आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण, शासनाची अनास्था यांमुळे प्रचंड प्रदूषित झालेली इंद्रायणी पाहत आहोत. इंद्रायणीचे पावित्र्य या पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे.
दिनेश रंधवे ऊर्फ राजाभाऊ चोपदार
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्वर॥
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र॥
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥
असे विविध संतांनी आळंदीचे व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संतमंडळींच्या जन्माने व संजीवन समाधीमुळे जरी ‘आळंदी’ हे गाव प्रसिद्धीस पावले असले, तरी त्यापूर्वीदेखील देवाधिदेव इंद्राच्या संचारामुळे इंद्रायणी नदीचे असणारे महत्त्व व अनेक सिद्धपुरुषांचा वावर यांमुळेही आळंदी प्रसिद्ध होती, असे अनेक दाखले पुराणात व संतसाहित्यात उपलब्ध होतात. गेली अनेक दशके आळंदीचा सखोल अभ्यास व सविस्तर माहिती लिखित व छापील स्वरूपात संकलितपणे उपलब्ध नव्हती. नेमकी हीच गरज ओळखून संदीप तापकीर, जे आळंदीनजीकच्या चऱ्होली गावचे सुपुत्र आहेत व साहित्यक्षेत्रात गेली अनेक वर्षे अनुभवसंपन्न साहित्यिकांमध्ये वावरत आहेत, यांनी ‘चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।’ या पुस्तकाच्या माध्यमातून बिनचूकपणे मांडण्याचा प्रामाणिक व स्तुत्य प्रयत्न केलेला आहे.
या पुस्तकामध्ये त्यांनी आळंदीचा भौगोलिक, पौराणिक इतिहास, मंदिर बांधकामाबाबतची सविस्तर माहिती, मंदिरातील नित्य व नैमित्तिक उपचार, आळंदी परिसरातील इतर धार्मिक स्थळे, आळंदी-पंढरपूर वारी सोहळ्यातील मुक्काम, दिंड्या व धर्मशाळांची सविस्तर यादी यांबाबत लिहिले आहे.
कितीही माहितीपूर्ण व परिपूर्ण पुस्तक करण्याचा प्रयत्न केला, तरीही अपूर्णता ही राहतच असते; कारण कालानुरूप या गावाचे स्वरूप व गरजा बदलत राहतात. देवाची असणारी आळंदी आता ‘लग्नाची आळंदी’ होऊ लागलेली आहे. धर्मशाळांची जागा मंगल कार्यालये घेऊ लागली आहेत. त्यामुळे भाविकांबरोबरच इतरही वर्दळ वाढून गावाचे स्वरूप बदलू पाहत आहे; परंतु अशा परिस्थितीतदेखील ज्ञानेश्वर माउलींमुळे असणारी आळंदीची ओळख ही अजरामरच राहणार आहे.
पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती. वारकरी बैलगाड्या घेऊन आळंदीस येत, तेव्हा ‘नगरप्रदक्षिणेच्या वाटेवर’ प्रकरणामध्ये उल्लेख केलेल्या ‘झाडी’ व झाडीबाजारामध्ये बैलगाड्या सोडत असत. तेथे आता भाविक वाहनांमध्ये येऊ लागल्यामुळे झाडी जाऊन पार्किंग वाहनतळाची निर्मिती झालेली आहे. असे बदलत्या आळंदीचे स्वरूप होऊ लागले आहे.
अलंकापुरीमध्ये असणाऱ्या इतर स्थळांबाबतच्या माहितीमध्ये ‘वारकरी शिक्षण संस्थे’चा उल्लेख आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘शिक्षकांना पगार नाही व विद्यार्थ्यांना फी नाही’ अशा तत्त्वावर गेली शंभर वर्षे चालणारी ही एकमेवाद्वितीय संस्था आहे. अशाच प्रकारच्या; परंतु सशुल्क पद्धतीने चालणाऱ्या सुमारे नवीन १०० संस्था आता आळंदीत अस्तित्वात आल्या आहेत.
आळंदीने सर्वांना सामावून घेतलेले आहे. त्यामुळे आपल्याला आळंदीत ज्ञानोबा-तुकोबांनी सांगितलेला समतेचा विचार, विभाजनवादी श्रेष्ठ-कनिष्ठतेचा विचार, देव मानणारा व न मानणारा असे दोन्ही विचार अशा सर्वच विचारांचे लोक आजही नांदत आहेत.
आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण, शासनाची अनास्था यांमुळे प्रचंड प्रदूषित झालेली इंद्रायणी पाहत आहोत. इंद्रायणीचे पावित्र्य या पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे. ते मूळ स्वरूप प्राप्त होण्यासाठीही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दिनेश रंधवे ऊर्फ राजाभाऊ चोपदार
पुस्तकाचे नाव – चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – १४५ रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.