कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी, कृषि विभागातील क्षेत्रिय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे, असे म्हणावे लागेल. या ग्रंथाची रचना, निर्मिती आणि सचित्र मांडणी अतिशय उत्तम झालेली आहे.
रावसाहेब पुजारी,
संपादक, शेतीप्रगती मासिक,
कोल्हापूर मोबा. – ९३२२९३९०४०.
आजची आपली शेती ही दिशाहीन अंधानुकरणाकडे वाटचाल करत आहे. कृषी विस्ताराची यंत्रणा एक खिडकीत अडकून पडलेली आहे. गाव पातळीवरचा, शेतकऱ्यांच्या बांधावरचा कृषि विभागाचा संपर्क दिवसेंदिवस कमी कमी होत निघालेला आहे. कृषी विद्यापीठातील नवं संशोधन शेतीपर्यंत पाझरायला खूप वेळ लागतो आहे. अशा परिस्थितीत गावोगावीच्या कृषि सेवा केंद्रावरचा लोकांचा वावर वाढलेला आहे. तसेच खासगी उत्पादकांचे मोठे जाळे गावोगावी पसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे, आडवणुकीचे आणि लुटीचे प्रमाण वाढलेले दिसते आहे. यातून शेतकऱ्यांची सुटका झाली पाहिजे. त्यासाठी त्याला सजग करण्याची गरज आहे. त्यासाठी त्याच्या हातामध्ये शास्त्रीय माहितीचं ज्ञान भांडार उपलब्ध असले पाहिजे. ही गरज नुकतेच प्रकाशित झालेल्या `एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन` या ग्रंथाने काही अंशी पुर्ण केली आहे.
कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी, कृषि विभागातील क्षेत्रिय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे, असे म्हणावे लागेल. या ग्रंथाची रचना, निर्मिती आणि सचित्र मांडणी अतिशय उत्तम झालेली आहे.
पीक उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक हा जमीन आहे. पण हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनाकडे अधिक लक्ष दिले. जमिनीच्या व्यवस्थापनाकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. परिणामी आज जमिनीतील सेंद्रिय कर्बाची उपलब्धता खूपच कमी झालेली आहे. ती चिंताजनक स्थितीला आलेली आहे. त्यामुळे जमिनींची उत्पादकता कमी कमी होत निघालेली आहे. ती भरून काढणे एक आव्हान झालेले आहे. एका बाजूने कृषी निविष्ठांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्यांच्या मात्राही वाढलेल्या आहेत. पण त्या तुलनेत उत्पादन निघेनासे झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झालेली आहे.
दुसऱ्या बाजूला या परिस्थितीचा फायदा उठवणारे अनेक बाजारबुनगे मार्केटमध्ये उतरले आहेत. भु-सुधारके, मायक्रो न्युट्रीयंटसच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माथी काहीबाही मारू लागले आहेत. पहिल्या एकाद्या पिकात त्यांचे रिझल्टही भेटतात. पण नंतर त्यातील फोलपणा पुढे येऊ लागतो. कोणी केवळ सेंद्रिय खतांचा आग्रह धरतो तर कोणी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याचे सांगून टाकते. या सगळ्यांचा मध्य साधून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाले तरच शेतकऱ्याना मदत होईल. हे लक्षात घेऊन संपादक मंडळींनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
यामध्ये अन्नद्रव्यांचे शेतीतील महत्त्व, पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये किती आणि कशी काम करतात, पीक उत्पादनामध्ये माती परीक्षणाचे महत्त्व, त्याच्यासाठी करावी लागणारी तयारी तसेच कोणत्याही खतांचे कार्यक्षम व्यवस्थापन जमिनीतून किंवा फवारणीतून कसे होते, वनस्पती कोणत्या स्थितीत खते कशी घेतात, याची सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये आलेली आहे.
वनस्पती पिकाच्या पोषणासाठी जमिनीतून अन्नद्रव्ये कसे घेतात आणि त्याचे रूपांतर उत्पादनात होताना चय-प्रचय क्रिया कशा होतात, याची शास्त्रीय माहिती आणि त्यातील बारकावे सांगणारे प्रकरण वाचनीय असे आहे. तसेच पोषणद्रव्ये, आंतरक्रिया आणि खत व्यवस्थापन कसे केले जाते. याची सविस्तर मांडणी एका स्वतंत्र प्रकरणात केलेली आहे.
एकूणच खत वापरामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे. ते केल्याने काय काय फायदे होतात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय विद्राव्य खते, दुय्यम आणि सुक्ष्मअन्नद्रव्ययुक्त खतांचे पिकाच्या वाढीतील, उत्पादन निर्मितीत किती महत्त्व आहे. यातून कोणते अन्नघटक पिकाला मिळतात आणि त्याचा कोणत्या गोष्टींवर प्रभाव टाकतो, याची माहिती काही ज्येष्ठ शास्त्राज्ञांनी दिलेली आहे. याचबरोबर सेंद्रीय शेती व्यवस्थापन, सेंद्रिय खते व जीवाणू खतांचे महत्त्व आणि वापरातील गरज, अमृत पाणी, बीज संस्काराचे पिकाच्या वाढीतील महत्त्व अशा अनेक गोष्टींचे विवेचन या पुस्तकामध्ये वाचावयास मिळते.
समस्याग्रस्त जमिनी व त्यावरील उपाय करताना माती, पाणी, पाने यांच्या परीक्षणाला किती महत्त्व आहे. तसेच त्यातून मिळणाऱ्या दिशादर्शनातून शेतकऱ्यांनी नेमके काय घ्यावे, याबाबतही सविस्तर, सचित्र माहिती दिलेली आहे. एकूण रासायनिक, सेंद्रिय खतांच्या पीकनिहाय शिफारशी काय आहेत आणि त्याचा वापर करताना काय दक्षता घेतली पाहिजे, याचे विवेचनही यामध्ये दिलेले आहे. प्रत्येक पिकाला कोणते खत कसं उपयोगी पडते, याच्या शास्त्रीय शिफारशी काय आहेत. याबाबतचा महत्त्वपुर्ण चार्ट या पुस्तकात दिलेला आहे.
खरीप आणि रब्बी पिकांच्या खतांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यातील बारकावे आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, याचेही मार्गदर्शन खपू सुंदर पद्धतीने दिलेले आहे. नॅनो खत ही आधुनिक युगाची शेती क्षेत्राला लाभलेली देणगी आहे. एक गोणी खत आणि शंभर ग्रॅम नॅनो खत सारखा परिणाम देते. याचे बारकावेही यामध्ये मांडलेली आहे.
जमीन समृद्ध ऱाहिली तरच उत्पादन मिळणार आहे. ते टिकविणे, त्यातील सेंद्रिय कर्बाचा टक्का वाढविणे आणि शेती शाश्वततेकडे नेण्यासाठी समृद्ध मातीसाठी समग्र माती व्यवस्थापन कसे करावे, यासाठी काही प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन यामध्ये पाहायला, वाचायला मिळते. या एकूणच पुस्तकामध्ये प्राचार्य उमेश पाटील, नामदेव परीट, डॉ. महादेव पोवार या संपादक मंडळाशिवाय शकरराव माळी, हरिदास हावळे, रावसाहेब पुजारी, प्रा. अरूण मराठे, प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, डॉ. बाळकृष्ण जमदग्नि, डॉ. बी. पी. पाटील, नेताजी पोवार, प्रताप चिपळूणकर, सुरेश देसाई यांचे लेखन सहयोग दिसते.
शेतकरी, कृषी विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी, कृषि विस्तार कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्यासाठी एक उत्तम दिशादर्शक ग्रंथ या निमित्ताने सिद्ध झालेला आहे. तो प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा निश्चितच आहे. त्यातून शेतकरी शास्त्रज्ञ घडण्याची एक प्रक्रिया वृद्धिंगत होत जाईल, असा विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
संपादक – नामदेव परीट, उमेश पाटील, डॉ. महादेव पोवार
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर (मो. ९३२२९३९०४०)
पृष्ठे – १४४, किंमत – २०० रूपये.