📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर

परदेशातही ‘गणपती बाप्पा मोरया’चा निनाद; A2MM गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

अमेरिकेतील Farmington High School येथे A2MM गणेशोत्सव उत्साहात झाला. चिमुकल्यांच्या गणेशमूर्ती, ढोल-ताशे, पारंपरिक भोजन आणि भक्तिसंगीताने मराठी संस्कृतीचा जागर झाला.

Farmington High School येथे गणेशोत्सव उत्साहात; चिमुकल्यांच्या हस्ते गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, भक्तिसंगीताची मैफल आणि पारंपरिक भोजनाची मेजवानी

फार्मिंग्टन (अमेरिका) : आपल्या मातृभूमीपासून हजारो मैल दूर असतानाही ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि उकडीच्या मोदकाचा सुगंध मनाला क्षणात महाराष्ट्राच्या मातीशी जोडून जातो. याच मराठी संस्कृतीच्या जिवंत नात्याचा अनुभव Farmington High School येथे झालेल्या A2MM गणेशोत्सवात आला.

ShivShardul Percussions पथकाच्या दमदार ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आणि काही क्षणांतच Farmington High Schoolचा परिसर मराठमोळ्या उत्साहाने भारून गेला. विशेष आकर्षण ठरले ते चिमुकल्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गणेशमूर्तींचे. या बालगणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि त्यानंतर भक्तिभावाने झालेली पूजा पाहताना परंपरा केवळ जपली जात नाही, तर ती पुढील पिढीच्या हातात प्रेमाने सोपवली जात असल्याचे चित्र दिसून आले.

गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या उत्सवात पारंपरिक मराठी भोजनाची मेजवानीही होती. घरच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जागवणारे उकडीचे मोदक, वरण-भात, पोळी, बटाटा भाजी, पंचामृत आणि मोदक आमटी अशा सात्त्विक व रुचकर पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. पारंपरिक चवीने परदेशातील गणेशोत्सवाला महाराष्ट्रातील घरगुती उत्सवाची उब मिळाली.

भोजनानंतर ‘स्वर-रंग’ या संगीत कार्यक्रमाने उत्सवाला सुरेल रंग चढवला. ऑस्टिन, टेक्सास येथून विशेषतः A2MMसाठी आलेल्या गायिका अश्विनी गोरे-देशपांडे यांनी भक्तिसंगीताबरोबरच नाट्यसंगीत आणि विविध संगीतप्रकारांचा समावेश असलेली वैविध्यपूर्ण मैफल सादर केली. ‘ॐकार अनादी अनंत’, ‘मी राधिका’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘सुरत पिया की’ यांसह नाट्यसंगीतातील विविध पदांचा मेडलीमध्ये समावेश होता.

अश्विनी गोरे-देशपांडे यांच्या सहज, भावपूर्ण आणि प्रभावी गायनाला गिरी ऐगळीकर यांच्या तबल्याची आणि प्रणित मराठे यांच्या हार्मोनियमची सुरेल साथ लाभली. उमा कानडे यांच्या ओघवत्या निवेदनामुळे मैफलीतील भाव अधिक खुलून आला. भक्तिसंगीत, शास्त्रीयतेचा स्पर्श आणि नाट्यसंगीतातील वैविध्य यामुळे ‘स्वर-रंग’ कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संगीताची मैफल संपल्यानंतर पुन्हा सर्वांची पावले गणरायाच्या चरणांकडे वळली. आरतीच्या वेळी टाळ्यांचा निनाद, ‘मोरया’चा जयघोष आणि मनात दाटलेली निरोपाची भावना यामुळे वातावरण भावूक झाले. विसर्जनाच्या क्षणी उपस्थितांनी गणरायाला निरोप देताना पुढील भेटीची आस मनात साठवून ठेवली.

परदेशातील भूमीवर साजरा झालेला हा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव ठरला नाही, तर मराठी भाषा, संस्कृती, संगीत, परंपरा आणि आपलेपणाची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा सांस्कृतिक सोहळा ठरला. विशेषतः चिमुकल्यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार करून उत्सवात सहभागी होणे ही परंपरेच्या संवर्धनाची आश्वासक बाब ठरली.

महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असतानाही मराठी मनाची नाळ आपल्या मातीशी घट्ट जोडलेली असल्याचे A2MM गणेशोत्सवाने पुन्हा अधोरेखित केले. माती दूर असली, तरी संस्कृतीची नाळ मनाशी जोडलेली असेल तर महाराष्ट्र कधीच दूर जात नाही, याची अनुभूती या उत्सवातून आली.

‘बाप्पा आले… मनं जोडून गेले… आणि जाताना पुढच्या भेटीची आस देऊन गेले,’ अशा भावपूर्ण वातावरणात A2MM गणेशोत्सवाची सांगता झाली.

Related posts

कवीने अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे! – डॉ राजेंद्र मुंढे

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

काश्मिर सफरीतील.प्रवासी, पक्षी अन् वृक्ष…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar