पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे, अशी माहिती अखिल भारतीय महामंडळाच्या कार्यवाह आणि ग्रंथप्रदर्शनाच्या प्रमुख सुनिताराजे पवार यांनी दिली आहे.
सातारा येथे तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साताऱ्याच्या लौकिकाला साजेसे असे होईल. साताऱ्यात वाचन संस्कृती रुजली आहे. जिल्ह्याला मोठी साहित्यिक परंपरा आहे. हे संमेलन सातारा बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या भव्य अशा शाहू स्टेडीअमवर होणार आहे. या संमेलनात प्रथमच चार दिवस ग्रंथ प्रदर्शन होणार असून ही वाचकांसाठी पर्वणी आहे.
संमेलनात एकूण गाळ्यांची संख्या २४० असेल. गाळ्याचा आकार ९ x ९ फूट असा आहे. गाळ्यामध्ये २ टेबल, २ खुर्च्या, वीजेची सुविधा उपलब्ध असेल. गाळ्याचे शुल्क प्रत्येकी ८००० + १४४० जीएसटी असे एकूण ९९४० रुपये आहे. प्रति गाळा एका व्यक्तीसाठी निवास, भोजन, चहा, नाष्टा याचा या शुल्कात समावेश आहे. आजवर संमेलनात एका संस्थेला केवळ चारच गाळ्यांची नोंदणी करता येत होती. यंदा एका संस्थेला जास्तीत जास्त ६ गाळ्यांची नोंदणी करता येईल. गाळ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. त्याची लिंक https://tender.abmsssatara.org/gala-nondani अशी आहे. गाळ्यांचे वाटप सोडत पद्धतीने होईल. गाळा नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु होईल, असेही पवार यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
