January 31, 2023
Collection of Books on Shahu Maharaj
Home » राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – अखिल मानवजातीचे कल्याण हाच आपला ध्यास आणि श्वास मानून संपूर्ण आयुष्यभर लोककल्याणाचे कार्य करणारे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज हे सदैव अभ्यासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय राहीले आहेत. त्यांच्यावर विपूल प्रमाणात लेखन करण्यात आले आहे. त्यांच्यावरील साहित्याची एकत्रित नोंद असावी या उद्देशाने ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ या नावाने ग्रंथ तयार करण्याचे काम प्रा. डॉ. जे. के. पवार हे करत आहेत. यासाठी शाहू महाराज यांच्यावरील साहित्यसंपदा संबंधीत लेखक-प्रकाशकांनी पाठवावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ या ग्रंथ उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, सन १९२४ ते १९७० या काळात राजर्षीच्या समकालीन व्यक्तींनी, लेखकांनी राजर्षीच्या जीवन-कार्यावर लेखन केले आहे. त्यातून अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यानंतर १९७४ साली राजर्षांच्या जन्मशताद्वीच्या निमित्ताने अभ्यासक, संशोधकांनी राजर्षीच्या विविध क्षेत्रातील कार्याविषयी अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक असे लेखन केले; तेही प्रकाशित झाले आहेत. सन १९९४ हे वर्ष राजर्षी शाहूंच्या राज्यारोहण शताब्दी वर्ष साजरे झाले; तेंव्हापासून आजपर्यंत काही इतिहास संशोधक, लेखक, साहित्यिक, कादंबरीकार, कवी, नाट्य लेखक, शाहीर आदींनी राजर्षीबद्दल तसेच त्यांनी केलेल्या बहुआयामी लोकोत्तर कार्याबद्दल विपुल लेखन केले आहे. मोठ्या प्रमाणावर मराठी तसेच अन्य भाषांमधून ते प्रकाशित झाले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या सामाजिक समतेचा विचार व कार्याच्या गौरवार्थ सन २००३ हे वर्ष ‘सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केले होते. सन २००९ या वर्षी दिल्ली येथील संसदेच्या प्रांगणात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. यावेळी औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांबद्दल काही ग्रंथांचे /पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन-कार्याचा, त्यांच्या विचारांचा वेध घेणाऱ्या साहित्यकृती ज्या अक्षररूपाने प्रकाशित/प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या सर्व साहित्यकृती म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वाङ्मयीन स्मारकेच आहेत. राजर्षी शाहूंच्या ह्या वाङ्मयीन स्मारकांमध्ये राजर्षी शाहूंचे जीवन-चरित्र, स्मारकग्रंथ, गौरवग्रंथ, त्यांच्या भाषणांचे संग्रह, त्यांच्या आठवणी, त्यांची पत्रे, त्यांच्या जीवनकार्यावरील कादंबरी, नाटक, कथासंग्रह, काव्यसंग्रह, पोवाडे, असे जे जे पुस्तक/ग्रंथ रूपाने प्रकाशित झालेले आहेत, अशा सर्व साहित्यकृतींचा समावेश या ग्रंथामध्ये केला आहे.

डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहूंच्या वाङ्मयीन स्मारकांचा एकत्रित ग्रंथरूपाने परिचय करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक साहित्यकृतीचा परिचय/ओळख हस्तलिखित तीन पानांमध्ये करून दिला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 175 ग्रंथांचा परिचय लेखन स्वरूपात पूर्ण केला गेला आहे. तरी लेखक, प्रकाशकांनी शाहूंच्या संदर्भातील ग्रंथसंपदा पाठवून आमच्या या उपक्रमास हातभार लावावा.

काही लेखकांकडे पुस्तकांच्या प्रती शिल्लक नसल्यास संग्रहातील किंवा संदर्भ ग्रंथरुपातील पुस्तकाची झेरॉक्सप्रत पाठवावी. या संदर्भातील सर्व खर्च आम्ही करू असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले आहे. या उपक्रमामुळे शाहूंच्या संदर्भातील सर्व ग्रंथ संपदा एकत्रितपणे उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा फायदा अभ्यासक, संशोधकांना होणार आहे. या संदर्भात शाहू महाराज अध्यासन सुरु करण्याचाही मानस असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील पुस्तके डॉ. प्रा. जे. के. पवार, साई, 32 राधाकृष्णनगर, राधानगरी रोड, कोल्हापूर या पत्त्यावर पाठवावीत. अधिकमाहितीसाठी संपर्क – ९४२०५८६६२२

Related posts

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

गांधी विचार जागर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

बोढेकर यांच्या अंतर मंतर चारोळी संग्रहाचे प्रकाशन

Leave a Comment