शोध आणि परिणाम !
संशोधकांनी कोणताही शोध लागल्यानंतर त्या शोधाला तातडीने प्रसिद्धी दिली. त्या शोधाचा मानवाला काय फायदा होणार, हे सांगितले, मात्र त्यातून भविष्यात कोणते प्रश्न निर्माण होणार आहेत, याबद्दल बोलणे अपवादानेच आले. यातून मानवाने केवळ स्वत:चे ऐहिक, भौतिक सुख पाहिले. ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली किंवा प्रश्नाने खूपच भीषण रूप धारण केले, तेव्हा दुष्परिणामांची चर्चा सुरू झाली.
डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पृथ्वीवरील जीवसृष्टिसाठी मानवाने आता दृढसंकल्प करण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. जे गतकाळाचा अभ्यास करून त्याची वर्तमानाची सांगड घालू शकतात, त्यांना भविष्याचा वेध घेण्याची ताकत प्राप्त होते. असे अनेक त्रिकालज्ञानी महामानव असतात. ते त्यांच्या कार्यात मग्न असतात. कारण स्वंयकेंद्री स्वभावाच्या माणसाला अशा विद्वानांच्या मताला किंमत द्यावी वाटत नाही. दरवर्षी बदलत जाणारे निसर्गाचे रूप पाहून, पावसाचे अकाली आणि अवकाळी पडणे, दरवर्षी कडक होत चाललेला उन्हाळा, जेथे वादळ कधी यायचे नाही, त्या भागातील होणारी वादळे, दुष्काळ आणि अतिवृष्टि हे सर्व पाहून आज अनेकजन या अभ्यासकांच्या मताला गांभिर्यांने घेत असल्याचे दर्शवतात. त्यामुळे त्यांची चर्चा होते. विषय सर्वांपर्यंत पोहोचतात. आणि त्यातूनच सुरुवातीपासून जी काळजी मानवाने घेणे आवश्यक होते, त्या बाबीची चर्चा आज सुरू झाली. त्यातूनच आज ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हे शब्द जणू परवलीचे ठरले आहेत.
मानवाने कितीही प्रगती केली तरी त्या प्रगती करण्यामागे स्वत:चे सुख, कष्ट कमी करण्याची भावनाच प्रामुख्याने होती. त्यासाठीच प्रामुख्याने प्रयत्न सुरू आहेत. शोध लागले, यातील अनेक शोध अपघातानेही लागले. मात्र त्या प्रत्येक शोधाचा उपयोग मानवाने स्वत:च्या सुखासाठी, स्वत:च्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केला. त्याचा अतिरेक करत गेला आणि त्यातून आज अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. पूर्वी संशोधक शोध लावत, अनेकजन त्याचा काय उपयोग होणार हेही सांगत. उदाहरणार्थ विल्यम राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध लागताच सांगून टाकले होते, ‘यातून अस्थी उपचार सुकर होतील. अशा रूग्णांच्या वेदना कमी होतील’. मात्र अनेक संशोधक आपले शोध लावत गेले. त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर अन्य लोकांनी केले. त्यातून मानव सुखी झाला, मात्र निसर्ग प्रत्येक क्षणाला एक नवा आघात, सहन करत राहिला. मानवी सुखासाठी निसर्गाची, नैसर्गिक संसाधनांची लयलूट मानवाने केली. परिणाम आज पृथ्वीवर काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा नवा मंत्र भावी संशोधकांच्या, युवा पिढीच्या समोर ठेवला जात आहे.
यात खरेतर दोष संशोधकांचा आहे. संशोधकांनी कोणताही शोध लागल्यानंतर त्या शोधाला तातडीने प्रसिद्धी दिली. त्या शोधाचा मानवाला काय फायदा होणार, हे सांगितले, मात्र त्यातून भविष्यात कोणते प्रश्न निर्माण होणार आहेत, याबद्दल बोलणे अपवादानेच आले. यातून मानवाने केवळ स्वत:चे ऐहिक, भौतिक सुख पाहिले. ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली किंवा प्रश्नाने खूपच भीषण रूप धारण केले, तेव्हा दुष्परिणामांची चर्चा सुरू झाली. पृथ्वीच्या इतर भागात, इतर राष्ट्रात काय झाले, काय घडले, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ‘पुढच्याच ठेच, मागचा शहाणा’, अशी एक सुंदर म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे एखाद्याला असा धक्का बसला तर त्यातून, ‘त्याला बसला आपल्याला काय त्याचे’ अशा भूमिकेत माणूस वागत आला. आता अशा सर्व समस्यांनी जग व्यापायला सुरुवात केली. हा प्रश्न जगभर दिसू लागले आहेत. अशा अनेक शोधांचे सुरुवातीला झालेले कौतुक आणि आज त्यातून निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच क्रांतीकारी शोधांचे आणि त्यासोबत आलेल्या समस्यांचा विचार या लेखमालेत केला जाणार आहे. असा वेगळा विचार मनात येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आज एका नव्या कचऱ्याची समस्या जगाला भेडसावत आहे. तो म्हणजे सौर ऊर्जेसाठी वापरलेल्या आणि आज निरूपयोगी बनलेल्या सौर पॅनेलच्या कचऱ्याचा.
राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकारला निकामी सौर पॅनेलची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने निर्माण झालेल्या समस्यावर नोटीस बजावली आणि उत्तर मागितले आहे. सौर पॅनेल निकामी झाल्यानंतर भंगार विक्रेते केवळ त्यातील ॲल्यमिनियम, तांबे आणि काचेचे घटक घेऊन जातात. मात्र हे पॅनेल बनवताना त्यासाठी कॅडमियम, शिसे यासारखे वापरण्यात आलेल्या जड धातूंचे विलगीकरण त्यांना करणे परवडत नाही. त्यांचे प्रमाणही अत्यल्प असते. असे धातू असलेला कचरा एकत्र कोठेतरी पडतो. अशा कचऱ्यासंदर्भात एका शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीवर हा आदेश झाला आहे. हा आज लक्षात आलेला प्रश्न आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी सरकार विशेष प्रोत्साहन आणि अनुदान देत आहे. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य त्याचा फायदा घेत आहेत. यातून ऊर्जा निर्मिती करताना होणारे प्रदूषण कमी होते यात शंकाच नाही. मात्र त्यानंतर होणारा कचरा जो आहे त्याची योग्य विल्हेवाट केवळ खर्च जास्त येतो म्हणून व्यवस्थित लावली जात नाही.
या घटनेने पहिल्या महायुद्धानंतरचा जपानमधील एक प्रसंग आठवला. मध्य जपानमधील एक सुंदर टेकडी. त्या टेकडीच्या पायथ्याशी एक गाव. गावाची शेती टेकडीच्या पायथ्यापर्यंत होती. गावाचे निसर्गसौंदर्य कोणीही प्रेमात पडावं असे. मात्र या गावातील लोकांना अचानक एका वेगळ्याच समस्येने ग्रासले. गावातील लोक चालताना ‘इटाई, इटाई’ असा सारखा घोष करत. अर्थात गाव जपानमधील. त्यांच्यातील कोणी पंढरीच्या विठूरायाचे भक्त असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे ते विठूमाऊलीचा जप करत नव्हते. सर्व प्रकारच्या चाचण्या, पडताळण्या झाल्या तरी कारण सापडेना. अखेर लोक जे अन्न खात त्याचे पृथ्थकरण करण्यात आले. त्यामध्ये संशोधकांना कॅडमियमचे काही अणू सापडले. भातात कधीच न येणारा घटक कोठून आला, याचा संशोधकांनी शोध घेतला. तेव्हा असे लक्षात आले की टेकडीवर अनेक निरूपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कचऱ्याचा ढीग होता. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर शेतात पसरत होते. तेथून ते भातात आणि भातातून मानवाच्या शरीरात. जपानच्या या उदाहरणावरून जग शहाणे झालेच नाही, उलट इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनतोय.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.