November 22, 2024
Spiritual interests increases with Guru Love
Home » गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी
विश्वाचे आर्त

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये आमूलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारु ।
तो मत्प्रातिकारु । जाणावया ।। १२२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – एक शिष्य व एक गुरु हा जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरिता आहे.

पहिली गुरू ही आई असते. कितीही थोर व्यक्ती झाली तरी त्याच्या या यशामागे आईचे प्रेम, माया निश्चितच कारणीभूत असते. हे प्रेम, माया त्याला यशाच्या शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरते. जगात सर्व काही विकत मिळू शकते, अगदी प्रेमही विकत मिळते, पण आईची माया, प्रेम विकत घेता येत नाही. ती नशिबानेच मिळते. असे म्हटलेही जाते की, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आईच्या कुशीत शांती असते. आनंद असतो. गोडवा असतो. हे ज्याला मिळाले तो निश्चितच तृप्त झाला. आईच्या संस्कारामुळेच तो थोर होतो. ही आई जन्माने आई असेल असेही नाही. कृपेचा आशिर्वाद देणारी प्रत्येक स्त्री ही प्रेमाने आईच असते. तिच्या छत्रछायेमध्ये अनेक कर्तृत्त्ववान पुरूष घडतात. केवळ तिच्या मायेनेच हे शक्य होते. म्हणून अशी मातेसमान असणारी स्त्री हीच पहिली गुरु असते.

आत्मज्ञान प्राप्तीसाठीही आत्मज्ञानी गुरूची गरज असते. आत्मज्ञानी गुरू हे आईसारखेच असतात. तीच गोडी, तेच प्रेम त्यांच्यातून ओसंडून वाहत असते. त्या प्रेमात, त्या गोडीत समरस व्हायला शिकले पाहिजे. त्यामध्ये मनमुराद डुंबायला पाहिजे. आत्मज्ञानी संतांच्या या प्रेमामुळेच त्यांना आईची उपमा दिली गेली आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली असे म्हटले गेले आहे. संतांची समाधी ही संजीवन असते. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहत असते. यामुळेच सातशे वर्षांनंतरही आळंदीत भक्तीचा मळा आजही जोमात फुलतो आहे. या मळ्यात विसावा घ्यायला हवा. त्या कुशीचा अनुभव घ्यायला हवा.

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये आमूलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. प्रेमाने युद्धही जिंकता येते. यासाठी बोलण्यात गोडवा हवा. वागण्यात गोडवा हवा. आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला ही गोडी लावायला शिकले पाहिजे. प्रेमाचे चार शब्दही दुसऱ्याच्या मनातील राग वितळवू शकतात. दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. यासाठी वक्तव्यात सुधारणा करायला हवी. तशी सवय आपण आपल्याला लावून घ्यायला हवी. आत्मज्ञानी संतही शिष्याला प्रेमाने शिकवतात. त्याच्यात बदल घडवितात. यासाठी अशा या संतांच्या सहवास राहायला हवे. त्यांना जाणून घ्यायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading