April 19, 2024
chitte river revival campaign Book By Santosh Lenbhe
Home » ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’
काय चाललयं अवतीभवती

‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’

ग्रामविकास संस्थेतर्फे शुक्रवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्वांसाठी पाणी व चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान - एक शोधयात्रा या जलविषयक महत्त्वपूर्ण दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, या निमित्त…
प्रकाशन सोहळा पाहण्यासाठी करा लिंकवर क्लिक https://www.facebook.com/gramvikas.sanstha

माथा ते पायथा या जल व्यवस्थापनाच्या कामामुळे चित्तेनदीचा पूर व होणारी जमिनीची धूप यावर नियंत्रण मिळाले. नदीकाठच्या विहिरींचा भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. खोऱ्यांतील गावांची टँकर मुक्ती, भूमिहीनांना रोजगाराची उपलब्धी, दुष्काळमुक्तिकडे दमदार वाटचाल, पिण्याच्या पाण्याच्या भटकंतीवर पूर्णविराम, शिवारात वाढती जलसमृद्धी हे लक्षणीय बदल घडून आले.

राजेश प्र.लेहेकर

‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान: एक शोधयात्रा’ हे पुस्तक संतोष लेंभे यांनी लिहिले आहे. ‘सर्वांसाठी पाणी’ या पुस्तकातील ‘लोकसहभागातून जलव्यवस्थापन’ या विषयाचे जमिनीवरील प्रगटीकरण म्हणजेच ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान’ होय. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद शहरापासून 12 किमी अंतरावरील चित्ते नदीखोऱ्यात हे अभियान राबविण्यात आले आहे.

खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा या क्रमाने जलसंधारणाच्या व जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून चित्ते नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2015 पासून या कार्यात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. परिसरातील तांडे व छोटे मोठे अशी 27 गावे चित्ते खोऱ्या अंतर्गत येतात. संपूर्ण खोरे एकक मानून ते काम सुरू झाले. यात चित्ते नदी रुंदीकरण व खोलीकरण, साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे, डोंगराच्या पायथ्याला डीप सी.सी.टी व एरिया उपचार, पाझर तलावातील गाळ काढणे, पडीक जमिनीवर, नदीकाठी वृक्षरोपण, शासकीय योजनांच्या माध्यमातून शेततळे, रिचार्ज शाफ्ट, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर या दहा कलमी जलव्यवस्थापन कामांचा समावेश होता.

चित्ते नदी खोऱ्याच्या पूर्वस्थिती विषयी माहिती देताना लेखकाने तेथील विदारक दुष्काळी स्थितीचे वर्णन केले आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती, नद्या-नाले व झऱ्यांचे आटलेले प्रवाह, गुराढोरांच्या वैरणीची टंचाई, दुग्ध व्यवसायावर आलेले विपरीत परिणाम यामुळे मातीमोल भावाने पशुधन विकण्याची आलेले पाळी, शेती व्यवसायाची पाण्याअभावी झालेली दुरावस्था व रोजगाराची समस्या, पाण्याअभावी किंवा दूषित पाण्यामुळे आरोग्य संकट, पाण्याअभावी आपापसातील संघर्ष अशी तेथील परिस्थिती होती. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानामुळे झालेले कायापालट डोळ्यात भरणारा होता.

माथा ते पायथा या जल व्यवस्थापनाच्या कामामुळे चित्तेनदीचा पूर व होणारी जमिनीची धूप यावर नियंत्रण मिळाले. नदीकाठच्या विहिरींचा भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. फळबाग व भाजीपाला क्षेत्रात वाढ झाली, बारमाही सिंचन क्षेत्रात वाढ, दुग्ध उत्पादनातील वाढ. शेतमालावर प्रक्रियेस गती, फळ व भाजीपाला थेट विक्री व्यवस्था. खोऱ्यांतील गावांची टँकर मुक्ती, भूमिहीनांना रोजगाराची उपलब्धी, दुष्काळमुक्तिकडे दमदार वाटचाल, पिण्याच्या पाण्याच्या भटकंतीवर पूर्णविराम, शिवारात वाढती जलसमृद्धी हे लक्षणीय बदल घडून आले. अभियानामुळे घडून आलेले हे अमुलाग्र परिवर्तन खरोखरच प्रेरणादायी आहे.

पुस्तकात ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांची विस्तृत मुलाखत घेण्यात आली आहे. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची कल्पना, आलेल्या अडचणी, लाभलेले सहकार्य, लोकसहभाग, खोऱ्यातील पीकपद्धतीत झालेले बदल, संस्थेने परिसरात राबवलेले विविध उपक्रम, मान्यवरांनी या उपक्रमांची घेतलेली दाखल आदी विषयांवरील प्रश्नांना त्यांनी माहितीपूर्ण उत्तरे दिली.

चित्ते खोऱ्यातील ‘शाश्वत विकास’ झालेल्या गावांची शोधयात्रा या प्रकरणात त्या त्या गावांमध्ये घडून आलेले परिवर्तन, राबविलेले उपक्रम व प्रत्येक टप्प्यावरील गावांची विकास यात्रा याची विस्तृत चर्चा केली आहे. ज्यातून अन्य गावांनाही प्रेरणा घेता येईल. पुस्तिकेत चित्ते नदी अभियानांतर्गत कोण कोणते प्रकल्प राबविले याची माहितीही दिली आहे. तसेच वेगवेगळ्या उपक्रमांची, भेटी दिलेल्या मान्यवरांची. झालेल्या परिवर्तनाची सुंदर छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
पुस्तकाची सुबक छपाई तसेच जलसंवर्धन विषयाला पूरक असे बोलके, अर्थगर्भ मुखपृष्ट हे या दोन्ही पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पुस्तकांचे प्रकाशन ग्रामविकास संस्थेने केले आहे.

ज्यांना पाणी क्षेत्रात काम करायचे आहे किंवा अगदी साध्या-साध्या उपायांचा अवलंब करुन ज्या सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात जल व्यवस्थापनाची कास धरून सामाजिक ऋण फेडायचे आहे. अशा सर्वांसाठी हे पुस्तके प्रेरणादायी, उपयुक्त व संग्रही ठेवावे अशी आहेत हे निश्चित.

पुस्तकाचे नाव: ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान’- एक शोधयात्रा
लेखक: संतोष लेंभे
प्रकाशक: ग्रामविकास संस्था
पृष्ठे: 132, किंमत: 100

Related posts

दुष्काळमुक्त मराठवाडा भावी दिशा

पाणी प्रश्नांवर उत्तरे सुचविणारे पुस्तक

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल

Leave a Comment