स्वच्छ आदर्श गाव हाची राष्ट्राचा पाया
गावात चांगल्या बदलाला सुरूवात होईल. अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृत्ती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च निचताची भावना नष्ट होऊन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल.
बंडोपंत बोढेकर , ग्रामगीताचार्य
गडचिरोली
भ्रमणध्वनी – 9975321682
आपला देश खेड्यांचा आहे. येथे राहणाऱ्या खेडूतांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीत सदोदीत उन्नती होत राहावी, या दृष्टीने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांनी काही महत्त्वाची सूत्रे ग्रामगीतेत सांगितली आहेत. त्यापैकी एक आहे ग्रामशुध्दी. ग्रामशुध्दी अभावी गाव कसे दिसते, याचे सत्य चित्रण मांडताना ते लिहितात ,
कागदी पुस्तकात, काव्यात । खेड्याचे वर्णन दिव्य बहुत ।
परि वस्तूस्थिती पाहता तेथ । क्षणभरीही न राहावे ।। अध्याय १२-२
गावात राहणारे लोक जर सार्वजनिक स्वास्थ्यांप्रती उदासिन झाले आणि केवळ त्यांच्यात उपभोगाची भावना वाढतच गेली तर त्यांचेकडून ग्रामशुध्दीची कामे कसे बरे होणार ? गाव सभोवताल गोदरी वाढून वातावरण दूषित होणारच. रस्त्यावर घाणींचे डबके साचणार. आरोग्याचे प्रश्नही निर्माण होणार. म्हणून ज्या ज्या गावी अशी आरोग्यविषयक गंभीर स्थिती निर्माण झाली असेल त्या गावातील प्रमुखांनी एकत्र येऊन गांभीर्यपूर्वक यावर विचार करावा. ग्रामसफाई रोज व्हावी यादृष्टीने आखणी करावी. ह्या कार्यात गावातील सर्व महिला, पुरूष, तसेच ग्राम पंचायतीचे पदाधिकारी मंडळींनी स्वयंस्फुर्त सहभागी व्हावे. घरातले पाणी रस्त्यावर जाऊ नये म्हणून घरोघरी शोषखड्डे करावे. नाले स्वच्छ करावेत , रस्त्यावर पडलेले काच, कचरा, गोबर, पडलेले काटे, खिळे उचलून घ्यावे. जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायास इजा होणार नाही. गावाची दुरावस्था रोखण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या कार्यात अंतर पडू देऊ नये.
स्वच्छ आदर्श गाव हा राष्ट्राचा पाया असून ते घडवून आणण्यासाठी बुध्दीवादी मंडळीनी विशेषतः खेड्याकडे लक्ष दिले पाहिजे . कारण गावातले लोक अनुकरणशील असतात. पण अलिकडे खेड्यातूनच शिकून मोठे झालेले लोक धंदा नोकरीच्या निमित्ताने शहरात जाऊन स्थायिक होतात. आणि पुढेपुढे त्यांचा गावाशी असलेला संपर्क तुटतो. हा तुटलेला संपर्क परत जोडून
त्यांचे सहयोग घेत ग्रामशुध्दीचे काम निरंतर सुरू ठेवले पाहिजेत. श्रमदानाचे सप्ताह घेऊन रस्ते दुरूस्तीचे कामे केली गेली पाहिजेत. गावातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजेत.
महाराजांनी ह्या कार्यास गती यावी याकरिता ग्रामगीतेच्या बारावा अध्यायात रामधूनची परंपरा सुचविली. आपल्या महान परंपरेचा धागा तुटू न देता ग्रामजीवनाची पुनर्घटना साधण्यासाठी सकाळची रामधून आहे. रामधूनचा जणूकाही “ड्राफ्ट ” च त्यांनी विस्तृतपणे बाराव्या अध्यायात विषद केलेला आहे.
मित्रहो , रामधून नाही आजची ।
ही आहे परंपरा प्रदक्षिणेची ।
प्रदक्षिणेत योजना होते कार्याची ।
तीच आहे रामधून ।। १२-४६
पूर्वी दिंड्या पालखीची पध्दत होती . त्या काळातल्या साधु संतानी सुरू केलेली ही पध्दत गावाला स्वच्छ व निर्मळ बनविण्यासाठीच केलेली होती. कालपरत्वे हे तत्व मागे पडून केवळ दिंड्या काढणे सुरू झाले आणि रस्ते अस्वच्छ राहु लागले. म्हणूनच सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ” रामधून ” चा कृती कार्यक्रम देत ग्रामनिष्ठेचा विचार रूजविला.
म्हणोनीच काढली रामधून ।
व्हावयासी गावाचे पुनर्निमाण ।
सेवा मंडळ संस्थेतून ।
उदय केला कार्याचा ।। ग्रा.अ.१२-४५
वास्तविक रामधून म्हणजे ग्राम निरीक्षणाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. गावाच्या स्वच्छतेचे ते एक महत्त्वाचे नियोजन आहे. गावाच्या श्रमदानातून स्वच्छतेचे काम पूर्णत्वास जावे ही योजना आहे. म्हणून रामधूनच्या साप्ताहिक दिंडीत गावच्या सर्वांनीच सहभागी व्हावे. जेणेकरून समस्यांचे आकलन तात्काळ होऊन त्यावर योग्य उपाय काढता येईल. छोट्या मोठ्या कामासाठी उगीच ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्याची गरजच भासणार नाही.
रामधून निघण्यापूर्वी प्रत्येकांनी रस्ते झाडून सडासंमार्जन करावे. रांगोळी, साधुसंताचे फोटो ठेवून सुंदर आम्रतोरण बांधले जावे. अंगणात स्वच्छतेच्या साधनांचे, श्रमाचे प्रदर्शन केले जावे. रामधून काढतांना दोन दोनच्या रांगा तयार करण्यात याव्या. त्यातून ग्राम शिस्तीचे प्रदर्शन घडावे. स्वच्छ शुभ्र गणवेष घातलेले सेवक रांगेत राष्ट्रभक्तीची गीते गात, जयघोष करत जनजागृती करावी.
या परंपरेने घरोघरी सौंदर्य दृष्टी विकसित होईल. राष्ट्रसंताच्या भजनांचा मानवी मनावर परिणाम होऊन गावात चांगल्या बदलाला सुरूवात होईल. अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृत्ती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च निचताची भावना नष्ट होऊन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. अश्या प्रकारची रामधून श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे कवडसी ( डाक ), मदनापूर, पिंपळनेरी, गोंदोडा, अंतरगाव ( सिंदेवाही ) अशा अनेक गावांत दर गुरूवारी रामधून काढली जात असे. कोरोना काळात बंद पडली आहे, ती परत सुरू केली गेली पाहिजेत. विशेष म्हणजे ज्या गावांनी शासनातर्फे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि राज्यस्तरीय विजेते ठरले त्या गावात तर रोजच रामधून काढून जनजागृती केली गेली होती आणि त्यामुळे श्रमदानाच्या कार्यास गती आली होती.
रामधून संदर्भात एक गोष्ट मला ऐकायला मिळाली. एक गावातील महिला मला सांंगत होती की, ” रामधून मुळे आज मी जिवंत आहे. मी आणि माझे पती एकदा आजारी पडले होते. बाहेरगावी दवाखान्यात जाण्यासाठी घरी पैसे नव्हते. त्याच दिवशी घरासमोरून सकाळी रामधून भजन गात पुढे जात होती. कुणाच्या तरी लक्षात आले की घरासमोरील रस्ता स्वच्छ केला नाही, म्हणून एकाने आम्हाला आवाज दिला.आम्ही दोघेही आजारी असल्याने उठू शकलो नाही. रामधून च्या कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून आम्हा दोघांनाही दवाखान्यात दाखल केले आणि आमचा जीवा वाचला.”
रामधून ची ही ” सेवाकार्याची ” ही दुसरी बाजू तितकीच मंगलमय आहे. ही मंगलमय योजना गावागावात सुरू व्हावी, गलिच्छता दूर करण्याची ” धून ” प्रत्येकांस लागावी. यातच ग्रामनाथांचे भले आहे.
रामधूनची ऐका रीती ।
आधी करा ग्रामशुध्दी ती ।
जेणे स्नान घडे गावाप्रती ।
आरोग्यदायी ।।अ. १२-७७
प्रत्येक व्यक्तीचा विकास समुदायात क्रमाक्रमाने होत असतो आणि समुदायाकडून त्यास सुरक्षितता, आधार आणि त्याच्या कार्याचा सन्मानही मिळत असतो. म्हणून व्यष्टी ते समेष्टी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामस्थांद्वारा संत बोधावर आधारित विवेकनिष्ठ तत्त्वविचार प्रणाली अंमलात आणली गेली पाहिजेत. ग्रामसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अखिल विश्वाच्या सुधारणेचा विचार करण्याऐवजी किमान आपले गाव सुखी करण्यासाठी गावातील सुजान कार्यकर्त्यांनी पुढे झाले पाहिजे. जनजागृतीचे सूत्र हाती घेऊन कार्यास लागले पाहिजे.
ग्रामगीतेत सांगितलेली –
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा ।
झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा ।।
ही भावना विकसित केली पाहिजे. गाव म्हटला की , सर्व प्रकारचे लोक गावात असतात. त्यापैकी काही लोक चांगल्या कामाचे अनुकरण करणारे असतात. नित्यनियमाने सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव पडला की, ते शुध्द भावनेने काम करण्यासाठी निश्चितपणे मदत करतात.
मात्र गावाचे आजचे चित्र तेवढे सुखावह दिसत नाही. पूर्वी गावात दिसणारी ग्रामवासियांची एकी , आत्मियता , सहयोगवृत्ती अलिकडे कुठे बरे निघून गेली असेल ?. गावात तेव्हा फारसे न शिकलेले लोक एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा लग्नप्रसंगी एकत्र येत असत. गावातल्या कोणत्याही घरचे लग्न असो, तो लग्न सोहळा प्रत्येकांस आपल्या घरचा वाटत असे. लोक चौकाचौकात बसून पत्रावळी शिवून देत असे. समुदायाच्या सहयोगाने लग्न घरचा मंडप उभा करीत असे. स्रिया आनंदाने स्वयंपाक कामात मदत करीत असे. युवा वर्ग पंगती वाढण्याचे काम आवडीने करीत असे, गावात येणारे पाहुणे आपला गाव पाहिल म्हणून स्वच्छतेची कामे मिळून मिसळून करीत असे. त्यामुळे विवाह सोहळ्याचे आयोजक परिवारास एकूणच मोठे मानसिक बळ मिळत असे.
अलिकडे मात्र शहरी संस्कृतीने ग्राम संस्कृतीत बरीच घुसखोरी केल्याने गावात होणारे विवाह सोहळे आता खर्चीक होऊ लागले आहे. आता अनेक शेतीपयोगी वस्तू शहरातून आपण आणतो. गावात तयार केलेल्या वस्तू न घेता शहरातून वस्तू विकत घेऊन येतो. पर्यायाने गावातला कारागीर रिकामा झाल्याने तो गाव सोडून निघून जातो. एकंदरीत एकेकाळी स्वावलंबी राहणारा, एकमेकांसाठी धावणारा गाव आता परावलंबी आणि आत्मकेंद्रीत झाल्याचे दिसून येते. शहरातून वस्तू आणून गावात सोहळे साजरे केल्याने गावागाड्यातला व्यवहार थांबला. एकमेकांविषयीची आपुलकी कमी झाली. गावातला लोकांचा स्थानिक आयोजनात सहभाग कमी झाल्याने खर्च वाढला. कार्यक्रमात कृत्रिमता आल्याने संवाद संपला आणि यामुळेच गावात एकमेकांविषयीचा विश्वास कमी झाला असल्याचे दिसून येते.
स्वच्छता आणि पवित्रता । शुध्दता आणि नैसर्गिकता ।
गावचे उद्योग मागासले । त्यास शिक्षणाने पुन्हा उजळीले ।
ऐसे असावे सुधारले । गाव आमुचे ।। ग्रा.अ. १८
यापध्दतीने गावातच छोटी मोठी उद्योग, व्यवसाय सुरू झाल्यास एकमेकांची गरज गावातच पूर्ण होईल. यातूनच ग्रामाला संजीवनी मिळून सहयोग, समन्वयवादी वातावरण निर्मितीसाठी मदत होईल. याकरिता गावातील प्रमुखांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी विवाह सोहळे साध्या पध्दतीने कमी खर्चात, कमी अतिथींच्या उपस्थितीत केले पाहिजेत. गावातल्या कारागीरांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले तर ते गाव सोडून जाणार नाही आणि आपणही परावलंबी होणार नाही. गावातच खरी शांती मिळेल.
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या चिंतनसृष्टीचा केंद्रबिंदू गाव आहे, गावातला सामान्य माणूस आहे. ग्रामजीवनात आलेल्या विकृत विपथगामी प्रवाहात अडकलेल्या समाजमनाला आत्मियतेच्या धाग्याने जोडण्याची दृष्टी त्यांनी आपल्या तत्त्वविचारांनी दिली आहे. लोकसहभागातून ग्रामजीवन सुंदर करण्याचा विचार दिला. ग्रामगीतेला अपेक्षित वातावरण आदिवासी प्रांतात विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात मी एका गावात पाहिले आहे की, तेथे ज्यांच्या घरी लग्नप्रसंग होते, त्यांच्या घरी गावातील प्रत्येक कुटुंबातून मदत किलोभर अन्नधान्य, तेल, मीठ यासारखे पदार्थ जमा केले होते. सर्वांनी मिळून गावातील साधन सामुग्रीचा उपयोग करत थोडक्यात लग्न सभारंभ गावातच आटोपून घेतला होता. गाव सामुदायिक पध्दतीने स्वच्छ व सुंदर ठेवला होता.
तसेच ज्यावेळी गावात गरज पडते तेव्हा तेव्हा शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता आपल्या गावांचे संरक्षण आपणच करतात. अशा उत्स्फुर्तपणे तयार होणाऱ्या ग्रामसंरक्षण दलाच्या निर्मितीमुळे गावात रात्रीला होणारी घरफोडी, चोरी ,अवैध कामे याला आळा बसतो. गरज पडेल तेव्हा ते शासनाच्या गृह विभागाचे सहकार्य घेतात. आपल्या गावाचे रक्षण आम्ही करू, गावातले तंटे गावातच सामोपचराने मिटवू या भावनेने ते काम करतात.
अश्या पध्दतीने काम झाल्यास शासकीय यंत्रणेला मोठा सहयोग मिळेल आणि गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहिल. गरज पडेल तेव्हा धावून जाणारी गाव संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारी सेवाभावी युवकांची चमू गावागावात राष्ट्रसंताच्या ग्रामनिर्माण कार्यानी भारली जावीत.
यानेच गाव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश ।
मानव समाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ग्रामगीता ।।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.