May 23, 2024
Suchita Ghorpade Khurpa book review by sammer Gayakwad
मुक्त संवाद

खुरपं मध्ये गावजीवन, कृषीसंस्कृती अन् बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण

गावजीवन, कृषीसंस्कृती आणि बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण या कथांत आहे. कथेत येणारी स्थळे इतक्या ताकदीने चितारली आहेत की दृश्यमानतेचा अनुभव यावा. व्यक्तीसमूहाच्या बोलीचे रूप या स्थळांना जिवंत करतं.

समीर गायकवाड

सुचिता घोरपडे यांचा ‘खुरपं’ हा कथासंग्रह अनेकार्थाने वेगळा आणि महत्वाचा आहे. आजघडीला अन्य विषयांच्या तुलनेत अस्सल ग्रामीण मराठी साहित्य कमी लिहिले जातेय, त्यातही स्त्री लेखिकांचा मोठा अभाव जाणवतो. मराठी साहित्याच्या आजवरच्या वाटचालीत स्त्री लेखिकांनी स्वतःचा अमीट ठसा उमटवला आहे हे जरी खरे असले तरी त्यांनी संपन्न केलेल्या लेखनाच्या वर्गवारीवरून उमगते की काही विषयांना हाताळण्यात त्यांना फारसे स्वारस्य नाही. ग्रामीण मराठी साहित्याशी कथाविषयांची नाळ जोडली गेलेल्या अशा खूप कमी लेखिका आहेत की ज्यांच्या लेखनाची दखल घ्यावीशी वाटते. सुचिता घोरपडे यांचे हेच वेगळेपण ! ‘खुरपं’ चं आणखी भिन्नत्व म्हणजे त्याची भाषाशैली आणि मांडणी. मराठी कानडीचे सहोदर असण्याचे लेखनभाव इतक्या ताकदीने आजकाल कमी अनुभवास येतात.

अवदस, खुरपं, माचुळी, येडताक, लागिरं, चईत, डबरणी, खेकडं, किनव्या, उतारा या यातल्या गोष्टी आहेत. पुस्तकाचं अक्षरविश्व १६४ पानांचं आहे मात्र यातले एकेक शब्द कमाल अर्थवाही आणि अथांग आहेत. असेही नाही की हे शब्द लोप पावलेले आहेत, त्याचबरोबर असंही म्हणता येणार नाही की हे शब्द केवळ अडगळ म्हणून अस्तित्वात आहेत ! Suchita सुचितांनी मृतप्राय होऊ घातलेल्या अनेक शब्दांना संजीवनी दिली आहे हे मात्र खरे आहे.

खेड्यापाड्यांनी वाड्या वस्त्यांनी साहित्य वाचन मुबलक होते असे म्हणणे कपोलकल्पित धाडसी वक्तव्य ठरेल, अपवाद वगळता आजकाल बहुतांश करून नागरी वा शहरी भागातील वाचकांद्वारेच साहित्य वाचन टिकून आहे. अशा वाचकांना हे शब्द आणि या कथांमधला भवताल मिथ्या वाटू शकतो कारण यातील अनेक शब्द ग्रामीण असूनही राज्यातील सर्व ग्रामीण भागात यांचा वापर होत नाही, काहींचा वापर राज्यातील एखाद्या विशिष्ठ भागापुरता अधिक आहे तर काही शब्द खेडूत जीवनात देखील आता कमी वापरले जात आहेत. असे असूनही सुचितांनी त्या शब्दांना टाळलेलं नाही उलटपक्षी त्यांचं छानसं देखणं आशयघन तोरण आपल्या वाचकांच्या मनी बांधलं आहे. याकरिता त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

ग्रामीण जीवनाचं रेखाटन करणाऱ्या कथा कादंबऱ्यात अलिकडील काळात मोठ्या प्रमाणात जाणवणारा दोष म्हणजे लेखकाची भाषाशैली ! धड शहरी नसलेली आणि निव्वळ ग्रामीणदेखील न राहता अत्यंत त्रासदायक अशी सरमिसळ केलेली शैली अनुसरली जाते. सुचितांच्या लेखनशैलीत एक वेगळेच गुणलक्षण आहे ते म्हणजे खेड्यातली माणसं जशी बोलतात वा त्यांचं वागणं बोलणं ज्या बोलीत शब्दांत असतं त्याच शब्दात त्याच लेहजात त्या व्यक्त झाल्यात. असं करताना वाचकासाठी ती एक रिस्क ठरली असती कारण अशा शब्दांशी वाचक फारसा परिचित नसला तर त्याला ते निरस वाटण्याची शक्यता अधिक असते. इथे तसं होत नाही. कथा ज्या भौगोलिक प्रांतात घडतात तिथलीच भाषा पात्रे बोलतात आणि ती बोलीभाषा कुठल्याही व्याकरणादिक वा एतद्देशीय संस्कारांचे ओझे घेऊन वावरत नाही ! पात्रे जी भाषा बोलतात तीच लेखनातजशीच्या तशी असून त्यातली गोडी ओढाळ अशी आहे.

गावजीवन, कृषीसंस्कृती आणि बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण या कथांत आहे. कथेत येणारी स्थळे इतक्या ताकदीने चितारली आहेत की दृश्यमानतेचा अनुभव यावा. व्यक्तीसमूहाच्या बोलीचे रूप या स्थळांना जिवंत करतं. ‘अवदस’मधला कृष्णेचा पूर हुरहूर लावतो. ‘माचुळी’ मधला भैरीचा डोंगर उगाच ओळखीचा वाटू लागतो, ‘खेकडं’मधला वाघजाईच्या वरल्या अंगाला असणारा रांजणडोह एकदा तरी पाहावा अशी ओढ लागते, ‘डबरणी’मधली पंचगंगेच्या काठावर पसरलेली कासारवाडी परिचयाची वाटू लागते तिथल्याच अंशीचा मोडत आलेला संसार काहूर माजवतो. छोट्या छोट्या वाक्य रचनेचा प्राण असणारे ग्राम्यशब्द कथांची रंगत वाढवतात. सत्तर ऐंशीच्या दशकातील ग्रामीण मराठी साहित्याची आवर्जून आठवण यावी असं हे लडिवाळ लिखाण. व्यक्तीचित्रणाच्या परिप्रेक्ष्यातून गावगाडा उलगडून दाखवण्याचे सुचितांचे कसब खूप देखणे आहे.

ज्यांना नित्य नव्या शब्दांची ओढ आहे अशांसाठी तर ही मेजवानीच आहे. यातल्या सर्व कथांचा पिंड एकसमान असला तरी त्यांची देहबोली विलक्षण वेगळी आहे. कधी खटकेबाज संवाद तर कधी डोळे ओलावणारे मायेचे कढ यामुळेही या कथा चांगल्याच लक्षात राहतात. ब्लर्बमध्ये रणधीर शिंदे सरांनी नोंदवलेलं निरीक्षण अगदी सही आहे, ‘पदराला दुक बांधून उंभरा वलांडलेल्या’ मायलेकीच्या वनवासकथांनी या समाजचित्रणास वेगळी परिमाणे लाभतात. नाती उसवायाच्या बेतात आलेली ही माणसं घनव्याकुळ करतात, बघता बघता त्यांच्या दुनियेत सामील करून घेतात. एक वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रह म्हणून ‘खुरपं’ लक्षात राहतो.

कथासंग्रह : खुरपं
लेखक : सुचिता घोरपडे
प्रकाशक : आर्ष पब्लिकेशन्स
मुखपृष्ठ : राजू बाविस्कर , जळगाव
पृष्ठे : १६४ | किंमत : ₹ २००

Related posts

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांची ओळख…

एक शिष्य एक गुरू परंपरेचे कार्य

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह अन् संकल्पना

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406