भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला कृतार्थ करते, म्हणूनच विठ्ठल भक्ती वारकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उर्जा देऊन जाते.
बंडोपंत बोढेकर, शिवाजीनगर ,चंद्रपूर
भ्रमणध्वनी – ९९७५३२१६८२
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ।।
तुळसीहार गळां कासे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि ध्यान ।।
विठू, विठूराया, विठाई , पंढरीचा पांडुरंग असा हा मराठी समाजाचा देव. आषाढी एकादशी आली की, भक्तांचे पाऊल पंढरीकडे वळतात. गावागावातून शेतकरी कष्टकरी लोक घरचा कारभार व्यवस्थित मार्गी लावून महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेच्या भक्तीपीठाकडे पायदळ वारी सुरू करतात. आषाढी कार्तिकीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा पोहा ज्या गावाजवळून जातो, त्या त्या ठिकाणी स्वागत केले जाते. वारीची मांदियाळी हा पायदळ वारकरीच आपल्या नेत्राने अनुभवत असतो.
पवित्र ते कुळ, पावन तो देश ।
जेथे हरीचे दास जन्म घेती ।।
कर्म धर्म त्यांचा जाला नारायण ।
त्यांचेनी पावन तिन्ही लोक ।।
पंढरीचा पांडुरंग हा तसा श्रमिकांचा देव ,जनसामान्यांचा सखा, संतांचा सोयरा आणि कष्टकऱ्यांचा आधार. सर्वांच्या मदतीला धावून येणारा हा पांडुरंग हा आपला आहे, ही भावना प्रत्येकाची असते. आषाढी कार्तिकेला आपल्या गावावरून पायी चालत जाणे, कित्येक तास रांगेत उभे राहणे, तेथे होणारी कुठलीही गैरसोय वारकऱ्यांना भक्तीमार्गापासून दूर करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी ।
पाहिली शोधुनी अवघी तीर्थे ।।
संत सेना महाराज यांचे हे प्रमाण आहे. नामस्मरण व भक्ती हा ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग संतांनी सांगितलेला आहे. सर्व जातीचे लोक वारीत एकत्र येतात आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने पंढरपूरला जमा होतात. सर्व जाती जमातींना भक्ती मार्गाने जोडणारा वारकरी संप्रदाय वैष्णव धर्माचे विकसित रूप आहे. सर्वसमावेशक सहजीवनाच्या भावमय सामाजिक आविष्काराचे दर्शनच जणू.
आजच्या आधुनिक काळातही वारकऱ्यांची संख्या वाढते आहे. विठ्ठल भक्ती सर्वसामान्यांकडे दिसते आहे याला कारण आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई यासारख्या थोर संतांनी विठ्ठल भक्तीचे महत्त्व आपल्या ग्रंथातून सांगुन ठेवले आहे. तो विचार कीर्तनकार , निरूपणकारांनी समाजजीवनाच्या मुळाशी रूजविण्याचे काम सातत्याने केले.
‘हर देश मे तू, हर भेष मे तू,
तेरे नाम अनेक, तू एकही है !’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास,
ज्यांना वारीला जाणे होत नसेल त्यांनी दुःखी न होता आपली दैनंदिन कामे करतानाच घरीच पांडुरंगाचे नाव घ्यावे. आणि आपलं जीवन उन्नत करून घ्यावे हा सरळ भक्तीचा सोपा मार्ग समजावून सांगितला आहे.
विठ्ठल भक्तीची परंपरा आणि आषाढी एकादशीचे व्रत स्वयंस्फूर्त पुढे नेण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग सहाय्यक ठरले आहे. ते अभंग मानवाला भवसागरातून सहज पार करणारे आहे . जो व्यक्ती ज्या स्थितीचा असेल त्याला तसे मार्गदर्शन करणारे आहे .
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ।।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।
मन विकारांच्या अधीन होऊ नये, आपल्या हातून पुण्यकर्म घडावे, जातीभेद विषयक अज्ञान दूर व्हावे , सेवेची उर्जा निर्माण व्हावी या हेतूने पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी पंढरपूर गाठतो. पंढरपूर तर तीर्थांचे तीर्थ आहे.
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख! पाहीन श्रीमुख आषाढी वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक लाखोच्या संख्येने सहभागी होत असतात. वारकऱ्यांच्या जीवनातील वारी हा एक स्वानंद सोहोळा असतो. भारताची ही दक्षिण काशी सोलापूर पासून ७२ किमी. अंतरावर स्थित आहे.
आपल्या आई वडिलांच्या सेवेत रममाण झालेल्या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठल, रुक्मिणीला विटेवर उभे राहत वाट पाहावी लागली. सेवेने खुद्द श्रीविठ्ठल- रुक्मिणी प्रसन्न झाले. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसले आहे. आषाढीला येणाऱ्या असंख्य पालख्या विठ्ठल रुक्मिणीचे मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन मागे परततात, पण मनात सेवेचा मार्ग धरूनच. प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवर येणाऱ्या संकटावर मोठ्या धीराने मात करण्याचे सामर्थ्य घेऊनच.
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेक्षर पूजनाचे ।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख-दुःख जीव भोग पावे ।।
अलीकडे यावारीच्या काळात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते कीर्तन प्रबोधनासोबतच पंढरपूरी स्वच्छता अभियान राबवित आहे. पायदळ वारीत संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता ग्रंथाचे तत्वज्ञान गावोगावी रूजविण्याचे काम करत आहेत.
विसाव्या शतकात विदर्भातील दोन संतानी पंढरीच्या वारीला नेहमी हजेरी लावली. कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज या दोन्ही संतांनी निराधांराना आधार दिला. आंधळ्या लंगड्यांसाठी अन्न सत्र उभे केले. त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे काम त्यांनी उभे केले होते. त्यांनी त्या काळात जनमानसात व्यसनमुक्तीचा, ग्रामस्वच्छतेचा, अस्पृश्यता निर्मूलनाचा महान विचार रुजवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तर ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा चंद्रभागेच्या तीरी मिळाली होती.
सदा घडो स्नान चंद्रभागेतिरी । पतितासी तारी पुंडलिक ।
तनमन लावू विठ्ठलाचे कामी । संत सदा नामी साष्टांगेसी ।।
अशी धुंद अवस्था त्यांची होत असे.
भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला कृतार्थ करते, म्हणूनच विठ्ठल भक्ती वारकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उर्जा देऊन जाते.