शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
जगभरात सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षात रासायनिक खते अन् किटनाशकांच्या अतीवापरामुळे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यातूनच सेंद्रिय शेतीची उपयुक्तता अधिक जाणवत आहे. भारतात २००२ मध्ये सुमारे १४ हजार टन सेंद्रिय शेतीचे उत्पादन होते. त्यातील ८५ टक्के उत्पादनाची निर्यात झाली. आता २० वर्षांनंतर म्हणजे २०२०-२१ मध्ये सेंद्रिय शेतीचे उत्पादन ३४ लाख ९६ हजार ८०० टन झाले. त्यातील २५.३९ टक्के शेतमालाची निर्यात झाली. यातून असे स्पष्ट होते की देशांतर्गत सेंद्रिय शेतमालाचा वापर वाढत आहे. असे असूनही सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे तर सेंद्रिय पिकाच्या आणि शेतजमिनीच्या गुणोत्तरामध्ये भारत ८८व्या क्रमांकावर आहे. अशी शेतीची ही स्थिती आता झपाट्याने बदलणे गरजेचे आहे. शेतीमध्ये तग धरायचे असेल तर शेतकऱ्यांनी बदलायला हवे. तज्ज्ञ शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल घडवून आणायला हवा.
शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता अॅग्रोप्रिन्युअर म्हणणे उचित ठरणार आहे. हा शेतकरी नियोजनबद्ध आणि अचूक शेती व्यवसाय करणारा माणूस आहे. शेती व्यवस्थेतील सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा तज्ज्ञ शेतकरी असेल. कृषी व्यवस्थेमध्ये चौथी क्रांती आणणारा हा कृषी तंत्रज्ञ आहे. या अनुशंगाने शेती तज्ज्ञ शेतकरी घडविण्यासाठी शासकिय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे तितकेच गरजेचे असणार आहे.
जुगळे यांच्यामते, अॅग्रोप्रिन्युअर हा केवळ शेतमालाचे उत्पादन घेणारा तज्ज्ञ नसेल तर त्याला पणन व्यवस्थेचीही चांगली जाण असते. अन्नधान्याचा जागतिक ताळेबंददेखील त्याला ज्ञात असतो. यील्ड मॅपिंग, विंड मॅपिंग, पाण्याची गुणवत्ता, व्हेरेएबल फर्टिलायझर अॅप्लिकेशनचे तंत्र वापरणारा आणि आधुनिक पद्धतीने रोग निदान आणि अन्नधान्याची गुणवत्ता सांभाळणारा असा हा शेतकरी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन तंत्र हाताळणारा आणि ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचविणारा हा शेतकरी आहे. इतकेच नव्हेतर हा शेतकरी ग्राहकांचे वर्गीकरण करून किंमत धोरण लवचिक ठेवणारा आणि ग्राहकांच्या खिशाची आणि अभिरुचीची माहिती असणारा हा शेतकरी आहे. अन्न प्रक्रियेची देखील जाण असणारा प्रक्रियादार आहे. श्रेणी, पॅकिंग आणि पणन व्यवहारामध्ये नावलौकिक असणारा आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरलेला हा नाविण्यपूर्ण, नवोन्मेष आणि रोज नवनवीन विचार करणारा हा नवप्रवर्तक शेतकरी आहे. रोबोट व सेन्सर यांच्या मदतीने मृद आरोग्य, पीक आरोग्याचा अभ्यास करून पिकांच्या मागणीचा शास्त्रीय नोंद करून त्याप्रमाणे शेती करणारा हा शेतकरी आहे.
असे हे नव्या शेतकऱ्याचे रुप असणार आहे. विषमुक्त शेती उत्पादन हे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. याच अनुशंगाने सेंद्रिय शेतीची कास त्याला धरावी लागणार आहे. जगभराचा विचार करता १८७ देशामध्ये सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. सुमारे ३.१ दशलक्ष शेतकरी सेंद्रिय शेती करत असून ७२.३ दशलक्ष हेक्टरवर सेंद्रिय शेती केली जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या पाहणीनुसार सेंद्रिय शेतीमध्ये ऑस्ट्रोलिया नंबर एकला आहे. तेथे सुमारे ३५.६९ दशलक्ष हेक्टरवर सेंद्रिय शेती केली जाते. त्याखालोखाल अर्जेंटिना, फ्रान्स, चीन, उरुग्वे व भारत असा क्रम आहे. भारतात सुमारे २.६६ दशलक्ष हेक्टरवर सेंद्रिय शेती केली जाते. जगभरात दरवर्षी या आकड्यामध्ये बदल होत आहे. पण सेंद्रिय शेतीच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. याला कारण आहे झपाट्याने बदलत चाललेले कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य विषयक जागरूकता. कोरोना महामारीमुळे यात अधिकच जागरुकता आली आहे. न्युट्ऱॉसिटिकल फार्मिंग अर्थात पोषणक्षम शेती व्यवस्था याचा जन्म यातूनच झाला आहे.
कृषी तंत्रज्ञानात जैव तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, सिंचन तंत्रज्ञान, सुगीपूर्व व सुगीपश्चात तंत्रज्ञान, जीएमओ, इलेक्ट्रॉनिक कृषी तंत्रज्ञान, सुदूर संवेदन तंत्रज्ञान, जैव-शाश्वत तत्रज्ञान, रोबोट-ड्रोन तंत्रज्ञान असे विविध तंत्रज्ञान शेतीमध्ये झपाट्याने विकसित होत आहे. सिंथेटिक अन्न घटकांमध्ये क्रांतीच घडत आहे. टेलिमेट्रिक पद्धतीने यंत्रातील बिघाड अगोदरच ओळखता येतात. तशा सुचना मोबाईलवरही मिळतात. अशा या घडामोडींचा आढावा आता शेतीमध्ये घेणे तितकेच गरजेचे आहे. या अशा हायटेक तंत्रज्ञानाने शेतीचे रुपच पालटणार आहे. तज्ज्ञांच्यामते २०३० मध्ये यातूनच शेतीमध्ये नवी क्रांती अनुभवास मिळणार आहे.
डॉ. जुगळे यांच्यामते सहकार क्षेत्रामध्येही मोठे बदल होणे अपेक्षित आहे. यामुळे त्यांनी सहकार क्षेत्रासाठी कोपप्रिन्युअर ही नवी संकल्पना विकसित केली आहे. सहकारामध्ये बदल घडवण्याची फार मोठी क्षमता आहे पण राजकिय नेतृत्त्वाच्या चक्रव्युहामध्ये अडकल्याने त्याचा विकास होऊ शकलेला नाही. नेते बदनाम झाले की सहकार बदनाम असे समिकरणच आता तयार झाले आहे. यामुळे सहकार कारण नसताना मागे पडत आहे. यावरच उपाय म्हणून डॉ. जुगळे यांनी कोपप्रिन्युअर ही संकल्पना मांडली आहे. त्यावर त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतीमध्ये झपाट्याने होणारे बदल हे विचारात घेणे गरजेचे आहे. तरच जगभरात आपले स्थान भक्कम होऊ शकेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.