December 12, 2024
Sandhya Tambe A poet in search of self-existence
Home » संध्या तांबे : स्व-अस्तित्वाचा शोध घेणारी कवयित्री
विशेष संपादकीय

संध्या तांबे : स्व-अस्तित्वाचा शोध घेणारी कवयित्री

कवयित्री संध्या तांबे यांची एकूणच कविता माणसाच्या आतल्या निर्मळ पणाला आवाहन करते. माणसाचे द्रष्टेपण माणसाच्या आतल्या संवेदनशीलतेशी आहे हे सूचीत करते. स्त्री आणि पुरुष या भेदाच्या पलीकडे या कवयित्रीच्या कवितेचा प्रवाह प्रवाहित होत असून मानवी जगण्यातील सूक्ष्म अनुभव मांडण्याला ती प्राधान्य देते.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

कवयित्री संध्या तांबे या सुमारे 40 वर्षे निष्ठेने कविता लेखन करत आहेत. कोकणच्या साहित्य क्षेत्रात अतिशय निर्मळ मनाने इतर लिहित्या लोकांबद्दल सहृदयता बाळगून लिहिणारी जी अगदी दोन-चार नाव असतील त्यातील अग्रेसर नाव म्हणजे कवयित्री संध्या तांबे. मूळ परिवर्तन परिवारातून साहित्याला जोडल्या गेलेल्या संध्या तांबे म्हणजे कोकणची ‘बहिणाबाई’ अशी उपमा त्यांना ज्येष्ठ लेखक प्र. श्री. नेरूरकर, कवी आ. सो शेवरे यांनी दिली.

अर्थात हा आपलेपणाचा सन्मान असला तरी संध्या तांबे यांची काव्यवृत्ती ही स्वतंत्र आहे. कवितेतून स्व- अस्तित्वाचा शोध घेणे आणि आपलं जगणं समष्टीला जोडणे हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. खरंतर त्यांनी एवढं दीर्घकाळ लेखन करून त्यांना ज्याप्रकारे साहित्य चळवळीतून पाठबळ मिळायला हवं होतं, तेवढं मिळालं नाही. ही खंत त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या मनात आहे. साहित्य चळवळीच मूळ उद्दिष्ट हे उत्तम गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांचे उत्खनन करणे असते. गट तट करणे नव्हे. अलीकडल्या काळात मात्र सुमार लोकांची साहित्य चळवळीत गर्दी वाढत आहे व अवतीभवती नाचणाऱ्यांना सोबत घेऊन नाचण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे संध्या तांबे यांच्यासारख्या सच्चा कवयित्रीकडे मराठी साहित्य चळवळीचे दुर्लक्ष झाले. साध्या सोप्या भाषेत अवतरणारी त्यांची कविता आशयाला मात्र अधिक सखोलपणे सहज कवेत घेते.

संध्या तांबे यांनी मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे 24 वर्षे मराठीचे अध्यापन केले. ‘गंधवेना’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून कथा / ललित आणि निबंध या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. विविध वृत्तपत्रात त्यांनी केलेले सदरलेखन लोकप्रिय झाले आहे. अर्थात विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले असले तरी कविता लेखन हाच त्यांचा स्थायीभाव आहे.

असं होऊन चालणार नाही
माझ्या स्वप्नांचा हिरवेपणा
मला जपला पाहिजे
ही स्व-अस्तित्वाची जाणीव बाळगणारी ही कवयित्री आहे. क्षणभंगुर जगण्याचा फोलपणा लक्षात घेऊन आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणे म्हणजेच आपल्या स्वाभिमानाला जपत आपलं आयुष्य समृद्ध करणे होय! हा विचार त्यांच्या कवितेत अधिकाधिक अधोरेखित होतो.

कवयित्री तांबे यांच्या कवितेची नाळ ही काळाची नोंद घेणे आणि त्यातील संभ्रमाची गोष्ट सांगणे याच्याशीही जोडली गेली आहे. हा काळ भ्रमिष्ट करणार आहे त्याची जाणीव त्यांना पूर्वीच लागली होती. म्हणूनच माणसाच्या भ्रमिष्ट करणाऱ्या अनेक शक्यता त्या तपासात राहतात. या संदर्भात विधान करताना त्या आपल्या कवितेत म्हणतात,
“कधीची तयारी करून
बसले आहे मी
कुठे जायचे आहे हे
निश्चित मला माहीत नसताना”

माणसाच्या जगण्याला भोवळ यावी एवढं या काळाने माणसाला भ्रमीत करून सोडलं आहे. आजच्या शतखंडित जगण्यात स्थिर काही नाही. त्यामुळे काही क्षणात आधीचा एक अनुभव दुसऱ्या अनुभवाला संघर्ष करत आपल्या समोर उभा राहतो. यात स्त्रीला तर कायमच स्वतःचा स्वतःशीच संघर्ष करावा लागतो. हे एकदा समजून घेतलं, की कवयित्री संध्या तांबे यांची कविता सहजपणे आपल्याला समजून घेता येते.पण यासाठी आपल्या आतला आवाज हा त्यांच्या काव्यसंवेदनशीलतेशी जोडला जायला हवा हे मात्र खरं.

कवी हा कलंदर असतो, असं म्हणतात. पण कलंदर वृत्ती ही बेफिकिरीशी जोडता येत नाही. ती जबाबदारीशी जोडावी लागते. कवी हा सर्वसामान्य माणसासारखाच असतो. त्यालाही संसार असतो. जबाबदारी असते. आपल्या माणसांची काळजी असते. तो एका फटक्यात उठला आणि जगाच्या भ्रमंतीला निघाला असे होत नाही. संध्या तांबे कवयित्री असल्या तरी एक जबाबदार माणूस म्हणून त्या तेवढ्याच श्रेष्ठ आहेत. किंबहुना माणूस म्हणून जगताना माणूसपणाच्या मूल्यांना त्यानी आपल्या जीवनात सर्वाधिक स्थान दिलेले आहे. त्यामुळेच व्यक्तिगत आयुष्यात आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींची जबाबदारी घेऊन त्या जगल्या. याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतही दिसते. या संदर्भात लिहिताना त्या आपल्या एका कवितेत म्हणतात,
जबाबदाऱ्यांचे भक्कम जू
बाजूला करता आलं नाही
याची खंत कधीही
डोळ्यात दिसली नाही

शोषित घटक हा अधिक शोषित का बनतो ? तर त्याचं उत्तर एका वाक्यात असं देता येईल, की त्याच्यावरच्या वर्गाला त्याच्याबद्दलची संवेदनशीलता नसते. माणसाची दुसऱ्या बद्दलची कणव संपली, की माणूस कोरडा होत जातो.बघता बघता समाजच कोरडा होतो. ही प्रक्रिया दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. यामुळे समाज आणि राजकीय स्तर जेवढा संवेदनशीलतेने उंचावायला हवा होता तेवढा उंचीवर गेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, समाजाचा स्तर आधी उंचवल्याशिवाय राजकीय स्तर उंचावणार नाही. राजकीय क्रांती घडवायची असेल, तर आधी सामाजिक क्रांती घडवावी लागते. यासाठी समाजाबद्दलच आस्था आपल्या मनात हवी. आता मात्र उलट झालंय प्रत्येकाला राजकीय चढाओढ करण्यात आनंद मिळतो.

सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आपण मात्र उदासीन असतो. कारण समाजाबद्दलचा आपल्यातला जिव्हाळा संपला आहे. पण कवयित्री संध्या तांबे यांच्यातील संवेदनशीलता ही शोषित समाजाबद्दलची सतत जागरूक असते असे त्यांच्या कवितेत वारंवार प्रत्ययास येते. त्या एका कवितेत म्हणतात,
“भंगारवाल्याचा आवाज ऐकला
की अंगात उत्साह संचारतो पुढच्या रविवारी ये रे खूप देते भंगार
मी त्याला आशावादी बनवते
तेव्हा आजची उपासमारी
तो विसरून जातो”

कवयित्री संध्या तांबे यांची एकूणच कविता माणसाच्या आतल्या निर्मळ पणाला आवाहन करते. माणसाचे द्रष्टेपण माणसाच्या आतल्या संवेदनशीलतेशी आहे हे सूचीत करते. स्त्री आणि पुरुष या भेदाच्या पलीकडे या कवयित्रीच्या कवितेचा प्रवाह प्रवाहित होत असून मानवी जगण्यातील सूक्ष्म अनुभव मांडण्याला ती प्राधान्य देते. आताच्या गद्यप्राय कवितेच्या खळखळाटात संध्या तांबे यांच्या कवितेचं आतल्या सौंदर्यदृष्टीशी स्वतंत्र नातं असून ते माणसाच्या असण्यालाच उजागर करू पाहते. हेच संध्या तांबे यांच्या कवितेच मोठं मोल आहे! हे मोल जपावं – वाढवावं याच आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading