May 18, 2024
book-review-of-sharad-bavaskar-bhura
Home » भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र

“भुरा”मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा वेध घेतो. थोरामोठ्यांच्या विचारधनातून आणि आपल्या स्वतःच्या तत्वचिंतनातून समाजातील विषमतेचे विश्लेषण करतो. त्याची कारणमीमांसा धुंडाळतो.

🌾 सॅबी परेरा 🌾

भुरा पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/44izM1j

धुळे जिल्ह्यातल्या रावेर या गावात राहणारा, दहावीला इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा नावाचा एक मुलगा आपल्या जिद्दीच्या, बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करतो. त्या जिद्दी, मेहनती आणि बुद्धिमान मुलाची , “भुरा” ही लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आत्मकथा आहे. या कथेचे नायक असलेले डॉक्टर शरद बाविस्कर हे ‘भाषा’ विषयाचे संशोधक तसेच तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्राचाचे अभ्यासक असून ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) फ्रेंच भाषा व साहित्याचे प्राध्यापक आहेत. त्यांनी युरोपातल्या विविध विद्यापीठांतून पाच पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या असून तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विविध राजकीय विचारप्रणालीचे प्रेरणास्रोत हा देखील त्यांच्या चिंतनाचा भाग आहे.

‘झिजून मरा पण थिजुन मरू नका’ हा आयुष्याचा मूलमंत्र देणारी, औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत अल्पशिक्षित परंतु आयुष्याकडून खूप काही शिकलेली आई हे भुराचं प्रेरणास्थान आहे. जेव्हा जेव्हा हा भुरा आयुष्याच्या तिठ्यावर थिजून उभा राहिला तेव्हा त्याला मार्गी लावण्याचं आणि त्यासाठी ऊर्जा पुरविण्याचं काम त्याच्या आईने आणि तिच्या अस्सल ग्रामीण अनुभवातून आलेल्या शहाणिवेने केलेलं आहे.

आपला आजवरचा अनुभव असा आहे की, बहुतांश आत्मचरित्रे ही, आयुष्यात आपल्या वाट्याला कसे खूप दारिद्र्य, कष्ट, यातना आणि अवहेलना आली आणि आपण त्यावर मात करून आजचे हे यश मिळविले याबद्दल कथानायकाने केलेली आत्मस्तुती, यातच रमणारी असतात. “भुरा”मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा वेध घेतो. थोरामोठ्यांच्या विचारधनातून आणि आपल्या स्वतःच्या तत्वचिंतनातून समाजातील विषमतेचे विश्लेषण करतो. त्याची कारणमीमांसा धुंडाळतो. तत्त्वचिंतन करतानाही त्याचं आजूबाजूचं भान सुटत नाही, जिथून आपण आलो ते वास्तव तो विसरत नाही. युरोपात जायला त्याला मोठ्या रकमेची स्कॉलरशिप मिळते त्या क्षणी हुरळून जाण्याऐवजी अगदी थोड्या दिवसांपूर्वीच आपल्या आईला, बहिणीच्या लग्नासाठी नगण्य किमतीत आपली जमीन विकावी लागल्याचं शल्य त्याच्या मनाला टोचतं.

शाळेत शिकताना लेखकाला शेतमजुरी करावी लागली, दगडांच्या खाणीत काम करावे लागले, क्रेनवर हेल्पर म्हणून राबावे लागले. गरिबीमुळे अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले, अवहेलना आणि अपमान झेलावे लागले. पण हे सगळं कथन करताना त्यात एक प्रकारची तटस्थता आहे. हे सगळं भोगणारे आपण एकटेच नसून आपल्यासारखे इतरही खूप लोक असल्याची जाण आहे. या कथनात कुठेही भावनाविवशता नाही की वाचकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नाही.

लहानपणीच्या या अनुभवांनी लेखकाला अंतर्मुख केलं. आपल्या आजूबाजूला आपल्याला उमेद देणाऱ्यांपेक्षा आपलं खच्चीकरण करणारेच जास्त आहेत. त्यांच्यात राहून, त्यांच्याशी बोलून वैफल्य आणि निराशा पदरी पाडून घेण्यापेक्षा स्वतःशी आणि निसर्गाशी संवाद साधणे हे लेखकाला जास्त श्रेयस्कर वाटले.

भुरा पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/44izM1j

“जे आपल्या पकडीत येत नाही त्याला चहुबाजूने घेरावं लागते” हे आपल्या आईचे बोल मनावर घेऊन त्याने आपल्याला वाकुल्या दाखविणाऱ्या इंग्रजीला घेरून संपूर्ण डिक्शनरीच पाठ करून टाकली. इंग्रजीवर मांड ठोकल्यावर त्याला एक आत्मविश्वास आला. तो आत्मविश्वास त्याने पुढे कधी गमावला नाही, कष्ट करण्याची तयारी कधी त्यागली नाही आणि आपल्या आयुष्याचे ध्येय त्याने कधीही नजरेआड होऊ दिले नाही.

आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्या भौगलिक आणि आंतरिक कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आवश्यक आहे हे तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्त्व कळल्या आणि पटल्यानंतर लेखकाने लखनौच्या इंग्रजी व परकीय भाषा संस्थेत प्रवेश घेतला. तिथे फ्रेंच भाषेचा हात धरून तो फ्रेंच संस्कृती आणि फ़्रेंच तत्ज्ञानाचा अभ्यास करत फ्रान्सला आणि तिथून युरोपात पोहोचला. अनेक स्कॉलरशिप्स आणि पदव्या पदरी पाडल्या. फ्रेंच तत्त्वज्ञानाच्या प्रेमात असलेल्या लेखकाच्या लक्षात आलं की, आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत ज्या उणिवा आहेत त्यावर मात करण्यासाठी युरोपीय आयुधांपेक्षा आंबेडकर, फुले, तुकाराम इत्यादींनी समृद्ध केलेली भारतीय मातीतील वैचारिक शस्त्रं वापरणं अधिक उपयुक्त ठरेल. म्हणून मग तो युरोपिअन तत्वज्ञानाची भारतीय तत्वज्ञानाशी सांगड घालत भारतात परतला आणि स्वतः ज्या विद्यापीठात शिकला तिथेच म्हणजे JNU मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला.

भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक, भाषिक विविधतेचे मिनी मॉडेल असलेले आणि पुरोगामी, परिवर्तनवादी व प्रबुद्ध भारताचं प्रतीक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उदारमतवादी लोकशाहीचे रूप पुढे पुढे राजकीय हस्तक्षेपामुळे कसे बेंगरूळ होऊ लागले आहे याचे काही नेमक्या प्रसंगातून आणि वस्तुनिष्ठ निवेदनातून लेखकाने बोलके चित्र उभे केले आहे.

या प्रवासातील विविध टप्प्यांवर आलेले अनुभव, त्या त्या वेळी लेखकाच्या मनात वाहणारे विचारांचे वारे आणि या सर्व प्रसंगी वस्तुनिष्ठ विचार करून लेखकाने आपल्या आयुष्याचा कधीही ढळू न दिलेला फोकस हे सारं मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लेखकाचा आरपार प्रामाणिकपणा आणि छोट्या मोठ्या व्यक्तिगत अनुभवांना दिलेले व्यापक चिंतनाचे अस्तर हा ‘भुरा’ या आत्मकथनाचा प्राण आहे. जीवनाकडे तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने पहात मूलभूत चिंतन करायला भाग पाडणारा हा जीवन प्रवास वाचनीय आणि प्रेरणादायी आहे.

भुरा पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/44izM1j

Related posts

समई मानवतेची…

अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

Neettu Talks : परफ्युम निवडताना…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406