अर्जुनाला गीतेचे तत्त्वज्ञान समजत आहे. तो ते घेण्यासही उत्सुक आहे. तरीही भगवंत त्याची अधूनमधून परिक्षा घेऊन त्याची चाचपणी करत आहेत. त्याला हा विषय किती समजला आहे याचा आढावा घेत आहेत. तो खरचं पुढचे शिकण्यास पात्र आहे की नाही हे भगवंत तपासून पाहात आहेत. शिकवताना थोडे शिकवल्यानंतर अधूनमधून शिकणाऱ्यांची इच्छाही जाणून घ्यायला हवी
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल -९०११०८७४०६
आतां तूं ययावरी । निके हे निर्धारी ।
निर्धारूनि करी । आवडे तैसे ।। १३३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – याचाच चांगल्यारीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला योग्य दिसेल तसें कर.
एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तरच ती आपण शिकू शकतो. अन्यथा ती गोष्ट कधीच आपणाला जमत नाही. जबरदस्तीने कोणतीही गोष्ट शिकवता येत नाही. अन् शिकल्या गेल्या तरी त्याचा योग्य वापर होईल याची शाश्वतीही देता येत नाही. जी गोष्ट आपण शिकणार आहोत त्याचे महत्त्व यासाठीच आपण प्रथम समजून घ्यायला हवे. शिक्षणाचे महत्त्व पटले तर ते शिकू शकतात. महत्त्व पटल्यानंतर लोक शिक्षणाकडे वळले. वाचाल तर वाचाल याचे महत्त्व समजल्यानंतरच लोक वाचायला लागले. शिकायला लागले. आता सर्वच जण शिकलेले आहेत. शिक्षणापासून वंचित राहाणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. साक्षरतेचे महत्त्व पटल्यानंतर लोक साक्षर झाले.
आवड असेल तर सवड आपोआपच मिळते. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो. यासाठीच विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी शोधून त्यातील त्यांचे गुण विकसित करण्याची पद्धती काही शिक्षण संस्थांनी विकसित केली आहे. गुणवत्ता पाहून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात पारंगत केले जाते. त्यातच त्यांचे करिअर घडवले जाते. अशातूनच अनेक महान व्यक्तीमत्त्व उदयाला येत आहेत. विद्यार्थ्यांचे कल पाहून त्यांना त्यात पारंगत करण्याची संधी द्यायला हवी. यावर काम होणे गरजेचे आहे.
अध्यात्म शास्त्र हे सुद्धा आवड असेल तरच ते आत्मसात होऊ शकते. अन्यथा या शास्त्राचा काहीच उपयोग होत नाही. यावरूनच एक म्हणही प्रचलित आहे. गाढवासमोर वाचली गीता अन् कालचा गोंधळ बरा होता. आवड नसणाऱ्या माणसाला गीतेचे महत्त्व सांगून काय उपयोग. तो कधीही गीताशास्त्राची ओळखही करून घेणार नाही. त्याची रुचीच त्यात नसते. गोष्ट समजावून सांगूनही लगेचच ती रुचेल असेही होत नाही. अशावेळी गोष्ट सांगून तुम्हाला वाटते ते करा असे म्हणून त्यांच्यावरच निर्णय सोपवायला हवा. योग्य वाटते ते करा असे सांगून निर्णय घेण्याची संधी त्यांना दिल्यास त्यांची विचार करण्याची वृत्ती विकसित होऊ शकते. मानसिकता झाली तरच ती गोष्ट आत्मसात होऊ शकेल.
प्रत्यक्षात परिस्थितीच माणसाला घडवत असते. सर्व सुविधांनी युक्त अशा वातावरणात वाढलेला मुलगा शिक्षणामध्ये मागे पडल्याचेही पाहायला मिळते अन् सविधा नसूनही फक्त शिक्षणाची आवड अन् गरज ओळखून कष्ट झेलणारा विद्यार्थी शिक्षणात मोठी प्रगती केल्याचेही पाहायला मिळते. असे घडतेच कसे ? कारण परिस्थितीची जाणीव त्या मुलाला झालेली असते. शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेले असते. दुसऱ्या अन्य पर्याय उपलब्ध नसल्यानेही त्याला त्यातच प्रगती करणे गरजेचे असते. परिस्थितीच त्याला घडवते.
अर्जुनाला गीतेचे तत्त्वज्ञान समजत आहे. तो ते घेण्यासही उत्सुक आहे. तरीही भगवंत त्याची अधूनमधून परिक्षा घेऊन त्याची चाचपणी करत आहेत. त्याला हा विषय किती समजला आहे याचा आढावा घेत आहेत. तो खरचं पुढचे शिकण्यास पात्र आहे की नाही हे भगवंत तपासून पाहात आहेत. शिकवताना थोडे शिकवल्यानंतर अधूनमधून शिकणाऱ्यांची इच्छाही जाणून घ्यायला हवी. त्यांना तो विषय समजत आहे की नाही हे तपासायला हवे व मगच पुढे जायला हवे. एका सुरात व्याख्यान देऊन घडा कधीच भरत नाही अशी परिस्थिती होते. अधूनमधून श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांना या विषयात रस किती आहे हे तपासायला हवे.
शिकवताना या गोष्टी निश्चितच विचारात घ्यायला हव्यात. प्रगती पाहून त्यानुसार शिकवण्याच्या पद्धतीमध्ये योग्य ते बदल करायला हवेत. विद्यार्थ्यांना तो विषय अवघड वाटणार नाही यासाठी या गोष्टी निश्चितच तपासायला हव्यात. शिकणाऱ्यालाही ते शास्त्र रुचकर वाटायला हवे. त्यात गोडी वाटायला हवी. नाहीतर सांगणारा सांगत राहातो अन् ऐकणारा वेगळ्याच विचारात भरकटत राहातो. अशाने दोघांचेही श्रम व्यर्थ जाऊ शकतात. शिकणाऱ्याला सक्ती न करता यासाठीच शिकवायला हवे. त्याची आवडनिवड पाहूनच त्याला शिकवले तरच तो उत्तम प्रकारे प्रगती करू शकतो. त्या गोष्टी तो निश्चितच आत्मसात करू शकतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.