- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ऐतिहासिक २०० वे संमेलन थाटात संपन्न
- राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या हस्ते उद्घाटन ;
- सयाजीराजेंच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक वंदन
वडोदरा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १ ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन वडोदरा येथे अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाले.मराठी भाषेचा आणि साहित्याचा हा महोत्सव परिषदेच्या इतिहासातील ऐतिहासिक २०० वे संमेलन ठरल्याने संपूर्ण साहित्य विश्वात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
या भव्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष किशोर टिळेकर, कविसंमेलन अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, प्रमुख पाहुणे रमेश रेडेकर, स्वागताध्यक्ष रंजनादेवी भोईटे, निमंत्रक मानसी म्हसकर, मिलिंद बोडस यांच्यासह अनेक साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शरद गोरे यांनी बडोदा येथे सयाजीराजे साहित्य संमेलनात सादर केलेली कविता ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा…
सयाजीराजेंच्या इतिहासावर गौरव उद्गार
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. शरद गोरे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अलौकिक कार्याला कृतज्ञतेने वंदन केले. ते म्हणाले, “सयाजीराजे हे केवळ एक राजे नव्हते, ते एक दूरदृष्टीचे युगपुरुष, लोककल्याणकारी राजे आणि समाजसुधारक होते. ज्यांनी वडोदराच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या प्रगतीचा पाया रचला.१८७५ मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गादीवर आलेल्या सयाजीराजांनी शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र मानला. त्यांनी आपल्या संस्थानात १८९३ मध्ये सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करून भारतात एक क्रांतीच घडवली. जेव्हा संपूर्ण देशात अज्ञानाचे अंधार होते, तेव्हा त्यांनी ज्ञानाचा दीप लावला.त्यांनी वडोदऱ्यात केंद्रीय ग्रंथालयाची स्थापना केली, गावोगावी वाचनालये, शाळा, महाविद्यालये उभारली. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले, बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध कठोर कायदे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या तेजस्वी रत्नाला परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांनी भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली.”
ते म्हणाले, “कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीचे सयाजीराजे हे खरे आश्रयदाते होते. लक्ष्मीविलास पॅलेस, सयाजी बाग, महाराजा सयाजीराव विद्यापीठ यांसारख्या वास्तू आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांनी कधीही भाषा, जात, धर्म यांचा भेद केला नाही. ज्ञान, कला आणि मानवता हाच त्यांचा धर्म होता.आज त्याच सयाजीनगरीत, त्यांच्याच नावाने हे पहिले साहित्य संमेलन होत आहे, आणि तेही परिषदेचे २०० वे ऐतिहासिक संमेलन असणे, हा केवळ योगायोग नाही, तर ही सयाजीराजेंच्या पुण्याईचीच पावती आहे.”
डॉ. गोरे पुढे म्हणाले, “मराठी भाषा ही केवळ भाषा नसून ती संस्कृती आहे, अस्मिता आहे. सयाजीराजे गायकवाड यांच्या पुण्यभूमीत हे २०० वे संमेलन होणे ही मराठीसाठी गौरवाची बाब आहे. गुजरातच्या भूमीतही मराठीचा झेंडा असाच अभिमानाने फडकत राहील.”
संपूर्ण दिवस कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन आणि साहित्यिक चर्चांनी भारलेला होता. शब्द, सूर आणि विचारांच्या या त्रिवेणी संगमात रसिक मंत्रमुग्ध झाले. सयाजीराजे गायकवाड यांच्या दूरदृष्टीला वंदन करीत या संमेलनाने मराठी साहित्याच्या सुवर्ण इतिहासात आणखी एक सोनेरी पान कोरले.
