April 25, 2024
Sarsenapati Santaji Ghorpade memory Day article by Suvarna Naik Nimbalkar
Home » सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…
मुक्त संवाद

सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…


🚩सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी वाचवले व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला.

डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर

सरसेनापती संताजी घोरपडे घराणे हे छत्रपतींच्या भोसले घराण्याचे चुलत घराणे आहे .ही दोन्ही कुळे मूळची मेवाडच्या राजघराण्याशी संबंधित सिसोदिया राजपूत घराणी आहेत. त्यांचे पूर्वज कर्णसिंह व भीमसिंह हे बहामनी साम्राज्यात चाकरीस होते. त्यांच्यावर खेळणा किल्ला सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा किल्ला अतिशय दुर्गम होता. तेव्हा या भोसले बंधूंनी घोरपडीचा वापर करून सैन्य गडावर पाठवले आणि किल्ला हस्तगत केला होता.मात्र दुर्दैवाने कर्णसिंहाला या युद्धात मरण पत्करावे लागले .पण हा पराक्रम पाहून बहामनी सुलतानाने भिमसिंहाला भीमसिंहाला “राजा घोरपडे बहाद्दूर ” हा किताब देऊन मुधोळची जहागिरी दिली. त्यामुळे भोसलेंच्या या धाकट्या पातीचे आडनाव घोरपडे असे पडले.

इ.स.१६८९ ला मोगल सेनापती मुकर्रबखानाने कोकणातील संगमेश्वर येथे वेढा घालून छत्रपतीं संभाजीराजांना अटक केली त्यावेळी म्हाळोजी घोरपडे यांनी छत्रपतीं संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्यामध्ये म्हाळोजी बाबांना अपयश आले .म्हाळोजीबाबांनी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

या म्हाळोजी घोरपडे याना तीन मुले. संताजी, बहिर्जी आणि धाकटे मालोजी. या भावांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूपपणे दक्षिणेत जिंजी किल्ल्यावर पोहोचवले होते. या शौर्यामुळे खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांना “ममलकतमदार”

बहिर्जी घोरपडे यांना ” हिंदुराव “

तर मालोजी घोरपडे यांना ” अमीर- उल -उमराव ” असे किताब देऊन गौरव केला.

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी वाचवले व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला. छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली.त्यावेळी संताजी घोरपडे त्यांच्या बरोबर होते. पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग संताजी घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगडकर , दत्तवाड ,कापशी इत्यादी घोरपडे घराण्याच्या शाखा उत्पन्न झाल्या. गजेंद्रगडकर घोरपडे यांच्या पदरी कवायती फौज होती. त्यामुळे त्यांचा दरारा निजाम ,हैदरअली व इंग्रज यांच्यात होता.अनेकदा पेशव्यांच्या वतीने बोलणी करण्यासाठी घोरपडे यांना पाठवले जायचे .

संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ मध्ये सेनापती पद दिले .संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असत. तेथूनच ते चारही दिशेत विजेसारखे चमकत राहिले.बादशहाने जिंकलेल्या विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला. संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते .”बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानीना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती ” संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजीराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी घोरपडे यांची प्रचंड दहशत होती .औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखानाने संताजीच्या या महान विजयाची कहाणी लिहून ठेवली हे विशेष .अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी.

संताजी घोरपडे यांचे लष्करी डावपेच व हालचाली अतिशय काटेकोरपणे आखल्या जात. हाताखालच्या सैनिकांना त्यांचे आदेश बिनचूक आणि बिनबोभाट पार पाडावे लागत. सन १६८९ साली बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची वडू कोरेगावच्या छावणीत अमानुषपणे हत्या केली. त्याच छावणीत औरंगजेब बादशहा असताना काही मोजक्या लोकांना बरोबर घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी यशस्वी छापा घातला व तंबूचे सोन्याचे कळस कापून ते पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे पेश केले.मराठ्यांच्या छत्रपतीची अमानुष हत्या झाल्याने सारी मराठी दौलत हादरून गेली असता , संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर घातलेला छापा मराठी सैन्याला एक नवसंजीवनी सारखा वाटला. या घटनेमुळे सार्‍यांच्या कामाला एक दिशा मिळाली. त्याचा पूर्ण अनुभव पुढील सतरा-अठरा वर्षे औरंगजेबाला घ्यावा लागला. मोगल बादशहाला मराठ्यांनी दे माय धरणी ठाय करून टाकले. त्याच्या मुळाशी संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला दिलेले आव्हान होते.

संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेले सेनानी होते.छत्रपती .निराशेच्या घोर अंधकारात हे स्वराज्याचाच विचार करत राहिले.या सर्व मंडळीत संताजी घोरपडे यांचे स्थान प्रथम दर्जाचे मानले पाहिजे. गनिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले. लढाईच्या कामी शिस्तीचे महत्व असते,हा धडा त्यांनी याच काळात घेतला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजींची कडव्या लष्करी शिस्तीचे सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिचा उगम या तालमीत तयार झाला आहे. पुढचा इतिहास असे सांगतो की संताजी सारखा प्रति संताजी मराठ्यांना परत निर्माण करता आला नाही .पुढे औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मराठी फौजा मोठ्या जिद्दीने व पराक्रमाने मोगलांशी गनिमी युद्ध करत राहिल्या.पण संताजी प्रमाणे एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कोणाही मराठा सेनानीस कमवीता आले नाहीत. संताजीची महती यातच आहे.

जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तिर्ण प्रदेश संताजी यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठीक ठिकाणी मोगली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजी मोगली फौजेचे हालचालींची व तिच्या सेनानीँच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत .यावरून संताजी घोरपडे यांच्या शौर्याची कल्पना येते .छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य पुढे अठराव्या शतकात आपल्या दरार्याने व अतुलनीय पराक्रमामुळे संताजी व धनाजी यांनी वाचवले .

‘वाजल्या जरी कुठे टापा l
धुरळ्याच्या दिसती छाया ll
छावणीत गोंधळ व्हावा l
संताजी आया आया ll

एवढी संताजींची दहशत होती.औरंगजेबाला जर संताजींनी मारले असते तर पुढील शंभर वर्षाचा तरी भारत देशाचा इतिहास नक्कीच बदलला असता. शेकडो लढाया गाजवणारा, अनेक नामांकित मोगल सरदारांना धुळीस मिळवणार्‍या संताजी घोरपडे यांचा पराभव होऊन असहाय्य अवस्थेत १८ जुन १६९७ रोजी अंत झाला.

🙏“अशा या महान सेनानीला स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा”🙏

Related posts

कोजागिरीचं चादणं..

ब्रह्म हा वायूचा श्वासोच्छवास

अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस

Leave a Comment