जगात वावरणारा प्रत्येक मानव हा वेगवेगळा आहे. पण त्यांच्यामध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे. हे एकतत्व समजून घेण्याची गरज आहे. हे समजण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी सुरूवात स्वतःपासून करावी लागते. हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. स्वतःला याची अनुभूती होईल, तेव्हाच हे सर्व विश्व त्याच्यात सामावलेले आहे अशी अनुभूती येईल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
हां गा एकेचि हेहीं । काय अनारिसे अवयव नाही ।
तेवी विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ।। 118 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, एकाच देहामध्यें निरनिराळे ( भिन्न आकारांचे ) अवयव नाहीत काय? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असें समज.
एकाच हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तर एकाच पायाची पाचही बोटेही सारखी नसतात. एकाच शरीरात हे वैविध्य पाहायला मिळते. सृष्टीचा हा नियम विचारात घेण्यासारखा आहे. झाडाला येणारी फळेही वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यांची गोडीही एकसारखी नसते. एकाच झाडावरील फळात हा फरक पाहायला मिळतो. इतकेच काय प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसेही वेगवेगळे असतात. एकसारखे ठसे असणारी व्यक्तीही पाहायला मिळत नाहीत. वैविध्य हा सृष्टीचा गुणधर्म आहे. आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार अन्य फळे त्या झाडाला लागणार नाहीत. म्हणजे त्याचे गुणधर्म हे निश्चित आहेत. गुणसुत्रे ही एकच आहेत. या विश्वात प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली पाहायला मिळते.
पण एक आहे. एकाच प्रकारच्या व्यक्ती कधी एकत्र आल्या तर निश्चित प्रगती होईल असे कधीही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे त्या सर्वाधिक काळ एकत्र राहीलेले पाहायला मिळत नाही. अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन एका राजकिय पक्षाची स्थापना केली. तज्ज्ञ व्यक्ती राजकारणात उतरल्याने त्यांना लोकमतही प्राप्त झाले. स्पष्ट बहुमताने त्यांनी सत्ताही मिळवली. पण सत्ता स्थापनेनंतर त्यांच्यात सुरु झालेला संघर्ष अखेर काही महिन्यातच त्यांना रस्त्यावर आणून सोडला. विद्वांनांची सत्ता विदवत्तेसह कोलमडली. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की एकाच प्रकारच्या व्यक्ती एकत्र आल्यास काहीच प्रगती होत नाही. हा सृष्टीचा नियम विचारात घेण्यासारखा आहे.
वीजेची निर्मिती कशी होते ? दोन विविध भार जेव्हा एकत्र येतात तेव्हाच दिवा लागतो. ऋण आणि धन भार म्हणजे वजा आणि अधिक भार एकत्र आल्यावरच प्रकाश पडतो. ही आवश्यक असणारी स्थिती विचारात घेण्याची गरज आहे. सृष्टीचे नियम हे वैविधतेने नटलेले आहेत. वैविधतेने भरलेले हे विश्व विचारात घ्यायला हवे. पण विचित्र विश्वाचे सूत्र मात्र एकच आहे हे जाणून घ्यायला हवे. सूर्यापासून या विश्वाची उत्पत्ती झाली आणि हे त्या सूर्यातच सामावरणार आहे हे जाणून घ्यायला हवे.
जगात वावरणारा प्रत्येक मानव हा वेगवेगळा आहे. पण त्यांच्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे. हे एकतत्व समजून घेण्याची गरज आहे. हे समजण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी सुरूवात स्वतःपासून करावी लागते हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. स्वतःला याची अनुभूती होईल तेव्हा हे सर्व विश्व त्याच्यात सामावलेले आहे अशी अनुभूती होईल. संपूर्ण विश्वात तो सामावलेला आहे याची अनुभूती येईल. विश्वाच्या या नियमाची अनुभूती घेऊन आपण विश्वस्वरूप व्हायचे आहे.