दोन्ही काकांनी सायबा विषयी केलेल्या वर्णनानंतर त्याच्यावर लिहीत असताना काही वेळा साहेबा माझ्या देखील डोळ्यासमोर उभा राहिला, हे मी माझे भाग्य समजतो. सायबाची उणीव पुढे आमचे श्रीकांत उर्फ बाबीकाका यांनी भरून काढली. असं असलं तरी आंबेडखुर्दचा अल्पवयीन अनभिशीक्त सम्राट सायबा तो सायबाच !
जे. डी. पराडकर 9890086086
इंग्रज १९४७ साली देश सोडून निघून गेले , देशाला जेवढं लुटता येईल तेवढं त्यांनी लुटलं. परतताना मात्र एक शब्द कायमचा मागे सोडून गेले, तो म्हणजे साहेब ! या शब्दाचे त्या – त्या प्रांतातील भाषेनुसार विविध ग्रामीण शब्द तयार झाले. सायबानू , सायब, साब, सायबा असे शब्द कोकणात उच्चारले जातात. या शब्दावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे, ज्याला साहेब म्हटले जाते, ती व्यक्ती मान सन्मानाने मोठी असते. फार पूर्वी केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच साहेब असे संबोधले जायचे. बदलत्या काळात मात्र राजकारणात ग्रामपंचायत सदस्या पासून अगदी वरिष्ठ स्तरावरील व्यक्तीला ‘ साहेब ’ असेच संबोधावे लागते. एखाद्या व्यक्तीला तो कमी वयाचा असतानाही साहेब असे म्हटले जाते, त्यामागे अत्यंतिक प्रेमभावना असते. एखाद्या व्यक्तीचा अधिकाधिक वावर सरकारी अधिकाऱ्यांसोबत झाला, तर त्याला देखील साहेब असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर सरस्वती प्रसन्न असते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बुद्धीमत्तेचे तेज दिसून येते. अशी व्यक्ती सौंदर्यवान असेल, तर सर्वांनाच त्याची भुरळ पडते. कुटुंबात देखील अशी व्यक्ती सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनते. आमचे आंबेडखुर्द या गावातील घर म्हणजे आम्हा सर्वांसाठीच ऊर्जेचा एक जबरदस्त स्त्रोत आहे. या घरात एकेकाळी किमान २० ते २५ माणसांचा राबता होता. याबरोबरच येणाऱ्या आप्तेष्टांची, स्नेह्यांची , सरकारी अधिकाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी होती. ज्या घरात , येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रसन्न वदनाने स्वागत होते तेथेच लक्ष्मी वास करते. सहाजिकच अशा घरात येणाजाणाऱ्यांचा राबता खूप मोठा असतो. याच घरात रंगनाथ केशव पराडकर हे एक अलौकिक बुद्धिमत्तेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व होऊन गेले. माझ्या जन्मापूर्वीच दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्याविषयी वडिलांसह सर्व चुलत्यांकडून खूप काही ऐकलं होतं. जिभेवर सरस्वती असल्याने मिश्किल आणि विनोदी स्वभावाच्या रंगनाथला सर्वजण “ सायबा ” असंच म्हणत असत. या सायबाची कहाणी विलक्षण आणि तितकीच काळीज पिळवटून टाकणारी आहे.
आंबेडखुर्दचे आमचे घर म्हणजे माझ्या लेखनाचे आणि डोंगरावरच्या कथांचे उगमस्थान आहे. माझे आजोबा म्हणजे केशव आत्माराम पराडकर, यांना अण्णा असं म्हणत असत. डोंगर उतारावर अण्णांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि नैसर्गिक स्त्रोताने आलेल्या पाण्याचा योग्य उपयोग करून घरा भोवतीच्या परिसराचे नंदनवनात रूपांतर केले. आलं, बटाटे, हळद आणि सुपारी यांचं त्यांनी अमाप उत्पादन घेतलं. सुपारीच्या हंगामात पोफळं ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहायची नाही, असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. केशरी रंगाची ही पोफळं म्हणजे, आमच्या आंबेडखुर्दची खरी समृद्धी होती. पोफळ सोलण्याच्या कामासाठी घरातील सर्वच माणसं बसत असत. यात आघाडीवर असायचा तो सायबा ! पोफळ सोलायला सुरुवात झाल्यानंतर अत्तराच्या कुपीत सापडणार नाही, असा गंध सर्वत्र दरवळायला सुरुवात व्हायची. हा गंध एकदा सायबाच्या मस्तकामध्ये भिनला, की सायबाची विनोद बुद्धी जागृत होई. मग पोफळं सोलण्यासाठी बसलेल्या सर्व मंडळींचा ताण हलका करण्याचे काम सायबा अगदी सहजपणे पार पाडत असे. नुकतेच यौवनात पदार्पण केलेल्या सायबाची विनोद बुद्धी पाहून खळाळून हसणाऱ्या सर्वांच्याच डोळ्यात हसताहसता आनंदाश्रू तरळत. मिश्किल स्वभावाचा सायबा पोफळं सोलता-सोलता प्रत्येक वाक्याला जे विनोद करे, ते ऐकून भविष्यात हा तरुण नक्कीच कोणत्यातरी पदावरचा साहेब बनेल असेच सर्वांना वाटे.
पराडकर कुटुंबीयांचे भविष्य बदलण्यासाठी आंबेडखुर्दच्या घरी एका अलौकिक बाळाचा जन्म झाला. रंगाने गोरापान गालावर आलेली लाली , केस मुलायम आणि काहीसे पिंगट, चेहरा गोल सारं सौंदर्य हे जणू दृष्ट लागण्याजोगं होतं. या बाळाच्या जन्माने, घरी आनंदी आनंद पसरला. त्याचा गोरा रंग पाहून घरातील कोणीतरी पटकन म्हणालं , हा मुलगा म्हणजे जणू रंगाचा नाथच आहे. अण्णांच्या कानावर हे वाक्य गेलं आणि या बाळाचं नाव ‘ रंगनाथ ’ हेच ठेवायचं, असं अण्णांनी मनोमन ठरवून टाकलं. नव्या बाळाचं बारसं दणक्यात संपन्न झालं. गावच्या विविध वाड्यासह अगदी सड्यावरील दूरची माणसे देखील बारशाला हजर होती. बाळाचं नाव ‘ रंगनाथ ’ असं ठेवल्याचं सांगून आलेल्या सर्व माणसांचं तोंड गोड केलं गेलं. अन्य भाऊ-बहिणींसह घरातील सर्वांचाच रंगनाथ लाडका होता. त्याला उचलून घेण्यासाठी सर्वांचीच परस्परात अगदी स्पर्धा लागे. बालपणापासूनच रंगनाथच्या चेहऱ्यावर हास्य होते. नवीन माणसाचा चेहरा दिसला, तरी प्रथम रंगनाथच्या चेहऱ्यावर यायचे ते हास्यच. त्याचे रांगणे , दूडदुड पावलाने चालणे सारेच मोहक होते. रंगनाथ रडला म्हणून त्याला कधीच उचलून घ्यावे लागलेले नाही. गुणी बाळाकडे असणारे सर्व गुण रंगनाथ मध्ये ओतप्रोत भरलेले होते. घरी कामासाठी येणाऱ्या महिलांकडे देखील रंगनाथ तासंतास रमायचा. अन्य भावंडे देखील रंगनाथची खूप काळजी घेत. गुणी बाळाचा सर्वांनाच लळा लागतो, रंगनाथच्या बाबतीत असंच घडलं.
माणसांच्या गोतावळ्यात रंगा झटपट मोठा होत होता . तो जसा मोठा होत होता, तसं त्याचं दिसणं अधिक राजबिंड होवू लागलं. बोलणं, शब्दांचे स्पष्ट उच्चार, स्मरणशक्ती हे सर्व रंगा मध्ये अगदी भरभरून भरलेलं होतं. सायंकाळी दिवेलागण झाल्यानंतर रंगा भावंडांबरोबर झोपळ्यावर बसून खणखणीत आवाजात पर्वचा म्हणू लागला. रंगा एकपाठी होता, हे त्याच्या पाठांतरावरून सर्वांच्याच लक्षात आले. हळूहळू अन्य भावंडांबरोबर रंगाने शाळेची देखील वाट धरली. गोरागोमटा आणि तांबूस रंगाची छटा असलेला रंगा शाळेत गेल्यानंतर शिक्षकांच्या मनात घर करून बसला. एखाद्या दिवशी रंगा शाळेत आला नाही, तर शिक्षक बेचैन होत. अन्य भावंडांजवळ रंगा शाळेत न येण्याचं कारण शिक्षकांकडून विचारलं जाई. स्वभावाने नम्र आणि अभ्यासात नेहमीच पुढे असणारा रंगा शिक्षकांच्या कौतुकास नेहमीच पात्र होत असे. रंगाची अभ्यासातील प्रगती पाहून घरी सर्वांकडूनच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाई. शाळेच्या अभ्यासाबरोबरच घरातील विविध काम करण्यात रंगा नेहमीच पुढे असे. सुट्टीच्या दिवशी तर तो स्वतःला विविध कामांमध्ये गुंतवून घेई. घरातील महिला वर्गाच्या हातांना मदत करण्यासाठी रंगा नेहमीच पुढे असे. घराच्या जवळ असणाऱ्या बागेवर रंगाचा मोठा जीव होता. फावला वेळ मिळाला, की रंगा बागेतील विविध फुलझाडे आणि फळझाडांच्या आजूबाजूला खूप काळ रमत असे. घरातील देव्हारा, पालखी सारखा मोठा असल्याने पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर फुलं लागत. सकाळच्या वेळी बागेत जाऊन विविध फुलझाडांच्या अवतीभोवती फिरत, मोन्या कळ्या तुटणार नाहीत याची काळजी घेत, रंगा अत्यंत नाजूक हाताने फुलं काढून हातातील फूलपरडी भरून आणायचा. बागेतून आणलेली सारी फुलं पूजेच्या तबकात तो क्रमवार लावून ठेवत असे. पूजा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तबकातील फुलं रंगाने काढली आहेत, हे आपोआप कळून यायचं.
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रंगाकडे नाही, असं कधी व्हायचं नाही. थोडक्यात म्हणजे तो हजरजबाबी होता. जिभेवर सरस्वती असल्याने स्वभाव मिश्किल विनोदी आणि खूप बोलका. आमचे आजोबा अण्णा हे पोलीस पाटील असल्याने घरी सरकारी अधिकाऱ्यांचा वरच्यावर राबता असायचा. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला रंगा घरी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करण्यात मग्न असे. रंगा घरी असेल, तर येणाऱ्या अधिकाऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी अन्य कोणाला घ्यावीच लागत नसे. अधिकारी मंडळीं आणि रंगाचे एकमेकांजवळ खूप चांगले संवाद होत. एकदा खूपशी अधिकारी मंडळी आमच्या आंबेडखुर्दच्या घरी आलेली असताना शेजारच्या भटाच्या परसावातील बाळू काका पाध्ये काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते. ते घरी आल्यानंतर सरकारी अधिकारी आणि रंगा यांच्यामधील संभाषण आणि परस्पर संबंध पाहून बाळूकाका पाध्ये यांनी रंगाचे नामकरण “ सायबा ” असे करून टाकले, ते कायमचेच. त्यानंतर रंगनाथ उर्फ रंग हा कायमस्वरूपी ‘ सायबा ’ याच नावाने ओळखला जाऊ लागला. शाळेतील मित्रमंडळी असोत अथवा घरी येणारे आप्तेष्ट, रंगाला सायबा असेच म्हणू लागले. घरातील माणसे देखील आता रंगाला प्रेमाने सायबा याच नावाने संबोधू लागली. त्याला गुराढोरांची कमालीची आवड. गुरांना चारायला नेणे, गोठा साफसूफ ठेवणे, दूध काढणे, गुरांची काळजी घेणे, त्यांचं खाणं पाणी पाहणे यावर सायबाचं नेहमीच बारीक लक्ष असे.
तुळशीच्या अंगणाजवळ असलेल्या पाणछपरात विविध प्रकारची कामं हाता वेगळी केली जात. पूर्वी गुरांच्या आमोणात ऐन – किंजळ या झाडांचा पाला आणून, तो बारीक करून घातला जाई. बऱ्याचदा हे काम सायबा स्वतः करत असे. पाणछपरात ठेवलेले ‘ साकटे ’ घेऊन त्यावर पानांच्या गुंडाळ्या करून कोयतीने त्याचे अगदी बारीक बारीक भाग तो करत असे. या कामात तो अगदी वाकबगार होता. तसही त्याला कोणत्याच कामाचा कधी कंटाळा नसे. घरालगत असणारी बाग विस्ताराने खूप मोठी. या बागेला पाणी लावण्यासाठी दोन ठिकाणी मोठे हौद तयार करण्यात आले होते. नैसर्गिक उताराने येणारे पाणी या हौदात रात्रभर साठवले जाई. सकाळच्या वेळी हे हौद फोडून ते पाणी गाणी गात, पाटाने धावणाऱ्या पाण्यासोबत पावले टाकत सायबा बागेला लावत असे. ग्रामीण भागात राहायचे म्हणजे सर्व कला अवगत असायला हव्यात. यानुसार आमच्याकडे असणाऱ्या असंख्य आंबा, फणस अशा विविध झाडांवर चढण्यात सायबा तरबेज होता. झाडावर चढण्याची सायबाची कला पाहून आमच्याकडे कामाला येणारे गडी देखील थक्क होत. सुपारीच्या हंगामात पाणछपरातच पोफळं सोलण्याचं काम केलं जायचं. केशरी रंगाच्या पोफळाची सालं विळीवर काढून नंतर ती वाळत टाकली जायची. मोठमोठे अनेक हारे भरून पाणछपरात पोफळं ठेवलेली असत. ज्याला जसा वेळ मिळेल, तसं त्याने पोफळं सोलण्याचे काम करायचे, असा शिरस्ता होता. या कामाचे बरेचसे नियोजन सायबा कडेच असायचे. एकदा बरीचशी माणसं पोफळं सोलण्याच्या कामासाठी एकत्र बसली होती. हाती घेतलेलं काम हलकं वाटावं म्हणून सायबा विविध प्रकारचे विनोद करत सर्वांचेच मनोरंजन करत होत.
गोळवळीचे नाना पाध्ये हे आमचे स्नेही आंबेडखुर्दच्या घरी वस्तीला आले होते. मुक्कामी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ सायबाचा मनमोकळा संवाद होई. नाना आराम खुर्चीत बसले होते. बाजूलाच चार ते पाच विळ्यांवर पोफळं सोलण्याच्या कामाने चांगलाच वेग घेतला होता. सर्व बाजूंनी पोफळाची साल काढल्यानंतर त्या सालांचा आकार काहीसा केशरी रंगाच्या सोनसाफ्यासारखा दिसतो. सायबाने पूर्ण सोललेली पोफळाची एक साल घेतली आणि नानांजवळ नेऊन ‘ हा घ्या सोनचाफा ’ असं म्हणत त्यांच्या हातात दिली. सोन चाफ्याच्या पाकळ्याप्रमाणे दिसणारं पोफळांचं साल, नानांनी केशरी सोनचाफा समजून गंध घेण्यासाठी नाकाला देखील लावलं. सोन चाफ्याच्या आकाराचं पोफळीचं साल देऊन सायबाने आपल्याला बनवलं आहे, हे नानांच्या लगेच लक्षात आलं. नाना देखील हजर जबाबी होते, सायबाकडे पहात ते म्हणाले, ‘ काय रे सायबा आंबेडातील सोनचाफ्यांचा गंध पोफळीच्या सालांसारखा कधीपासून येऊ लागला ’ ? सायबाच्या आणि नानांच्या या कृतीमुळे उपस्थित साऱ्या मंडळींमध्ये हास्याचे फवारे उडाले आणि कामाचा ताण देखील नकळत हलका झाला. पोफळं सोलण्याचे काम करता करता सायबाच्या आणि नानांच्या गप्पा खूप रंगत गेल्या. नानांनी उपस्थितांसह सायबाला अनेक किस्से ऐकवले. कामाचा व्याप मोठा असेल आणि त्याचा ताण येऊ द्यायचा नसेल, तर काम हलकं कसं करायचं ? हे सायबाला चांगलंच ज्ञात होतं. सायबा काम सुरू असतानाच विविध किस्से सांगत सर्वांना मनसोक्त हसवून सारं वातावरण आनंदी बनवत असे.
रंगा, रंगनाथ उर्फ सायबा म्हणजे पाच फुटांची उंची, गोरा रंग , गालावर लाली , पिंगट केस , चेहऱ्यावर नेहमी हास्य , मध्यम शरीरयष्टी , उत्तम आवाज , सरळ नासिका, डोळ्यात तेज , शुद्ध वाणी , अलौकिक बुद्धिमत्ता , आज्ञाधारक स्वभाव , हजरजबाबीपणा , कोणतेही काम करण्याची मनापासून तयारी , दुसऱ्याला नेहमी सहकार्याचा हात , एकपाठी , सरस्वतीचा नेहमीच वरदहस्त , सर्वांनाच हवंहवसं वाटणार अजातशत्रू व्यक्तिमत्व , अभिनयाची आवड , धाडसी मन , स्वच्छतेचा भोक्ता , आध्यात्मिक , सर्वांमध्ये मिसळून जाणारा स्वभाव , निसर्गात रमणारा , कमालीची विनोद बुद्धी असे एक ना अनेक गुण सायबा मध्ये ओतप्रोत भरलेले होते. सायबाचं शेजारच्या भटाच्या परसावा मधील बाळू काकांजवळ चांगलंच मेतकूट जमे. बाळूकाका आमच्या घरी आले, की अनेकदा त्यांचा आणि सायबाचा संवाद रंगत जाई. बाळू काका एकदा सायबाला म्हणाले, मी माझ्या गोठ्यातील एका पाड्याचे नाव ‘ जंटलमन ’ असे ठेवले आहे . यावर सायबा हसू लागला. पाड्याचं नांव जंटलमन कसं असू शकतं ? असा प्रश्न सायबा विचारणार , हे बहुदा बाळू काकांना आधीच माहित असावे. पुरुष उभ्याने लघुशंका करतात , अगदी पांढरपेशी देखील यामध्ये मागे नाहीत. असे पुरुष जर जंटलमन, तर माझा उभ्याने लघुशंका करणारा पाडा देखील जंटलमन का असू नये ? बाळू काका पाध्ये यांचे हे लॉजिक पाहून सायबाला हसू आवरणे कठीण गेले. वयाचे बंधन विसरून बाळूकाका आणि सायबा यांच्यामधील संवाद आणि चर्चा रंगत जात.
मुंबईहून आमचे स्नेही नरेश आणि यशवंत दुमाळे आंबेडखुर्दच्या घरी सुट्टीच्या कालावधीत येत असत. आंबेडच्या घरी येणाऱ्या कोणाचाही पाय तेथून सहजासहजी बाहेर निघत नसे. तेथून निघताना तन मन जड होई. दुमाळे बंधू घरी आले, की ते घरगुती नाटकं बसवत असत. कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी असल्याने घरगुती नाटकासाठी पात्र मिळणे अवघड होत नसे. सायबाला अभिनयाची कमालीची आवड. नाटक बसवायचे म्हटल्यानंतर, भूमिका सायबाच्या अंगात संचारू लागे. सायबा देखणा असल्याने त्याच्याकडे नेहमीच स्त्री पात्र दिलं जायचं. स्त्री पात्रासाठी सायबाला वेगळा मेकअप करण्याची गरजच भासत नसे. नाटकाच्या दिग्दर्शनाचे काम दुमाळे बंधूंकडेच असे. बसवलेल्या नाटकाच्या रोज तालमा चालत. नाटक आमच्या पडवीतच संपन्न होई. प्रेक्षक वर्ग देखील घरचाच असे. प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी सायबा आपली भूमिका साकारण्यासाठी समोर आला , की घरातील माणसं देखील त्याला ओळखू शकत नसत, असं त्याचं लाजवाब दिसणं आणि अभिनय असे. सायबाचे दिसणं आणि अभिनय पाहून दुमाळे बंधू , बालगंधर्व यांची आठवण येते, असं म्हणत आणि सायबाला उत्स्फूर्त दाद देत. नाटक उत्तरोत्तर रंगत जाई आणि दुमाळे बंधू यांच्या प्रयत्नाने सायबासह घरातील अनेकांना आपले अभिनय कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त होत असे. दुमाळे बंधू यांना आंबेडखुर्द हेच आपलं घर आणि येथील माणसं हीच आपली जिवाभावाची माणसं असं वाटे . येथे आल्यानंतर ते सर्वांमध्ये अंतर्मनाने मिसळून जात , येथे वयाचे कोणतेही बंधन नसे. आंबेड मधून निघताना मात्र दुमाळे बंधूच काय, तर प्रत्येकाची पावलं आणि मन जड होऊन जायचं.
रंगा, रंगपटात उत्तम उत्तम भूमिका सादर करताना पाहून सायबा अभिनेता होणार असंच सर्वांना वाटे. कधी कधी त्याचं रुबाबदार दिसणं आणि त्याच्यातील हुशारी, सुंदर हस्ताक्षर पाहून सायबा वरिष्ठ अधिकारी होऊन मोठ्या हुद्द्यावर जाणार असंही वाटायचं. मिश्किल स्वभाव, हजरजबाबीपणा, फर्ड वक्तृत्व पाहून सायबा उत्तम वक्ता होणार असंही वाटून जायचं. त्याला असणारी शेतीची – बागकामाची आवड , तो गुराढोरांची करत असलेली जोपासना पाहिल्यानंतर सायबा यशस्वी शेतकरी होणार आणि आंबेडखुर्दचा अधिकाधिक कायापालट करणार अशी सर्वांनाच खात्री वाटे. व्यक्ती एक पण त्याच्याकडे असणारे अनेक गुण पाहून भविष्यात सायबा नक्की काय करेल ? हे सांगता येण्यासारखं नव्हतं. आंबेडखुर्दच्या सड्यावरची माणसं आणि पराडकर कुटुंबीयांचे अत्यंत जिव्हाळ्याचं नातं. मुंबईहून कोणीही घरी आलं, एक-दोन दिवसात सड्यावर जाण्याचा बेत आखला जाई. आमच्या घरापासून पाऊण तासाचे चढ असणारे अंतर चालल्यानंतर साड्याचा भाग येतो. मुंबईला शिकण्यासाठी असणारी भावंड आणि काही चुलत भावंड गावी आली होती. सर्वांनीच एक दिवशी सड्यावर जाऊन तेथील माणसांना भेटण्याचा बेत आखला. मुंबईहून आलेल्या आणि गावी असणाऱ्या सर्व भावंडांनी सड्यावर जाण्याची तयारी केली. सड्यावर घरातील सर्वांनी जायचं ठरवलं, तर घरात आई एकटीच राहील म्हणून सायबाने आईजवळ घरीच थांबावे, असे भाऊ मनोहर याने सांगितले. कोणतीही तक्रार न करता आईला सोबत म्हणून घरी थांबण्याची सायबाने तयारी दर्शवली. सर्वांबरोबर सड्यावर जाता आलं नाही, याचं एक क्षण सायबाला वाईट वाटलं असलं, तरी आई सोबत राहण्याचे कर्तव्य त्याला अधिक श्रेष्ठ वाटलं.
आमचे आजोबा अण्णा यांचे भाऊ व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत होते. आंबेडखुर्द हा भाग अत्यंत दुर्गम असल्याने अण्णांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी मुंबई भावांकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. अन्य भावंडे शिक्षणासाठी मुंबईला गेली म्हटल्यानंतर सायबा देखील शिक्षणासाठी काहीसा जड अंतकरणानेच मुंबईला रवाना झाला. सायबाची नाळ खऱ्या अर्थाने आंबेडखुर्द जवळ जोडली गेलेली होती. मुंबईत शिक्षणासाठी गेल्यानंतरसायबाने तेथेही अभ्यासात त्याने आपली चुणूक दाखवली. गोरागोमटा सायबा सर्व मुलांमध्ये उठून दिसायचा. शाळांना सुट्टी झाल्यानंतर कधी एकदा मुंबईतून गावी जातोय असं सायबाला वाटे. सुट्टी संपल्यानंतर मुंबईला परत जाताना सायबाच्या चेहरा दुःखी असायचा. काहीसा मनाविरुद्ध मुंबईला राहिल्यामुळे सायबाच्या प्रकृतीत वरचेवर बिघाड होऊ लागला. त्याला मुंबईचे हवामान मानवलं नाही, असा निष्कर्ष काढला गेला. सायबाची बहीण माई त्यावेळी विवाह होऊन वरळीला बी डी डी चाळीत राहायला गेली होती. आपला भाऊ मनोहर याला सांगून एकदा सायबा वरळीला बसने जायला निघाला. बसने कसं जायचं ? हे त्याला माहीत होतं. सायबा घरातून बाहेर पडून वरळीला गेला खरा, मात्र तो माईकडे पोहोचला की नाही ? याची मनोहरला काळजी वाटू लागली आणि त्याचा जीव कासावीस झाला . त्याकाळी फोनची सुविधा उपलब्ध नसल्याने सायबा बहिणीकडे पोहचला की नाही , हे कळणं अशक्य होतं. अखेरीस मनोहर देखील बसने वरळीला पोहचला . सायबाला बहिणीच्या घरात बसलेला पाहून मनोहरने श्वास टाकला. भावंडांच्या परस्परातील नात्याची वीण ही अशी घट्ट होती.
प्रकृतीत वारंवार होवू लागलेला बिघाड पाहून सायबाला गावाकडे घेऊन येण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. गावी आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस येथील वातावरणामुळे सायबासाठी चांगले गेले. काही दिवसांनी मात्र सायबाची तब्येत परत परत बिघडू लागली. कसबा येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर श्रीराम कानिटकर यांचे आणि आमच्या वडिलांचे संबंध मित्रत्वाचे होते. सायबावर आंबेडखुर्द येथे अधून मधून येऊन डॉक्टर कानिटकर यांनी जवळपास सहा महिने उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्याकाळी वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान देखील आत्ता एवढे प्रगत नव्हते. हा सर्व परिसर दुर्गम असल्यामुळे आवश्यक आणि अपेक्षित वैद्यकीय सुविधा मिळवणे कठीण बनले. अखेरीस सायबा पोटाच्या दुखण्याने कमालीचा त्रस्त झाला. त्याच्यातील सहनशक्ती देखील संपून गेली. अंथरुणावर तो अक्षरशः विव्हळत असायचा. आजारामुळे सायबाच्या चेहऱ्यावरील रयाच निघून गेली. घरातील सर्वांनाच आता सायबाची काळजी वाटू लागली. आयुर्वेदिक औषधे झाली, वैद्यकीय उपचार झाले, अन्य कोणी काही उपासतापास सांगितले ते देखील करून झाले. काही केल्या सायबाची प्रकृती बरी होत नव्हती. अखेरीस आमचे वडील ज्यांना आप्पा म्हणत त्यांनी सायबाला तपासणीसाठी मुंबईला घेऊन जायचा निर्णय घेतला. सायबा देखील आपल्या आजाराला कमालीचा कंटाळला होता. घरातून बाहेर पडून पुन्हा एकदा मुंबईला उपचारासाठी जाणं त्याच्या जीवावरच आलं होतं. घरातील सर्वांनीच मनावर घेतल्यामुळे नाही म्हणणं, सायबाला शक्य झालं नाही. एक दिवशी आप्पा साहेबाला घेऊन मुंबईत गिरगावला चुलत्यांकडे दाखल झाले.
गिरगावच्या टोपीवाला वाडीतील मंडलिक डॉक्टर हे पराडकर कुटुंबीयांचे फॅमिली डॉक्टर होते. डॉक्टर मंडलिक हे मूळचे कोकणातले दापोली मंडणगडकडचे. वैद्यकीय व्यवसायात त्यांचे मांडलिकत्व होते. सायबाला तपासणीसाठी त्यांच्याकडे न्यायचे ठरले. डॉक्टर मंडलिक म्हणजे उंच पुरे सहा फुट उंचीचे . रंग गोरापान आणि निष्णात म्हणून ते परिचित होते. डॉक्टर दुपारी जेवायला घरी येतात त्याचवेळी त्यांना भेटायचे, असे सायबाचा भाऊ मनोहर यांनी ठरवले. सायबाला डॉक्टर मंडलिक यांच्याकडे तपासणीसाठी नेल्यानंतर, त्यांनी काय होते याला ? असा पहिला प्रश्न केला. गेले अनेक महिने याचे पोट दुखत आहे असे सांगताच, डॉक्टर मंडलिक मिश्किलपणे म्हणाले, गावाला कडबोळी खूप खाल्ली असतील. सायबाला काळजीपूर्वक तपासल्यानंतर, मनोहर यांच्या खांद्यावर हात टाकून चालता चालता डॉक्टरांच्या चेहऱ्यावर काळजी दिसून आली. मूत्रमार्गात खडा आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून देत, डॉक्टर मंडलिक यांनी यातील तज्ञ डॉक्टरना भेटायला सांगितले. अधिक तपासण्या केल्यानंतर सायबाच्या बाबतीत डॉक्टर मंडलिक यांनी केलेले निदान चुकीचे ठरले. सायबाचे पोट एकदम कडक झालेले होते. तपासणीनंतर सायबाला कर्करोग झाला असल्याचे निदान झाले. कर्करोग तज्ञांनी भाऊ मनोहर यांना सायबाचं आयुष्य आता केवळ एका महिन्याचे आहे, असे सांगितले. हे ऐकून सर्वांचेच आवसान गळून गेले. सायबाला शस्त्रक्रियेसाठी मोठ्या इस्पितळात दाखल करण्यात आले. या दरम्यान सायबाला कमालीचा त्रास आणि यातना सहन कराव्या लागल्या.
पोटात होणाऱ्या यातना कशाबशा सहन करत असतानाच सायबाने एकदा आपल्या भावांकडे “ मला प्रकाश दुग्ध मंदिर मधील पियुष प्यायचे आहे ” अशी इच्छा व्यक्त केली. गिरगावच्या प्रकाश दुग्ध मंदिर मधील पियुष त्याकाळी खूपच प्रसिद्ध होते. पियुषची ही अप्रतिम चव त्यांनी पुढे अनेक वर्षे जपली होती. सायबाला पियुष देण्याची परवानगी डॉक्टरनी दिली. भावांनी सायबाला प्रकाश दुग्ध मंदिर मधील पियुष आणून दिल्यानंतर ते पिण्या आधीच त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले गोड भाव उपस्थितांच्या नजरेतून सुटले नाहीत. प्रसन्न मनाने सायबाने पियुष प्यायले. प्रत्येक घोटाबरोबर तो आपल्या भावांकडे अत्यंत प्रसन्न मनाने पहात होता. आता आपण आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्यास तयार असल्याचेच त्याने आपल्या नजरेतून भावांना दर्शवले. पियुष पीत असताना सायबाच्या चेहऱ्यावर असणारे भाव त्याचे भाऊ मुकुंद, मनोहर यांच्या आजही लक्षात आहेत. तो प्रसंग आठवला, तरी आजही या दोन्ही भावांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. सर्वाचा शेवट गोड व्हावा म्हणून सायबाने पियुष प्यायले आणि पुढे काही कालावधीनंतर त्याने कायमचे नेत्र मिटून घेतले. भावांसह अन्य नातेवाईकांना शोक अनावर झाला. गावाकडून आई-वडील मुंबईत दाखल झाले. अत्यंत रूपवान , आज्ञाधारक असणाऱ्या मुलग्याचे कलेवर पाहून आई-वडील पूर्णता खचून गेले. त्यांना सावरणे अन्य मुलांना आणि त्यांच्या भावांना देखील खूप कठीण गेले. सायबाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी तो सर्वांना हवाहवासा असतानाच त्याने या जगाचा निरोप घेतला. हे जग सोडून जातानाही त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव होते. सायबा हे पराडकरांमधील एक शक्तिशाली आणि अलौकिक असे व्यक्तिमत्व होऊन गेले.
दुर्दैवाने सायबा माझ्या जन्मापूर्वीच गेला. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्याचे साहेबासारखे दिसणे हे एकदा तरी पाहायला मिळायला हवे होते, असे आजही वाटते. माझे आजोबा अण्णा, काका रंगनाथ हे दोघेही माझ्या जन्मापूर्वीच गेल्याने त्यांची भेट न झाल्याची रुखरुख यापुढेही मनात कायम राहील. आनंद एवढाच, की आज माझे चुलते मुकुंद उर्फ आबा यांनी वयाची ९२ वर्षे ओलांडली आहेत, याच्या जोडीला दुसरे चुलते मनोहर उर्फ मनू काका यांनी वयाची नव्वदि गाठली आहे. दोघांचीही स्मरणशक्ती या वयातही उत्तम असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवात या दोघांनी मला रंगनाथ उर्फ सायबा याच्या विषयीच्या सर्व आठवणी सांगितल्या. सायबाच्या आठवणी सांगताना आबा आपल्या हातातील उपरणे सारखेच त्यांच्या नेत्रांना लावत होते, तर मनुकाकांचा हात सायबा विषयीच्या आठवणी लिहून देताना कंप पावत होता. मला आठवणी सांगत असताना या दोघांच्या डोळ्या समोर सायबा अक्षरशः उभा राहत होता. यावरून साहेबाच्या जाण्याला आज इतकी वर्षे झाली तरीही भावांमधील बंधुप्रेम किती गहिरे होते, अंतर्मनाने ही भावंडे कशी आणि किती जोडली गेली होती , हेच मला अनुभवायला मिळाले. यातून व्यक्तिशः मलाही खूप काही शिकता आले. दोन्ही काकांनी सायबा विषयी केलेल्या वर्णनानंतर त्याच्यावर लिहीत असताना काही वेळा साहेबा माझ्या देखील डोळ्यासमोर उभा राहिला, हे मी माझे भाग्य समजतो. सायबाची उणीव पुढे आमचे श्रीकांत उर्फ बाबीकाका यांनी भरून काढली. असं असलं तरी आंबेडखुर्दचा अल्पवयीन अनभिशीक्त सम्राट सायबा तो सायबाच !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.