April 25, 2024
Vegetable hummingbird tree Hadga article by dr v n shinde
Home » मांसाहाराची चव विसरायला लावणारा चवदार हादगा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मांसाहाराची चव विसरायला लावणारा चवदार हादगा

डाॅ, व्ही. एन. शिंदे

हादगा… अतिशय देखणी फुले येणारे झाड. त्याच्या फुलाच्या भाजीची चव मांसाहाराची चव विसरायला लावते. मात्र आज हे झाड, त्याच्या खाद्द्य पदार्थ बनवण्याची पद्धती हळूहळू विस्मरणात चालल्या आहेत. अनेकांना हादगा झाड आहे, हेच माहीत नाही. ज्यांना झाड माहीत आहे, त्यातील अनेकाना त्याची भाजी आणि भजी करतात, हे पण माहीत नाही. मात्र हे झाड आणि त्याचे पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त. याचे साहित्यात फारसे प्रतिबिंब दिसत नाही, मात्र या हादग्याची फुले पुजेसाठी वापरली जातात. ‘हादगा’ हा उत्सवही साजरा केला जातो. अशा या हादग्याच्या झाडाविषयी, त्यापासून बनवल्या जाणाऱ्या खाद्द्य पदार्थाविषयीचा लेख…

डाॅ. व्ही. एन. शिंदे

इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर  https://t.me/MarathiliteratureAgriResearch 

मला ‘ते’ झाड दिसले… अनेक वर्षांनंतर… त्याला आलेली फुले पाहिली… त्याच्या फुलांपासून बनवलेल्या पकोड्यांची चव आठवली… सनई, बासरी वाजवणाऱ्या माणसासमोर चिंच धरली, तर त्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्याला ते वाद्य वाजवणे कठीण होते, असे म्हणतात. अनेक वर्षांच्या विरहानंतर भेटलेल्या या झाडाची फुले पाहिली आणि माझ्या बाबतीत नेमके तसेच झाले… वीसेक वर्षांपूर्वी खाल्लेले पकोडे आठवून, त्यांची चव जिभेवर रेंगाळू लागली. माझ्या तोंडाला असे पाणी आणणारे झाड म्हणजे हादगा !

‘मुळंच माहीत नसल्यावर बुंधा कसा दिसणार’

हादगा खूप उपयुक्त झाड. पूर्वी शेताच्या बांधावर हमखास दिसणारे. ऊस लावायला सुरूवात झाली आणि बांध गायब झाले. बांधाबरोबर झाडेही गायब. हादगा तर पूर्ण हरवूनच गेला. हादग्याच्या झाडाच्या फुलांपासून बनणारी भाजी आणि पकोड्यांची कोल्हापूरला आल्यापासून चव काही चाखता आली नव्हती. बऱ्याच लोकांकडे या झाडाबाबत चौकशी केली. अनेकांनी ‘हादगा’ या नवरात्रातील सणाबद्दल बोलायला सुरुवात केली. काहींनी गावाकडे झाडे असल्याचे सांगितले. मात्र शहरात आल्यानंतर ही भाजी खाता येत नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र बहुतेकांना हे झाड माहीत नव्हते. ‘मुळंच माहीत नसल्यावर बुंधा कसा दिसणार’, या उक्तीप्रमाणे त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पाककृतींची माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता.

हादग्याची ओळख

मराठीत हादगा, हेटा, अगाथी या नावाने प्रसिद्ध (?) असलेले झाड. हिंदीमध्ये अगस्ती, बक, बस्मा, बसना, चोगाचे, हतिया बनते. तर संस्कृतमध्ये अगस्त्य, अगस्ती, अगाती, दीर्घशिंबी आणि अगारी या नावाने ओळखले जाते. बंगालीमध्ये बकफूल, ककनतुरी, पिताईबेललंग किंवा जैन्ती, पंजाबीमध्ये अगस्त, गुजरातीत अगास्थियो, कन्नडमध्ये अगासे किंवा चोगाची, मल्याळममध्ये अगस्टा, तमिळमध्ये अगत्थिकिराई, कोकणीमध्ये बकफूल अगस्तो तर तेलगूमध्ये अविसी नावाने ओळखले जाते. ओडिसी भाषेमध्ये तर थेट ‘अगस्ती’ असे ऋषींच्याच नावाने ओळखले जाते. इंग्रजीमध्ये त्याला हमिंगबर्ड ट्री, व्हेजिटेबल हमिंगबर्ड, फ्लेमिंगो बिल, अगाती सेस्बानिया, ऑगस्ट फ्लॉवर ट्री, ग्रँडिफ्लोरा, सेस्बन, स्वॅम्प पी, टायगर टंग, स्कारलेट विस्टेरिया ट्री, वेस्ट इंडियन पी, व्हाईट ड्रॅगन ट्री या नावाने ओळखले जाते. हे झाड फ्रान्स, स्पेन या देशातही आढळते. याचे शास्त्रीय नाव सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा आहे. याचे कुटुंब लेगुमिनिओसी. हादग्याचे अनेक भाषांतील नाव अगस्ता आहे. अगस्ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा. अनेक संशोधक त्या दिशेला असणारा मलेशिया देश या झाडाचे मूळ मानतात. दक्षिण देशातील वृक्ष म्हणून त्याचे नाव अगस्ता पडले असावे, असे काही संशोधकांचे मत आहे. त्याला सेस्बेनिया हे नाव अरबी भाषेतील नावावरून आले. तर ग्रँडिफ्लोरा म्हणजे मोठे फुल असणारे झाड. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री.द. महाजन यांनी हादगा हे झाड विदेशी असल्याचे अनेक दाखले दिले आहेत.

मूळ भारतीय असल्याचा दावा

हादगा हे मध्यम चणीचे झाड. मूळ भारतातील, आशिया खंडातील असा अनेक संशोधकांचा दावा आहे. मात्र जागतिक कृषी आणि जंगल केंद्राच्या मते, या झाडाचे नेमके मूळ सांगता येत नाही. काही संशोधक, वनस्पतीशास्त्रीय संबंधातून याचे मूळ इंडोनेशियातील मानतात. मात्र याचे भारतातील नाव अगस्त्य ऋषींच्या नावावरून आहे आणि त्यामुळे इतर संशोधक हे झाड भारतीय मानतात. अगस्त्य ऋषींचा कालखंड हा ख्रिस्तपूर्व सातवे ते सहावे शतक मानले जाते. त्यांना तमिळ साहित्याचे आद्य प्रवर्तक मानले जाते. अगस्त्य ऋषींना आध्यात्म, वैद्यकशास्त्र आणि भाषाशास्त्रातील तज्ज्ञ मानले जात असे. भारताबाहेर मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ब्रम्हदेश, श्रीलंका या देशातही मोठ्या प्रमाणात आढळते. ऑस्ट्रेलियापासून युरोपीय देशातही याचा प्रसार आहे. ऑस्ट्रेलियात याला ऑस्ट्रेलियन कॉर्कवूड ट्री म्हणतात. जमिनीत भरपूर पाणी आणि आर्द्र हवा असणाऱ्या भागात हे चांगले वाढते. त्यामुळे मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, क्युबा, अशा सर्व देशांमध्ये पोहोचले आहे. उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात प्रामुख्याने आढळणारे हे झाड. भारतात आज हादग्याची झाडे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, आसाम आणि गुजरात या राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. उष्ण आणि दमट वातावरणात ही झाडे तणासारखी झपाट्याने वाढतात.

एकूण पन्नास प्रजाती

या झाडाच्या जगभरात एकूण पन्नास प्रजाती आढळतात. त्यातील चार महत्त्वाचे वाण मानले जातात. यातील ‘सीता’ प्रजातीला पांढरी फुले येतात. ‘पिता’ प्रजातीला पिवळी फुले असतात. ‘नीला’ या प्रजातीतील झाडांना नावाप्रमाणेच निळ्या रंगाची फुले येतात. तर लाल रंगाची फुले येणाऱ्या वाणाला ‘लोहिता’ म्हणून ओळखले जाते. हादग्याच कृत्रिम वाण तयार करण्यात आलेले नाहीत. यातील पांढऱ्या आणि लाल रंगाची फुले आहारात वापरली जातात. इतर दोन प्रकारची फुले आहारामध्ये वापरली जात नाहीत. लाल रंगांच्या फुलामध्ये फिनॉलिक संयुगांचे प्रमाण जास्त असल्याने ती अधिक पोषक मानली जातात. मात्र खाण्यासाठी सर्वाधिक पसंती पांढऱ्या फुलांना असते. पांढऱ्या फुलांना जास्त प्रमाणात खाल्ले तरी त्रास होत नाही.

भाजीची चव आता दुर्मिळ

हादगा हे काही व्यावसायिक पीक नाही. दारात, परसात आणि बांधावर अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ही झाडे हमखास दिसायची. लावली जायची. मात्र दात कोरून पोट भरत नाही, हे माहीत असूनही आम्ही बांध कोरून उत्पन्न वाढवायचे प्रयत्न करायला सुरूवात केली. त्यात बांध गेले. बांधावरची रोपे, झाडे गेली. पाणी जिरायचे कमी झाले. त्यावरची ही झाडे गेली आणि झाडापासून मिळणारे फायदेही गेले. त्यामुळे पूर्वी खेड्यात हमखास मिळणारी, जवळच्या शहरातील मंडईत अधूनमधून दर्शन देणारी ही फुले आणि त्याच्या भाजीची चव आता दुर्मिळ झाली. त्यातून कधी चुकून दिसली तर जुनी-जाणती माणसे ती घरी घेऊन येतात, मात्र हे काय आणलंय, असे घरातल्या नव्याकोऱ्या सूनबाई विचारून त्यांची पंचाईत करतात. त्यामुळे आजच्या पिढीतील अनेकांना हादगा आणि त्यापासून बनणारे खाद्यपदार्थ यांची ओळख नाही.

हादग्याची लागवड बियापासून

हादग्याची लागवड करण्यासाठी बिया वापरल्या जातात. एका किलोमध्ये साधारण सोळा ते सतरा हजार बिया असतात. ताज्या हंगामातील बिया असतील तर रूजण्याचे प्रमाण जास्त असते. जुन्या बिया लवकर कीड पकडतात. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक जुन्या बिया लावू नयेत. अपवादात्मक जाड फांद्या लावून झाडे बनवतात. मात्र फांद्यांपासून तयार होणाऱ्या झाडांचे प्रमाण कमी असते. हादग्याच्या बिया द्विदल असतात. या बिया मातीत लावल्या आणि पुरेसे पाणी दिले की रूजतात. मात्र बिया रूजवण्यासाठी थंडीचे दिवस टाळावेत. रोपे ४५ दिवसांत लावण्यास योग्य होतात. फूट-दीड फूट उंचीची रोपे लावण्यासाठी फूट- दीड फूट खोलीचा खड्डा पुरेसा होतो. हादग्याची झाडे काही देशात आंतरपीक म्हणूनही लावले जाते. दोन झाडांमध्ये एक ते दोन मीटर अंतर राखले जाते. विशेषत: शेताच्या बांधावर ही झाडे लावली जातात. इंडोनेशिया, बर्मा या देशात भात पिकांचे वाऱ्यापासून आणि जनावरांपासून रक्षण करण्यासाठी ही झाडे बांधावर जवळजवळ लावली जातात. तीन चार फुट उंच होताच झाडांना छाटून कुंपण बनवतात. ही छाटणी विशिष्ट वेळी आणि मर्यादित स्वरूपात करावी लागते. छाटणी जास्त झाल्यास झाड मरते.

बिया आठ दिवसांत अंकुरतात आणि जांभळ्या रंगांचे कोंब बाहेर येतात. सुरुवातीला दोन पसरट पाने समोरासमोर येतात. त्यांच्यामधून पुढे संयुक्त पाने यायला सुरुवात होते. पानांच्या देठावर पर्णिकांच्या जोड्या समोरासमोर अंडाकृती आकार घेऊन बसलेल्या असतात. सुरुवातीची पाने कमी लांबीची असतात. पुढे मात्र पाने फूट- दीड फूट लांबीची होतात. एका पानावर वीस-तीस पर्णिकांच्या जोड्या दिसतात. पर्णिकांची संख्या सम असते. पर्णिकांचा अंडाकार हा लांबीला दोन सेंटिमीटर आणि रूंदीला एक सेंटिमीटरपर्यंत असतो. पानाचा देठ पिवळसर असतो. मात्र पर्णिका गर्द हिरव्या. मागच्या बाजूचा रंग मात्र फिका असतो. त्यामुळे या झाडाचे सौंदर्य खुलते. झाड दोन महिन्यांत सात आठ फुटांची उंची गाठते. त्याबरोबर त्याला फांद्या यायला सुरूवात होते.

झाडाचा विस्तार दहा-पंधरा फुटापर्यंत

झाड तीसेक फूट उंच होते. हादग्याचे झाड कमालीच्या वेगाने वाढते. याला विरळ फांद्या येतात. दोन तीन वर्षांत ते वीस पंचवीस फूट वाढते. झाडाची सावली जास्त नसते. त्याचा विस्तार दहा-पंधरा फुटांच्या पलिकडे नसतो. हादग्याचे खोड एक ते दीड फुट व्यासापर्यंत वाढते. खोडावरील साल सुरुवातीला पूर्ण हिरवी असते. नंतर ती पांढरी होते. खोड जसे मोठे होईल, तसा तिचा रंग करडा होत जातो. साल नंतर फाटू लागते आणि मोठ्या खोडावर खोल खाचा दिसतात. खाचातून खोलवर फिकट अबोली रंगाची साल दिसते. तर चढाचा भाग हा काळसर करड्या रंगाचा असतो. सालीचा आतील भाग पांढरा असतो. साल वाळताना पिवळी होते.

कळ्या हुबेहुब कैरीसारख्या

या झाडाला वर्ष होता होताच कळ्या यायला सुरुवात होते. पानाच्या पिवळ्या देठाच्या बेचक्यातून कैरीच्या आकाराच्या बारीक हिरव्या कळ्यांचे घोस बाहेर पडतात. छोट्या कळ्या हुबेहुब कैरीसारख्या दिसतात. वाढत असताना त्याचा आकार कोयरीचा होतो. नंतर पाकळ्यांचा पांढरा भाग पुढे सरकत राहतो. दिडेक सेंटिमीटरचा हिरवा भाग हा देठाजवळ असतो. त्यामध्ये सर्व पाकळ्या घट्ट बसलेल्या असतात.

कळया दिसू लागल्यापासून आठ ते दहा दिवसात त्यांचे रूपांतर फुलात होते. कळ्याही वेगाने वाढतात. हादग्याच्या फुलांकडे पाहिले तरी प्रसन्न वाटते. मध्यभागी एक पाकळी असते. त्या पाकळीला स्त्रीकेसर आणि पुंकेसर घट्ट चिकटून बसलेले असतात. त्यांचा लांब दांडा त्या पाकळीच्या शेंड्यापर्यंत आलेला असतो. त्या पाकळीला आधार म्हणून जणू दुसरी पाकळी बसलेली असते. ही पाकळी मध्ये विभागलेली असते. मात्र तिचा शेंडा आणि बुडखा हा सलग असतो. फुलांच्या पाकळ्या या पांढऱ्या किंवा ऑफव्हाईट रंगाच्या असतात. त्यांना सावली देण्यासाठी वरच्या बाजूला नागफणा काढल्यासारखी आणखी एक पाकळी असते. तिचाही रंग पांढराच असतो. मात्र या पाकळीचा सुरूवातीचा भाग हा फिकट गुलाबी रंगाचा असतो. स्त्रीकेसर आणि पुंकेसराच्या दांड्यांच्या पुढील बाजूला पिवळे परागकण असतात. इतर रंगांच्या फुलांची रचनाही अशीच असते.

पक्षांकडून परागीभवन

फांद्यांच्या शेंड्याला कळ्या येतात. एवढ्या सुंदर फुलाकडे कोणीही पहावे आणि प्रसन्न व्हावे, असे ते सौंदर्य. फुलांची लांबी पाच ते सहा सेंटिमीटर असते. फुलांचा खरा बहर ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत असतो. मात्र वर्षभर फुले येतात. एका घोसामध्ये पंधरा ते वीस कळ्या असतात. कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत. या फुलाकडे अनेक कीटक आकर्षिले जातात. मात्र हे कीटक मेवा शोधताना परागीभवनाची प्रक्रिया घडवत नाहीत. या फुलांमध्ये परागीभवन प्रामुख्याने पक्षी घडवून आणतात.

शेंगा गुळदावू रंगाच्या

फुले फुललेल्या अवस्थेत दोन दिवस असतात. नंतर फुलांच्या पाकळ्या सुकू लागतात. पाकळ्यांच्या भोवती असणारे हिरवे आवरणही सुकायला लागते. पुंकेसर/ स्त्रीकेसर असलेल्या दांड्यांमधून हिरवी शेंग बाहेर येऊ लागते. ही शेंग वाढत जाते, तसे सुकलेल्या पाकळ्या आणि वरचे हिरवे आवरण गळून जाते. पोपटी रंगाच्या शेंगा सर्वत्र लोंबकळत असतात. दुसरीकडे शेंड्याला पुन्हा कळ्या आलेल्या असतात. ऐन उन्हाळ्यातील दोन अडीच महिने वगळता झाडाला कायम फुले असतात. त्यामुळे शेंगा येण्याची ही प्रक्रिया सुरूच असते. शेवग्याच्या शेंगांसारख्या या शेंगाही अंगावर रेघा घेऊन येतात. पुढे यांची जाडी अर्धा सेंटीमीटरपर्यंत वाढते. शेंगा आयताकृती असतात. शेंगामध्ये ज्या ठिकाणी बिया असतात, तेवढा भाग फुगीर बनतो. त्यामुळे शेंगांवर चढउतार दिसतात. पुढे त्यांचा रंग पिवळसर व्हायला सुरुवात होते. आतल्या बिया पक्व झाल्या की शेंगा सुकू लागतात. वाळलेल्या शेंगा गुळदावू रंगाच्या दिसतात. प्रत्येक शेंग पंधरा-वीस बिया देते. शेंगा दीड-दोन फुटांपर्यंत लांब होतात.

आकर्षक रंगीत फुलामुळे शोभेचे झाड

हादग्याचे आयुर्मान पंधरा-वीस वर्षांपेक्षा जास्त नसते. त्यावर कीड पडण्याचे प्रमाणही अधिक असते. लाकूड वजनाला हलके आणि कमी उष्मा देणारे असले तरी खेड्यामध्ये ते जळणासाठी वापरतात. अनेक भागात याचे लाकूड तात्पुरत्या कुंपणासाठी वापरले जाते. त्याच्या पानांचा आणि फुलांचा रंग आकर्षक असल्याने अनेकजण बागेत ते शोभेचे झाड म्हणून लावतात. फांद्यांची योग्य वेळी छाटणी करून त्याला हवा तसा आकारही देता येतो. शक्यतो याला कोणी खत घालत नाही. याचे लाकूड मऊ आणि पांढरे असते. त्याचा वापर आगपेटीतील काड्या बनवण्यासाठी केला जातो. कागद बनवण्यासाठीही हादग्याची लाकडे वापरली जातात. हादग्याचे लाकूड वजनाने हलके असते. घनताही कमी असते. वय वाढत जाते, तशी घनता वाढत जाते. मासेमारीमध्ये जाळ्यांना आधार देण्यासाठी ही लाकडे वापरली जातात. बाटल्यांची झाकणे तयार करण्यासाठीही या लाकडांचा उपयोग केला जातो. लाकडापासून मोठ्या प्रमाणात राख तयार होते.

फुलात आढळणारे घटक

या झाडाची पाने, फुले आणि शेंगा मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. शास्त्रीय अभ्यासातून हादग्याच्या फुलांच्या शंभर ग्रॅममध्ये ११३ किलोज्यूल एवढी ऊर्जा असते. त्या शंभर ग्रॅममध्ये ९१.५ ग्रॅम पाणी असते. यात १.२८ ग्रॅम प्रोटिन, ०.०४ ग्रॅम मेद, ०.३८ ग्रॅम मृत्तिका, ६.७३ ग्रॅम कर्बोदके, १८ मिलीग्रॅम कॅल्शियम, ०.८४ मिलिग्रॅम लोह, १२ मिलीग्रॅम मॅग्लेशियम, ३० मिलीग्रॅम फॉस्फरस, १८४ मिलीग्रॅम पॉटेशियम, १५ मिलीग्रॅम सोडियम, ०.८ मायक्रोग्रॅम सेलेनियम, ७३ मिलीग्रॅम जिवनसत्व-क, ०.०८३ मिलीग्रॅम थायमिन, ०.०८१ मिलीग्रॅम रायबोफ्लेवीन, ०.४३ मिलीग्रॅम नायसिन, आणि १०२ मायक्रोग्रॅम फोलेट असते. पांढरी आणि लाल फुले ही प्रामुख्याने खाण्यासाठी वापरली जातात. फुले चवीला कडवट, तुरट असतात. तुलनेमध्ये पांढरी फुले कमी कडवट असतात. हा कडवटपणा घालवण्यासाठी फुलातील पुकेसंर (स्टॅमेन) आणि निदलपुंज (कॅलिक्स) काढून टाकतात.

चवदार भाजी

या फुलांची भाजी करताना ताजी फुले घ्यावीत. सुकलेल्या पाकळ्याची फुले वापरू नयेत. फुलातील पुंकेसर आणि निदलपुंज काढून टाकावेत. त्यानंतर ती फुले स्वच्छ पाण्यात थोडावेळ ठेवून बाहेर काढून पाणी निथळू द्यावे. या फुलावर बारीक काळे किडे येतात. ते सर्व निघून जाण्यासाठी हे आवश्यक असते. अशा स्वच्छ केलेल्या फुलातील पाणी निथळेपर्यंत कांदा मध्यम आकारात कापून घ्यावा. त्यानंतर फुले कापावीत. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण टाकावा. नंतर हळद टाकून त्यामध्ये कांदा चांगला परतू द्यावा. तिखट म्हणून सोलापूरकडे ‘येसूर’ नावाने ओळखले जाणारे काळे तिखट मिळाल्यास उत्तम. नाही तर लाल मिरचीपूड किंवा हिरवी मिरचीही चालते. कांदा चांगला परतल्यानंतर त्यात कापलेली फुले टाकावीत. चवीपुरते मीठ, आवडत असल्यास हिंग पावडर टाकावी. झाकण ठेवून दहा मिनिटांपर्यंत शिजवून घ्यावी. मंद आचेवर शिजवल्यास करपण्याचा धोका नसतो. अधूनमधून भाजी हलवावी. चवदार भाजी ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाताना मांसाहाराची आठवण करून देतात. हादग्याची फुले कमी प्रमाणात असल्यास मूग डाळ वापरली जाते. मूग डाळ भिजवून घ्यावी आणि कांद्याबरोबर ती परतून घ्यावी आणि नंतर फोडणीमध्ये फुले मिसळावीत.

फुलांपासून सूप

इंडोनेेशियामध्ये हादग्याच्या पाकळ्या सॅलडप्रमाणे कच्च्या खाल्ल्या जातात. थायलंड, इंडोनशियाया देशात कोवळी पाने कच्ची खातात. काही भागात फुलांचे सूप बनवले जाते. कच्च्या कळ्यांना थेट अन्नपदार्थ म्हणून खातात. तेथे पुंकेसर आणि निदलपुंज काढत नाहीत. त्यामुळे पदार्थात येणारा कडवटपणा घालवण्यासाठी त्यात नारळाचे दुध आणि लसूण घालतात. या फुलांच्या भजी- पकोड्यांची चव कांदाभजीलाही मागे सारणारी. भजी बनवण्यासाठी नेहमीच्या पकोड्यासाठी करतो, तसेच पीठ तयार करावे. बेसन, तिखट, मीठ, हळद, ओवा हे पदार्थ वापरून पीठ तयार करावे. काही भागात तांदळाचे पीठही मिसळतात. तेल मध्यम आचेवर तापवून फुले पिठात घोळून तेलात सोडावीत. पलटल्यानंतर मंद आचेवर कुरकुरीत तळावीत. सॉससोबत किंवा नुसतीच भजी खाल्ली तरी चविष्ट लागतात. हादग्याच्या फुलांचे भरीत केले जाते. हादग्याची फुले प्रथम दांडे काढून चिरून घेतात. नंतर अर्धवट उकडून घेतात. फुलांमध्ये मीठ आणि साखर मिसळतात. वरून भरीताची फोडणी देतात. फोडणीत मिरचीचे तुकडे घालतात. हादग्याच्या फुलांचे सांडगेही केले जातात. आंबट दह्यात, धणे, जिरेपूड आणि मीठ घालतात. हे सर्व मिश्रण डाळीच्या भरड्या पीठात चांगले मिसळतात. त्यामध्ये फुलांचे तयार केलेले मिश्रण घालून कुस्करतात आणि एकजीव करून सांडगे बनवतात.

पानांमध्ये पोषक घटक

हादग्याची केवळ फुलेच खाण्यासाठी वापरली जातात, असे नाही. पाने मानवाच्या शरीराला आवश्यक असणारे घटक पुरवतात. हादग्याच्या १०० ग्रॅम पानामध्ये ९३ किलोज्यूल ऊर्जा असते. ७३ ग्रॅम पाणी असते. ८ ग्रॅम प्रोटिन, एक ग्रॅम मेद, ३ ग्रॅम क्षार, २ ग्रॅम तंतुमय पदार्थ, १२ ग्रॅम कर्बोदके, ११३० मिलीग्रॅम कॅल्शियम, ८० मिलीग्रॅम फॉस्फरस, आणि ४ मिलीग्रॅम लोह असते. पाने कॅल्शियम आणि लोहाची आगार आहेत. हाडाच्या संवर्धनात हादग्याची पाने महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हादग्याच्या कोवळ्या पानांचीही भाजी केली जाते. पूर्ण हिरवी झालेली कोवळी पाने घ्यावीत. ती पाण्याने स्वच्छ धुवावीत. धुतल्यानंतर त्यातील पाणी निघण्यासाठी ती निथळत कापडामध्ये ठेवावीत. तोपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण टाकावा. नंतर त्यामध्ये कांदा टाकून चांगला परतू द्यावा. हळद गरजेनुसार घालावी. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकून चांगला हलवून घ्यावा. पाणी निथळलेली पाने तयार फोडणीमध्ये टाकून हलवून घ्यावीत. चवीपुरते मीठ घालावे. त्यामध्ये पाणी न टाकता अंगच्या पाण्यावरच शिजू द्यावीत. शेवग्याच्या पानांच्या भाजीप्रमाणे ही भाजीही चवदार बनते.

हादग्याच्या शेंगांची भाजीही चविष्ट असते. यासाठी कोवळया, हाताने मोडल्या जाणाऱ्या शेंगा निवडाव्यात. दोन्ही टोके काढून टाकावीत. श्रावण घेवड्याच्या शेंगाप्रमाणे या शेंगाचे बारीक तुकडे करून घ्यावेत. पुढची भाजीची पाककृती इतर शेंगावर्गीय भाज्यांप्रमाणे करावी. भाजी तयार झाल्यानंतर त्यावर खिसलेले ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. खिसून घातले जाते. ही भाजी विशेषत: कोकण आणि गोव्याच्या ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाते.

पानामध्ये बीटाकॅरोटिन

हादग्याच्या पाना-फुलांमध्ये औषधी गुण आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये डोळ्यांच्या विकारावर हादग्याच्या पानाचे उल्लेख आढळतात. हादग्याच्या पानांमध्ये असणारे बीटाकॅरोटिन, जीवनसत्व-अ हादग्याच्या पानामध्ये गाजरापेक्षा जास्त प्रमाणात असते. हादगा वात, कफ आणि पित्तनाशक आहे. तो पौष्टिक आणि शक्तीवर्धक आहे. हादग्याची फुले आणि पाने अनेक विकारांवर उपयुक्त ठरत असली तरी, त्याचे सेवन मर्यादित – भाजी आणि भजी यापुरते असावे. या भाज्यांच्या अतिसेवनाने पोटाचे विकार सुरू होतात. कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात. फुलांमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ होते. हादग्याची सालही औषधी उपचारासाठी वापरतात. त्वचारोगासाठी पाने उपयोगाला येतात. संधीवाताच्या त्रासावर मुळांचा उपयोग होतो. मात्र असे उपचार आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे हिताचे आहे.

हस्त नक्षत्राचे झाड

याचे पुराण काळापासून महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. हे झाड हस्त नक्षत्राचे म्हणून ओळखले जाते. भगवान शंकराचे प्रिय झाड मानले जाते. ‘सर्वेश्वराय नम:l अगस्ती पत्रं समर्पयामिll’ हा श्लोक अगस्त्य झाडाचे महत्त्व सांगताे. या झाडाला दररोज प्रदक्षिणा घातल्याने सर्व दोषनिवारण होतात, असे मानले जाते. घराच्या कुंपणालगत हा वृक्ष असणे शुभ मानतात. हादग्याची फुले दररोज सूर्याला अर्पण केल्यास पुण्य लाभते, इडापिडा टळते, असाही समज आहे. सूर्य जन्म नक्षत्रावेळी पाण्यात टाकून स्नान केल्यास आरोग्य चांगले लाभते, असाही समज आहे. फुले पितृपुजेमध्ये महत्त्वाची मानतात. अगस्त्य म्हणजे चैतन्याचा विस्तार होय. दररोजच्या पूजेत हादग्याच्या फुलाचा समावेश केल्यास पुण्य लाभते, असे मानतात. हादग्यापेक्षा अनेक फुले सुंदर दिसतात. मात्र हादग्याला हे महत्त्व देण्यामागे त्याचे औषधी गुणधर्म कारण असावेत.

झाडावरून एक उत्सव

हादग्याच्या झाडांचा शेतीत फार चांगला उपयोग होतो. द्विदल वनस्पतींच्या मुळांप्रमाणेच हादग्याच्या मुळावर गोळे आलेले असतात. हादग्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. हादग्याची पाने, फुले, शेंगा जमिनीत पडतात. कुजतात. माती भुसभुशीत करतात. अनेक रोपवाटिकांमध्ये रोपांना सावली देण्यासाठी हादग्याच्या झाडांची लागवड केली जाते. हादग्याच्या झाडांचा प्रसार बियापासून होतो. वेगाने होतो. मात्र बिया दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. हादग्याचे झाड अत्यल्प पावसाच्या प्रदेशात जसे वाढते, तसेच अतिपावसाच्या प्रदेशातही चांगले वाढते. आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे अनेक आहेत. तसेच याच्या अतिसेवनाने पोटाचे विकारही सुरू होतात. असे हे वेगळ्या प्रकारचे झाड आज कोणी त्याला विदेशी म्हणो किंवा देशी; या मातीने त्याला स्वीकारले आहे. ते या मातीचे झाले आहे. ते इथल्या संस्कृतीमध्ये इतके मिसळले आहे, की या झाडावरून एक उत्सव साजरा केला जातो.

भुलाबाईचा उत्सव

नवरात्रामध्ये महाराष्ट्रात हादगा नावाचा उत्सव साजरा होतो. हस्तग म्हणजे सूर्य. सूर्य हस्त नक्षत्रात जातो, तो काळ या उत्सवाचा असतो. हस्त नक्षत्रात हत्ती बुडेल इतका पाऊस पडावा, असे शेतकऱ्यांना वाटते. असा पाऊस पडला की रब्बी पिक हमखास येते, असे मानले जाते. अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. याला भुलाबाईचा उत्सव, भोंडला अशा नावांनीही ओळखले जाते. भुलाबाईच्या खेळामागे एक लोककथा प्रचलित आहे. एकदा शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. पार्वतीने खेळात शंकराला हरवले. हरलेल्या शंकराला पार्वती चिडवू लागली. शंकर चिडले. रागाने जंगलात निघून गेले. पार्वतीला आपण जरा जास्तच चिडवले, याची जाणीव झाली. शंकराला मनवण्यासाठी पार्वती त्यांच्या शोधात जंगलात गेली. पार्वतीने शंकराला शोधण्यासाठी भिल्लीणीचे रूप धारण केले. भिल्लिणीच्या रूपात ती शंकराला शोधू लागली. या कथेनुसार भिल्लीण या शब्दाचा पुढे अपभ्रंश होवून भुलाबाई आणि शंकर म्हणजे भोलेनाथ, भुलोबा किंवा भुलोजी झाले. भुलाबाई ही विश्वाची जननी. भूमीप्रमाणे सृजनशील. भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंकर. पार्वती ही निर्मितीचे प्रतिक – शक्ती आणि शंकर म्हणजे बीज. शिव-शक्तीची पूजा या खेळात मांडली जाते. हा पूर्णत: स्त्रीप्रधान उत्सव आहे. काही भागात भुलाबाई आणि भुलोबाची मातीची मूर्ती बसवली जाते. सुंदर मखर सजवून त्यात या मूर्ती ठेवतात.

‘ऐलमा पैलमा गणेशदेवा…

काही भागात या खेळामध्ये, जमिनीवर, भिंतीवर किंवा पाटीवर हत्तीचे चित्र काढले जाते. या चित्राला पानाफुलांनी सजवले जाते. त्या हत्तीला खूप छान सजवतात. यामध्ये हादग्याच्या फुलाचाही समावेश असतो. हस्तग या शब्दावरून पुढे हादगा हे नाव या उत्सवाला आले असावे. नंतर त्या हत्तीच्या समोर किंवा त्याभोवती फेर धरून मुली फिरत गाणी म्हणतात. त्यांना हदग्याची किंवा हादग्याची गाणी म्हणतात. सोळा दिवसांत रोज एका नव्या गाण्याची भर पडत जाते. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन… अशी सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हणली जातात. ‘ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा’, हे गाणे पहिले असते. या गाण्यांत विशेषत: पावसाची गाणी, निसर्गाची गाणी यावर भर असतो. सोळा दिवस सोळा मुलींच्या अंगणात हा खेळ रंगतो. जिच्या घरी हादगा असतो, तिच्या घरी श्रमपरिहार आयोजित केला जातो. याला खिरापत म्हणतात. खिरापतीच्या पदार्थांचीही संख्या दररोज वाढवली जाते. हा खाऊ कोणता आहे, हे ओळखण्याचा मनोरंजक सवाल-जवाबाचा कार्यक्रम रंगतो. छोट्या मुलांना अनेकदा कडेवर घेतले जाते किंवा मध्ये बसवतात. मात्र दहा-बारा वर्षांपुढील मुलांना तेथे प्रवेश निषिद्ध असतो. हा खेळ बघणे खूप गंमतीचे असे.

पुढे आम्ही जरा मोठे झाल्यावर खेळावेळी आमचा प्रवेश निषिद्ध झाला. यावर आम्ही भारी उपाय शोधला. ज्याच्या घरी हादगा असायचा त्याच्या घराच्या माळवदावर जाऊन आम्ही हा खेळ बघत असायचो. सासरहून आलेल्या माहेरवाशिण आपल्या सुखदु:खाच्या गोष्टी आपल्या मैत्रीणीना सांगायच्या. मने हलकी करायच्या आणि सण संपल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने, उत्साहाने सासरी जायच्या. कालपरत्वे यात बदल होत गेले. स्थलपरत्वेही हा उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक आढळतो. काही ठिकाणी हत्तीच्या प्रतिमेऐवजी हादग्याच्या झाडाची फांदी मध्यभागी ठेवली जाते. काही ठिकाणी शंकर, पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. पार्वतीची गाणी गातात. ही पार्वती म्हणजेच भुलाबाई. गुजरातमधील गरब्याचे मूळ या गाण्यात आहे, असे लोकसंस्कृतीच्या अभ्यासकाचे मत आहे. गाण्यांची आणि खिरापतींची संख्याही अनेक ठिकाणी वेगवेगळी आढळते. या उत्सवाला भोंडला असेही म्हणतात. या उत्सवातील गाण्यांना भोंडल्याची गाणी म्हणतात. हदग्याची गाणी सर्वात जुन्या लोकगीतापैकी मानली जातात. भारतातील काही भागात हा उत्सव संक्रातीच्या काळात साजरा केला जातो.

Related posts

दरडी का कोसळतात?

पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?

गरज जागे होण्याची…

Leave a Comment