November 17, 2025
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा विराट मोर्चा; डॉ. सुकृत खांडेकर यांचा ‘मुंबई कॉलिंग’ मधील विश्लेषण – महाराष्ट्रात नव्या राजकीय वज्रमूठीचा इशारा.
Home » विरोधकांची वज्रमूठ…
सत्ता संघर्ष

विरोधकांची वज्रमूठ…

मुंबई कॉलिंग –

विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी दिलीच नाही. आता म्हणे मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. फॅशन्स स्ट्रीट ते मुंबई महापालिका असा हा मोर्चा निघाला. किती लाख या मोर्चात सामील होते, याचा आकडा कोणाला सांगता आला नाही कारण तो विराट मोर्चा होता.

डॉ. सुकृत खांडेकर

मतदार याद्यातील लक्षावधी दुबार मतदारांच्या विरोधात महाआघाडी आणि मनसे यांनी मुंबईत विराट मोर्चा काढून केलेल्या शक्ति प्रदर्शनानंतर विरोधकांची झालेली एकजूट हेच महायुती सरकारपुढील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी लक्षवधी मराठा मुंबईत एकत्र आले व त्यांनी सरकारला झुकवल्याचे सर्व राज्यातील जनतेला बघायला मिळाले, छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने मराठा आंदोलनाला शह देण्यासाठी ओबीसींचे मोठे शक्ति दर्शन घडवले गेले, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीच्या मागणीवरून नागपूर येथे लक्षावधी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आता मतदार याद्यातील लक्षावधी बोगस नावे हटविण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी मुंबईत निवडणूक आयोगाला जाब विचारणारा महामोर्चा काढला.

राज्यात कुठेही शांतता नाही. त्यातच फलटण येथे तरूण महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या यावरून वादळ उठले आहेच, मुंबईत मुलांना ओलीस ठेऊन थकीत बिलांच्या वसुलीसाठी धमकी देणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटनर ज्या पध्दतीने झाला त्यावरून मुंबई पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असे का होत आहे ? सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात संवाद संपला आहे का ? राज्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेणे बंद झाले आहे का ? राज्यात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अविश्वासाचे वातावरण का आहे ?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीचे तर २८८ पैकी २३५ जागांवर आमदार विजयी झाले. पराभूत झालेले विरोधी पक्ष भाजपच्या आश्चर्यकारक विजयाने हबकले. पण महायुतीने महाप्रचंड विजय मिळवूनही रस्त्यावर कुठे जल्लोष दिसला नाही. आपण एवढ्या मतांनी कसे विजयी झालो हेच अनेकांना समजले नाही. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्होट चोरीच्या मुद्यावरून देशव्यापी अभियान छेडले असून राज्याराज्यात मतदार याद्या कशा सदोष आहेत, हे ते पुराव्यानिशी दाखवत आहेत. महाराष्ट्रातही चाळीस लाख मतदार बोगस असल्याचा त्यांनी आरोप केला. जे राहूल गांधी देश पातळीवर पुरा्व्यानिशी सांगत आहेत, तेच शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार महाराष्ट्रात सांगत आहेत. मतदारसंघनिहाय दुबार मतदार किती आहेत याची भेंडोळी घेऊन राज ठाकरे सर्वत्र फिरत आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीतही विरोधी नेत्यांनी सज्जड पुरावे सादर केले. मग सदोष मतदार याद्यांमधे दुरूस्ती का होत नाही ? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ३१ जानेवारी पूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे सरकारला भाग आहे. मग सदोष मतदार याद्यावरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत का ?

विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी दिलीच नाही. आता म्हणे मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. फॅशन्स स्ट्रीट ते मुंबई महापालिका असा हा मोर्चा निघाला. किती लाख या मोर्चात सामील होते, याचा आकडा कोणाला सांगता आला नाही कारण तो विराट मोर्चा होता. उबाठा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ), मनसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट अशी विरोधकांची एकजूट दिसली. लाल झेंडेही विलक्षण होते. मोर्चा पाहून आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळातील मोर्चांची आठवण झाली असे उद् गार शरद पवारांनी काढले.

मतदार यादीत एक महिलेचे नाव रर हह असे आहे. तिच्या पतीचे नाव कक दद असे नोंदवले आहे. मग आता निवडणूक आयोगाचे नाव तत फफ असे ठेवा, अशी खिल्ली आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडवली. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १७ लाख २९ हजार मतदार आहेत, पैकी ६२ हजार ३७० मतदार दुबार आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १६ लाख ७४ हजार मतदार आहेत, पैकी ६० हजार २३१ दुबार आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १ ५ लाख ९० हजार मतदार आहेत पैकी ९२ हजार ९८३ दुबार आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात १६ लाख ८१ हजार मतदार आहे, पैकी ६३ हजार ७४० दुबार आहेत.

राज ठाकरे यांनी सत्याच्या मोर्चापुढे दुबार मतदारांच्या नावांचा ढिगारा उलगडून दाखवला. पैठणच्या आमदाराचा मुलगा जाहीरपणे सांगतो की, मी वीस हजार मतदार बाहेरून आणले. तरी निवडणूक आयोग गप्प आहे.नवी मुंबई आयुक्तांच्या निवासी पत्त्यावरही दुबार मतदार नोंदवले आहेत. महायुतीत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने नाशिक जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९८ हजार ८५३ मतदार दुबार असल्याचे म्हटले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सदोष मतदार याद्या दुरूस्त केल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली आहे. देशात बारा राज्यात स्पेशल इन्टेसिव्ह रिव्हिजन ( एसआयआर ) चालू आहे, त्यात पंजाब, पश्चिम बंगाल, तामि‌ळनाडू राज्ये आहेत, मग त्यात महाराष्ट्र का नाही ?

लोकसभा निकालानंतर आज सदोष मतदार यादीवर आवाज उठविणारे नेते कुठे होते, कर्नाटक- झारखंड किंवा तेलंगणाचा निकाल लागल्यानंतर दुबार मतदार यादीला आक्षेप घेणारे गप्प का होते, राज्यात एक लाख बूथ आहेत. प्रत्येक बूथवर उमेदवाराचे पोलिंग एजंट असतात, त्यातल्या एक टक्का म्हणजे एक हजार जणांनी तरी मतदानाच्या वेळी आक्षेप नोंदवले होते का ? मतदार याद्यांचे प्रारूप अगोदर जाहीर केले जाते तेव्हा विरोधी पक्षाने आवाज उठवला होता का ? हे प्रश्न भाजपने विचारले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाआघाडी गाफील राहिली, हे त्याचे कारण आहे.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, भाई जगताप, सतेज पाटील असे काही नेते मोर्चात सामील झाले. पण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ व मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड कुठे होत्या ? सत्याच्या मोर्चात राज ठाकरे तर खरे तर पाहुणे होते, ते काही महाआघाडीचे घटक नाहीत. पण आंदोलनाचा प्रमुख चेहरा तेच ठरले. मोर्चाचे व टीव्हीच्या पडद्यावरचे आकर्षण तेच ठरले. मत चोरीच्या निमित्ताने राज्यात निर्माण झालेली विरोधकांची वज्रमूठ निवडणुकीपर्यंत टिकेल का ? हा लाख मोलाचा प्रश्न आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading