February 18, 2025
Subway is a boon for the development of Mumbai article by Mahadev Pandit
Home » भुयारी मार्ग मुंबईच्या विकासासाठी वरदान
विशेष संपादकीय

भुयारी मार्ग मुंबईच्या विकासासाठी वरदान

भुयारी मार्ग शहरी विकासासाठी वरदान ठरतील

जशी उड्डाणसेतूंनी गावे, शहरे, माणसे, मने आणि संस्कृती जोडली जातात अगदी तश्याच प्रकारे भुयारी मार्गानी सुध्दा अनेक उपनगरे व शहरे जोडली जाणार आहेत त्यामुळे खडतर व लांबलचक वळसा घालत करावा लागणारा प्रवास सुकर केला जाणार आहे.

महादेव ई. पंडित
(लेखक मुंबई येथे स्थापत्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

भुयारी मार्ग तंत्रज्ञान हे मुळात स्थापत्य शास्रामधील खुप सुंदर व निसर्गाला बाधित न करणारे तंत्रज्ञान आहे. शहरातील नैसर्गिक डोंगर व गजबजलेली मानवनिर्मित वस्ती पार करण्यासाठी जे जमिनीखालून बांधकाम केले जाते, त्याला भुयारी मार्ग म्हणतात. जशी उड्डाणसेतूंनी गावे, शहरे, माणसे, मने आणि संस्कृती जोडली जातात अगदी तश्याच प्रकारे भुयारी मार्गानी सुध्दा अनेक उपनगरे व शहरे जोडली जाणार आहेत त्यामुळे खडतर व लांबलचक वळसा घालत करावा लागणारा प्रवास सुकर केला जाणार आहे. मुलूंड गोरेगाव ह्या नवीन मार्गाची अंदाजे लांबी १२.२० किमी असून त्यामध्ये अंदाजे ४.४७ किमीचा खिंडीपाडा ते चित्रनगरी हा भुयारी मार्ग आहे. एरवी ते पार करण्यासाठी कमीत कमी एक तास खर्ची पडत आहे. मुलूंड गोरेगाव हा भुयारी मार्ग (एमजीएलआर) हा अतिजलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा मुंबई शहरातील एक आदर्श नमुना आहे. ह्या भुयारी मार्गाचे काम नोव्हेंबर २०२३ अखेर चालू होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुलूंड गोरेगाव जोड रस्त्त्या अंतर्गत खिंडी पाडा व चित्रनगरी हा बोगदा व मुंबईची पुर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे जवळ आणणारा हा भुयारी मार्ग स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे! शहरा अंतर्गत इतका लांब व महत्वपुर्ण भुयारी मार्ग विक्रोळी जोगेश्वरी लिंक महामार्गावरील रहदारी नक्की कमी करु शकतो.

खरे तर मुंबई शहर हे पश्चिम किनारपट्टीवरील सुंदर नैसर्गिक बेट आहे. शीव, वांद्रे ते दक्षिणेकडील समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतच्या भागाला मुंबई असे संबोधले जाते आणि याव्यतिरिक्त मुंबईच्या उरलेल्या भागाला उपनगर म्हणून ओेळखले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने वांद्रे ते बोरिवलीस पश्चिम उपनगरे व शीव ते मुलुंडपर्यंतच्या भाग पुर्व उपनगर असे विभागले जाते. या पुर्व नगरांच्या मध्ये पवई पासून उत्तरेकडे वसई क्रिक ब्रीज पर्यंत ८७ चौरस किमी क्षेत्रफळाचे मोठाले नैसर्गिक अभयारण्य आहे. मुंबई पुर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यापूर्वी चेंबूर- सांताकृझ, घाटकोपर – अंधेरी व विक्रोली – जोगेश्वरी ह्या तीन लिंक रोडनी या पूर्वीच जोडली गेली आहेत, पण या दोन्ही उपनगरातील वाढती लोकसंख्या व रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने मुलूंड गोरेगाव हा चौथा लिंक रोड प्रस्तावित करुन लगेचच बांधकामाचे काम हाती घेतले आहे. सुमारे १२.२० किमी लांबीच्या या जोड रस्त्यामुळे मुलूंड गोरेगाव हे अंतर अंदाजे १० ते १२ मिनीटात पार करता येईल आणि परिणामी वाहनाच्या इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. हा नवा भूयारी मार्ग येत्या नोव्हेंबर अखेर चालू होईल असा अंदाज आहे.

खिंडीपाडा ते चित्रनगरी या प्रतिष्ठित भुयारी मार्गासाठी जेकुमार व एनसीसी यांची सहा हजार तीनशेहे एक कोटीची सर्वात कमी बोली मु्ंबई महानगरपालिकेने मंजूर केली आहे. या भुयारी मार्गामुळे अंदाजे १२.५० लाख घनमीटर वस्तूमानाचा खडक बाहेर काढून तो दोन्ही बाजूच्या म्हणजेच पुर्वद्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा व चित्रनगरी ते पश्चिम द्रुतगती मार्गच्या मजबूतीकरणासाठी वापरला जाऊ शकतो. आजच्या बाजारभावाने म्हणजे सर्वसाधरणपणे दोन हजार प्रतिबास ह्या दराने त्या खडकाची किमंत अंदाजे शंभर कोटी इतकी होऊ शकते.

भुयारी मार्गामुळे कोणत्याही प्रकारच्या मानवनिर्मित बाबींची हानी होत नाही तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा उदाहर्णाथ झाडां झुडूपांची बिलकूल कत्तल होत नाही त्यामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडत नाही. जंगलात रहात असलेल्या पशुपक्षी व प्राणी मात्राना आपले निवासस्थान बदलण्याची गरज पडत नाही. तसेच अभयारण्यातील जलाशयांना सुध्दा कोणतीही बाधा पोहचणार नाही. भुयारी मार्गामुळे निसर्गाचे शतप्रतिशत सवंर्धन होते. भुयारी मार्गातून बाहेर निघणारा खडक दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याच्या तसेच बांधकामाला वापरता येतो त्यामुळे निविदा बोलीच्या किमतींत खुप मोठाला घसारा मिळू शकतो आणि हाच खुप मोठाला फायदा अभियांत्रिकीच्या भुयारी तंत्रज्ञाना मुळे मिळाला आहे तसेच भुयारी मार्ग बांधकाम हे पर्यावरण पुरक आहे म्हणूनच भुयारी मार्ग हे खरेच खुप मोठे विकासाचे वरदान आहे असे संबोधण्यात काही वावगे ठरणार नाही.

मुलूंड गोरेगाव लिंक रोडच्या १२.२० ह्या एकूण लांबीच्या ६० टक्के म्हणजेच ७.५० किमी बोगदयाच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारापासून ते पुर्व व पश्चिम द्रूतगती मार्गापर्यंत जमिनीवरुन जाणारा जोड रस्ता आहे व उर्वरित ४० टक्के म्हणजे ४.७० किमी भाग अभयारण्याच्या खालून भुयारी मार्ग आहे आणि तो खिंडी पाडा ते चित्र नगरी ह्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना दरम्यान आहे. ह्या भुयारी मार्गामुळे राष्ट्रीय उद्याना मधील जीवसृष्टीचे संवर्धन होणार आहे . दोन समांतर बोगदे प्रत्येकी १३ मीटर व्यासाचे असून त्यामध्ये प्रगत अग्निशमन यंत्रणा, सीसीटिव्ही यंत्रणा व अग्नीरोधक यत्रणां कार्यान्वित करण्यात येणार आहे.मुलूंड गोरेगाव या नव्या जोड रस्त्यामुळे ऐरोली, घनसोली, भांडूप, ठाणे इत्यादी उपनगर पश्चिम उपनगरांना त्वरित जोडली जाणार आहेत.

अभयारण्ये ओलांडून विकास…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे ते बोरीवली हा नवा भुयारी मार्ग जोड रस्त्यासहित १३.३८ किमी लांबीचा असून तो आता पावसाळ्यानंतर बांधकामास हाती घेतला जाणार आहे. त्यामध्ये ५.७४किमी लांबीचा ठाणे ते बोरीवली व ६.०९ लांबीचा बोरीवली ते ठाणे असे प्रत्येकी तीन तीन मार्गिकेंचे दोन जुळे भुयारी बोगदे आहेत. या प्रकल्पाची अंदाजित निविदा बोली रक्कम सुमारे १४४०१ कोटी इतकी आहे. ठाणे आणि बोरीवली आता घोडबंदर रोडने जोडलेले आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी जवळ जवळ एक ते दिड तास लागतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्याना मार्गे अंदाजे २३ मीटर खालून एकदम सरळ जात असलेल्या भुयारी मार्गामुळे मागाठाणे एकता नगर ते टिकूजीनीवाडी हे अंतर फक्त १० मिनिटात पार करता येईल त्यामुळे ठाणे व मुंबईच्या पारंपारिक कलाकृतीचा व संस्कृतीचा चांगलाच मिलाप होऊन सुंदर संगम होणार आहे. हा भुयारी मार्ग मुंबईची पश्चिम उपनगरे व ठाणे शहराचा सर्वांगीण विकासास नक्कीच मोठा हातभार लावेल. हा भुयारी मार्ग मुलूंड गोरेगाव लिंक रोडच्या विस्तारित प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे. हा प्रकल्प हैदराबाद स्थित मे. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लि. ही कंपनी चालू असलेल्या पावसाळ्यांनंतर हाती घेणार आहे आणि तो प्रकल्प साधारणपणे नोव्हेंबर २०२७ पर्यंत लोकसेवेत दाखल होईल असा अंदाज आहे. ठाणे ते बोरीवली हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा एक आदर्श वाहतुकीचा कॅारीडॅार (छन्नमार्ग)ठरणार आहे कारण ठाणा, भिंवडी, कळवा, मुंब्रा , दिवा इत्यादी भाग टिबीएलआर मुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या एकदम जवळ येणार आहे. आता प्रवाश्यांना जेएनपीटी कडे मार्गक्रमण करीत असलेल्या जड अवजड वाहनाच्या प्रचंड कोंडीच्या मार्गातून प्रवास करत बोरीवली गाठावी लागते आणि त्यामध्ये बरीच दमछाक व मनस्ताप होतो. टिबीएलआर मुळे ह्या सर्व मनस्तापातून सुटका मिळेल व सर्व ठाणेकरांना पश्चिम उपनगराकडे जाताना आल्हाददायक प्रवासाची मेजवानी मिळेल.

आता मुलूंडकराना गोरेगाव गाठताना व ठाणेकरांना बोरीवली गाठताना काखेत कळसा आणि गावाला वळसा या पारंपारिक म्हणीचा शत प्रतिशत खरा अनुभव व अर्थ लक्षात येतो पण आता नव्या प्रस्तावित दोन भुयारी मार्गामुळे व अभियांत्रिकी च्या भुयारी तंत्रज्ञानामुळे मुलूंड – गोरेगाव आणि ठाणे – बोरीवली आता एकमेकांची प्रतिबिंबे असे भासतील आणि प्रवासाच्या अर्थाने काखेत कळसा व गावाला वळसा ही म्हण नक्कीच कालबाह्य ठरेल.

भारतीय पर्यावरणीय सर्वेक्षणानुसार ठाणे बोरीवली भुयारी मार्गामुळे जवळ जवळ १८ प्रकारच्या अत्यंत संरक्षणात्मक प्रजातीचे संरक्षण होणार आहे त्यामुळे वन्य जीव कायद्याचं संरक्षण होणार आहे. टिकूजिनीवाडी ते एकता नगर मागाठाणे हा जुळा बोगदा ठाणे बोरीवली जोड रस्त्यावरील महाराष्ट्रातील व देशातील शहरा अंतर्गत सर्वात मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.

भुयारी तंत्रज्ञान व विकास

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई व ठाणे शहराच्या अंतर्गत आहे त्यामुळे केंद्र सरकारने वन्य जीव सरंक्षर्णाथ त्याला ‘इको सेन्सिटीव्ह झोन’ म्हणून घोषित केले आहे. अश्या क्षेत्रातून रस्ता बांधत असताना पारंपारिक जीलेटीन ब्लास्टिंग करता येत नाही म्हणून आता हे दोन्ही भुयारी मार्ग खोदताना टनेल बोरींग यंत्रसामुग्रीवापर करणे कंत्राटदाराला बंधन कारक केले आहे. भुयारी मार्ग हे मजबूत दगडी पृष्ठभागातून जात असल्यामुळे त्यावर कधीही खड्डे पडण्याची शक्यता नाही तसेच बोगदा जवळ जवळ २५ मीटर जमिनीखालून नैसर्गिक मजबूत व कठीण खडकातून जात असल्यामुळे प्रवेशद्वाराच्या सुरवातीच्या सु शोभिकरणाच्या भागाव्यतिरिक्त कॅाक्रिट लायनिंगची गरज भासत नाही. भुयारी मार्ग पुर्ण दगडाच्या स्वबळावर स्ट्रक्चरली संरक्षित उभा रहातो, उड्डानपुल व उन्नत मार्गासारखे उंभे खांब त्याला पाईल , खांबाच्या डोकी वर पिलर कॅप, प्रिकास्ट गर्डर डेक स्लॅब व साईड बॅरियर इत्यादी आगाऊ स्ट्रक्चरल इलेमेंटची गरज भासत नाही त्यामुळे भुयारी बांधकामास जास्त वेळ लागत नाही. तसेच बोगद्याच्या खोदकामातून प्रचंड मोठ्या प्रमाणात दगड व दगडाची भुकटी बाहेर येते आणि ती आयती नैसर्गिक साधन संपत्ती इतर बांधकामासाठी कच्चा माल म्हणून वापरू शकतो. मग मित्रहो सांगा बरे भुयारीमार्ग तंत्रज्ञान अभियांत्रिकीने विकासाला दिलेले वरदानच आहे की नाही?

जीएमएलआर व टिबीएलआर या दोन्ही भुयारी मार्गामुळे पश्चिम उपनगरात पोहचण्यासाठी लागणार्‍या वेळेत अंदाजे २० ते ३० मिनिटांची बचत होणार आहे. त्याच प्रमाणे दळणवळण जलद होण्यास मदत होईल, आणि भुयारी मार्गामुळे जेव्हीएलआर व ठाणे घोडबंदर बोरीवली या दोन्ही वळण रस्त्यावरील ताण कमी होण्यास हातभार लागणे अपेक्षित आहे.

जमिनी खालून दक्षिण व उत्तर मुंबई जोडणारी मेट्रो ३ ची अक्वा विकास लाइन

मुंबई मेट्रो रेल कॅारपोरेशन लिमीटेड चा कुलाबा – बांद्रा – सीप्झ हा २३१३६ कोटीचा मेट्रो ३ मार्ग हा महत्वाकांक्षी विकास प्रकल्प जून २०२४ च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याच्या तयारीत आहे. मेट्रो ३ वर एकंदरीत २६ स्टेशन्स (थांबा) भुयारी आहेत तर एक स्टेशन जमिनीवर आहे. प्रत्येक स्टेशनला फक्त २५० मिटर लांब व २२ मीटर रुंद इतकीच जागा जमिनीवर लागते तर बाकी जमिनीखालीच व विना किंमतीची असते. मेट्रो ३ भुयारी मार्ग एकूण ३३ किमी लांबीचा आहे. मेट्रो ३ मुळे दररोज १७ लाख प्रवाश्याचा प्रवास होणार आहे त्यामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बनडायॲाक्साईड वातावरणात विसर्जित होणार नाही आणि परिणामी पर्यावरणात होणारे वायू प्रदूषण थांबेल. या ३३ किमी लांबीच्या भुयारी मेट्रोमुळे दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई अगदी जवळ येणार आहेत तसेच या बांधकामाला स्टेशन व्यतिरिक्त कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री करावी लागणार नाही तसेच बांधकाम चालू असताना मुंबईकरांच्या कोणत्याही दैनंदिन क्रियाकलापास तीळमात्र देखील अडथळा होत नाही त्यामुळे इतर प्रकल्पाच्या तुलनेत भुयारी प्रकल्प बांधकामासाठी कमी वेळ लागतो आणि तो भुयारी मेट्रो प्रकल्प लोकसेवेत त्वरित दाखल होऊ शकतो म्हणून भुयारी मार्ग तंत्रज्ञान हे स्थापत्य अभियांत्रिकीचे अद्भुतशास्र शहरी विकासाला मिळालेले वरदानच आहे.

मुंबई महानगरपालिकेचा ६३०१ कोटीचा मुलूंड गोरेगाव जोड रस्ता , मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा १४४०० कोटीचा ठाणे बोरीवली भुयारी मार्गासहित जोड रस्ता व मुंबई मेट्रो रेल महामंडळाचा २३१३६ कोटीचा मेट्रो ३ हे तिन्ही भुयारी प्रकल्प मुंबई महानगराच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासात पुढील पंचवार्षिक विकासास शत प्रतिशत हातभार लावतील म्हणूनच भुयारी मार्ग हे अति दाटीवाटीच्या महानगराच्या विकासास वरदान ठरतील ही मात्र काळ्या दगडावरची रेषा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading