शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत आहेत. याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे. या सर्व बाजूंनी या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
शेती हा न संपणारा व्यवसाय आहे. अनेक उद्योग येतील अन् जातील पण शेती हा असा व्यवसाय आहे त्याला पर्याय असूच शकत नाही. कारण शेतीतील उत्पादनावरच आपले जीवन आहे. असे असले तरी शेती आता संपणार असे बोलले जाते. शेती संपणार नाही फक्त त्यामध्ये आधुनिकता येणार. नव्या तंत्राने शेती होत राहाणार. जो शेतकरी हे तंत्रज्ञान आत्मसात करेल तोच भावी काळात शेतीत तग धरून राहील. २०३० नंतरचे कृषी तंत्रज्ञान कसे असेल ? हरित क्रांतीनंतर आता तंत्रज्ञान क्रातीचे पर्व असेल. जैव आणि नॅनो तंत्राच्या विस्तारापुढे शेती सुलभ आणि व्यवहारिक होत आहे. ड्रोण अन् रोबोट, सेन्सॉर सारख्या उपकरणांचा वापर शेतीत वाढून अचूक निदान करून शेती करावी लागणार आहे. असे हे सर्व बदल शेतीमध्ये होऊ घातले आहेत. अशाने शेती ही आता सर्वसामान्यांच्या बुद्धिमत्तेच्या व्यक्तीचे काम राहीलेले नाही. शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व बदलांचा आढावा डॉ. वसंत जुगळे यांनी बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकात घेतला आहे.
रचनात्मक शेती सुधारणा या पहिल्याच प्रकरणात डॉ. जुगळे यांनी नव्या बदलात येणाऱ्या अडथळ्यावर प्रकाश टाकला आहे. कर्जमाफी म्हणजे कृषी धोरण नव्हे असे सांगत त्यांनी शेती, शेतकरी आणि कृषी पणन व्यवस्थेची दुरावस्था रोखण्यासाठी रचनात्मक सुधारणांची गरज असल्याचे म्हटले आहे. कारण कर्जमाफीने शेतीचे उत्पन्न दुप्पट हे कधीच होणार नाही. अन् बाजारभावाचा प्रश्न हा केवळ घोषणातच राहातो. हे सर्व बदलण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा अशी व्यवस्था उभी करायला हवी. शेतमाल विकण्यासाठी शहरातील खुले भूखंड फार्मर्स मार्केटसाठी उपलब्ध करून द्यायला हवेत. येथे मध्यस्थांना अटकाव व्हायला हवा. प्रत्येक मार्केटच्या ठिकाणी फियाटो सॅनिटेशन लॅब उभारण्याची गरज आहे. यासाठी पणन विषयक कायद्यात सुधारणा अन् त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला हव्यात. अशोक दलवाई यांच्या समितीने शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व्यापक शिफारसी सुचविल्या आहेत. पण याचा विचार अद्याप केला गेलेला नाही अशी खंत जुगळे यांनी व्यक्त केली आहे. बदलत्या कृषी प्रवाहांचा सखोलपणे विचार केला तर शेतीत मोठे भवितव्य आहे हे विचारात घ्यायला हवे.
सदाहरित कृषी क्रांती या प्रकरणामध्ये कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात अमलात येणाऱ्या 5.0 तंत्रज्ञानावर जुगळे यांनी चर्चा केली आहे. मधमाशी वेक्टरिंग तंत्रज्ञान, अचूक निदानाची शेती, इनडोअर व्हर्टिकल फार्मिंग, लेझर स्केअरक्रोज, फार्म ऑटोमेशन, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, मिनीक्रोमोसोम तंत्रज्ञान, रिअल टाईम किनेमॅटिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरले जाईल याचा आढावा त्यांनी घेतला आहे. साहजिकच हे सर्व करण्यासाठी अर्थ पुरवठा होणे गरजेचे आहे. या अनुशंगाने कृषी वित्त व्यवस्थेची पुनर्रचना कशी असायला हवी यावर जुगळे यांनी काही उपाय सुचविले आहेत. को-ऑपरेटिव्ह व्हिलेज बँके योजनेचा उपाय जुगळे यांनी या प्रकरणात मांडला आहे. जैव उर्जा अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्यांचा सहभाग या प्रकरणात पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वाढता वापर या धोरणाचा मुलगामी परिणाम शेती, साखर कारखानदारी, वाहतूक उद्योग, पर्यावरण आणि शेतकऱ्यावर कसा परिणाम होणार या संदर्भात चर्चा केली आहे.
नव्या तंत्रज्ञानाबरोबर शेतीमध्ये नवे जोड धंदेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. नर्सरी हा त्यातीलच एक उद्योग आहे. भारतामध्ये २५०० मोठ्या नर्सरी आणि सुमारे २५ हजार नोंदणीकृती नर्सरी आहेत. या उद्योगातील नवीन प्रवाह आणि संधी यावरही माहिती देण्यात आली आहे. २०३० साल हे कृषी व्यवस्थेतील चौथी कृषी क्रांती अनुभवणारे वर्ष असणार आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याचे महत्त्व अधोरेखीत झाले. यानंतर न्युट्रॅसिटिकल फार्मिंग अथवा पोषणक्षण शेती या नव्या शेती व्यवस्थेचा जन्म झाला आहे. भारतात प्राचीन काळापासून अशा व्यवस्थेची परंपरा आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, न्युट्रीफार्मिंग आदीचा यामध्ये समावेश होतो. वनौषधींची लागवड आणि परंपरा भारतात पूर्वीपासूनच आहे याचे महत्त्व आता पुढील काळात वाढणार आहे या संदर्भातील माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही आता शक्य होऊ लागल्या आहेत. सर्वच क्षेत्रात आता याचा वापर होत आहे मग शेती कशी मागे राहील. शेतीमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. तो कसा असेल यावर जुगळे यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर या प्रकरणात चर्चा केली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कृषी उत्पादनाचे प्रमाण हे वाढवावे लागणार आहे. अशा काळात स्मार्ट शेतीचा पर्याय शेतकऱ्यांना निवडावा लागणार आहे. खते किती व कशी वापरायची, किटकनाशके कधी व कोठे वापरायची हे सर्व आता सेन्सरच्या माध्यमातून समजू शकणार आहे. पर्यावरणाचा विचार करून शेतीमध्ये हे येऊ घातलेले इंटरनेट ऑफ थिंग्जचे अॅप्लिकेशन्स (आयओटी) काय आहे ? त्याचा शेतीमध्ये कसा वापर होईल याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन तीन दशकातच शेतीमध्ये असे आमुलाग्र बदल होणार आहेत यावर मागणीप्रणित कृषी संरचना, भविष्यातील शेती व्यवस्था या प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे. संकटाच्या काळात सहकाराने सामूहिक कृतीतून जगाची सुटका केली आहे. अशा या सहकारी संस्थांची स्थिती बदलत्या काळात कशी असायला हवी. यावर सहकारातील सामूहिक तर्कशुद्धता आणि नवी क्षितीजे यामध्ये जुगळे यांनी मते मांडली आहेत.
ऊस हा गुळ आणि साखरेसाठी पिकवला जातो. पण आता इथेनॉल आणि प्लास्टिकच्या उत्पादनासाठीही ऊस पिकवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर सविस्तर चर्चा शुगरकेन नव्हे एनर्जीकेन, तसेच उसाची जैव रुपांतरण कार्यक्षमता या प्रकरणात जुगळे यांनी केली आहे. साहजिकच यामुळे जीएम उसाची निर्मितीही होऊ शकणार आहे. ब्राझिलमधील शुगर मिल्सने मार्च २०१८ मध्येच जीएम उसाची लागवड सुरु केली आहे. सुमारे १०० साखर कारखान्यांनी जीएम उसाच्या पहिल्या वाणाची लागवड केली. जीएम उसाची लागवड या प्रकरणात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
यासह शेतीचे काही व्यवहारवादी प्रश्नावरही जुगळे यांनी चर्चा केली आहे. भारतामध्ये बेरोजगारीपेक्षा न्युन वेतनाची समस्या गंभीर आहे. जागतिक मंदीमुळे कामगार कपात होऊ लागली आहे. पूर्ण बेकार राहण्यापेक्षा न्युन वेतनावर काम करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. या प्रश्नाकडे जुगळे यांनी लक्ष वेधले आहे. जैवविविधतेचा प्रश्न सध्या गंभीर रुप धारण करत आहे. वन्य प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यांच्या अधिवासाला धोका पोहचू लागला आहे. हवामान बदलामुळे शेतीचा चेहरामोहराच बदलला आहे. लोकांच्या खाण्याचा सवयीही बदलत आहेत. याबदलत्या जीवनशैलीमुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असे जुगळे यांना वाटते. कृषी बाजारपेठेतील ब्लॉकचेन या तंत्रज्ञानात वितरित लेजर आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसमध्ये कृषी अन्न उत्पादन आणि पुरवठा साखळीतील बनावट गोष्टी काढून टाकण्याची क्षमता आहे. ग्राहकांना आरोग्यदायी उत्पादने सुपूर्द करणे, व्यावसायिक विश्वास निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर एक चांगले जीवन सक्षम करणे या तंत्रज्ञानाद्वारे शक्य आहे. याचीही माहिती जुगळे यांनी दिली आहे.
एकंदरीतच बदलते कृषी तंत्रज्ञान कसे असेल अन् भावी शेतकरी कसा असेल याचे चित्र या पुस्तकातून जुगळे यांनी रेखाटले आहे. यासाठी हे पुस्तक जरूर वाचायला हवे. सोपी अन् सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वर्णन करत अवघड अर्थशास्त्रही अगदी सहज समजावून सांगितले आहे.
पुस्तकाचे नाव – बदलते कृषी तंत्रज्ञान
लेखक – डॉ. वसंतराव जुगळे, सांगली
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर, मोबाईल – 9322939040
पृष्ठे – 164, किंमत – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.