अहंकाराने, मीपणामुळे, हेकेखोरपणामुळे स्वतःचे नुकसान का करून घ्यायचे हा विचार करायला हवा. पण हा अहंकार, मीपणा सहज जात नाही. हे जावेत यासाठीच काही नियमांचे पालन हे करायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळो नेदावी ।
ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ।। ११६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा
ओवीचा अर्थ – म्हणून स्वधर्माचरण सोडूं नये. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये. असा ब्रह्मदेवानें प्रजांना उपदेश केला.
कितीही कठीण प्रसंग आले तरी सेवाभाव हा धर्म आपण सोडता कामा नये. राज्यकर्त्यांनी सेवा हा धर्मच सोडल्यामुळे सत्तेची गणिते चुकत आहेत. पूर्वीच्याकाळी एकमुखी सत्ता असायची. त्याला कारण त्या राज्यकर्त्यांमध्ये सेवाभाव होता. सेवा हाच त्यांचा धर्म होता. यामुळे जनतेमध्ये त्यांना विरोधकच नसत. तसे धाडसही कोणी करायचे नाही. केले तर ते फार काळ टिकायचेही नाही. कायमस्वरूपी सत्तेसाठी सेवा हा धर्म राज्यकर्त्यांनी जोपासायला हवा. हा धर्म सुटला की आसन निश्चितच डळमळीत होते.
साधकांनीही सेवाभाव अंगी जोपासायला हवा. याचा फायदा मन शांत ठेवण्यामध्ये होतो. सेवेतून समाधान मिळते. मनाला शांती मिळते. हे काम खालच्या दर्जाचे आहे. हा भाव काम करताना ठेवता कामा नये. सेवा हाच धर्म मानून ते काम करायला हवे. यामध्ये सर्व कामाची सवय लागते. विशेष म्हणजे वेळ प्रसंगी आपणास एखादे खालच्या दर्जाचे काम करावे लागले तरी मनाला त्याची सल टोचत नाही. मन विचलित होत नाही. मनाची शांती टिकून राहते. साहजिकच याचा परिणाम चांगला होतो.
अयोग्य काम करण्याचे मात्र टाळायला हवे. योग्य तेच स्वीकारायला हवे. ही सवय अंगी लागावी यासाठीच वारकरी संप्रदायामध्ये काही नियम तयार केले आहेत. हा मोठा, हा लहान, हा श्रीमंत, हा गरीब हा भेदभाव मनातून जावा यासाठीच हे नियम आहेत. विणा घेण्याची पद्धत संप्रदायात आहे. हा विणा घेताना समोरच्या व्यक्तीला वाकून नमस्कार करूनच तो घ्यायचा असतो. एखाद्या लहान व्यक्तीने हा विणा घेतलेला असेल तर त्याच्याकडून घेतानाही हा नियम पाळावा लागतो. विणा घेणारा कितीही मोठा, गर्भश्रीमंत असला तरीही हा नियम येथे आहे. अशा या नियमामागे भेदभाव दूर व्हावा हेच उद्देश आहेत.
विशेष म्हणजे असे काही नियम हे यासाठीच तयार केले आहेत. सेवाभाव निर्माण व्हावा यासाठी या सवयी अंगी लागाव्यात हा यामागचा उद्देश आहे. अहंकार जावा, अहंभाव जावा हे उद्देश आहेत. अहंकाराने, मीपणामुळे, हेकेखोरपणामुळे स्वतःचे नुकसान का करून घ्यायचे हा विचार करायला हवा. पण हा अहंकार, मीपणा सहज जात नाही. हे जावेत यासाठीच काही नियमांचे पालन हे करायला हवे. यामुळे आपणाला या गोष्टींची सवय लागते. धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही सवयी ह्या आवश्यक आहेत. तसे आता या सवयींचे पालन करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य वाटत असले तरी हाच खरा धर्म आहे. याचे आचरण हे आवश्यक आहे. सेवावृत्तीच अनेकांचे भले करते. अमरत्व प्राप्त करून देते. याचा विचार करायला हवा. स्वतःच्या स्वार्थासाठी सेवेचा त्याग करणे हे मूर्खपणाचे आहे.