयाचे बर्फाचे आवरण गेल्या काही दशकांत वातावरण बदलामुळे होत असलेल्या तापमानवाढीमुळे सातत्याने घटत आहे. गंगोत्रीच्या आसपासचा व वरील बाजूचा विस्तीर्ण प्रदेश उघडा पडला आहे. मुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे मातीचा थर झपाट्याने वाहून जात आहे. यामुळे गंगा व इतर नद्या उगमापासुन काळे, मातकट तपकिरी रंगाचे पाणी घेऊन वाहत आहेत. धरणे या मातीने भरत आहेत. फुटत आहेत. याचा परिणाम उत्तराखंड व इतर दुर्घटनांमधे दिसत आहे.

दि. १२ मे २०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रथम ४०० पीपीएम या कार्बनच्या धोकादायक पातळीची नोंद झाली. तेव्हापासुन पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर, बर्फवृष्टी, वादळे, वणवे अशा अभूतपूर्व तीव्रतेच्या दुर्घटनांचे तांडव सुरू झाले. १५ जून २०१३ रोजी ढगफुटी व त्याचवेळी दोन हिमनद्या वितळून घसरल्यामुळे झालेली केदारनाथची भयंकर आपत्ती ही याचाच भाग होती.

तापमानवाढ जगातील औद्योगिकरण व शहरीकरणातुन उत्सर्जित होणार्या कार्बन व इतर घटकांमुळे होत आहे. कोठेही कोळसा जाळून वीज बनली, रिफायनरीत तेल शुध्दीकरण झाले, मोटार चालली, सीमेंट – स्टील बनले तरी हिमालयाचा बर्फ वितळतो आणि, कोठेही औद्योगिक जीवनशैली जगणार्या माणसांसाठी गंगेच्या पाणलोट क्षेत्रात चालणार्या उद्योगांमुळे रासायनिक प्रदूषण होते. धरणे नद्यांना अडवतात. ते पाणी कारखाने वापरतात व दूषित विषारी पाणी पुढे नदीत सोडतात. या कारखान्यांत उद्योगांत नोकऱ्या मिळवण्यासाठी लोक धडपडतात. याला जीडीपी वाढवणारा विकास म्हटले जाते.

हे स्वातंत्र्यलढ्याला अपेक्षित नव्हते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावरून चरख्याला हटवले गेले. ही पुढील अनर्थाची नांदी होती. ‘चरखा’ अहिंसक, शाश्वत, स्वतंत्र जीवनाचे प्रतीक होता. त्याला नाकारणे अज्ञान व न्यूनगंडामुळे होते व त्यामुळे यंत्रसंस्कृतीला श्रेष्ठत्व बहाल करण्याची चूक झाली. वंचना व अभाव म्हणजे दारिद्रय. ते नको होते. पण त्याची साधेपणाशी गल्लत केली गेली व साधेपणा हटवला गेला. ब्रिटिशांना घालवले पण त्यांची निसर्गविरोधी ऊर्जाग्राही जीवनशैली त्यांच्यापेक्षा जोमाने पुढे नेली गेली. हा स्वातंत्र्यलढ्याचा पराभव होता. हे जिंकून हरणे होते. आपण दांभिक बनलो. आपल्या मातृभूमीविरूध्द वर्तन करू लागलो. तिचे शोषण करू लागलो. निसर्गाबद्दलची संवेदनहीनता आज जनता व राजकारणी या आडात व पोहऱ्यात दोन्हीत दिसत आहे.

औद्योगिकरणाच्या सूत्रधारांनी प्रसारमाध्यमे व शिक्षणाचा वापर करून, याला प्रगतीचा मुख्य प्रवाह म्हणून जगभरातील जनमानसात रूजवले. आपण या ‘बाजाराची अर्थव्यवस्था’, नावाच्या विकृतीला स्वीकारले व ज्यामुळे जगभरात संस्कृत्यांचा लोप झाला, त्या उपभोगवादी मार्गाकडे वळलो. आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक उपभोग व उपभोगवाद यातील फरक ओळखला होता व उपभोगवाद टाळला होता. परंतु “माणुस हे वासनांचे गाठोडे आहे” हे प्रचलित पाश्चात्य अर्थशास्त्राचे गृहितक आहे. हे लक्षात न आल्याने त्यागावर आधारित असूनही ‘चिपको’ व ‘नर्मदा बचाव’ आंदोलने आकलनाच्या अंतिम टप्यावर पोचली नाहीत. येऊ घातलेले अरिष्ट समजले नाही. औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था यांच्याविरोधात उभे राहिले नाही. धरण हीच अवैज्ञानिक, मानवविरोधी, सजीवविरोधी, पृथ्वीविरोधी गोष्ट आहे असे या आंदोलनांनी ठामपणे म्हटले नाही. ‘यंत्र’ व तंत्रज्ञान ही प्रगती आहे व पैसा जगवतो या गैरसमजामुळे अशी स्पष्ट भूमिका घेण्यात अडथळा आला.

आज तर मानवाचे उच्चाटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील ‘बाॅन’ येथे झालेल्या युनोच्या वातावरण परिषदेत जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढीने धोकादायक पातळी ओलांडल्याचे व तापमान आता वाढतच राहणार असल्याचे अहवाल स्पष्ट केले. तरीही धरणांना व औद्योगिकरणाला विरोध केल्यास, आपल्यावर ‘पर्यावरण अतिरेकी’ व ‘प्रगतीविरोधी’ असल्याचा शिक्का मारला जाईल असा गंड व अपराधीपणाची भावना आंदोलकांमधे दिसते. पृथ्वीची, जीवनाची, मानवजातीच्या अस्तित्वाची व नदीची बाजू घेण्यात अतिरेक, अधोगती व अपराध कसा?

स्वयंचलित यंत्राला ऊर्जा लागते. ऊर्जा व वीज मिळवण्यासाठी खनिज इंधन जाळावे लागते. अणुऊर्जा असली तरी पूर्ण अणु इंधन चक्रात खनिज इंधनेच जाळली जातात. यातुन ,कार्बन डाय ऑक्साईड, व इतर तापमान वाढवणार्या वायुंची निर्मिती होते. वायू असे घडवू शकतील याची माहिती पूर्वी नसली तरी यंत्राची विविधांगी राक्षसी भूक पृथ्वी भागवू शकणार नाही याची जाणीव संशोधकांना असायला पाहिजे होती. आदि शंकराचार्य सुमारे बाराशे वर्षांपूर्वी केनोपनिषदावरील टीकेत म्हणतात, ” कपिल व कणादाचा तंत्रबळाचा मार्ग चूक आहे. तंत्रबळापेक्षा आत्मबळ श्रेष्ठ आहे. गांधीजी हिंद स्वराज्यात सांगतात की, “भारतीयांच्या पूर्वजांना यंत्र शोधता आले नसते असे नाही. त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळले. त्यातील धोका त्यांना कळत होता. हातापायांनी काम करण्यातच खरे सुख व हित आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी आपली मातीची व कुडाची घरे कायम ठेवली.”

शिक्षण घेणाऱ्या बालकांना, तरूणांना मोटार, बंगल्याचे स्वप्न दाखवले जाते. काँम्प्युटर म्हणजे आधुनिकता असे ठसवले जाते. ‘अमेरिका व युरोप विकसित असून आपण स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अविकसित होतो. ते कमीपणाचे चिन्ह होते. आता आपण विकसनशील आहोत व लवकरच ही लाजिरवाणी अवस्था जाऊन आपण विकसित होणार आहोत’, असे त्यांच्या मनावर लहानपणापासुन बिंबवले जाते. माणुस आज यंत्राचा गुलाम झाला आहे. टीव्ही माणसाला समोर खिळवून ठेवत आहे व मोटार माणसाच्या इंद्रिय व मनावर आरूढ झाली आहे. जाच्याजवळ सर्वात जास्त यंत्र आहेत उदा. उद्योगपती, बँकर, नेते, नोकरशहा ते सर्वात मोठे गुलाम आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी यंत्र सोडणे आवश्यक असतानाही ते तसे करू शकत नाहीत. जीवनाचा कथित दर्जा व जीवनशैलीच्या सापळ्यात ते अडकले आहेत.

भौतिकदृष्ट्या ‘विकसित’ होणे हे पृथ्वीच्या व जीवनाच्या दृष्टीकोनातून सर्वात अयोग्य व हानिकारक आहे. ‘विकसनशील’ हा तुलनेने कमी विध्वंसक आहे. पाश्चात्यांच्या मोजपट्टीप्रमाणे मागास, आदिम वा कृषियुगात असलेले भूप्रदेश व राष्ट्रे ‘अविकसित’ आहेत. पृथ्वीच्या दृष्टीने मात्र शाश्वत अस्तित्वासाठी तीच योग्य आहेत. हे आपल्या देशातील व जगातील बालके व तरूणांच्या लक्षात येऊ दिले जात नाही. असे तथाकथित मागास प्रदेश हे मानवजातीच्या रक्षणाची आशा आहेत. मात्र मानवाचे उच्चाटन करणार्या तापमानवाढीबाबतच्या आंतरराष्ट्रीय अहवालांतही, ते गरीब असून तेथील अर्थव्यवस्था प्रगत नसल्याने मागास आहेत व तापमानवाढीला तोंड देऊ शकणार नाहीत, असा तद्दन चुकीचा निष्कर्ष काढला जातो. अशा अज्ञानाच्या किंवा लबाड विचारांच्या मार्यात जनतेला सत्य नेमके उलट आहे हे समजत नाही.

तंत्रज्ञान व यंत्र माणसांना गुलाम बनवत गेले. काँम्प्युटरमुळे ( अपवाद सोडला तर ) मठ्ठ, निर्बुध्द, अलिप्त व संवेदनाहीन समाज तयार झाला. कोपर्निकस, ब्रूनो व गॅलिलिओंच्या खर्या सत्य, वैज्ञानिक, वैचारिक, नैतिक, शोषणविरोधी क्रांतीवर ( सन १५५४ ) त्यानंतर दोनशे वर्षांनंतर आलेल्या जेम्स वॅटच्या वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या औद्योगिक क्रांतीने ( सन १७५६ ) पूर्ण बोळा फिरवला असे म्हणावे लागते.

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे अज्ञान दूर करून विज्ञान आले. पण पुढे तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याची चूक केली गेली. त्यातुन औद्योगिकरण म्हणजे प्रगती ही आजपर्यंतच्या कुठल्याही अंधश्रध्देपेक्षा घातक अंधश्रध्दा रूढ झाली. केली गेली. जर जीवन नष्ट करणारे हे असत्य, ही अंधश्रध्दा तात्काळ फेकली नाही व यंत्रपूर्व कृषियुगात मानवजात या दशकात परत गेली नाही तर, मानवजात व जीवसृष्टीचे या शतकात कायमचे उच्चाटन होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

हा प्रश्न ‘भौतिक विकास’ की ‘अस्तित्व’ असा आहे. जनतेला व सरकारला विकास हवा व नद्याही हव्या. हा दुटप्पीपणा झाला. दोन्ही एका वेळी मिळणार नाही. संतांनी या ठाम भूमिकेत येणे जरूरीचे आहे. सरकारकडून होणारा व आंदोलकांकडूनही होणारा लोकानुनय बंद होण्याची व सत्य स्वीकारण्याची गरज आहे. जनतेचे आकलन व मानसिकता बदलण्यासाठीदेखील कार्य हवे.

सन २०१७ मध्ये भारतात, जगात सर्वाधिक २५ लाख माणसे वायुप्रदूषणाने मरण पावली. हे वायुप्रदूषण मोटार, वीज, सीमेंट, स्टील, रासायनिक खते आदींच्या निर्मिती व वापरातून झाले. याचाच परिणाम म्हणून यावर्षी पृथ्वीच्या वातावरणात पॅरिस कराराने धोकादायक ठरवलेली सरासरी तापमानातील १•५ अंश सेल्सिअसची वाढ होत आहे. तापमानवाढीच्या सध्याच्या अभूतपूर्व अशा प्रतिवर्ष ०•२० अंश सेल्सिअस ( एक पंचमांश अंश सेल्सिअस ) वेगाने फक्त ३ ते ५ वर्षांत मानवजात वाचवण्यासाठीच्या २ अंश सेल्सिअस या मर्यादेचेही उल्लंघन होणार आहे. प्रश्न मानवजात व जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आहे. कार्बन उत्सर्जन या क्षणी शून्य करण्याची व नदी, सागर, जंगलांचे हरितद्रव्य वाढीला लागण्याची गरज आहे. औद्योगिकरण तात्काळ थांबवण्याची गरज आहे. यात गंगा असो की मुंबईतील मिठी, जगातील सर्व नद्या वाचवणे अंतर्भूत आहे. साठ वर्षांपूर्वीची, काळाच्या कसोटीला उतरलेली भारतीय शेतीवर आधारलेली जीवनपध्दती परत आणणे हाच वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. हवा, पाणी व अन्न इतकीच आपली गरज आहे. वस्त्र – चरखा व हातमाग, निवारा – मातीची व कुडाची घरे व वाहतुक – बैलगाडी व घोडागाडीतुन करणे हाच अस्तित्व टिकवण्याचा भारतीय संस्कृतीने दाखवलेला शाश्वत अहिंसक मार्ग आहे. यात कमीपणा नाही. उलट पृथ्वी व जीवनाप्रती आदर आहे. शुध्द गंगा आणि हे चिरंतन भारतीयत्व अभिन्न होते. त्याचे पुनरूज्जीवन मानवजातीला रक्षणाची दिशा दाखवू शकते.

कोट्यावधी वर्षे जेथे पाणी तेथे जीवन होते. पृथ्वीवर जीवसृष्टी पाण्याच्या आधारे निर्माण झाली व वाढली. म्हणून या संस्कृतीने पाण्यालाच जीवन म्हटले. पण स्वतःला आधुनिक म्हणवणारा, तंत्रज्ञानाचा अहंकार बाळगणारा माणुस म्हणू लागला की, जेथे आम्ही असू तेथे पाणी हवे ( शहरीकरण ) व जे आम्ही करू त्यासाठी पाणी हवे ( औद्योगिकरण ). सृष्टी प्रसवणार्या पृथ्वीने करोडो वर्षे केले ते जलव्यवस्थापन होते. जे आजचा अडाणी आधुनिक माणुस अत्यल्प काळात फक्त स्वतःसाठी स्वार्थीपणे करत आहे ते जलविध्वंसन आहे.

जनतेसह नेते, नोकरशहा, उद्योगपती, बँकर, अभियंते इ. सर्वांनी समजून घ्यावे की ‘धरणांना भावी पिढ्यांची मंदिरे’ म्हणणारे जवाहरलाल नेहरू नंतर खर्या अनुभवाने व्यथित व अस्वस्थ झाले होते. त्यांनी मोठ्या धरणांबाबतची व विकासाच्या या मार्गाबाबतची त्यांची चिंता सन १९५८ च्या भाषणात व्यक्त केली होती. महात्मा गांधीजींनी ११० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंद स्वराज्यात स्पष्ट म्हटले की, “यंत्रांमुळे युरोप उजाड झाला. भारताचेही तेच होईल.” टाॅलस्टाॅयना फ्रान्समधे बोलावले गेले. त्यांना कौतुकाने आयफेल टाॅवर दाखवला गेला. हा संत टाॅवरच्या पायथ्याशी उभा राहिला व त्याकडे वर पाहून म्हणाला की, “मी, जगातील सर्वात ओंगळ व कुरूप गोष्ट पाहत आहे.”

वैज्ञानिकांनी सत्यासाठी सुखे सोडली. त्यांना भोगलोलुपता अपेक्षित नव्हती. आज विज्ञानाचा जयजयकार करत प्रत्यक्षात भोगलालसा वाढवणारे तंत्रज्ञान राबवले जात आहे. वस्तुरूपी मृत व निर्जिव गोष्टी वाढवत राहण्याला आपण विकास म्हणत आहोत. हा विकास नाहीच. नुकत्याच आलेल्या ‘जागतिक वन्यजीवन निधी’ च्या ‘ जिवंत ग्रह ‘ या अहवालात नमूद केले की, सन १९७० पासुन आतापर्यंत पृष्ठवंशी, सस्तन प्राणी, पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी इ. पैकी ६० टक्के ते ८९ टक्के जीवसृष्टी मानवी दबावामुळे नष्ट झाली तसेच ‘क्वीन्सलँड विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया’ च्या अहवालात पृथ्वीच्या भूमिवरील ७७ टक्के व सागरातील ८७ टक्के भागात मानवाने विकासाच्या नावे अनिष्ट हस्तक्षेप व बदल करून नैसर्गिक स्वरूप शंभर वर्षांत नष्ट केल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु हे अहवाल देखील, वेळ निघुन जात असतानाही मोटार, सीमेंट, वीज वापरणे सोडावे किंवा उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहतुक, रासायनिक शेती थांबवावी असे स्पष्ट म्हणत नाहीत. यंत्रोत्तर काळात आर्थिक श्रीमंतीला प्रतिष्ठा दिली गेली. संत शेकडो वर्षे सांगत आले की, श्रीमंती ही चोरी आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त बाळगणे हा गुन्हा आहे. शिवाजीसारखे राजे उपभोगशून्य स्वामी होते. गांधीजींनी उद्योगांबाबत विश्वस्त कल्पना मांडली. विनोबांनी भूमिहीनांसाठी भूदान मागितले. आज जीवसृष्टीचा नाश पाहून म्हणावे लागते की श्रीमंती ही फक्त चोरी नाही. ती प्रचंड हिंसादेखील आहे. उदाहणार्थ औद्योगिकरणाने मृत केलेल्या नदी खाडी सागरातील जीव तर मारले गेले व त्यावर अवलंबून असलेले मानवसमूहही परागंदा झाले. ही हिंसा घडवणारे मात्र या प्रक्रियेतून मिळवलेल्या पैशातून जेथे अजूनही निसर्ग शिल्लक आहे तेथील मासे उपभोगतात.

एखाद्या अट्टल मद्यप्याचे शरीर त्याच्या काळजाच्या शेवटच्या निरोगी तुकड्यावर जिवंत असते व याची जाणीव नसल्याने तो सुधारू इच्छीत नाही. तशी तंत्रज्ञानाने दिलेल्या आधुनिक जीवनशैलीचे मद्य प्यालेल्या मानवजातीची स्थिती आहे. संत, साधूंनी भारतीयांना या भौतिक आर्थिक आसक्तीतून सोडवण्यासाठी जिवंत रहावे.

सन १९९० नंतर एका बाजूला उपभोगवाद वाढवणारे शिक्षण दिले गेले व त्याचवेळी मोठे वेतन देऊन मध्यमवर्गास औद्योगिक ऊत्पादने खरेदी करण्यासाठी चिथावणी दिली गेली. या सापळ्यात देश अडकला. आज तापमानवाढीच्या संकटाची माहिती दिल्यास अनेक बेजबाबदार पालक आपल्याच मुलांबाबत म्हणतात की, आम्ही आमचे आयुष्य जगलो, त्यांनी त्यांचे पहावे. संतांनी अर्थव्यवस्थेने प्रगती व विकास शब्द वापरून लावलेल्या या आसक्तीच्या सापळ्यातून बाहेर काढून अनासक्तीवर आधारित भारतीयत्व पुन्हा जागे करण्यासाठी कार्य करण्याची तातडीची गरज आहे.

औद्योगिकरणाचे खरे भयावह स्वरूप जगाला अजून कळले नाही. जेथे नैसर्गिक स्वयंपूर्ण विभाग टिकून असतील त्यांना मागास ठरवले जाते. त्यांना या प्रगतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा होते. आता निसर्गसमृध्द कोकणाला व ईशान्य भारताला या विध्वंसक प्रवाहात आणले जात आहे. जगात रोज सुमारे ९ कोटी बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होते. त्यावर प्रक्रिया करणार्या रिफायनर्यांचे व पुढील वाहनांचे आणि इतर प्रदूषण होते. देशात रोज १५ लाख टन कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळला जातो. त्यातून रोज सुमारे ७ लाख टन राख नद्या खाडी व सागरात टाकली जाते. शिवाय वायू व इतर प्रचंड प्रदूषण वेगळे. करोडो टन सीमेंट उत्पादन होते. प्रत्येक टनामागे २००० टन पाणी वापरले जाते. या औद्योगिकरण व शहरीकरणामुळे नद्या क्षणोक्षणी प्रदूषित होतात. हे विकास म्हणून चालू ठेवले तर नद्या कशा वाचणार ?

उपोषण करणाऱ्या संतांनी मानवजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभी असल्याने भारतीयांना व जगाला संयम व साधेपणामुळे चिरंतन टिकलेल्या ऊर्जाविरहित भारतीय जीवनपध्दतीचा सुटकेचा मार्ग दाखवण्यासाठी जगायला हवे. हा मार्ग ही भारतीय तत्वज्ञानाची जगाला दिलेली देणगी आहे. एकेकाळी ऋषिंनी पर्वतांना मातेच्या स्तनांची समर्पक उपमा दिली व पायाचा स्पर्श होत असल्याबद्दल क्षमा मागितली. आज हे पर्वत व भूमी तोडले व उखडले जात आहेत. मनोरचनेतला हा बदल केवळ भारतीयच नव्हे तर मानवी संस्कृती व अस्तित्व नष्ट करत आहे.

कसेही करून ही यंत्रमानवी लाट परतवावी लागेल. हे निर्वैर अध्यात्मिक वृत्तीनेच होऊ शकते. उद्योगपती व त्याचा उद्योग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्योगपती व उद्योगात नोकरी करणारा कर्मचारी हा माणुस म्हणून पृथ्वीमुळे जगतो. जसे त्याचे पूर्वज हजारो, लाखो वर्षे जगत होते. उद्योगामुळे नाही. आजही शहरातील सर्व माणसे इतर प्राण्यांप्रमाणे श्वास घेतात, पाणी पितात, अन्न खातात व त्यामुळे जगतात. ते पृथ्वी देते. उद्योग नाही. उलट, उद्योग जीवनाला नष्ट करतो. पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे. नोकरी देण्यासाठी नाही. शंभर वर्षांपूर्वी चरखा टिकणे हे भारत टिकणे होते. आज ते मानवजात टिकण्यासाठी आवश्यक आहे. गंगा जपणे हे मानवासह जीवसृष्टी जपणे आहे. केवळ प्रतीकपूजा नको.

गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासुन मानवजात व जीवसृष्टीला वाचवणे ही एकच गोष्ट आहे. ते प्रत्येक माणसासमोरील आव्हान आहे. त्याचे उत्तर प्रत्येकाच्या अंतरंगात आहे, पृथ्वीला मान्य असलेल्या आचरणात आहे. उत्तुंग हिमालय व प्राणदायिनी गंगेच्या प्रेरणेने व साक्षीने भारतीयांनी आपल्या साधेपणा व शहाणपणाच्या ठेव्यातून हे आव्हान स्वीकारले तर निगमानंद व सानंदांसारख्या संतांचे आत्मार्पण सार्थकी लागेल.

Related posts

प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठीच झाका दान

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज

Leave a Comment