July 27, 2024
Ran Pingala article by Prashant Satpute
Home » रानपिंगळ्यांची वसाहत..
फोटो फिचर

रानपिंगळ्यांची वसाहत..

बहुतेकजण पिंगळ्यालाच घुबड मानतात. साक्षात लक्ष्मीमातेचे वाहन असणारे घुबड आजही अशुभ मानले जाते. घुबड, गव्हाणी घुबड, पिंगळा-रानपिंगळा हे मानवाचे विशेषतः शेतकऱ्यांचे मित्र आहेत. उंदीर हे यांचे आवडते खाद्य असल्याने, मोठ्या प्रमाणात उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे ते काम करतात. तसे तो पाली, सरडे याच्यावरही छान ताव मारतो. मादी ही नरापेक्षा मोठी असते. अंडी उबवून पिलांचे संगोपन दोघेही करतात.

Ran Pingala article by Prashant Satpute

खरं तर पिंगळा-रानपिंगळा हा घुबड संवर्गातील पक्षी ! छोटेखानी घुबडच! घुबडापेक्षा आकाराने छोटा असतो. असो..पिंगळ्याची जोडी नितांतपणे रात्रीच्या काळोखात भाकणूक करताना अनेकवेळा जाणवते. असे हे रानपिंगळे मला भटकंतीत अनेकवेळा आढळले आहेत. पण, काल आणि आज त्यांची वसाहत पहायला मिळाली.

अगदी इंदोरजवळील शिरपूर तलावाला खास पक्षी निरीक्षण करताना, माणसाप्रमाणे डोळे मिचकवणारा रानपिंगळा पहायला मिळाला. यावेळीही आई-बाबा पिलांना प्रशिक्षित करताना दिसत होते.

ग्रामसंस्कृती जागवणारे, कुडबुडे जोशी पिंगळे माझ्या लहानपणी गल्लीत यायचे. डोक्याला पटका, अंगात तीन बटणी शर्ट, त्यावर कळकटलेला कोट, खाली पांढरे पायघोळ धोतर, पायात जडशीळ कातडी वहाणा, काखेत धान्य गोळा करायला असणारी खास वाकळेच्या पांढऱ्या दोऱ्याने शिवलेली पिशवी आणि उजव्या हातात अगदी छोटा डमरु हे वाद्य असे. हा हातातील वाद्य वाजवत विशिष्ट लयीत भाष्य करत दारात आला, म्हणजे भीती वाटायची. घरात बाळंतीण असेल तर आणखीनच पाचावर धारण बसायची. याविषयी विनाकारण त्यावेळी अनेक समजुती-गैरसमजुती होत्या.

पिंगळा पक्षाची भाषा याला म्हणे समजायची. त्यावरच हा मानवी वस्तीत येवून भविष्य सांगून आपला उदरनिर्वाह करायचा, असे लहानपणी मोठ्या माणसांच्या तोंडातून अनेकदा ऐकलेले. शिवाय पिंगळ्या पक्षाला दारु पाजून त्याच्याकडून भविष्य काढून घेण्याची कला याला अवगत असायची म्हणे. यात जरा जरी चूक झाली वा ही कला उलटली तर, पिंगळ्याचा साक्षात मृत्यू ठरलेला. ही अख्यायिका आणि तोंडी लावायला वर सांगितली जायची. लहानपणी ऐकताना हे सारे खरे अन् भीतीदायक वाटायचे. असल्या गोष्टी सांगायला आणि ऐकायला रात्रच साक्षीला असायची. अगदी कधितरी दिवा, चिमणी वा कंदील तेवढा बारीकपणे तेवत आसायचा. विश्वाच्या परिवर्तनाच्या जगरहाटीत हा ग्रामीण संस्कृतीचा, लोकपरंपरेचा प्रकार केव्हाच गडप झाला.

इंदोरजवळील कनाडिया येथील एका शेतात फिरता फिरता एक डेरेदार आंब्याचे झाड दिसले. खरंतर सूर्यास्त टिपायला मी सौ. बरोबर इथे आलो होतो. पण, या झाडाजवळून जाताना कोणत्या तरी पक्ष्यांची फडफडाट ऐकू आली. या फांदीवरुन त्या फांदीवर पाच-सहा पक्षी एकदम उडाले. जवळ जात अगदी झाडाच्या विरुद्ध दिसेला खोडांवर पाहिल्यावर समजले या ढोलीत रानपिंगळ्यांची वस्ती नक्की असणार. बारकाईने पाहताच, त्यांची संपूर्णपणे वसाहतच दिसली. पानांच्या, फांदीच्या आडोशाने माझ्याकडे नजर रोखून कितीतरी आई-बाबा पिलांना नवे प्रशिक्षण देत होते.

सूर्यास्त टिपून परतलो. उद्या दिवसा उजेडी पुन्हा भेट द्यायचे ठरवूनच! आज सकाळी उन्हात पुन्हा या रानपिंगळ्यांच्या वसाहतीला म्हणजेच आंब्याच्या झाडाला पहायला आलो. तर चक्क सगळे उन्हं अंगावर घेत, खात पूर्वेकडे विविध ठिकाणी बसून होते. माझी चाहूल आधीच त्यांना लागलेली. कालच्या माझ्या भेटीने आज बहुतेक ते जरा सरावलेले दिसले. अगदी मोजकी हालचाल वगळता ते माझ्याकडे टवकारुन फांदीवर बसून होते. मध्येच १८० अंश कोनात मान वळवून पुन्हा मान पुढे काढून माझ्यावर नजर ठेवून होते.

कितीतरी वेळ हा खेळ चालूच होता. एव्हाना दोन-चार खारुटी, एखादा राॕबीन आणि दोन-चार साळुंख्या हा मजेशीर डाव पाहात शांतपणे बसून होत्या. अचानकपणे मला निलपंखी दिसला तसा मी त्याच्यामागे धावलो. तसा सरावलेल्या रानपिंगळ्यांनी माझ्याबाजूच्या फांदीवर धाव घेत मला विशिष्ट साद घातली. कदाचित तेही फोटोसेशनसाठी आणखी उत्सूक असावेत.. असेच काहीसे म्हणा हवे तर..!

काही का असेना…लक्ष्मीमातेचे वाहन असणाऱ्या या ‘शुभ’ पक्षाचे दर्शन व्हायलाही तेवढेच भाग्य लागते..एवढं नक्की. !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी

हिमालयातील अतिउंचावरच्या गावावर हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवणारा चित्रपट

मानवता धर्म मानणाऱ्या शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरती घुले

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading