वयाच्या ठराविक कालावधीत योग्य संस्कार हे यासाठीच महत्त्वाचे आहेत. योग्य संस्कारांनी वासना नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. यासाठी चांगल्या गोष्टींची आवड, संगत आपण करायला हवी. चांगल्या विचारांचा मारा आपल्यावर सातत्याने व्हायला हवा. म्हणजे मन वासनेतून बाहेर पडेल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
मुळाचे तोडणे जैसें । होय कां शाखाद्देशे ।
कामु नाशले नि नाशे । तैसा क्रोधु ।। १०६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फाद्या जशा तुडतात, त्याप्रमाणे कामाचा नाश केल्यावर क्रोध नाश पावतो.
झाडाचे मूळ तुटते तर झाड जगू शकत नाही. नवीन मुळे फुटली तरच त्या झाडाची वाढ होऊ शकते. अन्यथा त्याच्या फाद्याही तुटतात. ते झाड मरून जाते. झाडाला नष्ट करायचे असेल तर त्याच्या मुळांना तोडायला हवे. म्हणजे संपूर्ण झाड आपोआप तुटेल. हा साधा सोपा विचार आहे. कोणत्याही गोष्टीशी लढायचे असेल तर त्या लढाईचे मूळ प्रथम शोधायला हवे. अन् तेच नष्ट करायला हवे म्हणजे लढाईच थांबेल. वादाचे मुळे सापडले अन् ते नष्ट केले तर वाद आपोआपच मिटतात. मुळापासून कृती केली तर यश निश्चितच मिळते.
मग आपणाला क्रोध मारायचा असेल किंवा तो नष्ट करायचा असेल तर कामरुपी मूळे शोधून ती तोडायला हवीत. क्रोधाच्या वृक्षाचे मुळ हे कामरुपी आहे. वासनेची भूकच आपल्यात क्रोध उत्पन्न करते. मारून मुटकून वासना नष्ट होत नाही. ती अधिकच बळावते. वासनेची मुळे मारायची तर त्यांचे खतपाणी बंद करायला हवे, तरच ती मूळे तुटू शकतात. पण तोडताना ती पुन्हा उत्पन्न होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मूळ तोडायचे म्हणजे काय करायचे ? तर वासना मनात कशामुळे उत्पन्न होते हे विचारात घ्यायला हवे. वासना उत्पन्न झाली पण तिला पोषक वातावरण मिळाले नाही, खत-पाणी मिळाले नाही तर तिची वाढ खूंटते. म्हणजेच वासनेला प्रोत्साहन देणारी प्रत्येक गोष्ट बंद करायला हवी.
सध्याच्या काळात तर वासनेला प्रोत्साहनच प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र क्रोधच क्रोध पाहायला मिळतो आहे. वासनेतूनच, क्रोधातूनच बरेचसे गुन्हे घडत आहेत. माणसाची हावच माणसाला संपवत आहे. हावरटपणामुळे माणसाचा दुरदृष्टीचा विचार संपला आहे. यातूनच पर्यावरणाचे प्रश्न उभे राहात आहेत. पण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचेच गंभीर परिणाम आजकाल पाहायला मिळत आहेत. मग अशा काळात वासनेला नियंत्रित कसे करायचे ? त्यावर विजय कसा मिळवायचा हे मोठे आव्हानच आहे.
वयाच्या ठराविक कालावधीत योग्य संस्कार हे यासाठीच महत्त्वाचे आहेत. योग्य संस्कारांनी वासना नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. यासाठी चांगल्या गोष्टींची आवड, संगत आपण करायला हवी. चांगल्या विचारांचा मारा आपल्यावर सातत्याने व्हायला हवा. म्हणजे मन वासनेतून बाहेर पडेल. तिकडे मन वळणार नाही. चांगल्या गोष्टीत मन गुंतून राहील्यास वासनेतून मन दूर जाऊ शकते. याचाच अर्थ वासनेला खत-पाणी न दिल्याने वासनेची वाढत खुंटते. कामाचा नाश हा अशा प्रकारे करायला हवा. काम वासना नियंत्रणात राहील्यास शरीरात आपोआपच शांतीचा अंकूर फुटतो. या बदलामुळेच क्रोध नाहीसा होतो. साहजिकच त्या व्यक्तिच्या वागण्यात, आचरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकतो. यासाठीच सतसंगाची गरज आहे. चांगल्या विचारांची संगत ही यासाठीच असायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.