प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक पडतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेंसीं नव्हे एकु ।
आहे दिठी डोळ्यां विवेकु । अपाडु जैसा ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो, तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टि आणि डोळा (चर्मगोलक) यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे.
कोणाची नजर लागू नये म्हणून काळी टिकली लावण्याची पद्धत होती. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही ही पद्धत मानली जायची. ही अंधश्रद्धा आहे. पण हल्ली ही फॅशनही झाली आहे. गालावर काळी टिकली लावली की सौंदर्यात भर पडते. गालावर जर काळा तीळ असेल तर तो सौंदर्य वाढवतो. पूर्वीच्या काळी मात्र सौंदर्याला नजर लागू नये म्हणून ही टिकली लावली जात होती. खरंतर ही टिकली चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. नव्या युगात ही फॅशन झाली आहे. कृती तीच आहे फक्त इथे विचार बदलला आहे.
या विचारात अंधश्रद्धा नाही. कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे. तशी ही टिकली चेहऱ्यापासून वेगळीही करता येते. चेहऱ्यावर ती नाही. पण तिच्या असण्याने चेहऱ्याचे सौंदर्य बदलते. चेहरा मुळात आहे तसाच आहे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. चंद्रावर काही ठिकाणी उंचवटे आहेत. काही ठिकाणी खोलगट दरी आहे. पण पृथ्वीवरून दिसताना हे भाग चंद्रावर काळे डाग असल्यासारखे दिसतात. पण हा चंद्राला लागलेला डाग आहे का? तर नाही. चंद्र आहे तसाच आहे. डोळ्याला तो तसाच दिसत आहे. पण आपला पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. दृष्टी आणि डोळा यामध्ये फरक आहे.
माझा एक मित्र होता. त्याच्याकडे एक कार्ड होते. त्या कार्डावरील चित्र प्रत्येक व्यक्तीला वेगळे दिसायचे. तो प्रत्येकाजवळ जायचा आणि ते चित्र कोणते आहे हे ओळखायला सांगायचा. प्रत्येकाला ते चित्र वेगळे दिसायचे. आम्हाला सर्वांना त्यावेळी आश्चर्य वाटले हे असे? कोणाला त्या चित्रात सिंहासन दिसले. कोणाला त्यात पक्षी दिसला. कोणाला त्या चित्रात नर्तिका दिसली. कोणाला त्या चित्रात विविध हत्यारे उदाहरणात तलवार, भाला दिसले. असे वेगवेगळे विचार प्रत्येकाने मांडले. चित्र मात्र एकच होते. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. सिंहासन वाटले ती व्यक्ती राजकीय घराण्याशी संबंधित होती. कोणाला नर्तिका दिसली ती व्यक्ती नृत्य कलेशी निगडित होती. कोणाला तलवार, भाला आदी हत्यारे दिसली त्या व्यक्तीचे पूर्वज हे शस्त्रकलेशी संबंधित असल्याचे आढळले. पक्षी दिसला त्या व्यक्तीचे घराणे पक्षी प्रेमी होते.
हा घडलेला सत्य प्रकार आहे. सांगण्याचा हेतू हाच की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक पडतो. सद्गुरू हेच तर सांगतात. देह आणि आत्मा वेगळा आहे, हे ओळखा. हे ज्याने ओळखले त्याच्यामध्ये बदल निश्चित होतो. विचारानुसार आचरणही बदलते. हळूहळू त्या व्यक्तीचा कल आत्मज्ञानाकडे वळतो. सद्गुरूंच्याकृपेनी ती व्यक्ती आत्मज्ञानी होते.