पारावर तव्हा
विचारांची पेरणी व्हायची
माणुसकी हीच काय तव्हा
सर्वदूर उगवायची…
पारवरच्या गोष्टी या कवितेच्या या ओळी.. गावचा पार हा गावाच्या संस्काराचे एक व्यासपीठ होते ते एक सांस्कृतिक केंद्र कसं होते ते या कवितेतून सांगितले आहे.प्रा. कुंडलिक शांताराम कदम,
शिक्षक भवन, तळेगाव ढमढेरे
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शिरूर
कवी तानाजी धरणे व्यवसायाने ग्रामसेवक. त्यांनी हेलपाटा नावाची त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. शेतीमातीत राबणाऱ्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जीवन जगण्यासाठी केलेली भटकंती आणि संघर्ष त्यांनी हेलपाटा कादंबरीत मांडला आहे. सध्या ते जरी ग्रामसेवक म्हणून कार्यरत असले तरी त्यांची शेतीमातीशी नाळ जोडली गेली आहे. त्यांनी गावगाडा पाहिला आहे. रोजच्या जगण्यातली लढाई त्यांनी पाहिली आहे. त्यांच्या कविता वाचताना ग्रामीण जीवनातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिबिंब कवितेतून स्पष्ट होतात. शेतकऱ्यांच्या अनेक व्यथा त्यांनी यात मांडल्या आहेत. त्यांच्या कवितेत शेतकऱ्यांच्या व्यथा असून त्यांनी व्यवस्थेला काही प्रश्नही विचारले आहेत.
शेतीत कष्ट करणाऱ्या बळीराजाला साथ देणाऱ्या सजीव, निर्जीव घटकांशी त्याचे असणारे ऋणानुबंध यात मांडले आहेत. नात्यामधील भावबंध यात मांडून त्यातील गोडवा वाढवला आहे.
त्यांच्या कवितेत शेतीमातीशी संबंधित अनेक जुने शब्द वाचायला मिळतात.
किती वाचावा हा
माझा वेदनेचा पाढा
येथे दुष्काळ पाचवीला
कसा ओढावा संसाराचा गाडा…
वेदनेचा पाढा या कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांच जीवन मांडले आहे. दुष्काळ मग तो कोरडा असेल किंवा ओला याचा शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे या कवितेमधून वाचायला मिळते.
ज्ञान मंदिराच्या परिघात
ऐकून प्रार्थना, मंत्रमुग्ध होते मन
बाल सवंगड्यांच्या आठवणीत
पुन्हा पेरते होते गावचे रान
हुरहूर ही कविता वाचताना आपल्याही मनाला हुरहूर लावते. गाव सोडल्यावर जेव्हा आपण पुन्हा गावात येतो, किंवा आपल्याला गावाच्या आठवणी येतात तेव्हा आपलं मन जुन्या आठवणीत हळवं होत. ते सगळं पाहून ते दिवस आठवून आपल्या मनात एक हुरहूर निर्माण होते.
पारावर तव्हा
विचारांची पेरणी व्हायची
माणुसकी हीच काय तव्हा
सर्वदूर उगवायची…
पारवरच्या गोष्टी या कवितेच्या या ओळी.. गावचा पार हा गावाच्या संस्काराचे एक व्यासपीठ होते ते एक सांस्कृतिक केंद्र कसं होते ते या कवितेतून सांगितले आहे. पार हे गावाच्या जिवंतपणाचे लक्षण होते आणि गावात माणुसकी कशी जिवंत होती हे या कवितेतून मांडले होते. तसेच बदलत गावही यातून मांडले आहे.
तळा माळाच्या पाठीवर असं दिस रातीचं राबण
जवारीचा फड तव्हा दिसतो गाभणं..
गोफण या कवितेतून शेतीत पिकं आल्यावर गोफणीच्या मदतीने राखण कशी केली जाते हे शब्दबद्ध केले आहे. शेतात पिकं बहाराला आल्यावर त्याचे वर्णन करताना
पाखरांचा थवा.. हिरवा शालू पदराचा नवा, लगडले कणसाला मोती, जागवतो मधुर राती असे समर्पक शब्द कवितेचे शब्दवैभव वाढवतात.
संसाराचा डोक्यावर घेऊनी भार
संभाळली चिलिपिली चार
संघर्षाचा काळ चाले घनघोर
पर नाही ढळू दिला डोईवरचा पदर
आई या कवितेतून आईच कष्ट, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि संस्कार यात मांडले आहेत.
लाल, गुलाबी, तांबूस फळावर
लगडतात सारे, काटेरी मुलायम तूस
वाळवंटातही तरुण ठेवतो
रुजवतो पाण्याविना आपली कुस
निवडुंग तसी दुर्लक्षित वनस्पती. याकडून संघर्ष माणसाने शिकला पाहिजे असं कवीला सांगायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत तो येतो. त्याला येणारे फळ सुद्धा किती उपयुक्त असते तेही यात सांगितलं आहे.
नका म्हणू ? गोधडीला
फाटक्या चिंध्याचा पुंजका
माह्या जन्म झाला तवा
तिनेच दिला मायेचा हुंदका
गोधडी ही फक्त एक वस्तू नसून तिच्याशी असलेले एक भावनिक नाते यात खूप भावनिक होऊन यात साकारले आहे. यात गोधडीची उब, धागे म्हणजे मायेचे फास, माय आणि गोठ्यातील कपिला गाय या सुंदर शब्दांची गुंफन यात केली आहे.
चाडं कुळवाचं यठण दोन बैलाचा सोबती
नांगरतो तळहाताच्या रेषा तरी येती दुष्काळ नौबती
नांगरतो तळहाताच्या रेषा कविता संग्रहाचे नाव असणारी कविता. यातील कविता वाचताना हे नाव किती योग्य आहे याची जाणीव होते. हाताच्या रेषात भविष्य शोधण्यापेक्षा कष्टाचा नांगर शेतात चालवून आपल्या कष्टावर भर देणाऱ्या कर्मयोगी बळीराजा यात वाचायला मिळतो.
पुस्तकाचे नाव – नांगरतो तळहाताच्या रेषा ( काव्यसंग्रह )
कवी – तानाजी धरणे
प्रकाशक – ज्ञानसिंधु प्रकाशन, नातेखिंड
पाने – 96 किंमत –150 रुपये
मुखपृष्ठ.. शिरीष घाटे

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.