October 16, 2024
Vaishakh vanva Pallavi Umare article
Home » Privacy Policy » वैशाखवणवा
मुक्त संवाद

वैशाखवणवा

वैशाखवणवा

मीही आतुर झाली त्या‌ पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत सख्यासवे प्रीतीच्या झुल्यावर झुलायला… मोहरायला……!! आणि तोही सज्ज झालाय आतुरल्या मनाला प्रेमात आकंठ बुडून चिंब चिंब भिजवायला…

पल्लवी उमरे

जाळी वैशाख वनवा
‌होते जीवाची काहीली
आस मृगाच्या सरीची
तृष्णा बनून राहिली….!!💧

ग्रीष्माचा दाह, त्याची प्रखरता आता सहन होत नाहीए…. सर्व सजीव होरपळून पार निघालेय सूर्य तर आग ओकतोय… तप्त वाऱ्याची झुळूकही आता सहन होईना… सुर्याच्या दाहक किरणांनी पोळलीय अवघी सृष्टी अंग अंग कसं करपल्यागत झालीय…. हिरवी नाजूक कुरणं दिनकराच्या तेजोवलयापुढे मलूल झालीय … सारे नतमस्तक झाले रे तुझ्यापुढे सूर्या….!!
जणू सारा गिळंकृत करण्याचा इरादा तुझा. अवघं रान दाहकतेने पोळून निघाले. तप्त निखाऱ्यासारखे चटके बसताहेत अंगाअंगाला..

भेगाळली भुई सारी,
रान सारं करपलं
सुख कोवळ्या जीवाचं
शोधू कुठे हरपलं…..!!

वैशाखवणव्यात पोळून धरणीही बघ कशी भेगाळल्यागत होऊन आवासून बघतेय त्या मेघांकडे व्याकुळ होऊन….तिची लेकरं सारी त्राही त्राहीमान झाल्यागत घामाच्या धारांनी डबडबलीय….गाईवासरे चारापाण्यासाठी हंबरतायत, जणु मेघांना साथ घालताहेत. तो चातक पक्षीबघा कसा चोच वर करून पाण्याच्या एका थेंबासाठी आतुरलाय….उगाच नाही त्याला कोणी चातक म्हणत…. तोच तर वर्दी देतोय ना तुझ्या येणाची…. सारे सजीव हुश्श्य हुश्श्य करीत उसासे सोडत आहेत…!! रखरखत्या उन्हात झाडे, वृक्ष, वेली सुकून गेलीये….एखादी षोडस ललना उन्हाने झाकोळावी तशी कोमेजून गेलीये…. सारं रान कसं ओसाड आणि भकास वाटतंय जणू सृष्टीला अवकळा आलीय……!!

मैना, राघू, कबुतर, मोर, लांडोर सर्व जीवांच्या अंगाचा दाह झाला नुसता…काहिली काहिलीत होतेय रे जीवांची…हा अग्नीदाह शांत करायला ये रे बाबा बाहू पसरवत आणि बरसून जा एकदाचा,घाल फुंकर सर्वांच्या मनांगणावर…..!!

ए मेघ सांगना रे त्या पावसाला, कर ना रे एकदाच गर्दी मेघांची, चालू दे अंबरात तुझा तोच खेळ लपंडावाचा अगदी धडाड धूम..तोच सोहळा बघायला आतुरलीय अवघी सृष्टी, त्या चातकाने बघ कसे कान टवकारले…. ये बाबा एकदाचा घननिळा मेघ बनून, सागराची अवखळ लाट बनून…अवनीचा प्रियकर बनून ये… अंगांग भिजवण्यासाठी सळसळत ये रे मेघ एकदाचा….मोरलांडोर आतुरलेयतं प्रणयराधनेसाठी,धरणीही आसुसलीय,तुझ्या मिलनासाठी,कोकीळेचे गुंजन सुरु झालेलं त्या आमराईत,तीही भावविभोर झालीय आताशा…..!!

आसूसले रान सारे
देई काहील्या जीवास शांती
रणरणते उन्हं झेली अंगावर
नसे तुज काही भ्रांती…

परसबागेतली रजनीगंधा, निशिगंधा, अबोली, चाफा, शेवंती बघ कशी सुकून हिरमुसली, मलूल झालीय……!!
मोगऱ्याच टपोरपण, त्याचा सुगंध हरवलाय. अवघं चैतन्यच हरवलय सृष्टीचं…. विराण भकास वाटतंय अवघं विश्व…. फुलव रे बाबा सृष्टी एकदाची….व्याकुळ धरणीही बघ मेघाच्या मिलनासाठी आतुरलीय… तिलाही तुझा विरह आता सहन होत नाहीये. कशी डोळ्यात प्राण आणून चातकासारखी वाट बघते तुझी….!!

का रे असा सतावतोय तिला, तिच्या अंतरीच्या वेदना कोण समजून घेणार, किती विनवणी करायची तुझी आणि तू आहेस कि तुला कशाकशाची भ्रांत नाही मुळी…. धरती प्रसवण्यासाठी तुझ्यात चिंब भिजण्यासाठी आतुरली नुसती. राणपाखरांचे आर्तस्वर आसमंतात भरून राहिलेत. टिटवीही टिवटीव करीत तुला साद घालतेय. वाराही शीळ घालायला आतुरलाय, नद्या नाले झरे खळखळून हसण्यासाठी आतुरले….!!

आली मेघांची वर्दी 🌨️
सुटला गारगार वारा
होरपळलेल्या मनाला
चिंब भिजवतोय सारा…!!

आनंदोत्सव पावसाचा
धरती मेघ मिलनाचा
मळभलेल्या मनाला
देई स्पर्श चैतन्याचा…!!

आता मात्र‌ प्रतिक्षा संपलीय ,काळ्या मेघांची ढगात‌ गर्दी दाटलीय… नील अंबरात मेघांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू झालाय,वार् यालाही उधाण आलंय …तो‌ सर्व‌ त्राहीमान जीवांना वर्दी देत सुटलाय ,त्याचाही आनंद गगनात मावेनासा ‌झालाय,तोही तेवढाच अधीर‌ झालाय मेघांच्या स्वागतासाठी……!!
“आले आभाळ भरुन⛈️
ढोल ताशांचा गजर
आज ‌येणार ग बाई
‌‌ माझा पाऊस साजणं” !!

आले, आले बरं का ते काळेकभिन्न श्यामल मेघ दाटून आलेत सौदामिनीची आणि ढगांची जुगलबंदी रंगतेय निलनभात कशी चपखल नृत्य करतेय बघ सौदामिनी अंबरी ढोल ताशा च्या गजरात….गेली गेली शिळ रानावनात आताशा बरसल्या रिमझिम धारा….सुरू झाले मयूराचे नर्तन केतकीच्या बनात लांडोरीसवे
रोमांचित झाली सृष्टी,पिसाटला रानवारा….!!
हर्षियली सृष्टी सारी आतुरली स्वागताला धोधो बरसल्या सरी धरतीमेघ मिलनाला…!!प्रसवेल धरणीही ,उतावळी रुजण्याला….फुटे कोंबही बिजांकुराला…..!!

मीही आतुर झाली त्या‌ पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत सख्यासवे प्रीतीच्या झुल्यावर झुलायला… मोहरायला……!! आणि तोही सज्ज झालाय आतुरल्या मनाला प्रेमात आकंठ बुडून चिंब चिंब भिजवायला…सृष्टी सृजन फुलविण्यासाठी….नवनिर्मितीसाठी…!!
आनंदाचे तुषार झेलत…!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading