डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय घेऊन कडेलूट कादंबरी येते, ही अधिक आश्वासक घटना आहे.” या विधानामागे कादंबरी निर्मितीचे सार दडलेले दिसून येते.
संतोष मनोहर फटे
संशोधक विद्यार्थी, मराठी संशोधन केंद्र, मराठी विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपुर (स्वायत्त) santoshfate31@gmail.com
संवादः ८२७५०२५१००
कडेलूट कादंबरीचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आकलन
सारांश :-
‘कडेलूट’ डॉ. श्रीकांत पाटील लिखित कादंबरी ग्रामीण भागातील विविध समस्या चित्रित करते. १९९१ साली जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर प्रगती, विकासाच्या नावाखाली गावगाड्यातील माणसाची द्विधा अवस्था, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरणाच्या नावाखाली विकासाच्या विविध योजनांखाली दबलेल्या ग्रामीण माणसाच्या व्यथा, वेदना दुःख, भावनिक कोंडमारा इ. चे चित्रण या कादंबरीत दिसून येते. नैसर्गिक मूलस्त्रोना दिलेले धक्के पर्यावरणाचा असमतोल, विकासाच्या नावाखाली गावाचे झालेले विद्रुपीकरण, रस्ते विकासाच्या नावाखाली केलेली जंगलतोड, वृक्षतोड, जमीनीचे सपाटीकरण, डोंगरकड्याची होणारी लयलूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासाची बदललेली परिमाणे रात्रं-दिवस डोंगरांची लूट करणारी ठेकेदारी स्पर्धा, भ्रष्टाचार, बरबटलेली शासकीय यंत्रणा, त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण समाजमनावर गावगाड्यावर झालेला दिसून येतो. निसर्ग, डोंगर- दऱ्या, पर्वत यांच्या अमानवी होणाऱ्या लयलूटीमुळे अस्मानी-सुलतानी संकट दुष्काळ, पूर, महापूर, ढगफुटी, ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषणु जागतिक तापमानवाढ, भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, दरडी कोसळणे, हिंस्र प्राण्यांचा लोकवस्तीत अधिवास, शेतीचे भावनात्मक उदात्तीकरण टाळून शेतीकडे व्यापारी मानसिकतेने बघण्याची दृष्टी या सगळ्या गोष्टीचा परिणाम ग्रामीण समाज मनावर झाल्यामुळे हतबल, हताश, उदास, हैराण, उध्वस्त, भयग्रस्त झालेल्या निसर्ग आणि माणूस याच्यातील संघषाची व्यथा यांचे चित्रण कडेलूट कादंबरीमध्ये दिसून येते.
प्रस्तुत शोधनिबंधामध्ये सामाजिक सांस्कृतीक, भावनीक आकलनाचा बोध घेण्यात येणार आहे.
सूचक शब्द :-
कडेलूट, समाज, भाषा, संस्कृती, आकलन
प्रस्तावना :-
‘लॉकडाऊन’, ‘ऊसकोंडी’, ‘पाणीफेरा’ या कादंबऱ्यानंतर डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘कडेलूट’ ही कादंबरी आशय, विषयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कादंबरी असलेली दिसून येते. ही कादंबरी सामाजिक समस्या मांडून त्यावरती उपाय सुचवित असलेली दिसून येते. या कादंबरीतील समाज, संस्कृती, रीती-भाती, जगण्याची धडपड, श्रध्दा, परंपरा, वरपांगिपणा, स्वार्थाने बरबटलेले चेहरे, व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला ग्रामीण माणूस, त्याचा दबलेला अंतस्वर दिसून येतो. सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आकलनाच्या अनुषंगाने या कादंबरीला साहित्यमूल्य प्राप्त झलिले दिसून येते. ग्रामीण भागातील निसर्गाच्या सानिध्यातील समस्यांचा दस्तऐवज म्हणून या कादंबरीचे आकलन करता येईल.
संशोधन पध्दती :-
प्रस्तूत शोधनिबंधामध्ये साहित्यकृतीचे विश्लेषण ही संशोधन पध्दती वापरण्यात आली आहे.
संशोधन उद्दिष्ट्ये :-
‘कडेलूट’ कांदबरीमधील सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आकलनाचा शोध घेणे.
‘कडेलूट’ कादंबरी निर्मितीचा आढावा :-
डॉ श्रीकांत पाटील लिखित ‘कडेलूट’ ही कादंबरी संस्कृती प्रकाशन, पुणे यांच्यावतीने नोव्हेंबर 2023 साली प्रकाशित झाली आहे. मुळामध्ये साहित्य ही आशयवादी कला असून त्या मधील आशय हा समाजजीवनांतर्गतच असतो. ग्रामीण भागातील सामाजिक जीवनातील प्रश्न, समस्या, १९९१ नंतरच्या जागतिकीकरणाचा विकासाच्या नावाखाली ग्रामीण अर्थकारणावर, समाज, संस्कृतीवर, निसर्ग, मानवावर, आधुनिकीकरणाच्या नावाखाली यांत्रिकीकरणाने विकासाची बदललेली दिशा याचा विपरीत परिणाम निसर्ग आणि मानवावर कसा झाला याचे चित्रण गंभीरपणे करणारी आणि समाजवास्तवाला तोंड फोडणारी ही कादंबरी महत्त्वपूर्ण असलेले दिसून येते.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय घेऊन कडेलूट कादंबरी येते, ही अधिक आश्वासक घटना आहे.” या विधानामागे कादंबरी निर्मितीचे सार दडलेले दिसून येते.
भौतिक प्रगती, विकास, रस्ते विकास, वाढती लोकसंख्या, डोंगर-दऱ्यांचे उध्वस्तीकरण, विद्रुपीकरण, पर्यावरणाची झालेली हानी, त्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडून त्याचे दुष्परिणाम मानवाला दीर्घकाळ भोगावे लागतील. हाच आशय कांदबरीतल्या केंद्रस्थानी असलेला दिसून येतो. डोंगरकडे, नदया, जंगलांचे अस्तित्त्व अबाधीत राखणे आपली नैतीक जबाबदारी आहे. याबाबत प्रबोधन व्हावे हा या कादंबरीच्या लेखनामागील लेखकाचा उद्देश आहे असे लेखकाने नमूद केले आहे. प्रस्तुत शोधनिबंधामधून आता आपण सामाजिक आकलनाचा आढावा घेऊया.
‘कडेलूट’ मथील सामाजिक आकलन :-
‘कडेलूट’ कादबरीमधील सामाजिक आकलनाचा शोध घेताना असे दिसून येते की, साहित्य आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेला दिसून येतात. ‘कडेलूट’ कादंबरी निर्मितीची प्रेरणा सामाजिक आहे. लेखक ज्या प्रदेशात जगतो, वाढतो त्याचा परिणाम त्याच्या लेखनावर झालेला दिसून येतो. वारणेचे खोरे, तेथील समाज, निसर्ग, कुटुंब, गावगाडा, कृषीजनसमूह, ग्रामीण समूहभावना याचे चित्रण ‘कडेलूट’मध्ये आलेले दिसून येते. कादंबरीचे कथाबीज ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील ५७० क्रमांकाची ओवीत आहे
“गांवीचे देवळेश्वर । नियामकची होती साचार।
तरी देशीचे डोंगर । उगे का असती। “
ग्रामदैवत सृष्टीचे नियामक असतील तर देशातील संपूर्ण डोंगर तिथल्या माणसाचे नियामक ठरणार नाहीत काय ? हा सामाजिक प्रश्न संपूर्ण कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेला दिसून येतो. यावरून कादंबरीकाराच्या लेखनशैलीवर अध्यात्म, शेती, माती, निसर्ग यांचा पगडा तसेच लेखनाची चिंतनशीलता दिसून येते.
कादंबरीतील तुका नावाची मध्यवर्गीय कुटुंबातील व्यक्तीरेखा कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेली दिसुन येते. डोंगरकड्याची होणारी लूट, रस्ते विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, जंगलतोड, जमिनीच सपाटीकरण, रात्रं-दिवस मुरुम, माती, दगड, खडी क्रश सँड यांचा वारेमाप वापर, स्वार्थाने बरबटलेली ठेकेदारी वृत्ती, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा, आधुनिकीकरणाच्या नावाखाली विकासाचा बदललेला दृष्टीकोन, इ.नी हैराण झालेला मुद्दा, निसर्गप्रेमी असलेला दिसतो. नवऱ्याला पती हाच परमेश्वर मानणारी शांता, प्रेम, सहकार्य, नातिसंबंध टिकविणारी शांता, ग्रामीण भारतीय स्त्रीचा उत्कट नमुना मानता येईल. बंधूप्रेमाचा उत्कट नमुना म्हणून कादंबरीतील तुकाचा साडू धनाजी व संभाजी कादंबरीतील ग्रामीणत्व, सामाजिक भान टिकवून ठेवतात. धनाजीवर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्याचा मेकॅनिकल भाऊ संभाजी धनाजीला मदत करतो “अरे, अस डोळ्यात पाणी आणून कसं चालेल. सख्खा भाऊ आहेस माझा. माझ्यासाठी पैसा नाही तर तू महत्त्वाचा आहेस.” (कडेलूट, पृ.क्र.१५७)
‘कडेलूट’ कादंबरीमधील कृषीव्यवस्था वारणेच्या खोऱ्यातील समृद्ध, संपन्न असलेली दिसते. डोंगरकड्याच्या लुटीच्या माध्यमातून निसर्ग आणि माणूस यांच्यातील संघर्ष सूक्ष्म पातळीवर जाऊन चितारला आहे. पण संघर्षात टोकदारपणा दिसत नाही. बरबटलेल्या व्यवस्थेच्या विरोधात तुका चिंतन करतो पण कादंबरीतील संघर्ष तीव्र रूप धारण करीत नाही ही कादंबरीची मर्यादा मानता येईल. ‘कडेलूट’मध्ये सामाजिक संस्था टिकून असलेल्या दिसतात. कादंबरीत राजकीय विषमतेच्या अनुषंगाने गावगाड्याचे झालेले राजकीयीकरण, स्वार्थ, सत्ता, संपती यांना महत्त्व आल्यामुळे सामान्य माणूस भरडला गेल्यामुळे इथल्या व्यवस्थेचे बुरखे फाडणे गरजेचे होते पण कादंबीरीची तशी रचना झालेली दिसत नाही. कादंबरीकार सामाजिक असल्यामुळे डोंगर-दऱ्या, नद्या-पर्वत, निसर्ग यांना आपल्या संस्कृतीचा घटक मानतो. राजन गवस म्हणतात, “निसर्गासह जगणे, प्रत्येकाला आपले मानून जगणे हा कृषीधर्म हेच गावगाड्याचे धर्माचरण होय? ही कृषीधर्माची, गावगाड्याची धर्माचरण व्यवस्था ‘कडेलूट’ मध्ये वारंवार आलेली दिसून येते.
‘कडेलूट’ मध्ये ग्रामीणत्व, सामाजिकत्व टिकून आहे. गावगाड्यांना पोखरणारे घटक दिसतात. शैक्षणिक मागासलेपणामुळे अजय-विजय ही तुकाची मुले मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत कुटुंबाला मदत करीत असलेली दिसून येतात. कादंबरीवर, लेखकावर वारकरी संप्रदायाचा पगडा असलेला दिसून येतो. म. गांधीजीचा “खेड्याकडे चला’ हा संदेश या कादंबरीतून मिळतो. रक्तरंजीतपणा कादंबरीत आढळत नाही. निसर्गावर अतिक्रमण झालं की, व्यक्ति, समाज, संस्था, व्यवस्था यांचा अंत नक्की जवळ आला आहे हा संदेश ही कादंबरी वाचकाला पावलोपावली लक्षात आणून देते.
‘कडेलूट’ मधील सांस्कृतिक आकलन :-
‘कडेलूट’ मधील सांस्कृतिक आकलनाचा शोध घेताना असे दिसून येते की, कादंबरीत कृषी संस्कृती, गावगाड्याशी निगडीत असलेली दिसून येते. कादंबरीतील तुका त्याची बायको शांता, मुले अजय, विजय, बहिण पुष्पा, मेहुणा सर्जेराव, धनाजी, संभाजी हे भाऊ हे कृषी संस्कृतीशी एकरूप झालेले दिसून येतात. इथल्या मातीची, संस्कृतीची, परंपरेची ओढ सर्व पात्रांना दिसून येते. पतीचा शब्द प्रमाण मानणारी शांता, सुधा, सुलभा या स्त्रीया सांस्कृतिक मूल्ये जपत असलेल्या दिसून येतात. साहित्य, समाज, संस्कृतीचा निकटचा संबंध असतो. साहित्य आणि सामाजिक परिस्थिती यांचा अविभाज्य संबंध असतो. मात्र लेखकाचे सामाजिक व्यवस्थेतील स्थान कोणते त्यावर त्याने केलेल्या सामाजिक चित्रणाचे स्वरूप अवलंबून असते. कादंबरीकार स्वतः शिक्षक असल्यामुळे वारणेच्या खोऱ्यातील व्यक्ती, समाज, संस्कृती, श्रध्दा, परंपरा, रुढी इ.ची जाण असल्यामुळे खेडी जरी बदलली असली तरी लेखक ग्रामीण सांस्कृतिक बाज, समूहभान, आत्मनिष्ठा, मूल्यनिष्ठा, सत्यनिष्ठपणा या मूल्यांची पेरणी कारंबरीमध्ये केल्यामुळे कादंबरीला सांस्कृतिक मूल्य प्राप्त झालेले दिसून येते.
‘कडेलूट’ मध्ये निसर्ग, डोंगर-दऱ्या, पर्वत, जंगल ही आपली आभूषणे आहेत असे लेखक निवेदन करतो. डोंगरकड्यांच्या उत्खननामुळे निसर्गाचे विद्रुपीकरण होत असल्यामुळे इथल्या निसर्ग संरकृतीला धक्का पोहचत आहे. ही सल लेखकाच्या मनामध्ये वारंवार दिसून येते. ‘कडेलूट’ मध्ये अध्यात्मिक आणि सामाजिक विचारांची पेरणी केलेली दिसून येते. कीर्तन, प्रवचन, अभंग, पोथी वाचणे, पारायण हे आपल्या ग्रामीण कृषी संस्कृतीचे घटक असलेले कादंबरीमध्ये दिसून येतात. यावरून लेखकाची चिंतनशीलता व अध्यात्माचा लेखनावरील पागडा दिसून येतो. एका संवादामध्ये जनार्दन तुकाला म्हणतो “तुकारामा…. आरं प्रवचन संपलय आणि आसा कुठं हारीवलायस?” (कडेलूट पृ.११) ‘कडेलूट’ मधील गावगाड्याची रचना मुळात अध्यामिक असलेली दिसून येते.
गायरान उध्वस्त करणे, टेकडीची, दगड, माती, खडी, क्रश सँड इ. साठी लूट करणे, रस्ते विकासाच्या नावाखाली औषधी वनस्पती तोडणे, जंगलतोड करणे, जाणीवपूर्वक वणवे पेटविणे यामुळे तुकाच्या मनाची विषण्णता दिसून येते. माणूस बेभानपणे वागत असेल तर निसर्ग, कृषी, संस्कृतीचा अंत जवळ आला आहे असा संदेश या कादंबरीतून वाचकाला अर्थबोध होतो. ‘कडेलूट’ मध्ये ग्रामदेवतेच्या जोडीला मारुती, श्रीकृष्ण, भैरवनाथ, शंकराची मंदिरे दिसतात. जोतीबा या क्षेत्रपाल दैवतावर संपूर्ण पात्रांची श्रध्दा असलेली दिसून येते. राजन गवस लिहितात “खेडयाची स्वतंत्र दैवतव्यवस्था आहे. ज्या दैवतव्यवस्थेचा आणि इथे बहुसंख्यांकांची म्हणून सांगितल्या जाणाऱ्या दैवत परंपरेचा काही एक संबध नाही. इथल्या दैवतव्यवस्थेत पूर्वज हाच देव ही दैवत व्यवस्था त्यांनी स्वतःची स्वतंत्र म्हणून जोपासली आहे. ही कृषिधर्माची दैवतव्यवस्था आहे. ग्रामीण कादंबरीमध्ये याचा प्रत्यय आलेला दिसून येतो.
कादंबरीत सुरपारंब्या, ग्रामीण खेळाचा उल्लेख, स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख, महापुरुषांविषयीच्या घोषणा, आंबी सरांची भाषणबाजी, देशभक्ती गीते, ग्रामीण गणेशोत्सव, झाडांना राखी बांधणे उल्लेख, रक्षाबंधन उत्सवाचे उल्लेख, निसर्ग रक्षण, ऐतिहासिक, पौराणिक उल्लेख आल्यामुळे कादबरीचे सांस्कृतिक रूप अधोरेखित झालेले दिसून येते. या कादंबरी निर्मितीचे प्रयोजन प्रबोधन करणे हे स्वतः लेखकानेच सांगून टाकले आहे. भौतीक संस्कृतीला लोकं बळी पडल्यामुळे ढाबा, होटेल संस्कृती उदयास आल्यामुळे पैसा उभारणी जमीन विक्रीतून करायची हा विरोधाभास कादंबरीत जाणवतो.
कादंबरीत बुलुतेदार-आलुतेदारांचे उल्लेख येतात. तुका-शांताच्या माध्यमातून श्रमनिष्ठा, मूल्य, समूहभान, उदारता, सहकार्य, नातेसंबंधावरचा विश्वास, जगण्याचे सच्चेपण, समूहभान, परोपकारवृत्ती, नैतिकता इ. ही ग्रामीण कृषिजन परंपरेच्या जगण्याची मूल्ये हीच ‘कडेलूट’ कादंबरीची साहित्यमूल्ये दिसून येतात.
कडेलूट’ कांदबरीमधील भाषिक आकलन :-
‘कडेलूट’ कादंबरीची आशयसूत्रे अध्यात्मिक, सामाजिक असलेली दिसून येतात. कादंबरीचा प्रारंभ अध्यात्मिक मध्य सामाजिक, शेवट प्रबोधनात्मक असलेला दिसून येतो. कादंबरीचे कथाबीज ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील ५७० क्रमांकाची ओवी ‘गांवीचे देवळेश्वर’ ही आहे. कांदबरीच्या मध्यावर निसर्ग आणि माणूस असा संघर्ष आहे. कादंबरीमध्ये संघर्घाने म्हणावे असे रूप धारण केले नाही. ही कादंबरीची मर्यात मानता येईल. कादंबरीमध्ये तुकावरच संपूर्ण सामाजिक प्रश्नांची भिस्त असलेली दिसून येते. कादंबरीचा शेवट ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळवती।’ या संत तुकारामाच्या अभंगाने केला आहे. या कादंबरीचा शोध घेत असताना असे दिसून येते की, अध्यात्म हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. नव्हे ती ग्रामसंस्कृतीतील जगण्याची एक धारणा आहे. कादंबरीचा प्रारंभ अध्यात्मिक आणि शेवट देखील अध्यात्मिक केलेला आहे. ‘अध्यात्माकडून अध्यात्माकडे जाण्याचा एक मार्ग, नव्हे तर आज ती काळाची गरज आहे. अध्यात्मिक अंगभूत शैलीचे सुत्र इथे जाणवते.
‘कडेलूट’ कादंबरीमधील भाषिक अविष्कार कोल्हापूर जिल्हयातील वारणेच्या खोऱ्यातील आहे. वारणाकाठची बोली भाषेच्या माध्यमातून कादंबरीचे कथानक चितारलेले दिसून येते. बोलीचा स्वतंत्र बाज कादंबरी आशयामध्ये दिसून येतो. वारणा काठच्या बोलीमुळे कांदबरीला भाषिक सौंदर्य प्राप्त झालेले दिसून येते. प्रमाण भाषा आणि वारणाकाठची बोलीचा संस्कार कादंबरीत झालेला दिसून येतो. कादंबरीतील तुका, शांता, धनाजी, संभाजी, सुधा ही पात्रे बोली भाषेत संवाद करीत असलेली दिसून येतात. ‘कादंबरीचे वातावरण कोल्हापूर परिसरातील वारणेच्या खोऱ्यातील समृद्ध संपन दिसून येते. अधून-मधून कथानकातून हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहारचे दर्शन घडते. विविधतेतून एकतेचे दर्शन घडलेले दिसते. कादंबरीत १९५३, २०१९, २०२१ सालातील महापुराचे संदर्भ, ढगफुटी, डोंगरकड्याच्या लूटीचा खणखणाट, माळीण इर्शाळवाडी दरडी कोसळल्याच्या घटना, चेंबूर, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर, कुर्ला भागातील दरडी, कोसळल्याच्या घटनेमुळे कादंबरीत भीतीदायक वास्तव निर्माण केलेले दिसून येते. परंतु लेखक त्यावर उपाय सांगत असल्यामुळे ही भीती कमी झालेली दिसून येते. घटनाप्रसंग आणि पात्रयोजनेद्वारे आकारणारे कांदबरीतील कथा कथानक, निवेदन व्यवस्था आणि निवेदनातून पुढे येणारा निवेदक यासह कांदबरीला मुर्तरुप देणारी भाषायोजना या गोष्टी कादंबरी अविष्काररुपाचे प्रमुख घटक आहेत. या सर्व घटकांना पूरक अशी योजना कादंबरीमध्ये झालेली दिसुन येते.
कादंबरीत लेखक स्वतः वक्ता असल्यामुळे आंबी सरांच्या माध्यमातून भाषणबाजीचा प्रत्यय, घोषणात्मक वाक्ये आलेली दिसून येतात. च्यायला, च्यामारी, झक मारली इ. ग्रामीण शिव्यामुळे बोलीचे महत्त्व वाढलेले दिसून येते. कादंबरीचे शीर्षक अल्पाक्षरी समर्पक दिसून येते. कादंबरीला कडेलोट वरुन कडेलूट हा शब्दला सुचला असावा. ऐतिहासिक शब्दांचा, जोडशब्द, अत्रस्त शब्दांचा वापर, म्हणी, वाक्यप्रचार, रुढी, हिंदी, इंग्रजी, मराठी शब्दांचा वापर यामुळे भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. खोपटे, चर, मोदळा, मुरडाण, टोकणन, भांगलण इ. शेतीशी निगडीत शब्द शेतकऱ्यांच्या तोंडी वारंवार ऐकायला मिळतात. स्त्रीयांच्या तोंडी बुट्टी, दळाण, निवडणं, टिपणं, पाखडणं, जेवाणखाण ही शब्दरूपे स्त्रीयांच्या तोंडी दिसून येतात. दाणेकरवाडी, शिलकेरवाडी, कुपलेवाडी, मानेवाडी गावांच्या नावांना वाडी हे प्रत्यय लागलेले दिसून येतात. बसवलंय, इस्काटलय, फिरतय अशी क्रियापदाची रूपे दिसून येतात. स्त्रीयांच्या तोंडी संस्कृतीनिष्ठ, प्रेमळ वारणेची बोली दिसून येते. नाम आणि सर्वनामाच्या विभक्ती प्रत्ययामध्ये फारसा फरक आढळत नाही. भाषेतील कडकपणा, ठसकेबाजपणा, विशिष्ट लय, रांगडेपणा यामुळे बोलीचे उच्चारदृष्ट्या वेगळेपण पटकन नजरेत भरते. भाषिक आकलनाचा शोध घेत असताना असे दिसून येते की, ‘वारणाकाठची बोलीचा स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे आहे असे मला वाटते.
एकंदरीत प्रस्तुत शोधनिबंधामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आकलनाच्या, आस्वाद, मूल्यमापनाच्या पातळीवर शोध घेत असताना कादंबरीला सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि साहित्यमूल्य प्राप्त झालेले दिसून येते. दलित मित्र कदम गुरुजी, महाविद्यालय, मंगळवेढा येथे दिनांक १२/०३/२०१४ रोजी ‘कडेलूट’ कांदबरीवरती झालेल्या परिसंवादामध्ये मी असे मत मांडले होते की “कडेलूट मधून निसर्गाचा आक्रोश, डोंगरकड्याची धडधड, आधुनिकतेच्या नावाखाली विकासाच्या बेगडी कल्पना, गावगाड्याचे, निसर्गाचे झालेल विद्रुपीकरण, त्यामुळे अंतर्बाह्यरीत्या कोलमडून पडलेला उदास, हैराण, हतबल उध्वस्त झालेला ग्रामीण माणूस, अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत वारणाकाठच्या बोलीच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुतारी फुंकीत असलेला दिसून येतो. त्यामुळे कडेलूटच्या पाना-पानाला डोंगरकड्याच्या लूटीचा वास येत असलेला दिसून येतो.”
निष्कर्ष :-
‘कडेलूट मधील सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आकलनाचा शोध घेतल्यानंतर असे निष्कर्ष दिसून येतात.
१. कडेलूट ही निसर्ग, पर्यावरणहानी, सामाजिक प्रश्नांची उकल करणारी सामाजिक कादंबरी आहे.
२. कादंबरीचा प्रारंभ अध्यात्मिक मध्य सामाजिक शेवट प्रबोधनात्मक केलेला दिसून येतो. अध्यात्माकडून अध्यात्माकडे हे सुत्र दिसून येते.
३. कादंबरीत निसर्ग आणि माणूस संघर्ष चित्रीत केला आहे.
४. जागतिकीकरणानंतर विकासाच्या बेगडी कल्पनांचे ग्रामीण भागावर झालेले विपरीत परिणाम दिसून येतात.
५. पात्रांना गावाची, मातीची, निसर्गाची, नातेसंबंधांची ओढ असलेली दिसून येते. पात्रे आकांड तांडव, थयथयाट करताना दिसत नाहीत.
६. कादंबरीतून लेखक निसर्गविषयक समस्या मांडतो व त्यावर उपाय सुचवितो. त्यावरून कादंबरीचा उद्देश प्रबोधन असलेला दिसून येतो.
७. कादंबरीचे परिप्रेक्ष्य वारणेचे खोरे आहे. वारणाकाठच्या बोलीमुळे कादंबरीला भाषासौंदर्य प्राप्त झालेले दिसून येते. वारणाकाठची बोलीचा स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे असलेले दिसून येते.
८. कादंबरीकार स्वतः वक्ता असल्यामुळे कादंबरीवर भाषणबाजीचा संस्कार झालेला दिसून येतो.
९. कादंबरीचे शीर्षक ‘कडेलूट’ अर्थपूर्ण वाटते. ‘कडेलोट’ या ऐतिहासिक शब्दावरून कडेलूट हा पर्यायी आशयसंपन्न शब्द आलेला दिसतो.
१०. कादंबरीचा आशय, विषय, सामाजिक असल्यामुळे कादंबरीला साहित्यमूल्य प्राप्त झालेले दिसून येते.
संतोष मनोहर फटे
संशोधक विद्यार्थी, मराठी संशोधन केंद्र, मराठी विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपुर (स्वायत्त)
संदर्भसूची :-
१) कुलकर्णी अ.वा.: ‘साहित्य काही संप्रदाय काही सिध्दांत’, प्रतिमा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, ऑक्टोबर २००८, पृ.१३३
२) शोभणे रवींद्रः ‘कडेलूट’ संस्कृती प्रकाशन, पुणे, नोव्हें. २०२३, मलपृष्ठावरील मजकूर.
३) कोत्तापल्ले नागनाथ (संपा): ‘साहित्य आणि समाज’ गो.मा. पवार गौरवग्रंथ, प्रतिमा प्रकाशन, पुणे- प्रथम आवृत्ती, मे २००७, पृ. २५३.
४) सोमण अंजलीः ‘साहित्य आणि सामाजिक संदर्भ’ प्रतिमा प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती २००५, पृ. २७.
५) गवस राजनः ‘कृषिजन संस्कृतीचे साहित्य’, संपा. नागनाथ कोत्तापल्ले, ‘साहित्य आणि समाज’ गो. मा. पवार गौरव ग्रंथ, प्रतिमा प्रकाशन पुणे, प्रथम आवृत्ती मे २००७, पृ.१५५
६) अपिने गजाननः ‘कादंबरीः एक साहित्यप्रकार आणि त्याचे मराठीतील अवतरण’, ‘मुक्त सृजन दिवाळी अंक, संपा. महेश खरात, डिसें. २०२१, पृ.४३
७) पाटील श्रीकांत : ‘कडेलूट’ परिशिष्ट १, ‘वारणाकाठची बोली’ संस्कृती प्रकाशन, पुणे, नोव्हें. २०२३- पृ.१९५
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.