आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा ठरत नाही. शाकाहारी विचार त्यामध्ये नसला तरी ती चांगल्याच्या रक्षणासाठी असल्याने त्याने धर्म भ्रष्ट होत नाही. काहीजण उपवासाच्या दिवशी औषधे घेत नाहीत. पण ते चुकीचे आहे. धर्म हा कृतीवर ठरतो. चांगल्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे धर्माला अनुसरूनच असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु ।। २२४।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आणि सर्व आर्युर्वेदही अर्जुना याच धोरणाचा आहे. कारण एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.
एकाचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा हा नियम आयुर्वेदातही आहे. काही औषधे ही अशाच पद्धतीने तयार केलेली असतात. मग अशी ही औषधे शाकाहारी कशी म्हणायची? ही अहिंसा कशी म्हणायची? दुसऱ्या जीव घेऊन तिसऱ्याला वाचविणे म्हणजेही हिंसाच आहे, पण ही हिंसा चांगल्याच्या रक्षणासाठी आहे. एखादाला रोग झाला तर रोगाचा जिवाणू हा विषाणू असतो. तो मारणे हे गरजेचे असते. तो मारल्याने हिंसा होत नाही. दुसऱ्या जिवाणूकडून त्या विषाणूला मारणे ही हिंसा नाही. कारण ही गोष्ट चांगल्याच्या रक्षणासाठी आहे.
महाभारतात कृष्ण अर्जुनाला हेच तर सांगत आहे. धर्माच्या रक्षणासाठी अधर्माला, विषाणूला मारणे हाच तर खरा धर्म आहे. पिकामध्ये तण उगवते. ज्वारीच्या पिकात मक्याचे एखादे रोप उगवले तर तेही तणच असते. कारण मुख्यपिक ज्वारी आहे. त्याचे उत्पादन आपण घेत आहोत. यासाठी ज्वारीव्यतिरिक्त त्या शेतामध्ये जे उगवते, ते तणच असते. त्याच्या वाढीने ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी त्याचा नायनाट हा करायलाच हवा.
पिकावर एखादी कीड पडते. ती कीड बऱ्याचदा नियंत्रणात येत नाही. त्याच्या नियंत्रणासाठी तो कीटक खाणारा दुसरा कीटक त्या शेतात सोडण्यात येतो. एका कीटकाकडून दुसऱ्याचे नियंत्रण केले जाते. तसे जीवनचक्रही असेच आहे. लहान प्राणी मोठ्या प्राण्याला खातो आणि जगतो. जगण्यासाठी त्याला दुसऱ्याचा जीव घेणे गरजेचेच असते. नाही खाल्लेतर जगणेही मुश्किल होते. यामुळेच आज वाघ, सिंह आदी हिंस्र पशूंची संख्या कमी झाली आहे. कारण त्यांना पोट भरण्यासाठी दुसरे जीवच मिळेनासे झाले आहेत. कुपोषणामुळे ह्या हिंस्रप्राण्यांचा वंशच नष्ट झाला आहे.
यावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे हिंस्र जीव कमी होत आहेत. तो विचार असणारे फार काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. हा जीवनचक्राचा नियम आहे. हा नियम मानवानेही विचारात घ्यायला हवा. हिंसेच्या विचाराने जगणाऱ्यांचा वंशच शिल्लक राहात नाही. चांगल्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी लढणारेच अमर होतात. त्यांनी जरी हिंसा केली तरी ती चांगल्यासाठी आहे. यामध्ये चांगल्याचा विचार आहे. चांगल्या गोष्टीचे रक्षण त्यात केले जाते. यासाठीच आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा ठरत नाही. शाकाहारी विचार त्यामध्ये नसला तरी ती चांगल्याच्या रक्षणासाठी असल्याने त्याने धर्म भ्रष्ट होत नाही. काहीजण उपवासाच्या दिवशी औषधे घेत नाहीत. पण ते चुकीचे आहे. धर्म हा कृतीवर ठरतो. चांगल्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे धर्माला अनुसरूनच असते.