बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते, पण आत्मज्ञान पूर्वी होते, आताही आहे आणि यापुढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 8999732685
कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।। १२९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटें वैगरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते.
आताचे युग हे कलियुग आहे, असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. हे तंत्रज्ञानाच्या युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे, पण या युगालाही अंत आहे. खनिजाचे साठे संपत आहेत. पर्याय शोधले जात आहेत. सौर ऊर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुऊर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील विजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार, यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय ? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पूर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच.
बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते, पण आत्मज्ञान पूर्वी होते, आताही आहे आणि यापुढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. चारही युगांचे एक चक्र आहे. कलियुगानंतर आता कृतयुग येईल. कृतयुग म्हणजे सत्ययुग. मानवतेचे युग. कलियुगात वाढलेले अत्याचार, वाढलेले तापमान थंड करण्यासाठी सत्ययुगाचा प्रारंभ आता जवळ येऊ लागला आहे. युगानुसार त्यानुसार ज्ञानही बदलत राहते, पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे तेच शाश्वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी.
सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे. युगाचे चक्रही सतत सुरु आहे. तशी ही ज्ञान दानाची परंपराही सुरुच आहे. धर्माच्या रक्षणासाठी सत्याचा जागर हा होतच असतो. तो कशा रुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. पण प्रकट होतोच. सत्य मेव जयते. नेहमीच सत्याचा विजय होतो. कितीही खोटे सांगून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे प्रकट होतेच. यासाठीच सत्याच्या मार्गाने चालायला हवे. सत्य नेहमीच आपणास प्रेरणा देत राहाते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.