जालन्याला झालेल्या महाचिंतनीच्या २८ व्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंद्रजीत भालेराव यांनी दिलेले व्याख्यान …
महदंबा, मराठी भाषेतील आद्य कवयित्री. मुक्ताबाई आणि जनाबाईच्या कितीतरी आधी जिनं मराठीत धवळे नावाचा ग्रंथ लिहिला. जो मराठीतला अजरामर ग्रंथ समजला जातो. त्या धवळ्याची रचनाकर्ती महदंबा. महादंबा या शब्दाचा अर्थ आहे ‘मोठी माय’ महद् म्हणजे मोठी, अंबा म्हणजे अम्मा म्हणजे आई म्हणजे माय. म्हणून महदंबा या शब्दाचा अर्थ ‘मोठी माय’ असा होतो. तिचे मूळ नाव महदंबा नव्हते. मातापित्याने तिला दिलेले नाव रुपै असे होते. कदाचित ती दिसायला सुंदर असावी. रूपै म्हणजे रूपवान, सुंदर. आपण नाही का अलीकडच्या काळात मुलीचं नाव ठेवतो सुंदर, सुंदराबाई. तसं हे रुपै. पण पुढे चक्रधर स्वामींच्या सहवासात आल्यावर तिची चिकित्सक दृष्टी पाहून चक्रधर स्वामींनी तिला आपल्या परिवारातली कारभारीन, मोठी माय म्हणून महादंबा असे नाव दिले. जगदंबा हे नाव सर्वत्र आहे. पण महदंबा हे नाव मात्र फारसे कुणाला माहीत नसते. हा शब्दही कुणाला फारसा माहीत नसतो. चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला दिलेली ही देण.
तर अशी ही महादंबा. महानुभाव परिवाराची, चक्रधरांच्या सहवासातल्या सर्वांची मोठी माय. कारण ती सतत चक्रधर स्वामींना काहीतरी प्रश्न विचारीत रहायची. म्हणून चक्रधर स्वामी तिच्याविषयी म्हणायचे ‘म्हातारी चर्चक, म्हातारी चिकित्सक, येथ काहीतरी पुसतची असे’ म्हणजे सतत चर्चा करणारी, सतत चिकित्सा करणारी, सतत काहीतरी विचारत राहणारी अशी ही म्हातारी आहे. तिने विचारलेल्या प्रश्नांमुळेच चक्रधर स्वामींनी आपले तत्वज्ञान सांगितले. आपली अनेक सूत्रे तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणूनच चक्रधर स्वामींच्या निरूपणात आलेली आहेत. आपल्या एकांकातल्या सगळ्या लीळा केवळ महदंबेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणून चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच आज त्या उपलब्ध आहेत. म्हणजे महदंबा केवळ धवळ्यांचीच निर्माती नव्हती तर लीळाचरित्र या ग्रंथाची निमित्तकारण देखील होती. जरी लीळाचरित्र म्हाईमभट्टाने लिहिलेले असले तरी त्याला निमित्तकारण महदंबा झालेली आहे. त्यामुळे महदंबेचे मराठी वाङ्मयावर अनंत उपकार आहेत. महदंबेच्या या स्वभावामुळे चक्रधर परिवाराचे नेतृत्व आपोआपच तिच्याकडे आले. आणि म्हणून चक्रधरांनी तिला महदंबा असे नाव दिले. म्हणजे आपल्या परिवाराची मोठी माय. आपण नाही का एखादी चुणूक दाखवणारी मुलगी पाहिली की, ‘अहो मोठी माय’ असं म्हणून तिचा गौरव करतो ? तसंच हे.
महदंबा ही केवळ चक्रधरांच्या परिवाराची मोठी माय नव्हती, तर ती मराठी कवितेची देखील मोठी माय होती. कारण मराठीतली पहिली उपलब्ध कविता म्हणजे महदंबेचे धवळे आहेत. त्या आधीची नोंदवलेली एकही कविता मराठीमध्ये उपलब्ध नाही. धवळे हे कदाचित लोकगीत असावे. वेडीपीसी मूर्ती म्हणून ओळखले जाणारे चक्रधर स्वामींचे आणि पर्यायाने महानुभाव परिवाराचे गुरु गोविंदप्रभू यांना एकदा अचानक लग्न करण्याची इच्छा झाली. ते हट्ट घेऊन बसले, ‘मला लग्न करायचं आहे’. एक स्त्री त्यांच्यासोबत विवाह करायला तयार झाली. गोविंदप्रभूंचा विवाह रचला गेला. त्यावेळी सर्व परिवाराने महदंबेला, ‘तू विवाह गीत म्हण’ अशी विनंती केली. आणि महदंबेने धवळे गाईले. गोविंद प्रभूच्या खोट्या खोट्या विवाहानिमित्त हे धवळे गायले गेलेले आहेत. धवळे हा विवाह गीताचाच प्रकार म्हणायला हरकत नाही. धवल म्हणजे पांढरी बाजू. लग्नात मुलीकडची म्हणजे नवरीकडची बाजू काळी समजली जाते आणि मुलाकडची म्हणजे नवरदेवाकडची बाजू पांढरी, म्हणजे धवल समजली जाते. त्या नवरदेवाच्या बाजूने म्हटली जाणारी गीते म्हणजे धवळे, असाही धवळे या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. गोविंदप्रभू हे नवरदेव होते आणि नवरदेवाच्या बाजूने विवाहात म्हटली जाणारी गाणी म्हणजे धवलगीते, म्हणजे धवळे, असा त्याचा अर्थ होय. म्हणजे गोविंद प्रभूच्या विवाहात महदंबेने पारंपारिक विवाह गीतांच्या धरतीवर उत्स्फूर्तपणे रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाची कथा रचून म्हटली, तेच हे धवळे. तिथून मराठी कवितेची सुरुवात झाली. पुढे अनेकांनी ही श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा मराठीत लिहिली. त्यात प्रत्यक्ष महानुभाव कवी नरेंद्र, वारकरी संत एकनाथ महाराज, पंडित कवी विठ्ठल बिडकर आणि अशा कितीतरी लोकांनी मराठीत रुक्मिणी स्वयंवरे लिहिली. स्वयंवर आख्यानांची एक परंपराच मराठीत रूढ झाली. पण या स्वयंवराख्यानांचा खरा स्रोत आहे तो म्हणजे महादंबेचे धवळे. त्यामुळे महादंबेला मराठी कवितेची ‘मोठी माय’ म्हणायला देखील हरकत नाही.
अशी ही महदंबा मुळात जन्माला आली ती मराठवाड्यात. आठशे वर्षापुर्वी, जालना जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या पुरीपांढरी नावाच्या गावात. एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कुटुंबात. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसला तरी महदंबा ही वडिलांची लाडकी असल्यामुळे पुराण कीर्तन श्रवणातून आणि वडिलांच्या मार्गदर्शनातून तिने बऱ्यापैकी मोठ्या पुराणांचा अभ्यास केलेला होता. वाचन केलेले होते. श्रवण केलेले होते. त्यामुळे तिला स्वतः पुराणकथा सांगता येत असत. तिचे वडील कौतुकाने, ‘आमची रुपै पुराण कथा सांगते’ असे अभिमानाने लोकांना सांगत असत. महदंबेच्या वडिलांचे नाव वायनायक तर चुलते माधवभट्ट. महदंबेचे चुलते कुटुंबाचा कारभार पहायचे. चुलतेच महदंबेची सगळी व्यवस्था पहायचे. महदंबेच्या चुलत्यांना चार आपत्य होती. एक नागदेव, दुसरा सारंगपाणी आणि तिसरा वैजोबा. आणि उमाईसा नावाची एक मुलगी. असा हा संसार सुखाने चाललेला होता. पुढे रूपैचा विवाह झाला आणि सुखाने संसार सुरू झाला. पण अचानक तिच्या पतीचे निधन झाले. वैधव्याची कुऱ्हाड तिच्यावर कोसळली. खूप दुःखी अंतःकरणाने ती माहेरी परत आली आणि आपल्या आईसोबत चुलत्यांकडे राहू लागली.
दरम्यान तिच्या चुलत बहिणीचा उमाईसाचाही विवाह झाला. पण दुर्दैवाने तीही विधवा झाली. या दोन विधवा बहिणी आईसोबत एकत्रित राहू लागल्या. त्यादरम्यान माधवभट्टांचंही निधन झालं आणि घरावर मोठीच आपत्ती कोसळली. या आपत्तीमधून हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या सारंगपाणी या भावाने आपले घर सावरले. तो आपला व्यापार देशोदेशी करू लागला. पण असाच कुठेतरी दूर देशी व्यापाराला गेला असताना तिकडेच त्याची हत्या झाली. पुष्कळ दिवस वाट पाहून घरचे थकले आणि एक दिवस कोणीतरी येऊन वार्ता सांगितली, सारंगपाणीची हत्या करून दरोडेखोरांनी त्याची सगळी संपत्ती लुटली. पुन्हा एकदा सगळे घर दुःखाच्या गर्तेत सापडले. नागदेव वेडापिसा झाला. तोही खरे तर हुशार होता. विद्वान होता. पण त्याने सर्व विद्वत्ता आणि सर्व हुशारी टाकून देऊन आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गुंडगिरी स्वीकारली. नंगी तलवार नाचपत तो गावात फिरू लागला. ‘भावाचे मारेकरी खतम केल्याशिवाय, भावाच्या खुनाचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही’ अशा गर्जना तो करायचा. पण ते दरोडेखोर काही त्याला सापडत नाही. पिसाळलेला नागदेव गावातल्याच लोकांना त्रास देवू लागला. त्यामुळे आधीच दुःखाच्या गर्तेत सापडलेले घर बदनामीच्या गर्तेत सापडले. घरातल्या या तिन्ही विधवा मायलेकी घर सोडून शेजारच्या रावसगावी जाऊन गोदावरीकाठी झोपडी बांधून देवधर्म करण्यात आपले आयुष्य वेचू लागल्या.
त्या काळात विधवा स्त्रियांना काय दुःख भोगावी लागत होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जेमतेम जीव जगवणे एवढेच तेव्हा शक्य होते. नाहीतर पतीच्या सरणावर लोटून तिला बळजबरीने सती जाणे भाग पाडले जायचे. अशा काळात देवाचे नाव घेत त्या तिघी जीवंत होत्या. त्या काळात त्यांना चक्रधरांचे शिष्य रामदेव भेटले. त्यांनी या तीन विधवांना चक्रधर स्वामींविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांच्यासोबत स्त्रिया कशा सुरक्षित असतात, तेही सांगितले. चक्रधरांचे नाव आणि कीर्ती ऐकून त्या विधवांना त्यांचा आधार वाटला. रामदेव त्यांना पुराण सांगू लागले आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालू लागले. पण आपल्या विधवा आई आणि बहिणींसोबत कुणीतरी एक पुराणिक राहतो, हे ऐकून संतापलेल्या नागदेवाने एक दिवस जाऊन रामदेवाचा भयंकर अपमान केला आणि आईलाही तो अद्वातद्वा काहीतरी बोलला. तेव्हा दुःखातीरेकाने कळवळून आई निर्वाणीचे नागदेवाला काही बाही बोलल्या. आईचा आक्रोश ऐकून नागदेवाला उपरती झाली आणि नागदेवाने रामदेवाला शोधून आणले. रामदेवाच्या विनंतीनुसार एक दिवस सगळे चक्रधर स्वामींना भेटायला सिन्नरला गेले. तिथे चक्रधर स्वामींची आणि या परिवाराची भेट झाली. या संपूर्ण परिवाराचा उद्धार झाला. किंकर्तव्यमूढ झालेला नागदेव आणि मरणपंथाला टेकलेल्या या तीन विधवा यांच्या आयुष्यात चक्रधरांनी प्राण फुंकले. हेच नागदेव पुढे महानुभाव पंथाचे आचार्य झाले आणि ह्याच विधवा पुढे महानुभाव पंथांच्या आधारस्तंभ झाल्या. यातली रुपै ही पुढे चक्रधर स्वामींची लाडकी शिष्या महदंबा झाली.
तिच्या स्वभावामुळे ती सगळ्या परिवाराला जोडून ठेवायची. त्यामुळे सगळा परिवार तिच्या ऐकण्यात असायचा. चक्रधरांना महदंबेचा मोठा आधार वाटायचा. त्याशिवाय ती बहुश्रुत असल्यामुळे आणि वडिलांकडून तिने बऱ्यापैकी पुराणश्रवण आणि ज्ञानग्रहण केल्यामुळे, तिच्या उत्सुक स्वभावामुळे ती चक्रधारांसोबत चर्चेत नेहमीच अग्रेसर असायची. उत्सुकतेने चक्रधर स्वामींना काहीबाही विचारीत राहायची. त्यानिमित्ताने चक्रधरांच्या मुखातून तत्वज्ञान बाहेर पडायचे. आपल्या जुन्या आठवणी बाहेर पडायच्या. आणि त्याच्या संकलनातूनच लीळाचरित्र आणि महानुभावांच्या तत्त्वज्ञानाची उभारणी झाली. पुन्हा या सगळ्या परिवाराला सोडून चक्रधर उत्तरापंथी निघून गेल्यावर सैरभैर झालेले नागदेव वेडे होऊन एका डोंगरात पडलेले होते. हा सगळा परिवार गोविंदप्रभूंकडे गेला. सगळेच नागदेवाचार्यांना शोधून थकलेले होते. कोणालाही ते सापडले नाही. त्यामुळे किंकर्तव्यमूढ झालेला हा सगळा परिवार गोविंदप्रभूजवळ राहू लागला. पण आपला भाऊ कुठे सापडत नाही त्यामुळे सैरभैर झालेल्या महदंबेला गोविंदप्रभूंनी सांगितले, यवतमाळ जिल्ह्यात भानखेडीच्या डोंगरात तो बेशुद्ध पडलेला आहे. त्याला शोधत शोधत महदंबा गेली आणि आपल्या शुद्ध हरवलेल्या भावाला पाठीवर घेऊन ती ऋद्धपुरला आली. गोविंदप्रभूच्या दर्शनाने नागदेव हळूहळू पूर्वपदावर आले. तिथून पुढे ते महानुभाव पंथाचे आचार्य झाले आणि अख्खा पंथाची त्यांनी उभारणी केली. जर महदंबा नसत्या आणि त्यांनी नागदेवाचार्यांना शोधून आणलं नसतं, आपल्या पाठकुळी घेऊन आल्या नसत्या तर आज महानुभाव पंथ तर सोडाच पण महानुभाव हा शब्दही आपणाला माहीत झाला नसता. अशा अनेक अर्थानं महादंबा ही महानुभाव पंथाची, मराठी भाषेची, मराठीची कवीतेची आणि आपल्या सगळ्यांची मोठी माय आहे. तिला शत शत वंदन !!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.