नाव आणि जात यावर तुमचे व्यक्तिमत ठरत नसते तर तुमच्यातील गुणांनी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व घडवायचे असते. यासाठीच चांगल्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा करायचा असतो यातून प्रेरणाही घ्यायची असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तें प्रागल्म्यरुप तेजा । जिये कर्मी गुण दुजा ।
आणि धीरू तो तिजा । जेथींचा गुण ।। ८६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – ते पाणीदारपणांरुप तेज ज्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे व धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे.
क्षत्रियांचे गुण आपण पाहात आहोत. एखाद्याचे चांगले गुण घ्यावेत असे म्हणतात. म्हणूनच क्षत्रियांचे गुण घेण्याचा, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्षत्रिय हा त्याच्यातील गुणांनी ठरतो. राजा हा गुणांनी राजा असायला हवा तेंव्हाच तो सार्वभौम राजा ठरू शकतो. त्याचाच राज्याभिषेक जनता उत्स्फुर्तपणे करते. आडनाव छत्रपती ठेवले म्हणून कोणी छत्रपती होत नसतो. तसेच नाव क्षुद्र असले म्हणून कोणी क्षुद्र ठरत नसतो. नाव आणि जात यावर तुमचे व्यक्तिमत ठरत नसते तर तुमच्यातील गुणांनी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व घडवायचे असते. यासाठीच चांगल्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा करायचा असतो यातून प्रेरणाही घ्यायची असते.
दान देताना दुसऱ्याकडून काही मिळेल अशी अपेक्षा कधीही ठेवायची नाही. अशा अपेक्षेने आपल्यात नाराजी येऊ शकते. आपली मानसिकता खचू शकते. हे विचारा घेऊन योग्य मानसिकतेनेच दान हे करायला हवे. तसे सामर्थ्य आपल्यात असायला हवे. सूर्य इतरांना प्रकाश देताना इतरांकडून प्रकाश मिळेल अशी अपेक्षा कधीही ठेवत नाही. झाड वाटसरुंना सावली देते तेंव्हा वाटसरूकडून झाड कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. जेंव्हा आपल्याकडे भरभरून असते तेंव्हाच आपण इतरांना मनासारखे देऊ शकतो. सूर्याजवळ प्रकाशाची काहीच कमतरता नाही. तो सदैव तेजस्वी आहे. त्याचे तेजही इतर ग्रहांच्या तेजाने कमी होत नाही. म्हणून आपण दान देणाऱ्या सूर्याला अन् झाडाला विसरायचे नाही. दान घेणाऱ्यानेही आपण काय देऊ शकतो हे पाहायला हवे. झाड सदैव आपणास सावली कशी देईल. हे पाहायला नको का ? जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणण्यासाठी आपणही काही तरी योगदान द्यायला नको का ? निसर्ग आपले रक्षण करतो म्हणून आपणही निसर्गाचे संवर्धन करणे हे कर्तव्य आहे हे विचारात घ्यायला नको का ? हे विचारात घेऊन आपण कृती करायला हवी. तेंव्हाच समतोल हा राखला जाईल.
सूर्यासारखेच तेजस्वी व्यक्तीमत्व क्षत्रियांचे अर्थात राजाचे असते. त्याचे तेज हे इतरांना स्फुर्ती देणारे, प्रेरणा देणारे, प्रोत्साहित करणारे असते. क्षत्रिय व्यक्तींचे व्यक्तीमत्व हे असे असते. साधकांनेही क्षत्रियांचे हे गुण विचारात घेऊन क्षत्रियाप्रमाणे साधनेत लढण्याची वृत्ती ठेवायला हवी. साधनेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत सदैव दक्ष राहायला हवे. आत्मज्ञानाच्या लढाईत युद्ध हे स्वतःलाच करावयाचे आहे. हे युद्ध स्वतःशीच करायचे आहे. स्वतःवरच आपण विजय मिळवायचा आहे. यात कोणी मदतीला येईल अशी अपेक्षाही ठेवायची नाही. गुरुंच्या मार्गदर्शनाने हे युद्ध स्वतःच लढून स्वतःच आत्मज्ञानी व्हायचे आहे. स्वतः आत्मज्ञानी झालो तरच इतरांनाही आपण आत्मज्ञानी करू शकू. यासाठी स्वतः तेजस्वी व्हायला हवे. तरच आपण इतरांनाही त्या तेजाने उजळवू शकू.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.