May 23, 2024
विश्वाचे आर्त

तवं नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझे ।।

विश्वरुपातही असेच अर्जुनाचे झाले प्रथम अर्जुनाला हे विश्वरुप हे भीतीदायक वाटले. पण जसजसा त्याचा अर्थ समजू लागला तेव्हा त्याची भीती दुर झाली. अध्यात्मात साधनेचीही असेच आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

कृष्णाते म्हणे अवधारिलें । आपण विश्वरुप मज दाखविलें ।
तवं नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझे ।। 21 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकले महाराज आपण मला विश्वरुप दाखविले, तेव्हा ते विश्वरुप अपूर्व म्हणून माझे चित्त भ्याले.

एखादी आश्चर्याची गोष्ट पाहील्यानंतर आपल्या मनात थोडीफार भिती उत्पन्न होते. काहीक्षण तरी ही भीती आपल्या मनात असते. जरी ते दृश्य आल्हादायक जरी असले तरी त्याच्याबद्दल अचानक आल्याने ते सुरुवातीला काहीक्षण तरी भीतीदायक वाटते. आकाशात अचानक जेव्हा फटाक्याचा स्फोट झाला तर प्रथम पाहताना आपल्या मनात क्षणिक भीती वाटते. स्फोटानंतर आकाशात पडलेला लख्ख प्रकाश आणि सुंदर चमचमणारे तारे दिसायला आल्हादायक, सुखकारक असले तरी मनात मात्र सुरुवातीला भीती उत्पन्न झालेली असते. या आल्हादायक दृश्याने ती भीती क्षणात नष्ट होते.

विश्वरुपातही असेच अर्जुनाचे झाले प्रथम अर्जुनाला हे विश्वरुप हे भीतीदायक वाटले. पण जसजसा त्याचा अर्थ समजू लागला तेव्हा त्याची भीती दुर झाली. अध्यात्मात साधनेचीही असेच आहे. सुरुवातीला साधना करताना त्रास जाणवतो. अंग जड झाल्याने भीती वाटते. पण हळूहळू त्याची सवय होते व नंतर त्याच्यातील भीती दूर होऊन साधनेत मन रमू लागते. त्यातील प्रसन्नता मनाला सुख समाधान देते.

अभ्यासाचेही असेच आहे. सुरुवातीला एखादा विषय कठीण वाटतो. मनात भीती वाटते. हे आपणाला समजेल का नाही. ही भीती असते. पण गुरु जेव्हा तो विषय समजावू लागतात. तेव्हा त्यातील धागेदोरे सुटल्यानंतर तो विषय सोपा वाटू लागतो. त्या विषयाची भीती दूर होते. अपूर्व, अद्भुत अशी गोष्ट अचानक पाहील्यानंतर मनाला सुरुवातीला काही क्षण भीती वाटते. हे स्वाभाविक आहे. यासाठी साधनेमध्ये किंवा अभ्यासामध्ये भीती न बाळगता तो विषय समजावून घेऊन प्रगती साधायला हवी. असे केल्यास साधनेत त्या बरोबरच अभ्यासातही निश्चितच प्रगती होते.

जीवनातही अशा अनेक भीतीदायक घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांना न भीती, न डगमगता सामोरे जावे. त्या घटना समजून घ्याव्यात. म्हणजे त्यातील भीती ही आपोआपच निघून जाते. अनेक अडचणींचा सामना करत जीवन पुढे चालायचे असते. हे जीवन जगताना भीती न ठेवता त्याचा आनंद, आस्वाद घ्यायला शिकले पाहीजे. जीवनात आलेले कठीण प्रसंग हे आश्चर्य समजून त्यांचा सामना करायला हवा. आश्चर्य कसे घडले असे समजून त्यावर आश्चर्यकारक मात करायला हवी.

Related posts

इंद्रियांनाच गुंतवा साधनेच्या स्वरात

विकासासाठी परिवार संकल्पना

ब्रह्मज्ञानी होण्यासाठीचा मार्ग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406