महाराष्ट्रामध्ये बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. महाराष्ट्रात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्यांना अवलंबून राहावे लागते. व्यापारी हे बियाणे राज्यात आणून वेगवेगळ्या नावांनी शेतकर्यांना विक्री करतात. बियाणे प्रमाणित आहे किंवा नाही याचीही कल्पना येत नाही. बियाणे विक्रीभावातही बराच चढ-उतार असतो. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून या पिकाची लागवड केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.
बटाटा बेणे व बेणे प्रक्रिया –
बटाटा बेणे हे प्रमाणित कीड व रोगमुक्त असावे. शक्यतो बटाटा बेणे हे सरकारी यंत्रणेकडूनच खात्रीशीर असे पायाभूत (फाऊंडेशन) किंवा सत्यप्रत असलेले वापरावे, किंवा राष्ट्रीय बीज निगम (नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्रतिनिधींकडून आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. शीतगृहात बटाटा बेणे ठेवलेले असल्यामुळे ते लागवडीपूर्वी ७-८ दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. बटाटा बेणे 30 ते 40 ग्रॅम वजनाचे व 5 सें.मी. व्यासाचे असावेत.
बटाटा बेणे प्रक्रियेसाठी, रसशोषण करणार्या किडींसाठी लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड 200 एस.एल. 5 मिनिटे बुडवून घ्यावे. लागवडीपूर्वी 2-5 किलो अॅझेटोबॅक्टर आणि 500 मिली द्रवरूप अॅझेटोबॅक्टर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून बियाणे 15 मिनिटे बुडवून बीजप्रक्रिया करावी. नंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरून ठेवावे.
लागवडीचा हंगाम –
हंगाम लागवडीची वेळ — काढणीची वेळ
खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा — सप्टेंबर-ऑक्टोबर
रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा — फेब्रुवारी-मार्च
खत व्यवस्थापन –
बटाटा पिकास लागवडीपूर्वी 3 ते 4 टन प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत द्यावे. पिकास 60 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति एकरी द्यावे. यामध्ये लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा, तर पालाश आणि स्फुरदाची पूर्ण मात्र द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देताना द्यावी.
पाणी व्यवस्थापन –
बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. बटाट्यास पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदुराप्रमाणे 50 ते 60 सें.मी. एवढी आहे. सरी वरंबा पद्धतीने रानबांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पादन जास्त मिळते. लागवडीनंतरचे हलके (आंबवणी) पाणी द्यावे. नंतर 5-6 दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी वरंबा 2/3 उंचीपर्यंत भिजेल अशा पद्धतीने द्यावे.
पीकवाढीच्या संवेदनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते, अन्यथा पीक उत्पादनात लक्षणीय घट येते. बटाटा या पिकाच्या तीन संवेदनक्षम अवस्था पुढीलप्रमाणे आहेत :
1) रोपावस्था – ही अवस्था लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी येते. या वेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही.
2) स्टोलोनायझेशन – या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते. ही अवस्था लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी येते. या अवस्थेस पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खूपच कमी येते.
3) बटाटे मोठे होण्याची अवस्था – ही अवस्था लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेस पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात. परिणामी, उत्पादन घटते.
तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब –
अवर्षणप्रवण क्षेत्रांतील मध्यम खोल जमिनीत बटाट्याच्या अधिक उत्पादनाकरता व अधिक नफा मिळवण्याकरता रब्बी बटाट्याची लागवड तुषार सिंचनाखाली करावी. याकरिता तुषार सिंचनाद्वारे 25 मि.मि. पाणी बाष्पीभवन झाल्यावर (5-8 दिवसांनी) 35 मि. मी. पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. या पद्धतीमुळे आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे पिकाची वाढ जोमदार तर होतेच, तसेच बटाटेदेखील चांगले पोसतात. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत नेहमीच वाफसा राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात व उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत –
बटाटा लागवडीनंतर 5 ते 6 दिवसांनी जमीन वाफश्यावर असताना बटाटा पिकामध्ये उगवणार्या तणांच्या बंदोबस्तासाठी मेट्रीबेंझीन 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात या तणनाशकाची जमिनीवर फवारणी करावी.
लागवडीनंतर साधारणत: 25 ते 30 दिवसांनी बटाटा पिकाच्या वरंब्यास मातीची भर द्यावी. यामुळे बटाट्याचे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते. या वेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच 30 किलो नत्र प्रति एकर द्यावे.
बटाटा काढणी –
काढणीपूर्वी 8 ते 10 दिवस पाणी देऊ नये. बटाटे काढणी पोटॅटो डिगरने करावी. काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावेत. आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.
अधिक माहितीकरिता संपर्क साधावा – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य