वानर आणि माकडांचा खेळ, हे लेखाचे शीर्षक वाचून हा लेख एखाद्या मदाऱ्यावर आहे की काय ? अशी आपल्याला शंका येईल. मात्र प्रत्यक्षात तसे नसून गेली काही वर्षे कोकणात विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात वानर आणि माकडांनी मानवी वस्तीत घुसून फळबागा , परसदारचा भाजीपाला याची जी अपरिमित हानी सुरू केली आहे, त्याचे विवेचन करणारा हा लेख आहे.
जे. डी. पराडकर 9890086086
वनांचे प्रमाण कमी होत आहे आणि रानात वानर माकडांना खाण्यासारखे काही राहिले नाही, हेच कारण यामागे नसून, त्यांची वाढती प्रजनन संख्या हे या मागचे मुख्य कारण आहे. घर अथवा बागायती भोवती वानर माकडांचा सुरू होणारा खेळ म्हणजे अतोनात हानी. हे सारे आपल्याच डोळ्यांनी पाहणे अशक्य होऊ लागल्याने याचा गंभीर परिणाम विविध प्रकारच्या लागवडीवर होऊ लागलाय . उन्हातानात मेहनत घेऊन जे काही रब्बी पीक घ्यायचे , अथवा फळ लागवड करायची त्याची पूर्णता विल्हेवाट वानर माकडांकडून लावली जात असल्याने अशी लागवड आणि पिके घेणे अनेकांनी सोडून दिले आहे. याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील अर्थार्जनावर होऊ लागलाय. आंब्याच्या हंगामात तर वानरांच्या झुंडीच्या झुंडी आंबा बागांवर अक्षरशः हल्ला चढवतात. आंबे चावून टाकून देण्याबरोबरच झाडांवर उड्या मारताना शेकडो आंबे खाली पडल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान होते. कोकणच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात २५ मे पासून वानर आणि माकडे पकडण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वृत्त वाचले आणि हा लेख लिहावासा वाटला.
गोळप ग्रामस्थाचे उपोषण
रत्नागिरी तालुक्याच्या गोळप या गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी वानर माकडांच्या त्रासापासून सुटका व्हावी आणि त्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून शासन दरबारी पत्रव्यवहार करून एक दिवसाचे उपोषण देखील केले. शासकीय यंत्रणेकडून म्हणजेच वनविभागाकडून अविनाश काळे यांना वानर माकडे पकडण्याचे आश्वासन देण्यात आले खरे , मात्र अशी वानर आणि माकडे पकडून ती परत जंगलातच सोडली जाणार असल्याने, हा प्रश्न कायमस्वरूपी संपणार नाही. वानर आणि माकडे कमालीची हुशार असतात. मानवाने लावलेल्या सापळ्यात ती सहसा अडकत नाहीत. असं असताना वनविभागातर्फे त्यांना पिंजऱ्यात पकडण्याची मोहीम ही फारशी यशस्वी होणार नाही, याची कल्पना ग्रामीण भागातील मंडळींना नक्कीच आहे.
मोहीम किती यशस्वी होईल ?
दिवसेंदिवस वानर आणि माकडे यांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यांची संख्या खूप असल्याने ते विविध गटात विभागले गेले आहेत. परिणामी गावागावातून दररोज एक ना दुसरा समूह येऊन नुकसान करतच असतो. वानर आणि माकडे पकडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ याविरुद्ध उपोषण केलेल्या अविनाश काळे यांच्या गोळप गावातून केला जाणार असला , तरी प्रत्यक्षात ही मोहीम किती यशस्वी होईल ? याची कल्पना काळे यांनाही आहे. एका तालुक्यात पकडलेली वानर माकडे दुसऱ्या तालुक्यात नेऊन सोडली आणि दुसऱ्या तालुक्यातील तिसऱ्या तालुक्यात सोडली, म्हणजे हा प्रश्न सुटेल असे कोणाला वाटत असेल, तर तो भ्रम ठरणार आहे. मानवी वस्तीत येऊन सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने, पिंजऱ्यात पकडलेली वानर आणि माकडे कितीही लांब सोडली , तरी ती परत मानवी वस्तीत येणार,यात कोणतीही शंका नाही . वानर आणि माकडे आता एवढी धाडसी झाली आहेत , कि त्यांना मानवापासून भीती हा प्रकारच उरला नाही. कितीही मोठ्या आवाजाचे फटाके लावा , बेचकीतून दगड मारा , छऱ्याची बंदूक दाखवा , यातील एकाही प्रकाराला वानर – माकडे घाबरत नाहीत. बेचकीतून आलेला दगड , ती थोडं बाजूला होऊन चुकवण्यात वाकबगार झाली आहेत. वानर माकडांचे हे धाडस पाहून त्यांना पळवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांचा संयम आता सुटू लागला आहे.
सोलर कंपाऊंडचा पर्याय
वानरांपेक्षा माकडं अधिक विध्वंसक असतात. ती थेट घरात घुसून कोणाचे लक्ष नसेल, तर घरातील अन्न देखील घेऊन जातात. नारळाच्या झाडावर चढून कोवळे नारळ दाताने सोलत त्यातील पाणी पितात , खोबरं खातात आणि नुकसान करून निघून जातात. आम्ही संगमेश्वर तालुक्यातील लोवले या गावात राहतो. आमच्या परिसरात वानरांचे तीन समूह येतात. प्रत्येक समूहात वानरांची १५ पासून २५ पर्यंतची संख्या आहे. घर परड्यात आल्यानंतर हा कळप, केवळ नुकसान करण्याच्या मागे असतो. हे तीनही कळप एक दिवस आड असे दररोज येतात. एकदा मोठ्या संख्येने आलेल्या वानरांच्या एका कळपाने आमच्या घर परड्यात अक्षरशः नंगानाच घातला. घर परड्यात चिकूची चार आणि पेरूची दोन झाडे खूप फळं देणारी होती. आमच्याकडून एकदा ज्यांनी चिकू नेले , ते परत चिकू मागायला येत एवढ्या गोडीचे आणि दर्जाचे ते फळ होते. एक दिवस वानरांच्या मोठ्या काळपाने घरात कोणी नाही असे पाहून सर्व झाडांवर उड्या मारत अक्षरशः धुडगूस घातला. सर्व चिकू आणि पेरू चावून झाडाखाली खूप मोठा पेर पडला. फुल झाडांचे, जास्वंदीचे मोठे नुकसान केले. वानरांनी आपल्या विध्वंसाने घर परड्याची शोभाच घालवून टाकली होती. घरी आल्यानंतर हा सारा विध्वंस पाहून माझे मन हताश आणि कमालीचे दुःखी झाले. अखेरीस चिकूची चार आणि पेरूची दोन लागती झाडे मी त्याच दिवशी तोडून टाकली. मी जे कृत्य केले, ते चुकीचे होते हे मला कळत होते . मात्र वानर मारणे माझ्या हातात नसल्याने , आमच्या मालकीची फळझाडे हताश होऊन तोडणे एवढेच माझ्या हाती होते, ते मी लगेच केले . फळझाडं तोडून टाकल्यानंतर देखील अधून मधून वानरांचा त्रास सुरूच होता. अखेरीस आमच्या घर परड्याला सोलर कंपाउंड केले, आणि वांनरांच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळवली. घरपरड्याला अथवा बागायतीला सोलर कंपाऊंड करणे, हे खर्चिक काम असल्याने प्रत्येकाला ते परवडेल आणि शक्य होईल असे नाही. मात्र मी सोलर कंपाऊंड केल्यानंतर आणखी चार माणसांनी सोलर कंपाउंडचा प्रयोग आपल्या जागेत केला आणि त्यांनाही त्याचा चांगला उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले.
कंटाळून शेती सोडण्याचा विचार
कमलाकर लोवलेकर यांच्या शेजारी आम्ही राहतो. गेले काही दिवस लोवलेकर पुणे येथे आपल्या मुलीकडे मुक्कामासाठी गेले आहेत. त्यांच्या घर परड्यात जवळपास एक हजारच्या दरम्यान कलमी आंबा तयार झाला होता. गेल्या पंधरा दिवसात वानरांच्या विविध कळपांनी या आंब्यावर उड्या मारून आंबे खाली पाडले आणि तयार आंबे अर्धे खाऊन खूप मोठे नुकसान केले. लोवलेकर पुण्याहून ज्यावेळी परत आपल्या घरी येतील तेव्हा झाडावर त्यांना एकही आंबा दिसणार नाही . अशाच प्रकारचा अनुभव मावळंगे माखजन आणि संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागातील छोट्या आंबा उत्पादकांनी कथन केला आहे. आमचे मौजे असुर्डे येथील स्नेही प्रयोगशील शेतकरी मकरंद मुळये यांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून घर परड्यातील भाजीपाला लागवड, रब्बी पिकांची लागवड , कलिंगड लागवड हे सारं करणं नाईलाजाने सोडून दिलं. यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न तर घटलेच शिवाय घरात लागणारा भाजीपाला, फळं नाईलाजाने विकत आणण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्याकडे तर सर्वात छोटा वानरांचा कळप हा ३५ एवढ्या संख्येचा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जर वानर येत असतील, तर फळबागांचं अथवा भाजीपाला लागवडीचं संरक्षण करायचे कसे ? असा प्रश्न मकरंद मुळये यांनी उपस्थित केला. मेहनत करायची, खर्च करायचा आणि अखेरीस उत्पन्न घेण्याची वेळ आली, की वानरांकडून नुकसान करून घ्यायचे. असे करण्यापेक्षा ती लागवड नको,असे म्हणण्याची वेळ मुळ्ये यांच्यावर आली . त्यांच्याप्रमाणेच तालुक्याच्या विविध गावातील शेतकरी आणि छोट्या उत्पादकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांची मागणी
भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या , त्यांच्याकडून होणारे हल्ले आणि वानर – माकडांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून बागायती आणि भाजीपाला लागवडीवर होणारे आक्रमण हे दोन्ही तितकेच क्लेशदायक आणि धोकादायक आहे . वनविभाग अथवा शासनाच्या विविध यंत्रणा आम्ही आता बंदोबस्त करू, असे कितीही छातीठोकपणे सांगत असतील, तरी त्याचा प्रभावी उपयोग होणं अशक्य असल्याचं मत ग्रामीण भागातील अनुभवी जनतेने व्यक्त केलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील वानर आणि माकडं पकडण्याची मोहीम उद्यापासून सुरू होतेय , या मोहिमेचं सध्या तरी स्वागतच करायला हवे . मात्र या मोहिमेत किती संख्येने वानर आणि माकडे पकडली गेली, पकडल्यानंतर त्यांना कुणीकडे सोडले ? हे वनविभागाने जाहीर करायला हवे. अशी मागणी शेतकरी आणि बागायतदार यांनी केली आहे.
कायमस्वरुपी उपाययोजना हवी
मोहिमेचे हे सर्व काम पारदर्शकपणे व्हावे यासाठी आंबा बागायतदार , शेतकरी , भाजीपाला उत्पादक , ग्रामस्थ यांच्यातील प्रतिनिधी असणारे मंडळ वन विभागाने स्थापन करणे आणि त्यांना त्याची माहिती देणे बंधनकारक करायला हवे . वानर आणि माकडे पिंजऱ्यात पकडणे आणि त्यांना दूर नेऊन सोडणे हा सर्व प्रकार म्हणजे केवळ वेळ काढू पणा असून यामुळे ही समस्या कायमची संपणारी नाही, असे मत ग्रामस्थांनी आणि बागायतदारांनी व्यक्त केले आहे. भटक्या कुत्र्यांनी , वानर – माकडांनी माणसांवर हल्ले केले तरी चालतील , त्यांचे मुडदे पाडले तरी चालतील , प्रचंड आर्थिक नुकसान केले तरी चालेल, मात्र मानवाने त्यांच्यावर हल्ला करायचा नाही, असा सरकारी दंडक आहे. मुक्या प्राण्यांच्या या नंगानाचा मुळे कमालीचे आर्थिक नुकसान होऊन आता मानवाची म्हणजेच बागायतदारांची आणि उत्पादकांची वाचा जाऊन आर्थिक नुकसानीमुळे ते मुके होण्याची वेळ आली आहे. भटक्या कुत्र्यांसह वानर माकडांची वाढती संख्या हा अत्यंत धोकादायक आणि गंभीर विषय असून या समस्येने माणसांचा उद्रेक होण्यापूर्वी शासन यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जे. डी. पराडकर,
jdparadkar@gmail.com
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.