अनंता सूर यांच्या ‘हेळसांड’ या कथासंग्रहाचे आणखी एक वैशिष्टय असे की लेखक केवळ स्व – समाजावर व सवर्णावरच लेखनभार टाकत नाही तर गावातील दलित समाज आणि गावाबाहेर पालात राहणारा पारधी समाज यांच्या विषयीसुद्धा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार आणि निरीक्षण करून लेखन करताना दिसून येतो. आणि ही सहसंवेदनाच मला फार महत्त्वाची वाटते.
बाबाराव मुसळे, वाशिम. भ्र.९३२५०४४२१०
प्रा. अनंता सूर हे कथा,आत्मकथन, कविता, कादंबरी, नाट्य, संपादन आणि महत्त्वाचे म्हणजे समीक्षा अशा अनेक प्रकारांमध्ये सातत्याने लेखन करणारे या घडीचे महत्त्वाचे लेखक आहेत. या सर्व प्रकारांसाठी त्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक मान्यवर साहित्यिक संस्थांकडून वेळोवेळी पुरस्कारही प्रदान करण्यात आलेले आहेत. मला त्यांनी त्यांच्या ‘वाताहत’ आणि ‘भोगवटा’ या कथासंग्रहानंतर ‘हेळसांड’ नावाच्या तिसऱ्या कथासंग्रहावर काही साधकबाधक लिहिण्यास सुचविले आहे. मी यातल्या कथा वाचल्यावर जे मला जाणवले ते मी येथे सारांशरूपाने प्रगट करतो.
त्यांच्या या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या कथांचे एकूण स्वरूप पाहता त्या कथा यवतमाळ जिल्ह्यातील शोषित,पीडित, दलित सामान्य मजूर माणसांच्या, पाड्यावरच्या पालात राहणाऱ्या पारध्यांच्या, सतत अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणाऱ्या सुशिक्षित दलित तरुणांच्या, गावातल्या ग्रामपंचायतीचा शह-काटशह, डावपेच, यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा, शिक्षण घेऊन बेकार झालेल्यांचा आणि शिक्षण घेऊन तीव्र सामाजिक विरोध सहन करून काही धडपड करू बघणाऱ्या मुलींच्या दमदारपणाच्या आदी विविध विषयांवरच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, जातीयतावादी अशा अनेकविध दृष्टिकोनांतून, भावभावनांना स्वसाक्षी ठेवून मार्मिक विवेचन आणि विश्लेषण करणाऱ्या अशा महत्त्वाच्या कथा आहेत.
यातही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की या कथांतील बहुतेक पात्रे ही परिस्थितीशरण वाटतात. त्यांना सामाजिक, कौटुंबिक विरोध फारसा सहन करावा लागत नाही. पण जी त्यांच्या दैवाने म्हणा किंवा कर्तृत्वाने म्हणा नैसर्गिक वा तत्सम परिस्थिती प्राप्त होते ती सहन करत जगण्याची त्यांची धडपड असते. याचा अर्थ असा की इथे या पात्रांवर कुठलाही समाज, जात, धर्म हा अन्याय व त्यांचे शोषण करत नाही ही मला फार मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट वाटते. अन्यथा ज्या आपल्याभोवती सामाजिक घटना घडत असतात, एखाद्यावर अन्याय होत असतो तेव्हा त्याला कारणीभूत काही सामाजिक घटकच असतात. त्यांचे निष्ठुरपणे, असहमतीने, असंवेदशील पद्धतीने वागणे याचा समोरच्या पात्रांना त्रास होत असतो. हे इथे फारसे दिसत नाही. त्यादृष्टीने या कथा मला अपवादात्मक आणि म्हणून वेगळ्या वाटतात. वर या लेखनास स्वसाक्षी असे म्हणण्याचे कारण हे की लेखक, त्यांच्या कुटुंबासह गावात राहून विविधारंगी, अंगी अनुभव घेत लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यामुळे गावांकडील सर्व अनुभवजन्य अवकाशाला लेखक अतिशय प्रामाणिकपणे, निरपेक्षपणे, सामाजिक बंधूभाव आणि जातीपातीविषयीचा समभाव, समूहभाव, सहानुभाव अशा गोष्टींना कथात्म पातळीवर नेऊन कथालेखनास प्रवृत्त झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या कथा अस्सल, जिवंत, रसरशीत अशा साक्षात्कारी स्वरूपात अवतरल्या आहेत. ग्रामीण जीवनातील ताणतणाव उलगडणारा एक सक्षम कथासंग्रह म्हणून प्रस्तुत ‘हेडसांड’ या कथासंग्रहाचे मौलिकत्व नाकारता येणार नाही.
यातील ‘ताटातूट’ ही कथा ग्रामीण भागात निष्ठेने जगणाऱ्या पांडुरंगचे जगणे चित्रीत करते. परिस्थितीने तो गरीब असल्यामुळे इच्छा असूनही तो सातवीच्या पुढे शाळा शिकू शकला नाही. मात्र बाबासाहेबांच्या विचारांवर त्याची निष्ठा असल्याने तो मुलीला एम. ए. आणि मुलाला डॉक्टर बनवतो. शिवाय दरवर्षी तो बाबासाहेबांच्या जयंतीला आणि महापरिनिर्वाणदिनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर गावातील काही निवडक मित्रांसह जातो. घरी परतताना फुले, शाहू, आंबेडकरांची तीन-चार थैले भरून पुस्तकेही आणतो. हीच त्याची वैचारिक मेजवानी आहे. मात्र ६ डिसेंबरसाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर मित्रांसह गेलेला असताना आदल्या दिवशी गेट वे ऑफ इंडियाजवळ फिरत असताना अचानक चार बॉम्ब ब्लास्ट होऊन त्यामध्ये बारा माणसे दगावतात आणि या बायामाणसांची ताटातूट होते. माणसांना अतिरेकी समजून पोलिस त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जातात. तेव्हा साऱ्यांच्या बायका त्यांचा शोध घेत पोलिस स्टेशनमध्ये येतात. मात्र ठाणेदार देवमाणूस निघाल्याने पुन्हा सर्व एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी सारेच चैत्यभूमीचे दर्शन घेतात. त्यावेळी पांडुरंगला बाबासाहेबांच्या अफाट संघर्षमय त्यागाची कल्पना कल्पना येते आणि तो त्यांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होतो.
‘दंश’ नावाच्या कथेत माणसाला भविष्यात काही मोठे संकट येणार आहे तर त्याची पूर्वसूचना निसर्गातील काही घटक-प्राणी, पक्षी, कीटक, झाडे, वनस्पती,आकाशातील तारे इत्यादि देतात आणि हे संकेत जर आपल्याला कळले, आपण त्यानुसार सावध होऊन वागलो तर अशी संकटे टळू शकतात. अशा प्रकारची एक मांडणी केलेली आहे. या कथेत बाप शेतामध्ये जात असता त्याला एक साप रस्त्यात आडवा येतो. तो साप असाच काही संकेत त्या बापाला देऊ पाहतो. पण बाप त्याकडे दुर्लक्ष करतो आणि शेतात निघून जातो. इकडे घरी त्याची मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आलेली असता तिची आई तिला थोडेफार हलके काम करायला लावत असते आणि हे स्वाभाविक आहे. ती अंगणात सडा टाकत असताना ती त्या सड्यावरून घसरून पडते. त्याची इजा तिच्या पोटातल्या गर्भाला होते आणि गर्भ आतल्याआत मरून जातो. नंतर मुलगीही मरते. सापाचा संकेत जर आपण पाळला असता आणि तिथून परत घरी आलो असतो तर कदाचित ही गोष्ट घडली नसती असे त्या बापाला वाटते. तसे वाटल्याने त्या सापांने प्रत्यक्ष डंख मारला नाही तरीसुद्धा त्याच्या जीवाला डंख मारल्याच्या वेदना होत राहतात.
‘गायीचे डोळे’ ही पहिली कथा. लेखकाचा स्वतःचा अनुभव या कथेत असल्याचा निर्देश लेखकाने स्पष्टपणे दिलेला आहे. लेखकाचे प्राणिमात्राविषयी असलेले प्रेम आणि दुर्लक्षही या कथेतून दृग्गोचर होते. लेखकाच्या शेतात नेमकी पोळ्याच्या दिवशीच कुणाची तरी मोकळी असलेली एक गाभण गाय शेतात खाली पडलेली असते. लेखक मित्राला घेऊन तिथे जातो. त्यावेळी ती एका वासराला जन्म देते. पण काही वेळाने लेखक जेव्हा तिथे जाऊन पाहतो तर वासरू जन्मतःच मरून पडलेले असते. नंतर कुत्रे त्याला उचलून घेऊन जातात. या गोष्टीचे लेखकाला वाईट वाटते. पण गाय उठून उभी व्हावी यासाठी तो काही इलाज करतो आणि त्याच्यासमोर गाय उठून उभी राहते. त्यावेळी तो गायीला तेथे सोडून रात्री घराकडे परत येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन गायीची अवस्था पाहिली तर गायीलाही कुत्र्यांनी तोडल्यामुळे ती मरण पावलेली त्याला दिसते. तसेच मनावर दगड ठेवून लेखक तिला पुरण्यासाठी स्वतःसह मित्राच्या हाताने खड्डा तयार करत असतात. त्याचे गायीकडे लक्ष जाते तेव्हा ती जणू काही डोळे वाचून आपल्याकडेच पाहात आहे असे त्याला वाटते. लेखकाला असे तर म्हणावयाचे नाही की तिच्या वटारून पाहण्याच्या वृत्तीतून ती लेखकालाच तिच्या स्थितीबद्दल दोष देत आहे. जर लेखकाने तिला कुठल्याही परिस्थितीत रात्री घरी सुरक्षित नेले असते तर कदाचित तिला मृत्यू आला नसता. पण लेखक तसे करत नाहीत आणि म्हणून आधी वासरू नंतर त्यांची गाय मरून पडते.
लचांड’ या कथेचा नायक स्वतः लेखक असून ग्रामीण भागातील बहुरूप्याचे सोंग घेणारे व्यक्तिमत्त्व इथे साकारले आहे. असाच एकदा लेखक वडिलोपार्जित वाट्याला आलेले बापाच्या जुन्या थैल्यातील शंकराचे रूप धारण करून कायरच्या आठवडी बाजारात फिरतो. लोकांकडून भरपूर दक्षिणाही भिडते. मात्र दुपारी नेमके चहा पिऊन झाल्यावर लेखकाला विडी पिण्याची तलफ येते आणि तो तिथे वेळी पितानाच त्याचा फोटो एक मुलगा मोबाईलवर काढून लगेच व्हायरल करतो. तसे पोलिस येऊन त्याला पकडतात आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देतात. त्यावेळी तो स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी जमा झालेले सगळे पैसे पोलिसांना देतो. संध्याकाळी घरी परतल्यावर रागारागाने घरातील मुखवट्यांचा तो वडिलोपार्जित थैला अंगणात आणून पेटवून देतो आणि बायकोला ‘आज मी खऱ्या अर्थाने बापाला जाळले’ म्हणून सांगतो. जुन्या परंपरा आणि नवी विचारसरणीमध्ये फसलेला नायक लटारी आत्मसन्मानाला, इज्जतीला कसे जपण्याचा प्रयत्न करतो यावर ‘लचांड’ ही कथा संवेदनशीलपणे प्रकाश टाकते.
अनंता सूर यांच्या ‘हेळसांड’ या कथासंग्रहाचे आणखी एक वैशिष्टय असे की लेखक केवळ स्व – समाजावर व सवर्णावरच लेखनभार टाकत नाही तर गावातील दलित समाज आणि गावाबाहेर पालात राहणारा पारधी समाज यांच्या विषयीसुद्धा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार आणि निरीक्षण करून लेखन करताना दिसून येतो. आणि ही सहसंवेदनाच मला फार महत्त्वाची वाटते.
बाबाराव मुसळे, वाशिम
अनंता सूर हे आघाडीचे साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, कविता, नाटक, स्वकथन, संपादन आणि समीक्षा या साहित्य प्रकारात त्यांनी सक्षमपणे लेखन केलेले आहे. सातत्यपूर्ण लेखन आणि समकालीन वास्तव ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू आहे. वैविद्यपूर्ण कथानक, नेमकी पात्रे आणि वैदर्भीय भाषेतील परिणामकारक संवादातून त्यांची कथा आकाराला येते. ‘हेळसांड’ हा कथासंग्रह त्याची साक्ष देतो आहे.
गावगाडा आणि गावगाड्याबाहेरही शोषित, पीडितांचं एक फार मोठं विश्व आहे. गोरगरीब, आदिवासी, विमुक्त, भिकारी तथा वंचितांचे जीवन म्हणजे लाचारी,अगतिकता, व्यथा, वेदना, अन्याय आणि अत्याचाराने भरलेले असते. त्यांचा दबलेला सूर आणि आंतरिक वेदना साहित्यातून आता प्रगट होऊ लागलेली आहे.अनंता सूर यांनी ‘हेळसांड’ कथासंग्रहात उपेक्षितांच्या व्यथा, वेदना मुखर केलेल्या आहेत. अज्ञान, दारिद्र्य, दैव, नशिबाचा फेरा, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण राजकारण, डावपेच, जातीपातीचे राजकारण तथा अन्य समस्यातून माणूस आजही मुक्त झालेला नाही. त्याचंच वास्तववादी चित्रण म्हणजेच ‘हेळसांड’ कथासंग्रह.योगीराज वाघमारे, ग्रामीण कथाकार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.