
पावसाळ्यात ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे बालगीत मुले एक दोन दिवसाच्या सुट्टीसाठी म्हणत असतात. पण आता मात्र कधीच न संपणाऱ्या सुट्टीला मुले अगदी कंटाळून गेली आहेत. त्यामुळे आता ‘भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, या वर्षी तरी आमची शाळा सुरु होईल काय’ ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सौ. सरीता सदानंद पाटील
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे
मुलाची पुस्तके आणण्यासाठी मी बाजारात म्हणजेच नौपाडा, ठाणे येथे गेले होते. मी, माझी दुचाकी, अन् मुलगी दहावीपर्यंत ज्या शाळेत जात होती त्या शाळेच्या बाजूला म्हणजेच सौ.ए. के जोशी इंग्रजी मध्यम शाळेच्या बाजूला पार्क केली आणि पुस्तके आणण्यास दुकानात जात होते. सहज माझे शाळेकडे लक्ष गेले. शाळेचे गेट बंद आणि गेटच्या आत थोडासा अंधार आणि मनाला स्पर्शून गेली ती भयाण शांतता.
वेळ साडे बारा-एकची म्हणजे शाळा सुटण्याची होती. एरवी शाळेचा आवार आणि आजूबाजूचा रस्ता आगदी चिमुकल्यांच्या कलकलाटाने गजबजून गेलेला असतो, पण आज मात्र त्या परिसरात मुलांविना शांतता होती. १५ जूनच्या सुमारास पहिली ते दहावीपर्यंतची मुले शाळा सुटल्यानंतर अगदी हातात पाण्याची बाटली, छत्री घेऊन आपली रिक्षा, बस किंवा मोटर पकडण्यासाठी धावत गोंगाट करत जात असतात. कोण छत्री, कोण रेनकोट घालून, कोण रस्त्यातील पावसाचे पाणी पायाने उडवत आपापली गाडी पकडत असतात. कोणाचा शर्ट बाहेर आलेला असतो, कोणाचा टाय सैल झालेला असतो, पण चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत असतो. कोण शाळेत खायचा अर्धा राहिलेला डबा खात असते, तर कोण बसमधील जागेवरून एकमेकांशी ‘तू तू मी मी’ करत गाडी चालू व्हायची वाट बघत असतात. तर कोण गाडीवाल्या काकांकडे मित्र मैत्रिणींची तक्रार करत असतात. गाडीमध्ये सुद्धा एकाच गोंगाट असतो. पण ह्या सर्वांचा बालपणातील आनंद मात्र अवर्णनीय असतो. हा आनंद आज कुठेतरी हरवलेला दिसतोय शालेय जीवनातील आनंद बाहेर कितीही पैसे खर्च केला तरी कुठेच मिळत नाही.
१५ जूनला पाऊस आणि शाळा दोन्ही सुरु झालेले असतात. जी मुले बालवाडी, छोटा शिशु वा मोठा शिशु या वर्गात नवीन प्रवेश घेतात त्या मुलांचे तर पहिल्या दिवशी शाळा फुग्यांनी, फुलांनी सुशोभित करुन स्वागत केले जाते. कांही चिमुकली तर शाळा नवीन असल्यामुळे रडत असतात. त्यांचे आई-वडील, शिक्षक त्यांना समजावत असतात. या सुमारास शाळेत येताना आणि सुटल्यानंतर आजूबाजूचा २०० मीटरचा परिसर आणि त्यांना आणण्यासाठी आलेल्या वाहनांनी भरून गेलेला असतो. पावसाळा आणि शाळा एकदमच सुरु होत असल्यामुळे सर्व मुलांना नवीन गणवेश, नवीन दप्तर, पुस्तके, रेनकोट, पावसाळी चप्पल आदी सर्व कांही नवीन त्यामुळे मुले खूप आनंदात असतात. दुपारच्या मधल्या सुट्टीत एकमेकांत पोळी –भाजीचा डब्बा वाटून खातानाची मज्जा कांही औरच असते. ती इतरत्र कुठेच मिळत नाही. शिवाय शाळेमधून आयुष्यभर पुरणारे अभ्यासाचे, शिस्तीचे, मोठ्यांचा आदर करण्याचे धडे जे शिक्षक देत असतात. ते खूप अनमोल असतात. मुले आपल्या शिक्षकांचे अनुकरण करत असतात. ऑनलाईन शिक्षणामध्ये हे सर्व मिळेलच असे नाही. मुले ही शाळेतच घडली आणि घडवली जातात. एरवी सुद्धा शाळेच्या बाजूने जाताना कधी मुले खेळतानाचा, कधी ते पाढे म्हणताना तर कधी प्रार्थना म्हणतानाचा आवाज कानात गुंजत असतो. पण आता मात्र ह्या सर्व गोष्टीना म्हणजेच बालपणातील आनंदाला मुले पारखी झाली आहेत. कोरोनाच्या साथीने हा आनंद हिरावून घेतला आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शाळा अगदी मुलांविना ओस पडल्या आहेत. शाळेतली बाके, फळे, तक्ते वा घंटा सर्व कांही मुलांविना मुकेच झाले आहेत. त्यामुळं हा जीवघेणा कोरोना लवकरात लवकर जावून मुलांची शाळा पाहिल्याप्रमाणे चालू व्हाव्यात अशी सर्व पालकांची इच्छा आहे. जवळ जवळ ५ ते ६ दशकातील किंबहुना जास्तच काळातील ही सलग एक-दीड वर्षे शाळा बंद पडण्याची बहुदा पहिलीच वेळ असेल. मुलांच्या, शिक्षकांच्या आणि सर्वात महत्वाचे शाळेच्या घंटेच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर गजबजून गेलेला असतो. सर्वच शाळांच्या आजूबाजूला हीच परिस्थिती आहे. पण सौ .ए. के जोशी इंग्रजी माध्यम व बेडेकर विद्यामंदिर मराठी माध्यम ह्या दोन्ही शाळा मुख्य बाजारच्या ठिकाणी असल्यामुळे शुकशुकाट खूपच जाणवत होता.
पावसाळ्यात ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे बालगीत मुले एक दोन दिवसाच्या सुट्टीसाठी म्हणत असतात. पण आता मात्र कधीच न संपणाऱ्या सुट्टीला मुले अगदी कंटाळून गेली आहेत. त्यामुळे आता ‘भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, या वर्षी तरी आमची शाळा सुरु होईल काय’ ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणून ‘बालपणीचा काळ सुखाचा’ हे अगदी योग्य आहे.
शासनाने सुद्धा आटोकाट प्रयत्न करुन रोज २० – २० मुलांचे गट करुन अंशतः का असेना शाळा सुरु करण्याचे निर्देश शाळांना द्यावेत. शाळेमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक क्रीडा महोत्सव, आंनद यात्रा आणि मुख्य म्हणजे ह्या सर्व दिवशी मुलांनी वर्षभर केलेल्या मेहनतीची बक्षिसे मिळत असतात. दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन झाल्यानंतर ही बक्षिसे घेताना मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टींचा अभावच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील मुले यासाठी सरावलेली नाहीत. शिवाय शहरातील छोट्या घरांमध्ये ऑनलाईन तासिका चालू असताना इतर घरातील माणसांचे अडथळे येतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये तर अड्थळयांचे न बोललेलेच बरे.
कालच बातमी वाचली कि ठाणे जिल्ह्यामध्ये ४२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर २५ शाळांना टाळे लागलेले आहे. एकूण १५,००० मुलांचे शिक्षण धोक्यात आलेले आहे. दारिद्र्य रेषेखालील मुलांच्यात आधीच शाळेविषयी नकारात्मक भावना असते आणि आता तर ही भावना वाढीस न लागली तर नवलच नाही का ? काही संस्थाचालकांनी तर शाळा विकायला काढल्या आहेत. हे वाचून एकविसाव्या शतकात कुठे नेऊन ठेवलाय भारत देश माझा ? हेच सामान्य काय सर्वच लोकांना वाटतय आणि हे सर्व देशाला अधोगतीकडेच नेणारे आहे. निदान ऑगस्टपासून तरी शाळा अंशतः चालू कराव्यात त्यासाठी पालकांच्याकडून अंडरटेकिंग घेण्याची गरज नाही, असे वाटते. शहरातल्या जवळजवळ ८० टक्के पालकांकडे दुचाकी तर असतेच किंवा आजूबाजूच्या पालकांकडील मोटारीमधून कारपुलिंग करता येईल. रिक्षा व मोटारीमधून मोजकी मुले पाठवता येतात, त्यामुळे चालकांनाही रोजगार मिळेल. शासनाने निर्देश काढले कि, सगळ्यांनाच आपोआप धाडस होईल. हा सर्व सारासार विचार करुन शासनाने शाळा चालू करणेबाबत डोळसपणे बघावे, अशी सर्व पालकांच्यावतीने मी विनंती करत आहे. मला आशा आहे कि नक्कीच काही तरी या बाबतीत सकारात्मक घडेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.